हिंदु राष्ट्राची पायाभरणी यांसाठी हिंदू जनजागृती समितीचे उपक्रम !

वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आणि हिंदु राष्ट्राची पायाभरणी यांसाठी हिंदू जनजागृती समितीचे धर्मजागरण अन् हिंदूसंघटन उपक्रम !

सद्य:स्थितीत धर्मनिरपेक्ष (अधर्मी) लोकशाहीमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची परम अधोगती झाली आहे. हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर उपाय म्हणून भारतात हिंदु धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदू जनजागृती समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण या उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी हिंदूसंघटनाचे कार्य करत आहे. या धर्मकार्यात आपणही स्वक्षमतेनुसार अधिकाधिक वेळ देऊन सहभागी झाल्यास आपला धर्मासाठी (म्हणजेच ईश्‍वरासाठी) तन, मन आणि धन यांचा त्याग होईल अन् आपली आध्यात्मिक प्रगतीही होईल.

हिंदु समाज हिंदु म्हणून जागृत झाला, तरच धर्मरक्षणासाठी कृतीशील होऊ शकतो; म्हणूनच हिंदू जनजागृती समिती राबवत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी प्रभावी ठरणार्‍या उपक्रमांचे आयोजन कसे करायचे, याविषयीचे दिशादर्शन येथे केले आहे.

१. धर्मशिक्षणवर्ग

हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव, हेच हिंदूंच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. मुसलमानांना मदरशांत आणि ख्रिस्त्यांना चर्चमध्ये धर्मशिक्षण मिळते, तसे हिंदूंना मिळत नाही. परिणामी त्यांच्यात धर्माभिमान नाही. यासाठीच हिंदू जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग आयोजित करते.

१ अ. आयोजन : आपल्या परिसरात धर्मप्रेमींच्या वेेेळेची अनुकूलता पाहून सप्ताहातून एकदा मंदिर, सभागृह, धर्मप्रेमीचे घर आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करावा. या वर्गात हिंदू जनजागृती समितीने बनवलेल्या धर्मसत्संगांच्या व्हीसीडींचे एकेक भाग दूरचित्रवाणी संच अथवा प्रोजेक्टर यांद्वारे दाखवता येतील. (समितीकडे धर्मसत्संगांच्या ३६७ व्हीसीडी उपलब्ध असून वर्गासाठी ती त्या उपलब्ध करून देईल.) प्रत्येक १५ दिवसांनी धर्माचरण आणि साधना यांविषयी शंकानिरसन अन् मार्गदर्शन करण्यासाठी समितीचेधर्मप्रसारक या वर्गाला उपस्थित रहातील.
स्थानिक केबल वाहिन्यांवरूनही धर्मसत्संगांच्या व्हीसीडींच्या प्रसारणासाठी संपर्क करता येईल.

१ आ.    धर्मशिक्षणवर्गाचे लाभ : १. धर्मशिक्षणवर्गात हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते. २. ईश्‍वरप्राप्ती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी साधना कशी करावी, याविषयी कृतीशील मार्गदर्शन मिळते. ३. धर्मरक्षणाच्या आगामी कृतींचे नियोजन एकत्रितपणे करता येते.

२. बालसंस्कारवर्ग

मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी हिंदू जनजागृती समिती बालसंस्कारवर्गांचे आयोजन करते. ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी एखाद्याचे घर अथवा मंदिर येथे बालसंस्कारवर्ग आयोजित करता येईल. आपणही Balsanskar.com हे संकेतस्थळ पाहून असा वर्ग घेऊ शकता.

३. जागो लघुसंदेश (एस्.एम्.एस्.)

धर्मजागृतीसाठी हिंदू जनजागृती समिती प्रतिदिन समाज, राष्ट्र्र अन् धर्म यांवरील आघाताचे वृत्त आणि त्यावरील योग्य दृष्टीकोन जागो लघुसंदेशाच्या (एस्.एम्.एस्.च्या) माध्यमातून ३ लक्षहून अधिक हिंदूंपर्यंत पोहोचवते. आपणही हा लघुसंदेश स्वतःच्या भ्रमणभाषद्वारे नातेवाईक, मित्र, व्यवसायानिमित्त परिचय झालेले हिंदू या सर्वांना पाठवून धर्मजागृती करू शकता.

जागो लघुसंदेश मिळण्यासाठी समितीच्या स्थानिक समन्वयकांशी संपर्क साधावा.

