Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे महत्त्व

अनुक्रमणिका


१. विषयप्रवेश

आपण आज धर्मरक्षणासाठी हिंदूंची संघशक्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र आलो आहोत. हिंदु धर्माची सद्यस्थिती कशी आहे, यापासून आपण आजची चर्चा चालू करूया.

१ अ. हिंदु धर्माची सद्यस्थिती : स्वामी विवेकानंद हिंदु धर्माविषयी अभिमानाने बोलायचे. वेद आणि उपनिषदे यांतील अनेक संदर्भ देऊन त्यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्चात्त्यांना सांगितले. त्याप्रमाणे किती हिंदू धर्मप्रसारक हिंदु धर्माविषयी इतक्या अभिमानाने आणि अभ्यासपूर्ण बोलू शकतात ? हिंदू समाजातील किती लोक ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ग्रंथांविषयी ५-१० मिनिटे लोकांसमोर बोलू शकतात ? किती लोक साधना म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी प्रार्थना, नामजप, मंत्रपठण, ध्यानधारणा यांपैकी काही करतात ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारार्थी आहेत.

१ आ. धार्मिक अज्ञान हे हिंदूंच्या अधःपतनाचे कारण : जगाचा आध्यात्मिक गुरु म्हणून भारताकडे पाहिले जाते. अन्य कोणत्याही धर्माकडे नाही इतके उच्च प्रतीचे ज्ञान वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण यांच्या माध्यमातून ऋषिमुनींनी आपल्यासाठी लिहून ठेवले आहे, तरीही हिंदूंना ‘स्वधर्माभिमान निर्माण करा’, असे का सांगावे लागते, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या अधःपतनाचे मुख्य कारण त्यांचे धर्मविषयक अज्ञान हे आहे. हिंदूंना त्यांची धर्मकर्तव्ये कोणती आहेत, हे माहीत नाही. याउलट मुसलमानांना त्यांची कर्तव्ये, म्हणजे अल्ला एकच आहे त्याचीच भक्ती करणे, दिवसातून पाच वेळा नमाज पढणे, धर्मासाठी जकात (दान) देणे, रोजे म्हणजे उपवास करणे, आयुष्यातून एकदा स्वखर्चाने हजला जाणे ही कर्तव्ये ठाऊक असतात अन् त्यांचे ते पालन करतात. हिंदूंना आता त्यांच्या धार्मिक कर्तव्यांची जाणीव करून देण्याची, म्हणजेच त्यांना साधना करण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे.

समाजाला धार्मिक कर्तव्यांची जाणीव करून देणे आणि धर्मरक्षण करणे हे पूर्वी राजाचे कर्तव्य असे; मात्र सध्याचे राज्यकर्ते धर्मद्रोही असल्याने आम्हा हिंदूंनाच आता धर्मरक्षणाचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. मी इथे ‘शिवधनुष्य’ असा उल्लेख आवर्जून केला; कारण केवळ बाहूबळाने शिवधनुष्य उचलणे शक्य नसते. त्यासाठी दैवी पाठबळही लागते. केवळ शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर कार्य करून धर्मरक्षण होणार नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न करावे लागतील. म्हणजे धर्मरक्षण करण्यासाठी क्षात्रतेजासह ब्राह्मतेजही आवश्यक असते. त्या दृष्टीने आज आपण ब्राह्मतेज म्हणजे काय, हिंदूंच्या इतिहासात ब्राह्मतेजाचे स्थान काय आहे, हिंदुसंघटनातील त्याची आवश्यकता काय, हे विषय समजून घेणार आहोत.

२. ब्राह्मतेज आणि त्याचे महत्त्व

२ अ. ब्राह्मतेज म्हणजे काय ? : एखादे कार्य होत असते, तेव्हा त्यात कार्यरत असलेल्या विविध घटकांवरून ते कार्य किती प्रमाणात यशस्वी होईल ते ठरते. अणुबाँबपेक्षा परमाणुबाँब अधिक प्रभावशाली असता़े; कारण तो अणुबाँबपेक्षा अधिक सूक्ष्म असतो. म्हणजे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म अधिक सामर्थ्यवान आहे. हे सूत्र शत्रूला मारण्याच्या उदाहरणावरून आपण समजून घेऊ.

१. पंचभौतिक (स्थूल, वैज्ञानिक स्तर) : शत्रू कोठे आहे, ते पंचज्ञानेंद्रियांनी जाणवले, उदा. तो दिसला किंवा त्याची हालचाल जाणवली, तर बंदुकीच्या गोळीने त्याला मारता येईल. मात्र काहीएक हालचाल न करता तो एखाद्या आडोशाच्या मागे लपला, तर बंदूकधारी त्याला मारू शकणार नाही. येथे मारण्यासाठी केवळ स्थूल आयुध वापरले आहे.

२. पंचभौतिक (स्थूल) आणि मंत्र (सूक्ष्म) एकत्रित : पूर्वीच्या काळी मंत्र उच्चारून धनुष्याला लावलेला बाण सोडीत. मंत्रामुळे बाणावर त्या शत्रूच्या नावाची नोंद होई आणि तो आडोशाच्या मागेच काय, तर त्रैलोक्यात कोठेही लपला, तरी बाण त्याचा वध करू शकत असे.

३. मंत्र (सूक्ष्मतर) : पुढच्या टप्प्यात बंदूक, धनुष्यबाण इत्यादी स्थुलातील आयुधांविना नुसत्या विशिष्ट मंत्राने शत्रूला मारता येते.

४. व्यक्त संकल्प (सूक्ष्मतम) : ‘एखादी गोष्ट घडो’, एवढाच विचार एखाद्या गुरूंच्या / संतांच्या मनात आला, तर ती गोष्ट घडते. यापेक्षा अधिक त्यांना दुसरे काहीएक करावे लागत नाही. ७० टक्क्यांहून जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या गुरूंच्या / संतांच्या संदर्भात ते शक्य होते. (सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के.)

५. अव्यक्त संकल्प (सूक्ष्मातीसूक्ष्म) : यात ‘अमुक एक गोष्ट होवो’, असा संकल्प गुरूंच्या / संतांच्या मनात न येताही, ते कार्य होते. याचे कारण म्हणजे, यामागे गुरूंचा / संतांचा अव्यक्त संकल्प असतो. ८० टक्क्यांहून जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या गुरूंच्या / संतांच्या संदर्भात ते शक्य होते.

६. अस्तित्व (अती सूक्ष्मातीसूक्ष्म) : या अंतिम टप्प्यात मनात संकल्पही करावा लागत नाही. गुरूंच्या / संतांच्या नुसत्या अस्तित्वाने, सान्निध्याने किंवा सत्संगाने ते कार्य होते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या गुरूंच्या / संतांच्या संदर्भात ते शक्य होते.

