Menu Close

हिंदु राष्ट्रासंदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

१. ‘हिंदू राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?

‘हिंदू राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक फाजील प्रश्न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदू राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ? खरे म्हणजे हा प्रश्न मुसलमानांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. ते ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान !’ असेच म्हणत रहातात.

अर्थात् या प्रश्नालाही उत्तर आहे. आगामी ‘हिंदू राष्ट्रा’त मुसलमानांनाच नव्हे, तर सर्वच पंथियांना शिवशाहीत दिली गेली, तशीच वागणूक मिळेल !

थोडक्यात, सूर्य उगवण्यापूर्वी सर्वत्र काळोख दाटून राहिलेला असतो, भूमीवर विसर्जित केलेल्या मल-मूत्राचा दुर्गंध येत असतो; परंतु सूर्य उगवताच काळोख आपोआपच नष्ट होतो, सर्व दुर्गंध वातावरणात विरून जातो. काळोखाला किंवा दुर्गंधाला कोणी सांगत नाही की, ‘दूर जा, सूर्य उगवतो आहे !’ आपोआपच हे सारे घडते. त्याचप्रमाणे आज भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख आणि दुर्गंध ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना होताच नष्ट होईल. धर्माचरणी राज्यकर्त्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल !

२. प्रथम गोहत्या, हिंदुंचे धर्मांतरण असे प्रश्न सोडवावेत की आधी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करावेत ?

केवळ भारतातीलच लोकांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन करावयाचे ‘हिंदू राष्ट्र’ मात्र आपोआप स्थापन होणार नाही. पांडवांना केवळ पाच गावे हवी होती, तीही त्यांना सहजासहजी मिळू शकली नाहीत. आपल्याला तर काश्मीर ते कन्याकुमारी असे अखंड ‘हिंदू राष्ट्र’ हवे आहे. यासाठी मात्र मोठा लढा द्यावा लागणार आहे. भारतासमोरील एकट्या-दुकट्या समस्यांच्या (उदा. गोहत्या, धर्मांतर, गंगेचे प्रदूषण, काश्मीर, राममंदिर, स्वभाषारक्षण आदींच्या) विरोधात स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा सर्व समविचारी व्यक्ती आणि संस्था यांनी मिळून ‘हिंदू राष्ट्र-स्थापना’ हेच ध्येय बाळगून कृती केली, तर हा लढा थोडा सुकर होईल.

३. धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय ?

अ. हिंदूंचे हित जपणारे राष्ट्र !

आ. राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था ! : काही जणांना ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले की, एखाद्या राजकीय पक्षाने मांडलेली त्याच्या लाभाची संकल्पना आठवते; पण ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था असेल.

इ. ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था म्हणजे ‘ईश्वरी राज्य’ ! : ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापी ‘हिंदू राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.

ई.जनहितकारी पितृशाही असलेले ‘आदर्श राज्य’ ! : त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाज, कर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासन, ही या ‘हिंदू राष्ट्रा’ची वैशिष्ट्ये असतील.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा बाळगणारे, तसेच समाजहितासाठी निःस्पृहपणे अहोरात्र झटणारे राज्यकर्ते, हे या ‘हिंदू राष्ट्रा’चे आधारस्तंभ असतील. असे ‘हिंदू राष्ट्र’ जगातील एक ‘आदर्श राज्य’ असेल !

४. हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणालीमूळे अखिल मानवजात सुखी कशी होऊ शकणार ?

अ. जगासाठी आदर्श राज्यपद्धत : सनातन हिंदु धर्म हा नीतीचे मूळ आहे. धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालींमध्ये धर्माचे (पंथाचे नव्हे) अधिष्ठान नसल्याने राष्ट्रातील नागरिकांचे नैतिक अधःपतन होत आहे. त्यामुळे कालबाह्य साम्यवाद, अत्याचारी हुकूमशाही आणि स्वार्थी लोकशाही या फसलेल्या राज्यपद्धतींना ‘हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली’ हा आदर्श पर्याय आहे. राष्ट्रजीवनात नैतिकतेचे संवर्धन करण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांना हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली अंगिकारणे आवश्यक ठरते.

आ. विश्वशांतीसाठी उपयुक्त : पृथ्वीवर शांततामय जीवन जगायचे असेल, तर हिंसाचाराची नव्हे, तर सहिष्णुतेची आवश्यकता आहे. सनातन हिंदु धर्म सहिष्णुतेसारख्या उच्चतम मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देतो. त्यामुळे तो जगासाठी कल्याणकारी आहे. हिंदु धर्माधारित राज्यप्रणाली जगभरातील राष्ट्रांनी आचरणात आणल्यास हिंसाचारी प्रवृत्तींचा लोप होईल; परिणामी जगभर युद्धबंदी होऊन अवघे जग शांती अनुभवील आणि विश्वशांतीचे महान ध्येय साध्य होईल !

