महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी त्यांची संघटनशक्ती दाखवणे, ही काळाची आवश्यकता ! – संपादक 

आपण ज्या हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत आहोत, त्या स्वरूपाच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० पेक्षा अधिक ऐतिहासिक दुर्ग बांधले आणि काही दुर्ग जिंकून घेतले. आर्य चाणक्यांनी बलशाली राष्ट्राची जी ७ शक्तीस्थाने सांगितली, त्यामध्ये दुर्गसंपत्ती हे एक स्थान आहे. गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. आज मात्र या गड-दुर्गांचे षड्यंत्रपूर्वक इस्लामीकरण केले जात आहे. एरव्ही गड-दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी एक वीट जरी इकडची तिकडे करायची म्हटली, तरी पुरातत्व विभाग अनेक नियम-चौकटी यांचा पाढा वाचतो; मात्र कित्येक गड-दुर्गांवर आज अनधिकृत थडगी, मजार, दर्गा, मशिदी बिनदिक्कतपणे उभ्या रहात असतांना त्याकडे कानाडोळा करतो. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज एकप्रकारे ‘लँड जिहाद’चा बळी ठरत आहेत.

१. गडाचे इस्लामीकरण करण्याची पद्धत

गड-दुर्गांवर थडगी बांधणे, नंतर त्यावर हिरवी चादर चढवणे, हळूहळू तेथे उरूस साजरा करून काही वर्षांनी ती जुनी परंपरा असल्याचे भासवणे आणि नंतर दर्गा उभारून ते धार्मिक केंद्र बनवणे, ही गडांचे इस्लामीकरण करण्याची एक नियोजनबद्ध पद्धत आहे. ज्यांचे हिंदवी स्वराज्यासाठीचे योगदान ठाऊक नाही, ज्यांची नावेही सर्वसामान्यांना ठाऊक नाहीत, अशा तथाकथित फकिरांच्या नावाने गड-दुर्गांवर दर्गे बांधणे, हा एका व्यापक षड्यंत्राचा भाग आहे.

श्री. मनोज खाडये

२. गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणांची प्रातिनिधिक उदाहरणे

२ अ. प्रतापगड : जागतिक स्तरावर छत्रपती शिवरायांच्या ज्या युद्धांचा अभ्यास केला जातो, त्यातील एक म्हणजे अफझलखानशी झालेले युद्ध ! छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते क्षेत्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील
प्रतापगड ! या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचे थडगे आहे; मात्र त्याचे उदात्तीकरण करून तेथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश देऊन अनेक वर्षे होऊनही अद्याप त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

२ आ. रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरही अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. किल्ल्यावरील ‘मदार मोर्चा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी ‘मशीद मोर्चा’ असल्याचा अपप्रचार करून त्या जागेला पांढरा रंग फासून तेथे हिरवी-लाल चादर चढवण्यात आली होती. याविषयी ‘सोशल मीडिया’तून आवाज उठल्यानंतर ते अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.

२ इ. लोहगड : पुणे जिल्ह्यातील लोहगडावर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. इतकेच नाही, तर कोरोनाच्या काळात गड-दुर्गांवर प्रवेशबंदी असतांनाही लोहगडावर पोलिसांच्या उपस्थितीत उरुस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या काळात लोहगडावरील अवैध थडग्याच्या भोवती ५-६ फूट उंचीच्या पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. या भिंतींसाठी गडावरीलच दगड वापरण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची पहाणी करूनही अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. हिंदुत्वनिष्ठांनी निवेदने आणि तक्रारी यांच्या माध्यमातून लोहगडावर होणार्‍या अनधिकृत उरुसावर बंदी घालण्यात यावी, यासाठी प्रयत्न केले; मात्र पोलिसांनी अनधिकृत बांधकामे करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाच नोटीस पाठवली.