६ अ १. संकल्प कार्य कसे करतो ? : संकल्पाने कार्य सिद्ध होण्यासाठी आध्यात्मिक पातळी न्यूनतम ७० टक्के तरी असावी लागते. संकल्प कार्य कसे करतो, हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. मनुष्यमात्राच्या मनाची शक्ती १०० एकक (युनिट) आहे, असे समजा. प्रत्येकाच्या मनात दिवसभर काही ना काही विचार येतच असतात. त्यासाठी काहीतरी शक्ती व्यय (खर्च) होत असते. एखाद्याच्या मनात असे दिवसात १०० विचार आले, तर त्याची त्या दिवसाची बरीच शक्ती संपून जाईल; परंतु त्याच्या मनात विचारच आला नाही, मन निर्विचार असले आणि अशा वेळी ‘अमुक एक गोष्ट घडो’, अशा प्रकारचा एक विचार आला, तर त्या एका विचारामागे सगळी १०० एकक शक्ती असते; म्हणून तो विचार (संकल्प) सिद्ध होतो, यालाच ‘ब्राह्मतेज’ म्हणतात. तो विचार ‘सत्’चा असला, तर स्वतःची साधना त्यात व्यय होत नाही. ईश्वरच ते कार्य पूर्ण करतो; कारण ते सत्चे, म्हणजे ईश्वराचेच कार्य असते. अर्थात हे साध्य होण्यासाठी नाम, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग या मार्गाने साधना करून, असत्चे विचारच मनात येत नाहीत, अशी स्थिती साधकाने प्राप्त करून घेतली पाहिजे.

आता काहींना वाटेल की, खरेच असे संकल्पाने काही होते का ? जिथे विश्वाची निर्मितीच ईश्वराच्या संकल्पाने झाली आहे, तिथे संकल्पाइतके सामर्थ्यशाली काही नाही, हे लक्षात घ्या ! आपण पुराणकाळातील गोष्टींमध्ये ऋषीमुनींनी शाप दिल्याची उदाहरणे ऐकतो. हा शाप म्हणजेच संकल्पसामर्थ्य असते. अर्थात हे संकल्पसामर्थ्य साधनेच्या बळावर ऋषीमुनींना प्राप्त झालेले असते. धर्मरक्षण आणि हिंदू राष्ट्राची स्थापना यांसाठी केवळ शारीरिक पातळीवर प्रयत्न करून नव्हे, तर साधना करून संकल्पाचे सामर्थ्य निर्माण करून कार्य करणे आवश्यक आहे.

२ आ. ब्राह्मतेजाचे महत्त्व

१. संतांच्या कार्यक्रमाला लाखो लोक स्वेच्छेने आणि श्रद्धेने येतात. राजकीय सभांप्रमाणे त्यांना पैसे देऊन किंवा वाहनसुविधा देऊन बोलवावे लागत नाही. पू. रामदेवबाबांच्या कार्यक्रमाला पहाटे ५ वाजल्यापासून लोक येतात.
२. एकाही राजकीय पक्षाचा विदेशात प्रचार होत नाही; पण आध्यात्मिक संस्थांचा होतो; कारण आध्यात्मिक संस्थांकडे आध्यात्मिक तेज, म्हणजेच ब्राह्मतेज असते.

३. हिंदूंच्या इतिहासातील ब्राह्मतेजाचे स्थान

हिंदूंच्या पूर्वेतिहासात अवतारी पुरुष आणि महापुरुष यांनी क्षात्रतेज अन् ब्राह्मतेज धारण करून धर्मरक्षण केल्याची अनेक उदाहरणे सापडतात.

३ अ. भगवान परशुराम : यांचे वर्णन असे केले आहे –

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे आणि पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज, अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास परशुराम शाप देऊन अथवा बाणाने हरवील.

परशुरामाने ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. याचा उल्लेख वाल्मीकिऋषींनी ‘राजविमर्दन’ असा केला आहे. त्याचा अर्थ आहे ‘दुर्जन राज्यकर्त्यांचा नाश.’ येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे भगवान परशुरामाने केवळ शस्त्राने नाही, तर शाप देऊन, म्हणजे ब्राह्मतेजाचा वापर करून दुर्जन राज्यकर्त्यांचा नाश केला.

३ आ. अर्जुन : आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज एकदा म्हणाले, ‘‘अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; त्याचबरोबर तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेऊन सोडत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे.’’

३ इ. छत्रपती शिवाजी महाराज : हे कुलदेवता श्री भवानीदेवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मुखात नेहमी ‘जगदंब जगदंब’ असा नामजप असे. त्यांचे सैन्यही लढतांना ‘हर हर महादेव’चा गजर करत असे. त्यामुळे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री अल्प असूनही ते पाच बलाढ्य पातशाह्यांना नमवून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करू शकले. त्यांच्या साधनेमुळेच त्यांना संत तुकाराम महाराज आणि संत रामदासस्वामी यांचे आशीर्वाद मिळाले अन् मोठमोठ्या संकटांतून त्यांचे रक्षण झाले.

नामस्मरणाने, भक्तीने दैवी शक्तीचे साहाय्य मिळते आणि आपण अंगीकारलेल्या कार्यात यश मिळते, याची ही उदाहरणे आहेत.

४. हिंदुत्ववाद्यांनी स्वतःमध्ये ब्राह्मतेज निर्माण करण्याचे, अर्थात साधना करण्याचे महत्त्व !

४ अ. प्रतिकूल प्रसंगात स्वतःचे रक्षण होण्याचे भक्तच बनले पाहिजे : हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांनी स्वतःमध्ये ब्राह्मतेज निर्माण करण्याचे, अर्थात साधना करण्याचे महत्त्व आपण राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकांद्वारे समजून घेऊ,
‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।।’ (मनाचे श्लोक, श्लोक ३०)

या श्लोकात समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे, ‘समर्थाच्या, म्हणजेच भगवंताच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने बघू शकेल, असा या भूमंडळात कोण आहे ?’ आपण सर्व जण धर्मरक्षण करणारे आहोत. धर्मरक्षणासाठी लढतांना जिवावर बेतण्याचे प्रसंग काही वेळा अनुभवायला आले असतील. तुम्ही जर ईश्वराचे भक्त असाल, तर मोठमोठ्या संकटांतूनही तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. पांडवांची लाक्षागृहातून सुटका किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफझलखान भेट, आग्र्याहून सुटका असे प्रसंग आठवले की, समर्थ रामदासस्वामींच्या या श्लोकातील मतितार्थ आपल्या लक्षात येईल.