इ. सृष्टीचा विनाश टाळण्याचा एकमात्र उपाय ! : ‘ज्या वेळेस धर्मग्लानी येते, म्हणजे मानव तमोगुणाच्या शिखरावर जातो, त्या वेळेस सर्वत्र अनैतिकताच पसरते. अशा वेळी निसर्ग पूर्णपणे प्रतिकूल होऊन प्रदूषणासारखी अनेक समस्यारूपी संकटे कोसळतात. असे झाले, तर सृष्टीचा विनाश जवळ आला, असे समजले जाते. अशा वेळी मानवामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी झाली, तरच सृष्टीचा विनाश टळतो. त्यासाठी रामराज्य, म्हणजे हिंदु धर्माने नियंत्रित केलेल्या राज्यघटनेवर आधारित राज्य, हा एकच उपाय संभवतो. आज ती वेळ जवळ येऊन ठेपली आहे !’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)

ई. अखिल मानवजातीचा उद्धार ! : ‘हिंदू राष्ट्राची स्थापना केवळ हिंदूंसाठीच नाही, तर जगभरच्या मानवांसाठी आवश्यक आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे ‘आदर्श राष्ट्र’ असल्याने त्याचा भारतातील जनतेला लाभ होणारच आहे; पण त्याचबरोबर हिंदू राष्ट्रामुळे जगभर हिंदु धर्माचा प्रसार करणे सुलभ झाल्याने जगभरच्या मानवांना अध्यात्म आणि साधना कळेल अन् त्यांचीही आध्यात्मिक प्रगती होण्यास साहाय्य होईल. त्यामुळे पृथ्वीवर सत्त्वप्रधान वातावरण निर्माण होऊन सर्व मानवजात सुखी होईल !’ – डॉ. जयंत आठवले, संकलक (वैशाख कृष्ण पक्ष १२, कलियुग वर्ष ५११४ ड१७.५.२०१२़)

उ. धर्माशी अद्वैत स्थापित झालेले राष्ट्रच वैभवशाली आणि चिरंतन ठरते ! : ‘जेव्हा संपूर्ण मानववंश धर्माचरण करायला लागेल, तेव्हा पृथ्वीवर एक राष्ट्र होईल, जसे सत्ययुगात होते. अशा वेळी राष्ट्र आणि धर्म यांमध्ये अद्वैत होते अन् असेच राष्ट्र चिरंतन होते. राष्ट्राचे सुख हे प्रजेच्या धर्माचरणाचे आनुषंगिक फळ असते. धर्माधिष्ठित राज्यप्रणालीतील राज्यकत्र्यांना हे तत्त्व समजल्यामुळे त्यांच्या राष्ट्रात निवृत्तीमार्गियांचा योगक्षेम निष्कंटक चालतो, ते राष्ट्र आचारविचारसंपन्न होते. म्हणूनच ते सर्व दृष्टीने समृद्ध होऊन त्यावर कधीच संकट येत नाही. असे राष्ट्र मृत्युंजय असते आणि हेच विश्वशांतीच्या रहस्याचे गमक आहे, असे आपली आर्य वैदिक हिंदु संस्कृती सांगते.’ – प.पू. काणे महाराज, पुणे, महाराष्ट्र. (१९९१)

थोडक्यात ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे विश्वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र होय !

५. ‘हिंदू राष्ट्र’ किंवा ‘हिंदू राष्ट्रा’ची मागणी करणे, हे संवैधानिक कि असंवैधानिक ?

‘भारतात विविध पंथांचे लोक रहात असून त्यांना ‘निधर्मी’ राज्यघटनेद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. असे असतांना ‘एका धर्माचे राष्ट्र स्थापन करण्याची मागणी करणे किंवा तसे राष्ट्र स्थापन होण्यासाठीे प्रयत्न करणे, हे घटनाबाह्य आहे’, असा आक्षेप ‘हिंदू’ शब्दाची बाधा (अ‍ॅलर्जी) असलेल्या काही जणांकडून घेतला जातो. विशेष म्हणजे असा आक्षेप घेणारी मंडळी आजपर्यंत करण्यात आलेल्या घटनाद्रोहांच्या विविध घटनांविषयी अवाक्षरही काढतांना दिसत नाहीत. अशा प्रकारे ‘घटनेच्या आडून चालू असलेल्या स्वतःच्या अनिर्बंध कारवायांवर बंधन येईल’, या भीतीने हिंदूंना विरोध करणार्‍या या तथाकथित घटनाप्रेमींसाठी ‘हिंदू राष्ट्र किंवा अशा राष्ट्राची मागणी करणे, हे घटनाबाह्य कसे नाही ?’, याचे विश्लेषण पुढे केले आहे.

