वारंवार पालटणार्‍या आरोपींमुळे अन्वेषण यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद ‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’

कोल्हापूर – अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव पुढे केले. पुढे सीबीआयने सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचे, तर परत तिसर्‍यांदा अंदुरे अन् कळसकर यांचे आरोपी म्हणून नाव घेतले. एखाद्या चित्रपटाप्रमाणे अन्वेषणाचे पुढचे पुढचे ‘व्हर्जन’ (नवीन प्रणाली) येत असून यामुळे या अन्वेषणाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण योग्य पद्धतीने झालेले नाही. अन्वेषण यंत्रणांना अन्वेषणच करायचे नसून या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळी दिशा दिली जात आहे का ? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. दुसरीकडे ज्यांच्यावर अन्वेषण यंत्रणांनी हत्येचे सूत्रधार म्हणून आरोप ठेवला आहे, त्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मात्र गेली ६ वर्षे जामीन मिळत नाही, अशी स्थिती आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. १८ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या ऑनलाईन आयोजित केलेल्या विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनीही सहभाग घेतला. या संवादाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नरेंद्र सुर्वे आणि कार्तिक साळुंखे यांनी केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब लाईव्ह’ यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम १२ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अन्वेषण प्रकरणी उपस्थित केलेली सूत्रे

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, २० ऑगस्ट २०१३ मध्ये ज्या पिस्तुलाने डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, ते पिस्तूल अन्य अन्वेषण यंत्रणांनी त्याच दिवशी मुंब्रा येथे कह्यात घेतले. डॉ. दाभोलकरांची हत्या जे पिस्तूल वापरून झाली ते पिस्तूल आणि गोळ्या एकच असल्याचे न्यायवैद्यक अहवालातून सिद्ध झाले, असा दावा पोलिसांनी केला. हा अहवाल आणि अन्वेषण यांचे नंतर पुढे काहीच झाले नाही.

२. यानंतर वर्ष २०१६ मध्ये हे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘सीबीआय’कडे) गेले. सीबीआयने सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. या वेळी अन्वेषण यंत्रणांनी असा दावा केला की, सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या केली अन् डॉ. तावडे हे त्याचे मुख्य सूत्रधार आहेत. ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना दोन प्रत्यक्षदर्शी लोकांनी पाहिले होते’, असा दावा अन्वेषण यंत्रणांनी केला.

३. सीबीआयने वर्ष २०१८ मध्ये अचानक वेगळाच दावा करत ‘डॉ. दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनी गोळ्या झाडल्या’, असा दावा केला. ‘हत्या झाली त्याच दिवशी पुलावर असलेल्या अन्य एका व्यक्तीने या दोघांना ओळखले होते’, असे अन्वेषण यंत्रणांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणातही सनातन संस्थेच्या साधकांची निर्दाेष सुटका होईल ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात एकूणच अन्वेषण यंत्रणांकडून सोयीनुसार सर्व गोष्टी सांगितल्या जात आहेत. हे न्यायालयात स्पष्ट होईलच. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या फेब्रुवारी २०१५ मध्ये झाली. जर दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी वापरलेले पिस्तूल कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरले गेले, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. जर ते पिस्तूल सीबीआयच्या कह्यात होते, तर ते कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात कसे आले ? सकाळी हत्येसाठी पिस्तूल वापरले गेले आणि परत सीबीआयच्या कह्यात कसे काय गेले ? हा प्रश्न समोर येऊ नये यासाठी अन्वेषण यंत्रणा स्वतःहून मुंबई उच्च न्यायालयात गेल्या. अन्वेषण यंत्रणांनी न्यायालयातील खटला लांबणीवर टाकण्यासाठी शस्त्रांचा अहवाल स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून मागवण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने तशी अनुमती दिली.