४ आ. ईश्वरी कार्यात येणारे अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर करण्यासाठी साधनाच हवी ! : समाजातील अनेक लोक वाईट शक्तींच्या प्रभावाखाली आहेत. आपण हिंदुत्वाचे, म्हणजे ईश्वरी कार्य करत आहोत. या कार्याला अदृश्य वाईट शक्तींचा विरोध हा होतोच. त्यामुळे डोके जड होणे, न सुचणे, कार्यात अडचणी येणे आणि त्यामुळे नैराश्य येणे, असे त्रास होऊ शकतात. हे त्रास न्यून (कमी) करण्यासाठी आणि कार्य सुरळीत चालू रहाण्यासाठी साधना करणे, हाच एकमेव उपाय असतो.

४ इ. हिंदुसंघटनात अडथळा ठरणारा अहंकार दूर करण्यासाठी साधना उपयुक्त ! : हिंदुत्ववाद्यांमधील अहंकार हा हिंदूऐक्यातील प्रमुख अडथळा असतो. साधना केल्यामुळे अहंकार उणावतो, नम्रता वाढते आणि इतरांशी जुळवून घेणे सोपे जाते. थोडक्यात, साधनेमुळे ईश्वरी गुण वाढतात. हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक प्रतिदिन साधना करत असल्याने ते इतरांशी पटकन जुळवून घेतात.

४ ई. समाजाला धर्मशास्त्राची दृष्टी देण्यासाठी साधना लाभदायी ! : सनातन संस्थेचे साधक आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते साधना करणारे असल्याने अन् त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला असल्याने वेगवेगळ्या दूरचित्रवाहिन्या धर्मशास्त्रविषयक चर्चासत्रांमध्ये हिंदु धर्माचे अधिकृत मत सांगण्यासाठी साधक आणि कार्यकर्ते यांना निमंत्रित करतात. आतापर्यंत गणेशोत्सव कसा साजरा करावा, ग्रहणाविषयीचे धर्मशास्त्र, अध्यात्माच्या दृष्टीकोनातून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा विचार, लिंगबदलाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन अशा विविध विषयांवर बोलण्यासाठी साधक आणि कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

४ ई १. साधना आणि धर्मदृष्टी नसलेले हिंदू संत, नेते आणि संघटना यांच्याकडून समाजाला दिली जाणारी अयोग्य दिशा ! : २०१० साली एका स्वामींनी ‘मुसलमानांची वाढती लोकसंख्या’ या विषयावर बोलतांना सांगितले, ‘हिंदूंनीही अनेक पत्नी करून अनेक मुलांना जन्माला घातले पाहिजे, तरच हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ होऊन मुसलमानांशी लढण्याचे त्यांचे सामर्थ्य वाढेल.’ वास्तविक हे सूत्र राष्ट्रहित आणि धर्मसिद्धांत यांच्या विरोधातील असल्याने लोकांना मानसिक स्तरावरील अयोग्य दृष्टीकोन मिळाला; मात्र मूळ हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि त्यांनी धर्माचरण करणे, हे योग्य उपाय समजले नाहीत.

५. साधना कोणती करावी ?

 ५ अ. प्रतिदिन न्यूनतम १ घंटा कुलदेवतेचा किंवा इष्टदेवतेचा नामजप करणे :  धर्मशिक्षण घेणे आणि साधना करणे यादृष्टीने कोणते प्रयत्न करावे, असा प्रश्न आता काहींच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तुमच्यापैकी कोणी पूजापाठ, स्तोत्रपठण, उपवास असे काहीतरी करत असतील. हे सर्व तुम्ही चालू ठेवा. त्यासह देवाचा सतत नामजप करा. नामजप ही उपासनाकांडातील साधना आहे. ती येता-जाता, उठता-बसता अशी कधीही करता येण्यासारखी आहे. नामजपाच्या माध्यमातून मनाने नेहमी देवाच्या जवळ रहाणे शक्य होते. तुम्ही पूर्वीपासून एखाद्या देवतेचा किंवा गुरूंनी दिलेला नामजप करत असाल, तर तोच अखंड होण्यासाठी प्रयत्न करा.

तुम्ही आता नव्याने नामजप चालू करणार असाल, तर कुलदेवीचा (उदा. ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’), कुलदेवी ठाऊक नसल्यास कुलदेवाचा आणि दोन्ही ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप दिवसातून अधिकाधिक करा. तसेच पूर्वजांचा त्रास होऊ नये किंवा जरासा असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे, मध्यम त्रास असल्यास प्रतिदिन २ ते ४ घंटे आणि तीव्र त्रास असल्यास प्रतिदिन ४ ते ६ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करा.

५ आ. इष्टदेवतेला प्रार्थना करून भाषणाचा आरंभ आणि शेवट करणे : सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांचे वक्ते नेहमीच त्यांचे गुरू अन् भगवान श्रीकृष्ण यांना वंदन करून भाषणाला प्रारंभ करतात. भाषणाचा शेवटही तसाच करतात. त्यामुळे अहं न वाढण्याला साहाय्य होते. अहं अल्प असल्यास देवाचा आशीर्वाद मिळायला साहाय्य होते आणि इष्टदेवतेच्या स्मरणाने तिचाही आशीर्वाद मिळतो.

आपणही आपल्या इष्टदेवतेचे नाव घेऊन बोलण्यास प्रारंभ आणि बोलण्याचा शेवट केल्यास काय वाटते, याचा अनुभव घेऊ शकता.

५ इ. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करणे : धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी एखाद्या अन्य संघटनेचा उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा. त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा.

६. धर्माभिमान निर्माण होण्यासाठी धर्माचरणही करा !

साधनेसह धर्माचरण आणि आचारधर्माचे पालन करणेही महत्त्वाचे आहे; कारण हिंदु संस्कृतीतील विविध उपासनामार्ग, सण-उत्सव, आचारविचार, आहारविहाराच्या पद्धती यांतूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीतूनच सत्त्वगुण वाढेल, म्हणजे साधना होईल, अशी योजना हिंदु धर्मात आहे. हे हिंदु धर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. हिंदु धर्मानुसार आचरण करणे, म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्यासारखे आहे.

दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजाअर्चा, आरती, प्रासंगिक सण आणि उत्सव शास्त्र समजून घेऊन करणे; तसेच कुलाचार, कुलपरंपरा सांभाळणे, यालाच ‘धर्माचरण’ असे म्हणतात.

६ अ. धर्माचरणाच्या आणखी काही कृती

१. हस्तांदोलन न करता हात जोडून नमस्कार करणे
२. वाढदिवस दिनांकानुसार नव्हे, तर तिथीनुसार आणि औक्षण करून साजरा करणे
३. स्त्रियांनी प्रतिदिन गोल कुंकू आणि पुरुषांनी कुंकवाचा टिळा लावूनच घराबाहेर पडणे
४. केवळ मंगलप्रसंगीच नव्हे, तर एरव्हीही हिंदु संस्कृतीनुसार कपडे परिधान करणे
५. दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) बोलतांना `हॅलो’ नव्हे, तर `नमस्कार’ किंवा `जय श्रीराम’ म्हणणे
६. दिवसभरात एकदातरी देवळात जाऊन देवाचे दर्शन घेणे
७. वर्षातून एकदा कुलाचारासाठी कुलदेवतेच्या दर्र्शनाला जाणे

या नियमित धर्माचरणाच्या काही कृती आहेत. या कृती केवळ कृती म्हणून न करता धर्मशास्त्र जाणून धर्मपालन म्हणून केल्यास त्यांचा अधिक आध्यात्मिक लाभ आपल्याला होतो.

