आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधनारत रहा ! – सद्गुरु सत्यवान कदम

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे प्रांतीय हिंदू अधिवेशन

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम बाजूला श्री. मनोज खाडये

रत्नागिरी : अनेक संतांनी ‘पुढील काळ, हा घोर आपत्काळ आहे’, असे सांगितले आहे. हा आपत्काळ आता आपल्या दारात येऊन ठेपला आहे. ‘या आपत्काळात वादळ, सुनामी, भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकतात. त्यात बरीच मनुष्यहानी होईल’, असेही अनेक संत, भविष्यकार आणि नाडीपट्टी वाचन करणारे यांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि देव नेहमी भक्तांचे रक्षण करत असल्याने आपत्काळाविषयी मनात भीती न बाळगता नेहमी साधनारत रहा, असे आशीर्वचनपर उद्गार सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर खेड तालुका वारकरी संघटनेचे ह.भ.प. सखाराम महाराज जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समिती समन्वयक श्री. मनोज खाडये हे मान्यवर उपस्थित होते.

हात उंचावून घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठ आणि (१) सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम पुढे म्हणाले, ‘‘आपत्काळत आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या भौतिक सुखसोयींचा उपयोग करता येणार नाही. यासाठी शारीरिक स्तरावर चुलीवर अन्न शिजवणे, घराजवळ औषधी वनस्पती लावणे, प्रथमोपचार आदी गोष्टी शिकून घेणे आवश्यक आहे. मानसिक स्तरावर अधिक काळाकरता कुटुंबियांचा वियोग सहन करण्याची सिद्धता ठेवणे, अनावश्यक भीती वाटत असल्यास मन आणि परिस्थिती यांचा अभ्यास करणे, भावनेत न अडकता साक्षीभावात रहाणे आदी प्रयत्न आपल्याला करता येतील. याशिवाय आध्यात्मिक स्तरावरील सिद्धता ही सर्वांन महत्त्वाची सिद्धता आहे. यामध्ये प्रतिदिन देवाला प्रार्थना करणे, स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होईल. इतकेच नव्हे, तर स्वत:तील स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचेही प्रयत्न केले पाहिजेत.’’

अधिवेशनाचा उद्देश श्री. मनोज खाडये यांनी सांगितला. सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी आणि श्री. प्रकाश कोंडसकर यांनी केले. या अधिवेशनाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ६७ धर्माभिमानी उपस्थित होते.

मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार  

या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे सदस्य ह.भ.प. सिद्धेश महाराज पालांडे यांनी केला. खेड तालुका वारकरी संघटनेचे ह.भ.प. सखाराम महाराज जाधव यांचा सन्मान मालवण, जि. सिंधुदुर्ग येथील धर्माभिमानी श्री. मधुसूदन सारंग यांनी केला, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समिती समन्वयक श्री. मनोज खाडये यांचा सत्कार भिलारे-आयनी येथील श्री. राजेंद्र भिलारे यांनी केला.

अधिवेशनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन

अधिवेशनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांनी केले.

रत्नागिरी येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनातील मान्यवरांचे विचार

हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर होण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक !- ह.भ.प. सखाराम महाराज जाधव

आज आपण येथे धर्म टिकावा; म्हणून संघटित झालो आहोत. उर्दू शाळांतील मुलांना त्यांचा धर्म शिकवला जातो. त्यामुळे ५ वर्षांचा मुसलमान मुलगाही रमझानचा उपवास करतो. याउलट हिंदूंच्या शाळांमधून हिंदु धर्म शिकवला जात नसल्याने हिंदु मुलांना ‘४ वेद कोणते ?’, हेसुद्धा ठाऊक नसते. हिंदू राज्यघटनेचे पालन करतात, तसेच कुटुंब नियोजनही करतात; मात्र अन्य पंथीय त्यांच्या कायद्यानुसार वागतात. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मपालन करत नाहीत. त्यामुळे हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्या देशातील लोकशाहीदेखील निरर्थक ठरली आहे. पैशांद्वारे मते विकत घेतली जातात. हल्लीच्या काळात ८ वीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्यासारखे निर्णय घेतले जातात. यातून विद्यार्थी घडणार तरी कसे ? हेच विद्यार्थी देशाचे भावी मतदार आहेत.

राष्ट्र सुरक्षित झाल्याशिवाय उत्कर्ष साधता येत नाही ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदु समाज ज्ञातीबांधव, संघटना, संप्रदाय, पक्ष यांमध्ये विभागला गेला आहे. त्यांचे विचारही तेवढ्याच समुहापुरते मर्यादित असतात. त्याच्या पुढे जाऊन राष्ट्र आणि धर्म यांचा विचार व्हायला हवा. समाजात असलेला आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण आदी समस्या सुटण्यासाठी आपण एकत्र येण्यात आणि आवश्यक तेवढा राजकीय दबाव निर्माण करण्यास न्यून पडत आहोत. हिंदु समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र चालू आहे. जोपर्यंत आपण धर्माच्या रक्षणासाठी एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्या सामाजिक अडचणी सुटणार नाहीत, याची जाणीव आपल्याला प्रत्येक छोट्या गटापर्यंत जाऊन सर्वांना करून द्यायची आहे आणि संघटन करायचे आहे; कारण धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे आणि राष्ट्र सुरक्षित झाल्याशिवाय उत्कर्ष साधता येत नाही.

