धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी योगदान देण्याची आवश्यकता !

१. धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय ?

अ. हिंदूंचे हित जपणारे राष्ट्र !

आ. राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था ! : काही जणांना ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले की, एखाद्या राजकीय पक्षाने मांडलेली त्याच्या लाभाची संकल्पना आठवते; पण ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था असेल.

इ. ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था म्हणजे ‘ईश्वरी राज्य’ ! : ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापी ‘हिंदू राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.

ई. जनहितकारी पितृशाही असलेले ‘आदर्श राज्य’ ! : त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाज, कर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासन, ही या ‘हिंदू राष्ट्रा’ची वैशिष्ट्ये असतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा बाळगणारे, तसेच समाजहितासाठी निःस्पृहपणे अहोरात्र झटणारे राज्यकर्ते, हे या ‘हिंदू राष्ट्रा’चे आधारस्तंभ असतील. असे ‘हिंदू राष्ट्र’ जगातील एक ‘आदर्श राज्य’ असेल !

२. धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी योगदान देण्याची आवश्यकता !

सध्याच्या निधर्मी, भ्रष्ट, स्वार्थलोलुप, जात्यंध आणि देशाभिमानशून्य राज्यप्रणालीतच सर्व जण गुंतून पडले आहेत. या राज्यप्रणालीने निर्माण केलेल्या प्रदूषणामुळे ‘हिंदू राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’, म्हणजेच ‘हिंदू राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘सर्वधर्मसमभावी राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा’ रंग फासण्याचा खटाटोप केला जात आहे. ‘रामराज्य’ म्हणजे ‘हिंदू राष्ट्र’ येथे प्रत्यक्षात अवतरूनही त्याला आज एक ‘दंतकथा’ म्हणवून हिणवले जात आहे. ‘हिंदू राष्ट्र म्हणजे धर्मांधता’, असा समज हेतूपुरस्सर रूढ केला जात आहे; मात्र हा अपप्रचार आहे. छत्रपती शिवरायांच्या ‘हिंदू राष्ट्रा’चा आदर्श घेऊन वर्ष २०२३ मध्ये भारतात एक संपन्न, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारे अन् ‘रामराज्या’चे दर्शन घडवणारे ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होईल !

‘हिंदू राष्ट्राची स्थापना होईल’, अशी आशा निर्माण होण्यासारख्या कोणत्याही घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदू राष्ट्रा’विषयी इतक्या ठामपणे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना त्या उज्ज्वल अशा उद्याच्या ‘हिंदू राष्ट्रा’ची चाहूल लागली आहे !

अ.धर्मसंस्थापनेसाठी योगदान देणे, हे धर्मकर्तव्यच आहे ! : आधुनिक भाषेत आपण ज्याला ‘राष्ट्ररचना’ म्हणू, त्याला संस्कृत भाषेतील धर्मग्रंथांमध्ये ‘धर्मसंस्थापना’ हे नाव आहे. अशी धर्मसंस्थापना, म्हणजेच ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे, हेच सद्यस्थितीत सर्व दृष्टीकोनांतून श्रेयस्कर आहे. प्रत्येक हिंदु धर्मियाने त्या दिशेने प्रयत्न करणे, ही प्रत्येकाची साधना किंवा धर्मकर्तव्य आहे. धर्मसंस्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे घटक आवश्यक असतात. राष्ट्रासाठी साधनेच्या बळावर ‘ब्राह्मतेजा’ची जोपासना करण्याचे कार्य बहुतांश संत आणि ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक संस्था करत आहेत, तर राष्ट्राची दुःस्थिती पालटण्यासाठी राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी संस्था, काही नियतकालिके आणि अनेक विचारवंत अनुक्रमे शारीरिक, मानसिक अन् बौद्धिक स्तरावर प्रत्यक्ष कार्य, अर्थात् ‘क्षात्रतेजा’ची जोपासना करत आहेत. या कार्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

अ १. शारीरिक : धर्मसंस्थापनेसाठी प्रत्यक्ष देहाने कृती करणे, उदा. प्रत्यक्ष धर्महानी रोखणे, धर्महानीविरुद्ध आंदोलने करणे इत्यादी. याला काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.