धर्मरक्षणाच्या कार्यातील एक कर्तव्य म्हणून धर्माचरणाकडे पाहिले पाहिजे. धर्मानुसार स्वतः आचरण केले पाहिजे आणि धर्माचरणाचा कार्यकर्ते, हिंदु समाज यांच्यातही प्रसार केला पाहिजे.

नामजप चालू केल्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला लिहून पाठवा. समाजाला साधनेचे महत्त्व सांगण्यासाठी नियतकालिके आणि संकेतस्थळ यांच्या माध्यमातून आम्ही त्या प्रकाशित करू.

७. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेतील साधनेची आवश्यकता

आतापर्यंत झालेल्या चर्चेतून आपण हिंदूंच्या इतिहासातील ब्राह्मतेजाचे स्थान, हिंदुत्ववाद्यांनी ब्राह्मतेज निर्माण होण्यासाठी साधना करण्याचे महत्त्व आणि साधना कोणती करावी, हा विषय समजून घेतला. आता राजकारणी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि धर्मनिष्ठ कार्यकर्ते यांचा तुलनात्मक अभ्यास करूया.

आपणा सर्व हिंदुत्ववाद्यांचे मुख्य ध्येय ‘हिंदू राष्ट्राची स्थापना’ हे आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करणे, म्हणजे राष्ट्राची पुनर्रचना करणे ! राष्ट्ररचना ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि तिच्यात केवळ सत्याला स्थान आहे. हे कार्य कोण करू शकते, हे आता पाहूया

७ अ. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सध्याचे राजकारणी अपात्र का आहेत ?

हल्लीचे राजकारणी असत्याचे रूप आहेत. भ्रष्टाचार, स्वार्थ, अनैतिकता, स्वैराचार असे दुर्गुण राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे राजकारण्यांकडून ‘राष्ट्ररचना’ होणे सर्वथा अशक्य आहे. राज्यकर्त्यांना अमर्याद सत्ता हवी असते. याउलट राष्ट्ररचनेसाठी निःस्वार्थीपणा, प्रसिद्धीचा हव्यास नसणे, त्याग अशा गुणांची आवश्यकता असते. हे गुण ईश्वराची भक्ती आणि धर्मरक्षणासाठी कार्य अशा दोन्ही अंगांनी प्रयत्न करणार्‍या साधकांकडेच असतात. त्यामुळे धर्मनिष्ठ हिंदू कार्यकर्तेच हिंदू राष्ट्र स्थापू शकतात.

७ आ. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वच हिंदुत्ववादी कार्यकर्ते सक्षम आहेत का ?

आपण सर्व जण समाजातील विविध व्यक्तींना संघटित करून धर्मरक्षणाचे कार्य करत आहात. धर्मरक्षणासाठी संघटित झालेल्या व्यक्ती हिंदुत्ववादी विचारसरणीच्या असल्या, तरी प्रत्येकाची प्रवृत्ती, विचारसरणी वेगवेगळी असते, याचा अनुभव आपणही घेतला असेल. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी काही जण वाममार्गी, व्यसनी असतात. थोडक्यात, कार्यकर्ते अनेक राजकीय पक्षांत ज्याप्रमाणे कार्य करतात, त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांतही कार्य करतांना आढळतात. अशा लोकांना घेऊन आपण जमाव निर्माण करू शकू; मात्र त्यातून धर्मरक्षण होणार नाही. किंबहुना हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी असे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सक्षम ठरणार नाहीत.

७ इ. ईश्वर भक्ताला साहाय्य करतो म्हणून हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी धर्मनिष्ठ हिंदूंची आवश्यकता : हिंदू राष्ट्राच्या स्थापनेतील धर्मनिष्ठ हिंदूंचे महत्त्व महाराष्ट्रातील नारायणगाव येथील एक मोठे संत प.पू. काणे महाराज यांनी अगदी नेमकेपणाने सांगितले आहे. ते म्हणतात, ‘राष्ट्र आपत्काळात किंवा पारतंर्त्यात आले, तर ईश्वर अवतार घेत नाही. दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तर अवतार घेतो; म्हणून आपण भक्ती वाढवली की, ईश्वराचे पाठबळ आपल्याला मिळाल्याने आपले ईश्वरी राज्याचे सुखस्वप्न साकार होईल.

७ इ १. उपस्थित ईश्वरनिष्ठ हिंदुत्ववाद्यांचा आदर्श घेऊन धर्माचरणी बना !

काही हिंदुत्ववादी हिंदुत्वासाठी कार्य करतात; पण ते धर्माचरणी असतातच असे नाही. नामजप, उपासना हे महिला आणि वृद्ध यांनी करायच्या कृती आहेत, अशी त्यांची धारणा असते. हिंदुत्वासाठी कार्य करणे आणि साधना हे वेगवेगळे आहेत, अशी काहींची धारणा असते. प्रत्यक्षात या एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत, हे लक्षात घेऊन हिंदुत्ववाद्यांनी स्वतः साधना करायला हवी. काही हिंदुत्ववादी ईश्वरनिष्ठ असतात. इथे उपस्थित असलेले सर्व संत हे ब्राह्मतेजाचे प्रतिक आहेत. त्यासोबत आंध्रप्रदेशमधील श्री. राजासिंग ठाकूर हे रामभक्त असल्याने त्यांनी त्यांची संघटना आणि दूरचित्रवाहिनी यांच्या नावात श्रीराम आहे. डॉ. नील माधव दास, श्री. अनिल धीर यांच्यासारखे ईश्वरची भक्ती करणारे, गुरु असलेले हिंदुत्ववादी आपल्यात आहेत, अशांकडून आदर्श घेऊन आपण साधना केली पाहिजे.

८. ब्राह्मतेजाविना हिंदुसंघटन अशक्य !