३ अ. जागो लघुसंदेशाचा लाभ :

१. जागो लघुसंदेशाद्वारे हिंदूंची संपर्कयंत्रणा बनते. त्यामुळे आपद्प्रसंगी काय करावे, याविषयी लघुसंदेशातून हिंदूंना दिशादर्शन करता येते.

२. जागो लघुसंदेश धर्मजागृतीपर असल्याने ते लिखाण मंदिरे, चौक इत्यादी सार्वजनिक ठिकाणच्या सूचना फलकांवर प्रतिदिन खडूने लिहू शकतो. यामुळे एकाच वेळी अनेकांमध्ये धर्मजागृती करता येते.

४. राष्ट्र आणि धर्म जागृतीपर व्हीसीडींचे प्रसारण

२०१२ आणि २०१३ या वर्षी गोव्यात झालेल्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या धर्मजागृतीपर मार्गदर्शनांच्या व्हीसीडी (हिंदीत २५ आणि इंग्रजीत ४) समितीने बनवल्या आहेत. या व्हीसीडी एकेक घंट्याच्या असून त्या समाजातील विविध घटकांमध्ये (उदा. युवा मंच, गणेशोत्सव मंडळे) धर्मजागृती करण्यासाठी उपयुक्त आहेत.

४ अ. आयोजन : सर्वांच्या सोयीने सप्ताहातून एकदा एखाद्याचे घर, देऊळ, कार्यालय, सभागृह आदी ठिकाणी दूरचित्रवाणी संच / प्रोजेक्टर यांद्वारे हिंदु अधिवेशनाच्या व्हीसीडी दाखवता येतील.

५. धर्मजागृतीपर फलक प्रदर्शनांचे आयोजन

हिंदू जनजागृती समितीने पुढील विषयांवर २०० धर्मजागृतीपर फलकांची निर्मिती केली आहे.

५ अ. धर्मजागृतीपर प्रदर्शनांचे दहा विषय

१. देवतांची उपासना : ग्रामदेवता, कुलदेवता, अन्य देवी, तसेच विठ्ठल, गणपति, शिव, दत्त, मारुति, श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या उपासनेविषयी दिशादर्शन करणारे फलक प्रदर्शन

२. हिंदु संस्कृतीचे पालन : हिंदु धर्मातील आचारपालनाविषयी दिशादर्शन करणारे फलक प्रदर्शन

३. राष्ट्ररक्षण : राष्ट्रप्रतिकांचा सन्मान करा, स्वदेशी अस्मिता जोपासा, स्वभाषाभिमान वाढवा, राष्ट्ररक्षण करा, इतिहासाचे विकृतीकरण रोखा इत्यादी विषयांवर फलक प्रदर्शन

४. धर्मजागृती : लव्ह जिहाद, देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांंतील अपप्रकार, हिंदुविरोधी कायदे, पाश्‍चात्त्य प्रथांचे दुष्परिणाम इत्यादी विषयांवर हिंदूंमध्ये जागृती करणारे फलक प्रदर्शन

५. हिंदु राष्ट्र का हवे ? : निरर्थक लोकशाही अन् हिंदु राष्ट्र-स्थापना याविषयीचे फलक प्रदर्शन

६. क्रांतीपुरुषांचे स्मरण : हिंदूंचे राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचा तेजस्वी इतिहास सांगणारे प्रदर्शन

७. आतंकवादाचे भीषण सत्य : जिहाद्यांनी काश्मिरी हिंदूंवर केेलेले अत्याचार सांगणारे चित्रप्रदर्शन

८. बांगलादेशी हिंदूंची व्यथा : बांगलादेशी हिंदूंना भोगाव्या लागणार्‍या नरकयातनांचे चित्रप्रदर्शन

९. मंदिरांचे रक्षण : मूर्तीभंजन, मंदिरांचे सरकारीकरण, पावित्र्यरक्षण आदी विषयांवरील प्रदर्शन

१०. गोरक्षण आणि गंगारक्षण : गोमाता अन् गंगा यांच्या रक्षणाविषयी जागृती करणारे प्रदर्शन

हे धर्मजागृतीपर फलक हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलगू, तमिळ आणि मल्याळम् या ९ भाषांत असून या संदर्भात धर्मशिक्षण फलक हा ग्रंथही हिंदू जनजागृती समितीने प्रकाशित केला आहे. हा ग्रंथ पाहून आपल्यासाठी कोणते फलक छपाई करायचे, हे ठरवता येईल.