२ ई. श्रीक्षेत्र मलंग गड : श्री मलंगगडावर नवनाथांपैकी श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ अशा ७ नाथांच्या समाध्या आहेत, श्री मच्छिंद्र या शब्दाचा भाषिक अपभ्रंश मलंग असा होतो. ‘श्री मलंगबाबा’ यांच्या समाधीवरच ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ यांच्या नावाचा दर्गा उभारून ‘श्रीक्षेत्र मलंगगडा’चे नाव ‘हाजी मलंग’ असे प्रचलित करण्यात आले आहे.

२ उ. दुर्गाडी गड : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. श्री दुर्गादेवीचे मंदिर हे मशीद असल्याचा दावा वर्ष १९६८ मध्ये मुसलमानांनी केला. याविषयी १९७० मध्ये जिल्हाधिकार्‍यांनी एक नोटीस काढून ‘दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिरच आहे’, असा निर्णय दिला; मात्र मंदिराच्या मागील बाजूला ईदच्या दिवशी वर्षातून २ वेळा नमाजपठण करावे, यासाठीही अनुमती दिली. याचे स्तोम वाढत जाऊन गडाच्या अर्ध्या भागावर हिंदूंना प्रवेश बंदीही करण्यात आली आहे. बकरी ईद आणि रमजान ईद या दिवशी तर केवळ भाविकांना नाही, तर पुजार्‍यांनाही मंदिरात प्रवेशबंदी केली जाते. मंदिराची घंटाही बांधून ठेवली जाते.

२ ऊ. शिवडी किल्ला : मुंबईतील शिवडी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह नावाचा दर्गा बांधण्यात आला आहे. दर्गा आणि तत्सम इस्लामी वास्तूंसाठी अनधिकृतपणे १ एकर जागा कह्यात घेतली आहे. दर्ग्यावर जाण्यासाठी स्वतंत्र पक्का रस्ता बांधण्यात आला असून त्याच्या प्रवेशद्वारावर दर्ग्याच्या नावाची मोठी कमान बांधण्यात आली आहे. गडाच्या प्रवेशद्वाराबाहेरच अनेक हिरवे ध्वज लावण्यात आले आहेत. गडापेक्षाही तेथे दर्ग्याचेच उदात्तीकरण करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

२ ए. कुलाबा दुर्ग : शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील कुलाबा दुर्गावरही अवैध थडगे बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गडावरील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच सिमेंट आणि लाद्या यांचे पक्के बांधकाम करून थडगे उभारण्यात आले होते.

२ ऐ. माहिम गड : मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहिम गडावर धर्मांधांनी अतिक्रमणे करून संपूर्ण गडच बळकावला आहे. हा गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे; मात्र गडावरील धर्मांधांची वस्ती पहाता हा गड संरक्षित नाही, तर पूर्णपणे वार्‍यावर सोडला गेल्याचे लक्षात येते.

३. हिंदु जनजागृती समितीचे ‘गड-दुर्ग रक्षण आंदोलन’

या विरोधात समितीने आंदोलन उभारून गडाच्या इस्लामीकरणाला चाप लावला.

३ अ. विशाळगड : कोल्हापूर जिल्ह्यात असलेला आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानाने पावन झालेला विशाळगडही इस्लामी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. गडाच्या पायथ्याशी नरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीही पूर्णतः दुर्लक्षित आहेत. कित्येक वर्षे या समाधीस्थानांवर छप्परही नव्हते. तेथे जाण्यासाठी असलेली पायवाट अत्यंत जिकिरीची आहे. दुसरीकडे गडावरील रेहान बाबाच्या दर्ग्याचा दिवसागणिक अनधिकृत विस्तार होत आहे. या दर्ग्याकडे जाण्यासाठी सरकारने ५ लाख रुपये खर्च करून ‘पेवर ब्लॉक’चा रस्ता केला आहे. याच गडावर लाश रोझा दर्गा बांधण्यात आला आहे, याउलट गडावरील ३२ हून अधिक मंदिरांची पडझड झाली आहे. गडावरील घोड्याच्या टापेचे पाणी या ऐतिहासिक स्थळाची ‘रेहानबाबाचे तीर्थ’ म्हणून ओळख पसरवली जात आहे. गडावर १०० हून अधिक आर्.सी.सी. बांधकामे झाली असून या बांधकामांना परवाने कुणी दिले ? याचे उत्तर ना स्थानिक ग्रामपंचायतीकडे आहे ना पुरातत्व विभागाकडे !