भारतात अनेक मोठ्या संघटना हिंदु धर्माचे कार्य करतात. हिंदु धर्माविषयी काहीतरी करण्याची मोठी इच्छा या संघटनांना होती; पण हिंदु समाजासाठी त्या फारसे काही करू शकल्या नाहीत. गेली काही वर्षे या संघटनांनी पुष्कळ कार्य करूनही त्यांची अशी स्थिती का व्हावी ? याचे कारण म्हणजे त्यांनी सर्व कार्य मानसिक स्तरावर केले. साधनेचे पाठबळ नसल्यामुळे त्यांना ब्राह्मतेज, तसेच ईश्वराचा आशीर्वाद मिळू शकला नाही. आपणाला मात्र तसे करून चालणार नाही. ईश्वर राष्ट्रभक्ताला नाही, तर भक्ताला साहाय्य करतो, हे लक्षात घेऊन आपण साधना वाढवली पाहिजे, म्हणजे आपल्या कार्याला ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल !

९. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाही साधना करण्यास प्रवृत्त करा !

हिंदू राष्ट्र स्थापन झाले पाहिजे, अशी इच्छा बाळगणारे अनेक हिंदुत्ववादी आहेत. यांपैकी किती हिंदुत्ववाद्यांना हिंदू राष्ट्र स्थापन होईल, याची खात्री आहे. याउलट हिंदू राष्ट्र स्थापन होईल याची खात्री सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांचे साधक आणि कार्यकर्ते यांना सुरुवातीपासून वाटत आहे. याचे कारण त्यांची ईश्वर आणि गुरु यांच्यावरील श्रद्धा, हे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सातत्याने आणि टप्प्याटप्प्याने आत्मविश्वासासह प्रयत्न करत आहेत. हे अधिवेशन हा त्याचाच एक भाग आहे. विशेष म्हणजे हे करत असतांना ते कुठेही तणावाग्रस्त नाहीत, तर दिवसेंदिवस त्यांच्यातील आनंद वाढत आहेत. हे त्यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेल्या ब्राह्मतेजाचे प्रतिक आहे.साधनेने आत्मबल जागृत होते आणि आत्मबल जागृत झालेल्या व्यक्तीकडून धर्माचे कार्य परिणामकारकरित्या होते. त्यामुळे आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांनाही साधना करण्यास प्रवृत्त करा. त्यासाठी संघटनेच्या स्तरावर तुम्ही पुढील प्रयत्न करू शकता.

अ. संघटनेतील कार्यकर्त्यांना नामजप साधना करण्यास सांगा !

आ. संघटनेच्या बैठकांमध्ये ज्याप्रमाणे उपक्रमांचा आढावा घेतला जातो, त्याप्रमाणे थोडा वेळ राखून ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने आठवड्याभरात साधना म्हणून कोणते प्रयत्न केले, याचा आढावा घ्या !

इ. संघटनेतील कार्यकर्त्यांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी अभ्यासवर्ग आयोजित करा. त्यांना धर्मशिक्षण देणारे ग्रंथ, ध्वनीचित्रचकत्या उपलब्ध करून द्या ! हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व समजले, तर धर्मद्रोही, पाखंडी आणि इतर धर्मांचे प्रसारक यांच्या हिंदूविरोधी विचारांचे बौद्धिक खंडण ते करू शकतील.

ई. हिंदूसंघटनासाठी हानीकारक असलेल्या दोषांची कार्यकर्त्यांना जाणीव करून द्या आणि ते घालवण्यासाठी त्यांना साहाय्य करा !

साधना करणार्‍या व्यक्तीचे जीवन हळूहळू नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न बनत जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी साधना चालू केल्यास त्यांच्यात व्यसनाधीनता, अहंकारीपणा, उद्धटपणा असे दोष असतील, तर तेही हळूहळू न्यून होत जातील. साधनेमुळे त्यांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीही होईल. कार्यकर्त्यांनी साधना केल्यास संघटनेचे कार्यही गुणात्मक स्तरावर अधिक चांगले होत आहे आणि कार्यकर्त्यांच्या वृत्तीमध्येही पालट होत आहे, असे तुम्हाला अनुभवायला मिळेल.

एका उदाहरणाच्या माध्यमातून हे सूत्र आपण स्पष्ट करून घेऊया. हिंदु जनजागृती समितीच्या एखाद्या कार्यकर्त्यामध्ये अहंभाव निर्माण झाला आहे, असे आढळल्यास त्या कार्यकर्त्याला तात्काळ सनातनच्या आश्रमात अहंनिर्मूलनासाठी पाठवले जाते. सनातनच्या आश्रमात हे कार्यकर्ते अहंनिर्मूलनासाठी उपयुक्त अशी स्थूल सेवा (उदा. बांधकाम, शेती, स्वयंपाकघर आदी) करतात. तरीही हे कार्यकर्ते समितीचे कार्य सोडून जात नाहीत, तर स्वतःमधील अहं नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश साधना करणे हा असतो, त्यांची गुरूंवर श्रद्धा असते. त्यामुळे समिती सोडून जाण्याचा विचार त्यांच्या मनात येत नाही. याउलट अन्य संघटनेतील एखाद्या पदाधिकार्‍याचे पद काढून घेतले वा त्याच्या मनाविरुद्ध काही झाले, तर तो संघटना सोडून देतो. यावरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी साधना करण्याचे महत्त्व काय हे लक्षात येईल.

या दृष्टीने तुम्ही संघटनेच्या स्तरावर काही प्रयत्न केल्यास आणि त्यांचे चांगले अनुभव आल्यास ते आम्हाला कळवा. इतर हिंदुत्ववादी संघटनांना तसे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा अनुभवांचा उपयोग होईल. आपण ते सर्वांना कळवू.

१०. हिंदु समाज आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी प्रयत्न करा !

आतापर्यंतच्या विषयात आपण हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते यांनी साधना करण्याचे महत्त्व पाहिले. आपण राजकारण्यांप्रमाणे स्वतःचा किंवा स्वतःच्या संघटनेचा विचार करून थांबू शकत नाही. आपले प्रयत्न समाजाचा उद्धार व्हावा, यासाठी असतात. त्यामुळे जन्मोजन्मीचे कल्याण करणारी साधना समाजापर्यंत पोहोचावी, यासाठीही आपले प्रयत्न व्हायला हवेत.

११. हिंदु समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता !

भारतभूमीवर एका आदर्श राष्ट्राची, म्हणजे हिंदू राष्ट्राची पुनर्रचना करणे, हे आपले ध्येय आहे. जेव्हा कधी आदर्श राज्याचा विषय येतो, तेव्हा प्रभु श्रीरामचंद्रांचे रामराज्य आपल्या दृष्टीसमोर येते. सर्वांनाच हेवा वाटावा, असा राजा रामराज्यातील प्रजेला मिळाला. असा आदर्श राजा त्या वेळच्याच प्रजेला का मिळाला ? याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. पूर्वीसारखेच रामराज्य, म्हणजे हिंदू राष्ट्र आताही अवतरू शकेल ! यासाठी हिंदु समाज धर्माचरणी आणि ईश्वराचा भक्त बनला पाहिजे.

पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक साधना करणारे असल्यामुळे बहुतेक जण सात्त्विक होते. कलियुगामध्ये बहुसंख्य लोक साधना करणारे नसल्यामुळे रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. याचाच परिणाम म्हणून राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. हे पालटण्यासाठी प्रत्येकाने व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक आहे. व्यष्टी साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीची सात्त्विकता वाढेल.

१२. हिंदूंचे स्वतःच्याच धर्माविषयी अज्ञान आणि अपसमज

हिंदु समाज धर्माचरणी बनवायचा असेल, तर हिंदु धर्माची सद्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. इतर धर्मियांना धर्मशिक्षण देण्यासाठी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये त्यांचे धर्मगुरु असतात, उदा. चर्चमध्ये पाद्री आणि मशिदींमध्ये मौलवी त्यांच्या त्यांच्या धर्मियांना शिक्षण देतात. त्यामुळे खिश्चनांना ‘बायबल’ आणि मुसलमानांना ‘कुराण’ थोडेतरी ठाऊक असते. याउलट हिंदूंना ‘गीते’विषयी काय ठाऊक असते ? गीतेचे नुसते वाचन करणारेसुद्धा अल्प आहेत; वाचून समजणारे तर फारच अल्प आहेत आणि वाचून समजून घेऊन कृतीत आणणारा तर लाखो कोट्यवधीत एखादाच असेल. ही आहे आपल्या हिंदु धर्माची स्थिती !

व्यावहारिक शिक्षणाचा आणि अध्यात्मविषयक अज्ञानाचा काहीएक संबंध नाही. अशिक्षित, प्राथमिक शिक्षण झालेले, माध्यमिक शिक्षण झालेले, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले, अशा प्रत्येक गटातील जवळजवळ ८० टक्के व्यक्तींना अध्यात्म या विषयाचे खरे शिक्षण नसल्याने त्याविषयी त्यांच्यात अज्ञानच असते. सद्यस्थितीत हिंदूंना धर्मशिक्षण देणारी कोणती व्यवस्थाच उपलब्ध नाही. अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल.

१३. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे झालेली हानी !

१३ अ. अंधश्रद्धा : समाजातील २० टक्के व्यक्तींमध्ये अंधश्रद्धा आढळून येते.

१३ आ. अपलाभ (गैरफायदा) : अध्यात्माच्या नावाखाली पैसे मिळवण्याचा धंदा साधारणतः ५ टक्के लोक करतात.

१३ इ. फसवणूक : एकंदर साधूंपैकी जवळजवळ ३० टक्के भोंदू असतात. साधुत्वाच्या नावाखाली ते पैसे कमावतात. ५० टक्के साधूंना धर्माचे ज्ञान नसते.

१३ ई. साधनेविषयी अपसमज : समाजजीवनाच्या दृष्टीने अध्यात्मवाद ही एक प्रगतीविरोधी वृत्ती आहे, तो एक पलायनवाद आहे, असे पुष्कळ क्रांतीकारकांचे आणि समाजसुधारकांचे मत होते. आजही असे मानणारे अनेक पुरोगामी आहेत. तथापी एवढ्याने ‘अध्यात्मवाद हा मुळातच समाजविरोधी आहे’, असे मानणे योग्य होणार नाही; कारण अध्यात्मवादी पुरुषांनी जगामध्ये उदात्ततेचे आदर्श वेळोवेळी निर्माण केले आहेत आणि त्या आदर्शांकडे जाण्याचे आवाहन समाजमनाला केले आहे.

१३ उ. स्वधर्माचा तिरस्कार आणि अन्य धर्मांचे आकर्षण : धर्मशिक्षण नसल्यामुळे नव्या पिढीला हिंदु धर्म बुरसटलेला वाटू लागला आहे. हिंदु संस्कृतीनुसार आचरण करणे मागासलेपणाचे लक्षण वाटू लागले आहे. त्यांना अन्य धर्म, त्यांच्या चालीरिती, परकीय भाषा श्रेष्ठ वाटू लागल्या आहेत. त्यामुळे हिंदूंची नवी पिढी पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणातून उद्भवलेल्या नीतीशून्यतेच्या आहारी गेली आहे. समलैंगिकता, कथित पुरोगामित्व, साम्यवाद, समाजवाद, क्रूरता, गुंडगिरी, अत्याचारी प्रवृत्ती हे सध्याच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेले दोष पाश्चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणातून निर्माण झाले आहेत.

१३ ऊ. हिंदूंकडूनच धर्महानी  

१. सण, धार्मिक उत्सव कसे साजरे करावेत, हे हिंदू समजून घेत नाहीत. त्यामुळे हल्लीच्या सण, धार्मिक उत्सवांतील भाविकता अल्प झाली आहे आणि त्यांच्याकडे मौजमजा करण्यासाठीचे एक निमित्त म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. धार्मिक उत्सवांत बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, अश्लील नाचगाणी, मद्यपान, धूम्रपान, महिलांची छेडछाड असे अपप्रकार सर्रास घडतांना आढळतात.

२. हिंदूंना देवतांचे पावित्र्य कसे जपावे, हे ठाऊक नाही. त्यामुळे कोणी थुंकू नये, म्हणून जिन्यात देवतांची चित्रे लावली जातात. देवतांचा विज्ञापनांसाठी वापर होतो. नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे यांमधून हिंदु धर्म, देवता, धर्मपुरुष यांच्यावरून विनोद केले जातात. ‘हिंदु’ ही एक शिवी झाली आहे.

३. परधर्मियांच्या धर्मांतर, लव्ह जिहाद यांसारख्या षड्यंत्रांना हिंदु समाज बळी पडत आहे.

४. हिंदू गोमातेचे महत्त्वच विसरले आहेत. त्यामुळे कसायांना गायी विकणारे बहुतांश हिंदूच असतात.

५. देवळांचे आध्यात्मिक महत्त्व न समजल्यामुळे देवळे अस्वच्छ रहाण्यास हिंदूच कारणीभूत असतात. देवळांमध्ये चित्रपटांतील गाणी लावणारे, जुगार खेळणारे, मद्यपान करणारेही हिंदूच असतात.

६. राज्यकर्त्यांनी केलेले कायदे, अवलंबलेली धोरणे यांच्यामुळे स्वतःची धार्मिकदृष्ट्या कोणती हानी होणार आहे, याचे आकलनच हिंदूंना होत नाही.

या सर्व धार्मिक समस्या मुसलमानांना भेडसावत नाहीत. किंबहुना आतापर्यंत अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या संदर्भात निर्माणच झालेल्या नाहीत; याचे कारण त्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माबाबत अत्यंत सजग असतात. याउलट हिंदूंना धर्मशिक्षणच नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये धर्मविषयक सजगता असण्याची शक्यताच नसते.

१४. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हा धर्मविषयक समस्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा परिणामकारक मार्ग !