५ आ. जागेची आवश्यकता : हे फलक ३ फूट x ४ फूट या आकाराचे असून १०० फूट सरळ जागेत किंवा २५ फूट X २५ फूट लांबीच्या चौकोनामध्ये २५ ते ३० फलकांचे प्रदर्शन लावता येते.

५ इ. काळ : हे प्रदर्शन विषयानुरूप विशेष दिवशी, उदा. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी, तसेच सार्वजनिक धार्मिक उत्सव, मंदिरे, यात्रोत्सव, विवाह समारंभ इत्यादी प्रसंगी लावता येईल. अवतीभोवतीच्या परिसरात/गावांत मोक्याच्या ठिकाणी सुटीच्या दिवशी हे प्रदर्शन लावता येईल.

५ ई. धर्मजागृतीपर फलकांच्या प्रदर्शनाचे लाभ : आतापर्यंत हिंदू जनजागृती समितीने २ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी धर्मजागृतीपर फलकांच्या प्रदर्शनांचे आयोजन केले असून या माध्यमातून अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याशी जोडले गेले आहेत. २०१३ मधील कुंभमेळ्यात समितीने लावलेल्या प्रदर्शनाचा लाभ २ लक्षहून अधिक भाविकांनी घेतला. या प्रदर्शनामुळे समितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी भारतभरात २ सहस्रहून अधिक संपर्क मिळाले, तसेच ४० संतांनी आपापल्या क्षेत्रांत हे प्रदर्शन लावण्यासाठी समितीला आमंत्रित केले आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य भारतभर पोहोचले.

६. धर्मजागृतीपर साहित्य प्रायोजित करून त्याचे वितरण

हिंदू जनजागृती समितीनिर्मित धर्मजागृतीपर फलक, तसेच धर्मशिक्षण फलक, हिंदु राष्ट्र का हवे ?, लव्ह जिहाद, धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण, धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान, देवनदी गंगेचे रक्षण करा !, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादी धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी उपयुक्त ग्रंथ दानशुरांकडून प्रायोजित करून घ्यावेत. त्यांचे वितरण पुढीलप्रमाणे करता येईल.

अ. धर्मजागृतीपर फलक : देवळे, रुग्णालये, कार्यालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अनुमती घेऊन कायमस्वरूपी लावता येतील. यामुळे तेथे ये-जा करणार्‍यांमध्ये धर्मजागृती होईल.

आ. धर्मजागृतीपर ग्रंथ : धर्मजागृतीपर प्रदर्शनाला भेट देणारे, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, धर्मकार्यात साहाय्य करणारे धर्मप्रेमी इत्यादींना भेट द्यावेत.

७. हिंदूंमध्ये जागृती करण्याचे प्रभावी माध्यम : हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदू जनजागृती समिती हिंदूजागृती आणि हिंदूसंघटन होण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करते. वर्ष २०१३ पर्यंत, म्हणजे गेल्या ६ वर्षांत समितीने ७ राज्यांत अनुमाने ९०० धर्मजागृती सभांच्या माध्यमातून ११ लाख हिंदूंमध्ये धर्मजागृती केली आहे.

७ अ. हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

१. मनुष्यबळ : जाहीर धर्मसभेचे आयोजन न्यूनतम १० कार्यकर्त्यांच्या साहाय्याने करता येते.

२. काळ : पावसाळ्यानंतर ८ महिन्यांच्या कालावधीत कधीही धर्मसभांचे आयोजन करता येते.

३. स्थळ : ५ ते ६ सहस्र लोकवस्ती असलेल्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत सभागृहांत किंवा मोकळ्या पटांगणात धर्मसभा घेता येतात.

४. प्रसार : पत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे, वाहनातून उद्घोषणा करणे आदींद्वारे करता येतो.

७ आ. हिंदु धर्मजागृती सभेचे लाभ

१. एखाद्या परिसरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले की, त्या भागातील हिंदूंमध्ये धर्मजागृती होते आणि हिंदुत्वाविषयी आस्था असलेल्यांना शोधणे सुलभ होते.

२. धर्मसभेनंतर हिंदु धर्मावरील संकटांविरुद्ध कृती करण्याची इच्छा हिंदूंमध्ये निर्माण होते.