हे समोर आल्यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून हिंदु जनजागृती समितीने स्थानिक शिवप्रेमी संघटनांना एकत्र करून विशाळगड अतिक्रमणविरोधी समिती स्थापन केली. या अतिक्रमणविरोधी समितीच्या माध्यमातून ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा’ ही मोहीम चालू केली. त्या अंतर्गत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना भेटून निवेदने देण्यात आली. सोशल मिडिया, ट्विटर ट्रेंड या माध्यमांतून जागृती करण्यात आली. परिणामी जिल्हाधिकार्‍यांना विशाळगडावरील अतिक्रमण तोडण्यासाठी नोटीस काढावी लागली. जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णपणे काढले जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार आहे.

३ आ. वंदनगड : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये वंदनगड या ठिकाणी हिंदूंचे पुरातन शिवमंदिर आहे. गडाच्या पायथ्याशी असणार्‍या काही शिवप्रेमींनी या ठिकाणी भाविकांसाठी पत्र्याची शेड उभारली होती. याविषयी काही धर्मांधांनी वनविभागाच्या भूमीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार वाई वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली होती. या वेळी वनविभागाशी पत्रव्यवहार करतांना धर्मांधांनी वंदनगडाचा उल्लेख हेतुपुरस्सर ‘पीर ए वंदनगड’, असा केला होता. ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीला समजल्यानंतर याची दखल घेत समितीने याविषयी निवेदन दिले. याविषयी वन विभागाने खुलासा करावा, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याची चेतावणी समितीने दिली होती. त्यानंतर वाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस्.एस्. मगर यांनी ‘वनविभागाकडून कधीही वंदनगडाचे नाव पालटण्यात आलेले नाही आणि यापुढे पालटण्यात येणारही नाही’, अशी लेखी हमी पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीला दिली.

आता आपण पाहिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ‘लँड जिहाद’च्या अंतर्गत कित्येक गड-दुर्ग, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थाने यांना इस्लामी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

४. पुरातत्व विभागाची निष्क्रीयता

प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थल अवशेष नियम १९५३ मधील कलम १९ आणि नियम ८, तसेच अधिनियम १९५९ च्या नियम ९ यांनुसार प्राचीन स्मारक किंवा त्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी आहे. त्यामुळे प्राचीन स्मारकांमध्ये समावेश असलेल्या शिवकालीन गडांवर पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना एक खिळाही ठोकता येत नाही. इतके कडक नियम असतांनाही राज्यातील गड-दुर्गांवर थडगी, दर्गे यांची अवैधपणे पक्की बांधकामे करण्यात येत असून त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी करूनही कोणती कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाचा पांढरा हत्ती पोसायचा कशासाठी ?, असा प्रश्न उपस्थित होतो.

दुर्गांना दर्ग्यांमध्ये रूपांतरित झालेले पहायचे नसेल, तर वैयक्तिक किंवा संघटनात्मक पातळीवर वैध मार्गाने कृतीशील व्हायला हवे. हिंदु जनजागृती समितीने गडरक्षणाचे पावित्र्य रक्षण करण्यासाठी मोहीम चालू केली आहे. आपण एकत्रितपणे आंदोलन उभारून गड-दुर्गांचे, ऐतिहासिक-सांस्कृतिक स्थानांचे पावित्र्यरक्षण होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया.

– श्री. मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (२४.५.२०२२)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​