अ २. मानसिक : ‘राष्ट्रभावना आणि धर्मभावना जागृत झाल्याविना कृती होत नाही’, या तत्त्वानुसार हिंदूंचे धर्मसंस्थापनेसाठी प्रबोधन करून त्यांना कृतीप्रवण करणे, उदा. वृत्तपत्रे, नियतकालिके यांत प्रबोधनपर लिखाण करणे, व्याख्याने देणे इत्यादी. यालाही काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.

अ ३. बौद्धिक : धर्मसंस्थापनेसाठी हिंदु समाजाला दिशा देणे, उदा. हिंदूंवरील संकटांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे, संघटनांना वैचारिक बळ करणे इत्यादी. यालाही काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.

अ ४. आध्यात्मिक : धर्मसंस्थापनेच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कार्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी उपासना करणे, उदा. एखादे कार्य सिद्धीस जाण्यासाठी नामजप, यज्ञयाग आदी उपासना करणे. याला काळानुसार ७० टक्के एवढे सर्वाधिक महत्त्व आहे. काळानुसार प्रत्येक हिंदूने धर्मसंस्थापनेसाठी स्वक्षमता आणि साधना यांनुसार क्षात्रतेजाचे आणि ब्राह्मतेजाचे कार्य करणे, म्हणजे धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेत प्रत्यक्ष सहभागी होणे होय !

आ. हिंदूंनो, ‘हिंदू राष्ट्र-स्थापने’च्या धर्मकार्यासाठी असे योगदान द्या !

१.‘हिंदू राष्ट्र-स्थापने’साठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत सक्रीय व्हा ! यासाठी प्रतिदिन स्वतःचा न्यूनतम १ घंटा (तास) तरी द्या !

२. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे आणि अन्य माध्यमांतून ‘हिंदू राष्ट्र-स्थापनेची आवश्यकता’ याविषयी जनजागृती करा !

३.प्रसारमाध्यमे, संकेतस्थळे इत्यादी माध्यमांतून ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेचा विचार प्रसारित करा !

४.‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कार्यरत व्यक्ती आणि संघटना यांना स्वक्षमतेनुसार अर्थसाहाय्य करा !

५.‘हिंदू राष्ट्र-स्थापने’चे कार्य करणार्‍यांना साहाय्यभूत कृती करा, उदा.

अ. शिक्षकांनी शाळांमध्ये ‘हिंदू राष्ट्रा’च्या संकल्पनेचा प्रसार होण्यासाठी छ. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी राष्ट्रपुरुषांचे स्मृतीदिन साजरे करणे

आ. अधिवक्त्यांनी (वकिलांनी) ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कार्य करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य निःशुल्क करणे

इ. पत्रकारांनी वृत्तपत्रांत ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेचे महत्त्व सांगणारे लेखन करणे

ई. शासकीय सेवेत असणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रचलित प्रशासन व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून त्या त्रुटी धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्रात न रहाण्याच्या दृष्टीकोनातून उपाय शोधणे

उ. व्यापार्‍यांनी ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कार्यरत व्यक्ती आणि संघटना यांना प्रतिमास वस्तूरूपाने किंवा द्रव्यरूपाने अर्पण देणे

ऊ. वाचनालयांनी ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेचा विचार प्रसारित करणारे ग्रंथ उपलब्ध करून जनप्रबोधन करणे

ए. हिंदू संघटनांनी ‘लव्ह जिहाद’चा प्रतिकार’, ‘धर्मांतरितांचे शुद्धीकरण’, ‘गोरक्षण’, ‘गंगा शुद्धीकरण’ इत्यादी उपक्रमांसह धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना होण्यासाठी जागृतीपर उपक्रम राबवणे

ऐ. वेदपाठशाळा आणि पुरोहित यांनी ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कार्य करणार्‍यांना आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी यज्ञयाग करणे

ओ. संत आणि आध्यात्मिक संप्रदाय यांनी ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी प्रतिदिन काही वेळ प्रार्थना अन् नामजप करणे

संदर्भ : ‘हिंदु जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’