Menu Close

भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा

western_infuence

भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्‍या व्हायच्या. सध्या मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘सारी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होतात. महाविद्यालयांच्या उपहारगृहांतील उसळ-मिसळची जागा आता महागड्या ‘पिझ्झा-बर्गर’ने घेतली आहे. ८० टक्क्यांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ यांसारख्या पुरुषी वेशांत महाविद्यालयांत विद्येचे धडे घेतांना दिसतात. पूर्वी चित्रपटांतही क्वचितच दिसणार्‍या ‘मिडी-मिनी’वेषातील मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात वावरतांना दिसतात. मुंबईतील एका संस्थेने केलेल्या चाचणीनुसार सध्याच्या बहुसंख्य मुलींचे कौमार्य वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच भंग होते. पुरोगामित्त्वाच्या नावावर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने युवापिढीचा असा र्‍हास होत चालला आहे. आजची युवापिढी केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून त्यांचे लांगूलचालन करण्यातच आपली धन्यता मानू लागल्याने आपली मूळ हिंदु संस्कृती हरवत चालली आहे. परिणामी आजची युवापिढी दिशाहीन आणि ध्येयहीन झाली आहे. संस्कृतीला अनुरूप कृती करणे, हे आजच्या पिढीला लज्जास्पद वाटते. पाश्चात्त्यांच्या पावलांवर पावले टाकून आज आपणसुद्धा (हिंदू) १ जानेवारी हा आपला वर्षारंभ मानून आदल्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

भारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. आपला तरुणवर्ग मात्र पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.