प्रत्यक्षात पिस्तुलाचा अहवाल स्कॉटलंडयार्ड मधून कधी मागवलाच गेला नाही; कारण त्यांच्या समवेत भारताचा तसा करारच नाही. गुजरातमधील एका प्रयोगशाळेतून त्या पिस्तुलांचा अहवाल घेण्यात आला. गुजरातच्या प्रयोगशाळेने सांगितले की, मुंबईतील प्रयोगशाळेचा अहवाल चुकीचा आहे. त्यानंतर ठाण्याच्या खाडीत पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले, असा कयास यंत्रणेने केला आणि त्याचे अन्वेषण करण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करून ठाण्याच्या खाडीत शस्त्रांचे तुकडे शोधले. प्रत्यक्षात तुकडे शोधणार्‍यांना पूर्ण पिस्तूल सापडले. या सर्व असंबद्ध गोष्टी सोडून केवळ ‘सूत्रधार पकडा’ अशी मागणी केली जाते. मडगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाने ‘सनातन संस्थेला यात गोवण्यात आले’, असे मत नोंदवले आणि या प्रकरणातील ६ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. त्याच प्रकारे ‘डॉ. दाभोलकर प्रकरणातही सनातनच्या साधकांसह सर्वांची निर्दाेष सुटका होईल’, असा आमचा विश्वास आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानवकल्याणकारी कार्य करते, हा दावा अतिशय खोटा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

१. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानवकल्याणकारी कार्य करते, हा दावा अतिशय खोटा आहे. सर्व क्षेत्रांत भोंदूगिरी आणि दांभिकता चालते. कोणत्याही सश्रद्ध व्यक्तीचा दांभिकतेला विरोध असतो. सनातन संस्थेने या संदर्भात ४ ग्रंथ प्रकाशित करून भोंदूगिरीपासून सावध होण्यासाठी प्रबोधन केले आहे. भाव आणि श्रद्धा यांच्या आधारे भोंदूगिरी अन् दांभिकता काय असते, हे लक्षात येऊ शकते. साम्यवाद्यांप्रमाणे अंनिसलाही ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असेच वाटते; कारण ते व्यक्तीश: नास्तिकतावादी आहेत. ‘मानवीय नास्तिक मंच’ असे पूर्वी नाव असलेल्या संघटनेचे पुढे ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ असे आताचे गोंडस नाव आहे. हे लोक जेव्हा शारीरिक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा ते नक्षलवादी असतात आणि बौद्धिक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा ते अर्बन (शहरी) नक्षलवादी असतात. त्यामुळे मानवकल्याणकारी कार्य करण्यासाठी प्रथमतः धर्म आणि अध्यात्म आचरणात आणा.

२. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या ट्रस्टमध्ये असलेले घोटाळे आम्ही उघडकीस आणले आहेत. आम्ही दाभोलकरांच्या विरोधात लोकशाही मार्गाने विविध खटले प्रविष्ट केले होते. डॉ. दाभोलकर आज जिवंत असते, तर आज ते नक्कीच कारागृहात असते.

३. सनातन संस्थेने केव्हाही अंनिस किंवा दाभोलकर यांना विरोध केला नाही किंवा विरोधक म्हटलेले नाही. प्रत्यक्षात वर्ष २००७ मध्ये दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात आम्ही एकत्र कार्य केले आहे. विरोध असता, तर एकत्र कार्य केलेच नसते.

४. नैतिकता धर्मामुळे येते. अंनिसच्या संदर्भात नैतिकता हे सूत्रच दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी कुणाला पकडले की, त्यांचे कौतुक करणे आणि तो निर्दोष असेल, तर पोलिसांच्या विरोधात निदर्शने करणे, ही दुटप्पी भूमिका येते.

५. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि नरबळी प्रथा विरोधी कायदा आणू पहात असतांना आम्ही या कायद्याला विरोध केला होता; कारण त्यातील कलमे अशी होती ज्याने हिंदु धर्मातील अनेक पूजा-अर्चा बंद झाल्या असत्या.