३. धर्मसभेनंतर उपस्थित हिंदू स्वक्षमतेनुसार धर्मशिक्षणवर्ग, धर्मजागृतीपर प्रदर्शन, स्वसंरक्षण प्रशिक्षण आदी उपक्रमांत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करून धर्मरक्षणार्थ कृतीशील होतात.

४. हिंदु धर्मजागृती सभेला श्रोता म्हणून आलेले काही हिंदुत्ववादी गट त्यांच्या परिसरात किंवा गावात अशाच प्रकारच्या धर्मसभेचे आयोजन करतात.

८. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंच्या संघटनासह त्यांना बलशाली करण्याचा उपक्रम म्हणजे ठिकठिकाणी कराटे, लाठी चालवणे आदी स्वसंरक्षणविद्या शिकवणारे विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करणे. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांतून हिंदु समाज संघटित आणि सशक्त झाला की, तो हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांवरील संकटांचा परिणामकारकपणे प्रतिकार करू शकेल.

८ अ. आयोजन : सप्ताहातून एक किंवा दोन दिवस पटांगणात स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करता येईल. या प्रशिक्षणवर्गाचा प्रसार शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा आदी ठिकाणी भित्तीपत्रके लावणे, पत्रके वाटणे, स्वसंरक्षण शिकण्याची आवश्यकता या विषयावर व्याख्याने देणे आदी माध्यमांतून करता येईल. या उपक्रमासाठी कराटे, लाठी शिकलेल्या धर्मप्रेमी तरुणांचे साहाय्य घेता येईल. प्रशिक्षण घेतल्यानंतर कार्यकर्ते स्वतःच अन्यत्र स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेऊ शकतात.

८ आ. स्वरूप : स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात कराटे, लाठी चालवणे इत्यादी शिकवले जाते. या प्रशिक्षणवर्गासाठी आवश्यकतेप्रमाणे हिंदू जनजागृती समिती प्रशिक्षक उपलब्ध करील.

९. स्वभाषा, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे उपक्रम

पुढील उपक्रम नियमित राबवून राष्ट्र अन् धर्म जागृतीसाठी वर्षभर कार्यरत रहाता येईल.

९ अ. मातृभाषेचे रक्षण करा !

१. घर आणि कार्यालय यांवर नावाची पाटी मातृभाषेत लावण्याविषयी प्रचार करा !

२. दुकानांची नावे इंग्रजीत न ठेवता स्वभाषेत ठेवण्याविषयी (उदा. उपाहारगृहाचे नाव Suruchi Hotel न ठेवता सुरुची भोजनालय असे ठेवण्याविषयी) दुकानदारांना सांगा !

९ आ. हिंदु संस्कृतीचे पालन करून संस्कृतीप्रेमी व्हा !

१. एकमेकांना भेटतांना शेक हॅण्ड न करता हात जोडून नमस्कार करण्याविषयी प्रबोधन करा !

२. हिंदूंचे राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन संघटितपणे साजरे करून त्यांचे स्मरण करा !

३. हिंदूसंघटनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी आदर्शरित्या साजरे करा !

४. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे आदी पाश्‍चात्त्यांचे डे स्वत: साजरे करू नका, तसेच हे एका दिवसाचे सांस्कृतिक धर्मांतर रोखण्यासाठी प्रबोधन करा !

९ इ. परकीय दास्यत्वाच्या प्रतिकांना विरोध करा !

१. कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु मुलामुलींना मेंदी लावणे, बांगड्या घालणे, टिळा लावणे आदी धर्माचरणास प्रतिबंध करतात. अशा शाळांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना जागरूक करा !

२. कॉन्व्हेंट शाळांनी हिंदु धर्मातील सणांच्या काळात परीक्षा ठेवल्यास वा विद्यार्थ्यांना मराठीतून बोलण्यास प्रतिबंध केल्यास शिक्षण विभागाकडे तक्रार करा !

३. भारत उष्णकटीबंधीय प्रदेश असूनही शाळेत टाय, कोट, तसेच संस्कृतीहीन आखूड स्कर्ट अशी पाश्‍चात्त्य वेशभूषा असल्यास ती पालटण्यास शाळेच्या व्यवस्थापनाला भाग पाडा !

४. परकीय आक्रमकांची नावे असलेल्या गावांना त्यांचे मूळ नाव मिळण्यासाठी आंदोलन करा !