आपण धर्मरक्षणासाठी वेगवेगळ्या कृती करतो. त्यांपैकी बहुतांश शारीरिक आणि मानसिक पातळीच्या असतात, उदा. धर्मांतरासाठी प्रयत्न करणार्‍या पाद्र्यांना रोखणे किंवा हत्येसाठी वाहतूक होणार्‍या गायींची वाहतूक रोखणे, असे उपक्रम आपण राबवतो. हे उपक्रम तात्कालिक उपाययोजना म्हणून राबवणे योग्य आहे; मात्र त्या दीर्घकालीन उपाययोजना नव्हेत. आपण किती काळ पाद्र्यांना हाकलून देण्याची किंवा हत्येसाठी केली जाणारी गायींची वाहतूक रोखण्याची कृती करू शकू ? आज एका ठिकाणाहून पाद्र्यांना हाकलले, तर ते दुसरीकडे जाऊन धर्मप्रसार करतील किंवा एकीकडील गायीची वाहतूक रोखली, तर ती दुसरीकडून चालू होईल. अशा सर्व धार्मिक समस्यांवर दीर्घकालीन उपाय एकच आहे, तो म्हणजे सर्वत्रच्या हिंदूंना सर्वंकष धर्मशिक्षण देणे. हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व समजले, तर त्यांच्याकडे कितीही संख्येने पाद्री आले, त्यांनी कितीही आमिषे दाखवली, तरी ते पाद्र्यांच्या धर्मांतराच्या षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, हिंदु शेतकरी कसायांना गायी विकणार नाहीत, हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाहीत. विज्ञानाच्या भाषेत हिंदु धर्मातील प्रत्येक सूत्र किती परिपूर्ण आहे, हे आजच्या तरुण पिढीला सांगितले, तर ती धर्माचरण करील. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि त्याचे दुष्परिणाम यांच्या दुष्टचक्रातून तरुण पिढीची सुटका होईल.

धर्माचरणामुळे हिंदूंमधील धर्माभिमान जागृत होईल. धर्माभिमान जागृत झालेला समाज धर्मरक्षणही करतो, किंबहुना धर्महानी होऊच देत नाही. अशा धर्मनिष्ठ राष्ट्राला नैसर्गिक आपत्ती, परचक्र आदी कोणतेही भय नसते. ते राष्ट्र आनंदी, नीतीमान आणि समृद्ध असते.

जेव्हा पूर्ण मानववंश धर्माचरण करायला लागेल, तेव्हा पृथ्वीवर एक राष्ट्र होईल, जसे सत्ययुगात होते. अशा वेळी राष्ट्र आणि धर्म यांमध्ये अद्वैत होते. राष्ट्र म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे राष्ट्र असे होते. असेच राष्ट्र चिरंतन होते.

यावरून समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.

१५. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे दायित्व हिंदुत्ववादी संघटनांनी पितृभावनेने स्वीकारायला हवे !

चर्चमध्ये पाद्री आणि मशिदींमध्ये मौलवी त्यांच्या त्यांच्या धर्मियांना धर्मशिक्षण देतात; पण हिंदूंना धर्मशिक्षण देणारी कोणतीही व्यवस्था सद्यस्थितीत नाही. सध्याचे निधर्मी राज्यकर्ते हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी काही करतील, अशी अपेक्षा ठेवू शकत नाही. मग हे कार्य करणार तरी कोण ? ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावनेने हिंदुत्ववादी संघटनांनीच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी काही प्रयत्न केले, तरच सद्यस्थितीत हे कार्य होऊ शकेल. सध्याच्या हिंदु समाजाला कोणी वाली नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हिंदु समाजाचे पितृत्व आता आपल्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीच स्वीकारायला हवे. पिता जसा स्वतःच्या मुलाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करतो, तशीच भूमिका आपण हिंदु समाजाच्या बाबतीत ठेवली पाहिजे. आपण सर्वच जण धर्मरक्षणासाठी काहीतरी करतो. आता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी काही केले, तर ते प्रयत्न पूर्णत्वाकडे जातील.

१६. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी राबवावयाचे उपक्रम

हिंदु समाज आणि सध्याची सामाजिक परिस्थिती यांचा विचार करता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठीचे काही प्रयत्न असे करता येतील.

१६ अ. प्रवचने : हिंदु धर्माचे महत्त्व, प्रतिदिन साधना करण्याचे महत्त्व, एखाद्या सणाच्या पाश्र्वभूमीवर ‘तो सण धर्मशास्त्रदृष्ट्या कसा साजरा करावा आणि त्याचे महत्त्व काय’, अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या गटांसाठी प्रवचनांचे आयोजन करता येईल.

१६ आ. साप्ताहिक धर्मसत्संग : ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिज्ञासू हिंदू आहेत, तेथे साप्ताहिक धर्मसत्संग आयोजित करता येतील.

१६ इ. बालसंस्कारवर्ग : मोठ्यांप्रमाणे लहानांवरही धर्माचे संस्कार होणे आवश्यक आहे. शिशुवर्गासाठी साप्ताहिक बालसंस्कारवर्ग आयोजित करणे महत्त्वाचे आहे. अशा बालसंस्कारवर्गातून मुलांनी सायंकाळी कोणत्या प्रार्थना म्हणायच्या, मोठ्यांशी आचरण कसे ठेवायचे, वेगवेगळे गुण संपादन करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, यांविषयी मार्गदर्शन करता येईल.

१६ ई. नियतकालिके : आपल्या संघटनेचे एखादे नियतकालिक असेल, तर त्यात ‘धर्मशिक्षण’ हे सदर नियमित चालू करता येईल. त्यातून सण आणि धार्मिक उत्सव यांचे महत्त्व आणि ते कसे साजरे करावेत, हिंदु धर्मानुसार आचरण कसे असावे, अशा विषयांवर लेख प्रसिद्ध करता येतील.

१६ उ. संकेतस्थळे : आपल्या संघटनेचे संकेतस्थळ असल्यास असे धर्मशिक्षणाचे सदर संकेतस्थळावरूनही चालू करता येईल.

१६ ऊ. दृकश्राव्य माध्यमे : दृकश्राव्य माध्यम हे सध्याच्या युगातील अत्यंत गतीमान असे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे पुष्कळ अल्प अवधीमध्ये आपण अनेक लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचू शकतो. या माध्यमातूनही आपण हिंदूंना धर्मशिक्षण देऊ शकतो. धर्मशिक्षण देणार्‍या ध्वनीचित्रचकत्या दूरचित्रवाहिन्यांवरून किंवा स्थानिक केबल वाहिन्यांवरूनही प्रसारित करता येतील. अगदीच शक्य नसेल त्या ठिकाणी २०-२५ लोकांना एकत्र करून त्यांना धर्मशिक्षण देणारी ध्वनीचित्रचकती दाखवता येईल. अशा धर्मशिक्षण देणार्‍या ध्वनीचित्रचकत्यांच्या अनेक मालिका हिंदु जनजागृती समितीने बनवल्या आहेत. त्यांचा वापर आपण समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी करू शकता. त्याचप्रमाणे वर उल्लेख केलेल्या उपक्रमांविषयी आपणाला काही साहाय्य हवे असल्यास समिती आपणाला ते साहाय्य करू शकेल.

