शिवसैनिक पोलिसांच्या कह्यात !
- राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती आणि हिंदूंना मात्र मंदिरात जाण्यास विरोध असा दुटप्पीपणा का ?
- गडावर हिंदूंना प्रतिबंध केला जाणे, हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी अन्यायकारक होय ! – संपादक, हिंदु जनजागृती समिती

कल्याण (जिल्हा ठाणे) – ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात हिंदु भाविकांना प्रवेश मिळावा आणि हिंदु भाविकांवरील निर्बंध हटवण्यात यावेत, या मागणीसाठी कल्याण येथील लालचौकी येथे गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर शिवसेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घंटानाद आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुर्गाडीच्या दिशेने जाणार्या शिवसैनिकांना पोलिसांनी बॅरिकेड्स (प्रतिबंधात्मक जाळीद्वारे) रोखले. नमाजपठणाच्या काळात एकाही शिवसैनिकाला पोलिसांनी तेथे जाऊ दिले नाही. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना कह्यात घेतले आणि त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
या वेळी हिंदूंनी ‘दुर्गाडी किल्ला आमच्या हक्काचा’ अशा घोषणा दिल्या. ‘हिंदु भाविकांना श्री दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे, तो आम्हा हिंदूंचा हक्क आहे’, अशा आशयाचे फलक सर्वांनी हाती घेतले होते. शुभ्र सदरे आणि भगव्या टोप्या यांमुळे वातावरणात वीरश्री संचारली होती.
काय आहे प्रकरण ?
बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. बंदीच्या या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. वर्ष १९८२ पासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशांनुसार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी येथे घंटानाद आंदोलन चालू केले होते. ते अजूनही चालू आहे. हा वाद गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ चालू आहे.
ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !
-
गडावरील ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट, तरीही रस्ता अडवून नमाजपठण !
-
नमाजपठणाच्या वेळी हिंदूंना गडावरील दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेशबंदी

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे असलेल्या दुर्गाडी गडावरील कथित ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. असे असूनही दुर्गाडी गडाच्या बाहेर सहस्रावधी मुसलमान मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ता अडवून नमाजपठण करत आहेत. संतापजनक गोष्ट म्हणजे नमाजपठणाच्या वेळेत दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीच्या मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. भोजशाळेतही शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी हिंदूंना सरस्वतीमातेची पूजा करण्यावर आतापर्यंत बंदी घालण्यात आली होती. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने भोजशाळा हिंदूंचीच असल्याचा निर्णय दिल्यानंतर हिंदू तेथे आता प्रतिदिन पूजा-अर्चना करू शकतात.
ईदगाह नसल्याचे पुरावे असे !
संतापजनक गोष्ट अशी की, दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिरही मशीद असल्याचा दावा मुसलमानांनी केला होता; मात्र गडावरील ही वास्तू मंदिरच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यासह या कथित ‘ईदगाह’चा विषयही सध्या कल्याण जिल्हा न्यायालयात प्रविष्ट आहे. दुर्गाडी गडावरील ही भिंत ‘ईदगाह’ असल्याच्या वल्गना मुसलमान करत आहेत. ‘ईदगाह’च्या दोन्ही बाजूंना मिनार असतात. तसे मिनार या भिंतीला नाहीत. ‘ईदगाह’च्या मध्ये मुसलमान धर्मगुरूंना भाषण करण्यासाठी जागा असते, तशी जागाही या भिंतींच्या मध्ये नाही. असे असूनही वर्षानुवर्षे मुसलमानांच्या झुंडशाहीपुढे नमून प्रशासनाकडून रस्त्यावरील नमाजपठणाला संरक्षण दिले जात आहे.
पोलिसांनी हिंदूंना मंदिरात जाण्यापासून रोखू नये – शिवसेना
दुर्गाडी गडावर श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. नमाजपठणाच्या वेळी पोलीस मंदिरात जाण्यापासून हिंदूंना रोखतात. मंदिरात जाणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे. पोलिसांनी त्यापासून आम्हाला रोखू नये. उलट रस्ता अडवून अवैधपणे नमाजपठण करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली.