१.  भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये सुधारणा करणे शक्य ! : आतापर्यंत भारतीय राज्यघटनेत ९७ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. घटनेच्या ३६८ व्या अनुच्छेदातील पहिल्या प्रावधानात स्पष्टपणे म्हटले आहे की, या संविधानात काहीही असले, तरी संसदेला आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून या संविधानाच्या कोणत्याही तरतुदींमध्ये, या अनुच्छेदात घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार अधिक भर घालून, फेरबदल करून किंवा तिचे निरसन करून सुधारणा करता येईल !

१ अ.‘हिंदू राष्ट्रा’ची घोषणा असंवैधानिक नसतांनाही ‘हिंदू राष्ट्रा’च्या विचारधारेला असंवैधानिक म्हणणे, हा ‘हिंदू राष्ट्रा’ची आवश्यकता स्पष्ट करणारा हिंदूंवरील अन्याय ! : इंदिरा गांधींनी १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द राज्यघटनेत घातले. याचा अर्थ, १९७५ मध्ये ‘हे राष्ट्र निधर्मी करू’, अशी घोषणा करणे असंवैधानिक होते का ? मग ‘हिंदू राष्ट्रा’ची घोषणा असंवैधानिक कशी होईल ? म्हणजे संवैधानिक मार्गांनी घटनादुरुस्ती करणे असंवैधानिक नाही आणि जोपर्यंत ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्याचे विचार मांडणार्‍या व्यक्ती असंवैधानिक कृत्ये करत नाहीत, तोपर्यंत त्यांना असंवैधानिक म्हणणे, हा त्यांच्यावरील अन्याय आहे !

२.  संविधानाच्या चौकटीत राहून समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना मांडणे, हे पूर्णतः संवैधानिक ! : लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार (हक्क) आहे’, अशी एक क्रांतीकारी गर्जना केली होती. त्याचप्रमाणे आता ‘हिंदू राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’, हीसुद्धा एक क्रांतीकारी गर्जना आहे ! लोकमान्यांची घोषणा स्वराज्यासाठी, तर ‘हिंदू राष्ट्रा’ची घोषणा सुराज्यासाठी आहे. त्यामुळे ‘हिंदू राष्ट्राची विचारधारा वा संकल्पना संवैधानिक कि असंवैधानिक ?’, असा प्रश्न निर्माण होऊच शकत नाही; कारण संविधानाच्या चौकटीत राहून समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना मांडणे, हे पूर्णतः संवैधानिक आहे !

३.  कोणत्याही परिवर्तनास राज्यघटनेचे पूर्णतः स्वातंत्र्य ! : भारतात ‘हिंदुत्व’ ही मुख्य विचारधारा आहे. ही विचारधारा जपल्याने ‘हिंदवी स्वराज्य’, म्हणजे ‘आदर्श राष्ट्र’, म्हणजे ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करून सर्व जातीपंथांचे परमकल्याण साधता येते, हे छत्रपती शिवरायांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे राष्ट्राची विचारसरणीही याच विचारधारेचा वेंâद्रबिंदू असायला हवी ! कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी स्तरांवरील कोणतेही परिवर्तन करण्यास राज्यघटनेने पूर्णतः स्वातंत्र्य दिले आहे. असे परिवर्तन ‘हिंदू राष्ट्र’ स्थापण्यासाठी होणार असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही ! पोप बेनेडिक्ट पॉल यांचे भारत दौर्‍यातील ‘संपूर्ण भारत खिस्तमय करायचा आहे’, हे वक्तव्य एकाही प्रसारमाध्यमाने असंवैधानिक ठरवले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

४.  अत्यंत पुढारलेला आणि लोकशाहीप्रधान देश असूनही इंग्लंड एक ‘खिस्ती’ राष्ट्र आहे, मग भारत ‘हिंदू राष्ट्र’ का नाही ? : सलमान रश्दींना केवळ खिस्ती धर्मश्रद्धा दुखावल्याच्या कारणावरून तेथील न्यायालयाने त्यांना इंग्लंडमध्ये रहाण्यास अनुमती दिली नव्हती. इंग्लंड हा अत्यंत पुढारलेला आणि लोकशाहीप्रधान देश असूनही तो ‘खिस्ती’ देश आहे. मग ८५ टक्के हिंदू धर्मीय असलेला भारत ‘हिंदू राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?