देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दीपूर्ती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

स्वातंत्र्यवीर सावरकर

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेची नुकतीच शतकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दीपूर्ती’ या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ चर्चासत्र घेण्यात आले. सध्या देश कोरोनाच्या अत्यंत कठीण संकटाशी झुंज देत आहे. या स्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अंदमानातील जीवनपट आजच्या समाजाला उभारी देणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मबळाचा पाया हा अध्यात्माचा होता, हे त्यांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला । मारिल रिपु जगती कसा कवण जन्मला ।।’ या आत्मगर्जनेतून प्रतीत होते. सध्या देशाची आणि बहुसंख्य हिंदूंची स्थिती पहाता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे. या सर्वांचे बीज सावरकर यांचे हिंदु राष्ट्रनिष्ठ आणि आत्मबलशाली विचार अन् आचार यांत दिसून येते. सद्य:स्थितीत ते कशा प्रकारे प्रेरणादायी आहेत, हे या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रस्तुत केले. या कार्यक्रमात केंद्र सरकारचे माहिती आयुक्त तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. उदय माहुरकर, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज श्री. रणजित सावरकर, तसेच समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी उद्बोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम यू ट्यूबच्या माध्यमातून ५ सहस्र ७०० हून अधिक जणांनी पाहिला.

श्री. रणजित सावरकर

पुणे – मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष १९२० मध्ये तेव्हाच्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या २२ टक्के झाल्यावर खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याच्या नावाखाली देशभरात दंगली करून केरळ-बंगालमध्ये लाखो हिंदूंना ठार मारले. गेल्या वर्षी २०२० मध्ये पुन्हा २२ टक्के लोकसंख्या झालेल्या मुसलमानांनी १०० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करत देहलीत दंगल करून अनेक हिंदूंना मारले. वर्ष १९४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यावर त्यांनी देशभरात दंगली घडवून भारताची फाळणी केली. पुढे वर्ष २०४७ मध्ये त्यांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.

रणजित सावरकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. वर्ष १९२० मध्ये भारतातील मुसलमानांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. खिलाफत चळवळीच्या नावाखाली संपूर्ण भारतात दंगली झाल्या. वर्ष १९२१ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भारतात आल्यानंतर त्यांनी खिलाफत चळवळीला विरोध केला. ‘जो या पुण्यभूला पितृभूमी मानतो, तो हिंदू’, अशी हिंदुत्वाची व्याख्या करत हिंदूसंघटन केले.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे हिंदूंचे सैनिकीकरण !

सैन्यातील हिंदूंची संख्या ३५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत गेल्याने फाळणीनंतर काश्मीरमध्ये पाकिस्तानला हरवता आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या दोन गोष्टी केल्या नसत्या, तर आज कदाचित् भारताचे इस्लामीकरण झाले असते.

३. काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हा प्रचार खोटा !

जेव्हा आपण ‘सावरकर’ असे उच्चारतो, तेव्हा त्यात सर्व क्रांतीकारक येतात. नेहरू सरकारने सत्तेत आल्यानंतर ‘काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असा खोटा प्रचार केला आणि क्रांतीकारकांचा इतिहास पालटला. वर्ष १९१६ च्या शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सोडवण्यासाठी रासबिहारी बोस यांनी एक जहाज पाठवले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना थायलंड येथे आणून पुढे ब्रह्मदेश कह्यात घेण्याची योजना होती. जहाजावर अनुमाने ५०० ते १ सहस्र क्रांतीकारक होते. या घटनेचा सुगावा लागल्याने इंग्रजांनी ते जहाज बुडवले. या क्रांतीकारकांचे काय झाले ? हे कुणालाही ठाऊक नाही. त्या वेळी ब्रह्मदेशात जमलेल्या ५ सहस्रांहून अधिक भारतियांना इंग्रजांनी बंदीवासात टाकून जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांची नावेही अज्ञात आहेत. भारतात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले असेल ? अशा अगणित आणि अज्ञात हुतात्म्यांच्या बलीदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले, वर्ष १९३० आणि १९४२ च्या आंदोलनांमुळे नाही. १९४२ मधील आंदोलन तर केवळ ५ दिवसांत चिरडले गेले होते. स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या या शेकडो क्रांतीकारकांचा इतिहास प्रदर्शित व्हायला हवा.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अंदमानवास म्हणजे ‘हे ही दिवस जातील’ या संदेशाचे मूर्तीमंत रूप ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते

काळे पाणी म्हणजे असे ठिकाण, जेथून परत येणे कठीण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जेव्हा अंदमानातील कोठडीत नेण्यात आले, तेव्हा त्यांना समुद्राचे तीन वाडगे भरून पाणी स्नानासाठी देण्यात आले. याविषयी सावरकर लिहितात, ‘लंडनमधील ‘टर्कीश’ स्नानाचा, सुगंधित द्रव्यांच्या फवार्‍यांचा आजपर्यंत आनंद घेतला, आता अंदमानातीलही अनुभव घ्यावा.’ या लिखाणावरून त्यांचे मनोबल किती दृढ होते, हे लक्षात येते. अंदमानातील असह्य वेदना सहन करूनही अन्य क्रांतीकारकांना सावरकर प्रोत्साहित करत. अंदमानातील छळामुळे काही बंदीवानांनी आत्महत्या केली, तर काही वेडे झाले; मात्र या सर्व कठोर यातना सहन करत वीर सावरकरांनी राष्ट्रहितासाठी सहस्रो पानांचे अजरामर साहित्य लिहिले. सावरकर यांचा अंदमानातील जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. ‘हे ही दिवस जातील’, हा संदेश त्यांच्या अंदमानवासातून मूर्तिमंत स्वरूपात पहायला मिळतो. आज कोरोनाच्या काळातही हे वाक्य घरात लिहून ठेवल्यास स्वतःचे मनोबल वाढेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या ठिकाणी ठेवले होते, तिथून ४ ते ६ मासांपर्यंत कुणी व्यक्ती दृष्टीसही पडत नसे. त्यांना नारळाची साले काढणे, नारळाच्या शेंडीपासून दोरी बनवणे, कोलू चालवणे अशा क्रमवार शिक्षा देण्यात आल्या. या शिक्षा भोगतांना हात सोलवटले जातात, तसेच हाताची बोटे दुमडली जातात. कोलू चालवतांना कितीही कष्ट झाले, तरी त्यांना प्रतिदिन ३० पौंड तेल काढावे लागे. हे सर्व अत्यंत वेदनादायी आहे. अंदमानातील कारागृहातील जेवणाविषयी सावरकर यांनी लिहिले आहे, ‘गुप्तरोग असलेले आचारी जेवण बनवत. आमटीमध्ये त्यांचा घाम निथळत असे, तसेच भाजीमध्ये सापाचे तुकडे मिळत. हे खाणे नाकारले, तर पुढील ७ दिवस उपाशी रहावे लागे. अशा परिस्थितीला सामोरे गेलेल्या सावरकर यांची सहनशीलता किती असेल, हे लक्षात येते.

भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्थान अढळ ! – उदय माहुरकर, माहिती आयुक्त, केंद्र सरकार

श्री. उदय माहुरकर

बहुइस्लामवादी, साम्यवादी आणि मुसलमानांच्या मतांची भीक मागणारे राजकीय पक्ष हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समजून न घेता त्यांच्यावर टीका करणारे लोक आहेत. त्यांनीच सावरकर यांना अपकीर्त करण्याचे कारस्थान केले. भारताच्या इतिहासात गेल्या १०० वर्षांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखी व्यक्ती नाही. त्यांनी भोगलेला शारीरिक त्रास, त्यांची विचारसरणी आणि त्यांचे योगदान यांमुळे भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.

उदय माहूरकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. वर्ष १९०९ मध्ये लंडनमध्ये दसर्‍याच्या निमित्ताने भाषण करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्व धर्म समान असून हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन आणि पारशी यांचे भारतासाठी योगदान असल्याचे मान्य केले होते; परंतु वर्ष १९२३ मध्ये त्यांचे विचार प्रखर राष्ट्रवादी झाले. या पालटामध्ये अंदमानच्या कारावासात व्यथित केलेल्या दिवसांचे महत्त्व अधिक आहे.

२. अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतांना कारागृहामध्ये मुसलमानांचे तुष्टीकरण, पोलिसांकडून करण्यात येणारा भेदभाव आणि धर्मांतर यांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर दु:खी होते. देशातील मुसलमानांचे तुष्टीकरण करणारे राजकारण, देशातील पालटणारे वारे, बाहेरच्या बातम्या त्यांच्यापर्यंत जात होत्या. हे सर्व गांधींमुळे होत आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. या परिस्थितीत अंदमानमध्येच त्यांच्या मनात राष्ट्रवादाचे विचार निर्माण झाले होते. तेथून बाहेर आल्यानंतर रत्नागिरीत ते अधिक दृढ होत गेले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे, ही सावरकरांचीही शिकवण ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुमित सागवेकर

१. लंडनमधील दसर्‍याच्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘जोपर्यंत या देशात (भारतात) राम आहे, तोपर्यंत देशाची उन्नती सहज शक्य आहे’, असे म्हटले होते. यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरही हिंदु राष्ट्रासाठी ईश्वरी अधिष्ठान महत्त्वपूर्ण असल्याची शिकवण देत आहेत, हे लक्षात येते.

२. सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी अंदमानात जाऊन कोलू फिरवून दाखवावा. केवळ दोन-तीन भाषणे दिल्यावर विश्रांतीसाठी बँकॉकमध्ये जाणार्‍यांकडून काय अपेक्षा करू शकतो ?

३. जे.एन्.यू.मध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍या ‘तुकडे-तुकडे गँग’ने प्रथम उत्तर द्यावे की, कॉम्रेड डांगे यांनी ब्रिटिशांची क्षमा का मागितली होती ? आणि ‘ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहीन’, असे का म्हटले होते ? माफीवीर तर सेक्युलर आणि साम्यवादी आहेत. आम्ही तर कृष्णनीती, चाणक्यनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा अनुसरणारे आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांना आदर्श मानत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कधीही इंग्रजांची क्षमा मागितली नाही.

४. वर्ष १९६५ चे भारत-पाकिस्तानचे युद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जनरल परांजपे यांच्याशी भेट झाल्यानंतर ते म्हणाले होते, ‘जर पाकिस्तानचे सैन्य चुकून आपल्या देशात येऊ शकते, तर आपले सैन्य लाहोरपर्यंत का जाऊ शकत नाही ?’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांना छोटासा ‘सर्जिकल स्ट्राईक’ अपेक्षित नव्हता, तर त्यांना सिंधु नदीपासून सिंधुसागरपर्यंत संपूर्ण अखंड भारत हिंदु राष्ट्र अपेक्षित होता. या प्रखर राष्ट्रनिष्ठ विचारांमुळेच त्यांची उपेक्षा केली गेली.

५. सावरकर यांचा द्वेष करणार्‍यांना मी आज निक्षून सांगतो, ‘आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळवून देणारच आहोत, त्यांना या भारताशी जोडून ठेवणारच आहोत आणि हिंदु राष्ट्रही आणणारच आहोत.’

चर्चासत्रातील उद्बोधक सूर !

देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर

सध्या भारताच्या इस्लामीकरणाचा धोका वाढत असून तो रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अनुसरायला हवे, असे मत चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

पाकिस्तानची निर्मिती होणार, असे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्ष १९३७ पासूनच सांगत होते. देशात केवळ १ ते २ वेळाच पाकिस्तान या शब्दाचा उच्चार झाला असतांना तो हेरून त्यांनी हे भाकीत केले होते. अल्पसंख्यांकांचे वेगळे राष्ट्र ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांची विचारधारा देशाला एकत्र करणारी होती. सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना ही स्पष्ट होती. हिंदु राष्ट्रात त्यांना सर्व जाती-धर्मांना समान हक्क अभिप्रेत होते. त्यांची लढाई ही सामान्य अधिकारांसाठी होती. सावरकरांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती. आज देशाचे दुसरे विभाजन नको असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्रवादाचे विचार आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. तसेच आपल्या देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरले पाहिजे.

चर्चासत्राच्या वेळी करण्यात आलेल्या एकमुखी मागण्या

  • सावरकर यांनी ‘धर्माचे स्थान हृदयात असते, पोटात नाही’, असे सांगून कारागृहात धर्मांतर केलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण केले. सध्या कोरोनाच्या काळात हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन केंद्र सरकारने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा !
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवा !
  • भारत सरकारने मार्सेलिस (फ्रान्स) येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक बांधायला हवे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​