५. राष्ट्रपुरुषांचा इतिहास विकृतपणे सादर करणार्‍या इतिहासाच्या पुस्तकाविरुद्ध आंदोलन करा !

९ ई. गावातील दुष्प्रवृत्तींना विरोध करा !

१. गावातील व्यसनाधीनतेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवा !

२. मटका खेळणारे आणि जातीद्वेष पसरवणारे यांना वैध मार्गाने विरोध करा !

३. शासकीय कर्मचार्‍यांची संपत्ती अल्पावधीत वेगाने वाढत असल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करा !

४. वजनमापात फसवणारे भाजीवाले, गिरणीवाले आणि दुकानदार; धान्य, पेट्रोल इत्यादींमध्ये भेसळ करणारे; तिकीट काढल्यावर उर्वरित सुटे पैसे (उपलब्ध असूनही) परत न करणारे बसवाहक; शाळेत प्रवेशासाठी देणगी मागणार्‍या शिक्षणसंस्था आदींना वैध मार्गाने विरोध करा !

५. अश्‍लील विज्ञापने असलेल्या फलकांच्या (होर्डिंग्जच्या) विरोधात आंदोलन करा !

९ उ. हिंदु धर्माची होणारी हानी रोखून धर्मप्रेम वाढवा !

१. देवतांची चित्रे असलेले कपडे घालणे; जिन्यात देवतांच्या चित्रांच्या लाद्या (फरशा) लावणे; देवतांची चित्रे विकृतपणे रेखाटणे आदी माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखा !

२. भाषणे, पुस्तके, वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, चित्रपट आदींच्या माध्यमातून देवता, संत आणि हिंदूंच्या धार्मिक प्रथा यांची टिंगलटवाळी करणार्‍यांना वैध मार्गाने जाब विचारा !

३. हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी बळाने वर्गणी वसूल करणे, ध्वनीप्रदूषण करणे, मिरवणुकीत मद्य पिऊन नाचणे, महिलांची छेड काढणे आदी         अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवून ते रोखा !

४. देवळांतील उत्सवांच्या वेळी होणारे ऑर्केस्ट्रा, मनोरंजनात्मक नाटके, चित्रपट यांसारख्या अधार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण रोखून देवळांच्या पावित्र्य रक्षणासाठी प्रयत्न करा !

५. धर्मद्रोही विचार पसरवणारी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांवर बहिष्कार घाला !

६. पाकच्या कलाकारांचे चित्रपट/दूरचित्रवाहिन्या यांवरील कार्यक्रम यांवर बहिष्कार घाला ! तसेच पाकच्या कलाकारांचे चित्रपट न दाखवण्यासंबंधी चित्रपटगृहचालकांचे प्रबोधन करा !

७. देवतांची नावे असलेल्या मद्याच्या दुकानांची नावे पालटण्यासाठी आंदोलन करा !

९ ऊ. स्वरक्षण, ग्रामरक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी पुढाकार घ्या !

१.  गावगुंडांपासून रक्षण : सार्वजनिक ठिकाणी उपद्रव देणार्‍या गावगुंडांना संघटितपणे समज द्या !

२. हिंदुद्वेषी अन्य पंथियांपासून रक्षण : अन्य पंथियांच्या हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमण करणे, दंगली घडवणे, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर आदी आक्रमणांपासून हिंदूंचे रक्षण करा !

३. देवळांचे रक्षण करणे : हिंदुद्वेष्ट्यांनी देवळांत चोर्‍या, मूर्तीभंजन, मांस टाकणे इत्यादी प्रकार करू नयेत, यासाठी ग्रामस्थांचे गट करून आळीपाळीने रात्री देवळांभोवती पहारा ठेवा !

४. गावात होणार्‍या राष्ट्र आणि धर्म विरोधी हालचालींविषयी पोलिसांना त्वरित कळवा !

९ ए. हिंदु बांधवांच्या साहाय्यासाठी भक्कम संपर्कयंत्रणा उभारा ! : अन्य पंथीय त्यांच्या विरोधात एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ मोठ्या संख्येने एकत्रित होतात, तसे हिंदूंच्या संदर्भात होत नाही. यासाठी एखादी हिंदुविरोधी घटना, उदा. दंगल घडल्यास किंवा एखाद्या हिंदूवर अन्याय झाल्यास त्याविरुद्ध संघटित होण्यासाठी गावातील हिंदूंची प्रभावी संपर्कयंत्रणा विकसित करा !