‘अंनिस’च्या गैरकारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्या ट्रस्टवर तातडीने प्रशासक नेमा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

१. स्वत:ला विवेकवादी म्हणवणार्‍या दाभोलकरांच्या ट्रस्टमधील अनेक आर्थिक घोटाळे आम्ही पुराव्यानिशी उघड केले आहेत. तशीच निरीक्षणे सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक, अधीक्षक आणि साहाय्यक आयुक्त यांनी नोंदवली आहेत. इतकेच नव्हे, तर याच संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ट्रस्टच्या कारभारावर, तसेच तो ट्रस्ट स्वत:च्या नियंत्रणात ठेवू पहाणार्‍या दाभोलकर कुटुंबियांवर जाहीर आरोप केले, यातून आम्ही केलेले आरोप खरे होते, हेच सिद्ध होते. त्यामुळे ‘अंनिस’च्या गैरकारभाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ‘अंनिस’च्या ट्रस्टवर तातडीने प्रशासक नेमला पाहिजे.

२. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी चढाओढ चालू झाली. वास्तविक त्यांचे आर्थिक अपव्यवहार उघड झाल्यानंतर अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारींवर निरीक्षक, साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सातारा यांनी त्यांचा अहवाल सिद्ध केला. त्या कार्यालयातील अधीक्षकांनी त्याचा अभ्यास करून स्वतःची निरीक्षणे नोंदवली. अशा प्रकारे डॉ. दाभोलकर आणि त्यांचे विविध न्यास यांच्याविषयी निरीक्षक, अधीक्षक आणि साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. यावरून स्वत:ला विवेकवादी आणि पारदर्शक म्हणणार्‍या अंनिसने समाजाची फसवणूकच केली आहे, असेच म्हणावे लागेल.

३. डॉ. दाभोलकर परिवाराचा व्यसनमुक्तीच्या गोंडस नावाखाली कार्य करणारा ‘परिर्वतन ट्रस्ट’ आहे. यातील सर्व संचालक हे डॉ. दाभोलकर परिवाराचे सदस्य आहेत. या ट्रस्टलाही लाखो रुपये देश-विदेशांतून येतात, हेही उघड झाले आहे. ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नाही’, असे सांगणार्‍या राष्ट्रविरोधी ‘स्विस एड फाऊंडेशन’कडून या ट्रस्टला लाखो रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही देणगी ‘सेंद्रिय शेती’च्या नावाखाली घेण्यात आली. अशा प्रकारे फसवणूक करून आणि खोटी माहिती देऊन देणग्या गोळ्या केल्या जातात. यावरून लोकांनीही अंनिससारख्या संघटना नेमके काय काम करतात, याची माहिती घेतली पाहिजे आणि त्यांचे खरे स्वरूप जाणून घेतले पाहिजे.

साम्यवाद्यांकडून झालेल्या हत्यांविषयी कुणीही बोलत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

साम्यवाद्यांकडून देशात १४ सहस्र हत्या केल्या गेल्या. यात आदिवासी, पोलीस, पंचायत समिती सदस्य, आमदार, मंत्री असा अनेकांचा समावेश आहे. या संदर्भात ना प्रसारमाध्यमे बोलली, ना साम्यवाद्यांनी क्षमा मागितली. याउलट प्रसिद्धीमाध्यमे आणि अन्य काही लोक यांच्याकडून ‘एन्.आय.ए.’ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) अटक केलेल्या फादर स्टेन स्वामी यांचा उल्लेख आदरार्थी केला जातो आणि सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा उल्लेख मात्र एकेरी केला जातो.

अंनिसचे नास्तिकतावादाचे धंदे बंद पडू लागल्यामुळे त्यांनी सनातनला विरोध चालू केला ! – चेतन राजहंस

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ञ होते. त्यांनी संपूर्णपणे अध्यात्माला वाहून घेतले आणि अंनिसला हे मान्य नसल्याने त्यांनी तेथून विरोध चालू केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांचे अध्यात्मविषयीचे लेख प्रकाशित व्हायला लागले. लोकांना वैज्ञानिक भाषेत अध्यात्म लक्षात येऊ लागले. अकोला, अमरावती येथे अंनिसचे काही कार्यकर्ते सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. अंनिसचे नास्तिकतावादाचे धंदे बंद पडू लागल्यामुळे त्यांनी सनातनला विरोध चालू केला.

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​