१६ ए. ग्रंथ : ग्रंथांच्या माध्यमातून प्रभावी धर्मप्रसार करता येतो. हिंदु धर्माच्या प्रसारासाठी सनातनचे धर्मशिक्षणपर धर्मग्रंथ उपयुक्त आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत या ग्रंथांमुळेच समिती आणि संस्था यांच्या कार्याचा प्रसार झाला. सनातन संस्थेचे साधक संख्येने खूपच कमी आहेत. तरीही सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य विस्तृत आहे. याचे कारण म्हणजे सनातन संस्थेने प्रकाशित केलेले धर्मप्रसाराचे ग्रंथ, हे आहेत. या ग्रंथांत धर्म, अध्यात्म, देवता, धर्मग्रंथ यांविषयीचे ज्ञान सामावले आहे, त्यामुळे ते चैतन्यमय आहेत. सनातनचे सर्व ग्रंथ वैज्ञानिक भाषेत म्हणजे टक्केवारी, प्रमाण, तुलनात्मक फरक अशा स्वरूपातील आहेत. पूर्वीच्या काळी शब्दप्रमाण होते; पण आताचा काळ बुद्धीप्रमाण आहे. त्यामुळे शिवाला बेल का आणि कसा वहावा, स्त्रियांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा का लावावे, धर्मशास्त्रानुसार पेहराव का करावा, आचारधर्माचे पालन कसे करावे आदींमागील का आणि कसे यांविषयीची शास्त्रीय माहिती या ग्रंथांतून दिल्यामुळे विज्ञाननिष्ठ आणि देशविदेशातील असे सर्वजण या ग्रंथांकडे आकृष्ट होतात. असे चैतन्यमय ज्ञान सामावलेल्या ग्रंथांमुळेच सनातनचा खरा धर्मप्रसार होतो. अन्य राज्यांतही धर्मशिक्षण देण्यासाठी या ग्रंथांचा लाभ घेता येईल. तसेच हे ग्रंथ विविध भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी या ग्रंथांच्या भाषांतराची सेवा करण्यास आपल्या ओळखीतील कोणी इच्छुक असल्यास आम्हाला संपर्क करू शकता. या माध्यमातून ते धर्मकार्यासाठी हातभार लावू शकतात.

१७. धर्मशिक्षणाच्या उपक्रमांतूनच परिणामकारक हिंदुसंघटन आणि हिंदु धर्म प्रसार होईल !

‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सनातन संस्था’ स्थापनेपासून हिंदूंना धर्मशिक्षण देणारे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे या दोन्ही संघटनांच्या कार्यात अनेक हिंदू सामील होत गेले. या दोन्ही संघटनांचे कार्य अल्पावधीत वाढण्यासाठी धर्मशिक्षणाचे उपक्रम हे प्रमुख माध्यम बनले आहे. या दोन्ही संघटनांवर जेव्हा जेव्हा संकटे आली, त्या वेळी या संघटनांतील कार्यकर्ते आणि साधक न डगमगता टिकून राहिले, याचेही मुख्य कारण त्यांना धर्मशिक्षणवर्गातून मिळणारी शिकवण हे होते.

आपल्यामुळे नाही, तर ‘हिंदु धर्म’ या शब्दांतील चैतन्यामुळे कार्य होते ! : एखाद्याचे नाव एखाद्या गल्लीत ठाऊक असेल, तर तो त्या गल्लीत कार्य करू शकतो. एखाद्याचे नाव एखाद्या गावात ठाऊक असेल, तर तो त्या गावात कार्य करू शकतो. एखाद्याचे नाव एखाद्या जिल्ह्यात ठाऊक असेल, तर तो त्या जिल्ह्यात कार्य करू शकतो. एखाद्या संघटनेचे नाव एखाद्या राज्यात ठाऊक असेल, तर ती त्या राज्यात कार्य करू शकते. एखाद्या संघटनेचे नाव एखाद्या राष्ट्रात ठाऊक असेल, तर ती त्या राष्ट्रात सर्वत्र कार्य करू शकते. याउलट, हिंदु धर्म जगभर कार्य, म्हणजे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करू शकतो ! हे जाणले की, कोणाच्यातही कार्यासंदर्भात अहंभाव निर्माण होत नाही. त्यामुळे त्याच्याकडून अहंविरहित कार्य होऊ लागते. असे झाले की, त्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि कार्य यशस्वी होते. त्याचबरोबर त्याची आध्यात्मिक उन्नतीही होते.’

१८. जगभरात हिंदु धर्माच्या प्रसाराची आवश्यकता

हा सर्व विचार आपण केवळ भारतातील जनतेपुरता करतो. पुढे जाऊन आपल्याला सार्‍या विश्वाचा विचार करायचा आहे. आपल्या पूर्वजांनी ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’, म्हणजे ‘अवघे विश्व आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू’, अशी घोषणा केली होती आणि त्यांनी ती कृतीतही आणून दाखवली होती. द्वापरयुगापर्यंत पृथ्वीवर एकच सनातन धर्म होता. त्यामुळे पृथ्वीवरील मानव सुखी होता. आता मानवाला सुखी करण्यासाठी जगभरात हिंदु धर्माची प्रस्थापना करणे आवश्यक झाले आहे आणि हे समाजाला धर्मशिक्षण देण्याच्या उपक्रमांतून साध्य होऊ शकते. इथे लक्षात घेतले पाहिजे की, इतर धर्मियांचा प्रचार हा केवळ त्यांच्या धर्मियांचे जगावर राज्य आणण्यासाठी असतो. याउलट हिंदूंचा प्रचार हा अखिल मानवजातीला सुखी करण्यासाठी असतो.

आपणही या दिशेने प्रयत्न करावेत. स्वतः साधना करून आत्मबलसंपन्न बनावे. कार्यकर्त्यांना धर्माचरणाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून ते करवून घ्यावे आणि हिंदु समाजालाही धर्मशिक्षण देऊन तो धर्माचरणी अन् आदर्श हिंदू राष्ट्रासाठी पात्र होईल, असे करावे, अशी आपल्याला विनंती करतो.

या दृष्टीकोनातून आपणा सर्वांचे प्रयत्न होवोत, तसे प्रयत्न करत असतांना येणार्‍या अडचणींचे निराकरण होवो, अशी मी माझ्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करून माझा विषय संपवतो.