हिंदु राष्ट्र आणि धर्म यांकरता युवकांना संघटित करणे आवश्यक !- डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती

देशाचे सामर्थ्य शक्ती हे त्या देशातील युवकांच्या संख्येवर अवलंबून आहे. आपल्या देशात ६५ कोटी युवक आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आपला देश, धर्म हा युवकांमुळेच टिकला असल्याचा इतिहास आहे. यामध्ये क्रांतीकारकांची अनेक उदाहरणे देता येतील; मात्र आपल्या देशाची आजची स्थिती काय आहे ? देश अनेक समस्यांनी ग्रासला आहे. अफझल, कसाब यांसारखे युवक देशाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र देशात मावळे आढळून येत नाहीत. याचे कारण आजच्या युवकांसमोर छत्रपती शिवाजी महाराज, चापेकरबंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आदर्श नसून नटनट्यांचे आदर्श आहेत. असे म्हणतात की, देशातील युवक त्यांचा वेळ कोणत्या गोष्टींमध्ये घालवतात, त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते. एका अहवालानुसार आपल्या देशातील युवक आठवड्याचे ६-७ घंटे अश्‍लील ‘व्हिडिओ’ बघण्यात वेळ वाया घालवत आहेत. देश एका युवकाच्या शिक्षणासाठी २५ लाख रुपये खर्च करतो; पण शिक्षण घेऊन बाहेर पडलेला युवक राष्ट्रासाठी योगदान देतांना दिसत नाही. या युवकांना समाजऋण फेडण्याचा विचारही येत नाही, ते व्यक्तिगत विचारांमध्येच अडकलेले आहेत आणि हा सर्व शिक्षणाचा परिणाम आहे. त्यामुळे राष्ट्राची स्थिती पालटण्यासाठी युवकांना धर्मशिक्षण देणे आणि त्यांना संघटित करणे आवश्यक आहे.

कायद्यानेच कायद्याला जाब विचारण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना !- अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे

आज हिंदु विधीज्ञ परिषदेच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या अधिवक्त्यांना राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आर्त साद घालणारे हे धर्मप्रेमीच होते. त्यामुळे अधिवक्त्यांचे संघटन शक्य झाले. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आज कोणीही राष्ट्रासाठी काही करण्यासाठी एकत्र येत नाही, पैसा प्रसिद्धी यांसाठी येतात आणि जे कोणी राष्ट्र धर्मासाठी एकत्र येतात त्यांची गळचेपी केली जाते. आजच्या न्यायप्रणालीतही काही त्रुटी आहेत. जी न्यायप्रणाली मुसलमान धर्मामधील एखादा निर्णय धर्माच्या व्यासपिठावर सोडवण्यास सांगते, तीच न्यायप्रणाली हिंदु धर्मामध्ये मात्र हस्तक्षेप करतांना आढळते. हिंदु समाज धर्माविषयी संवेदनशील नसल्यामुळे गोहत्या, मंदिर सरकारीकरण, कुंभमेळ्याच्या तिकिटावर अतिरिक्त अधिभार, हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई आदी प्रकार चालू आहेत. यासाठी अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक आहे. यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या व्यासपिठाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांना विनामूल्य साहाय्य, तसेच अन्य न्यायालयीन लढा देण्यासाठी त्यांचे साहाय्य होईल आणि यातून अधिवक्त्ये सुद्धा राष्ट्र आणि धर्म कार्यातील योगदान वाढेल.

आजचा हिंदु समाज केवळ वंश, धर्म आणि रंग यांनीच हिंदु राहिला आहे ! –  राजू पाटील, हिंदु जनजागृती समिती

आज बघायला गेल तर सगळ्यात जास्त हिंदूंच निद्रिस्त आहेत. हिंदुंच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. लॉर्ड मेकॉलोने सांगितल्याप्रमाणे त्यांनी घातलेल्या शिक्षणप्रणालीप्रमाणे आजचा हिंदु हा केवळ वंशाने, रंगाने आणि धर्मानेच हिंदु राहीलेला आहे; पण बाकी वागणूक ही पाश्‍चिमात्यांप्रमाणे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करण्याचे काम हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून करत आहे. यातून हिंदूंमध्ये राष्ट्र-धर्माविषयी असलेले कर्तव्य, स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हिंदूंचा सामाजिक दोष हा नाही की, ते काही भव्यदिव्य करत नाहीत, तर हा आहे की, ते आपल्या आवाक्यातीलही काही करत नाहीत. हिंदूंनी त्यांच्या आवाक्यातील गोष्टी करण्यासाठी त्यांनी धर्म शिकायला हवा, समजून घ्यायला हवा.

दैनिक सनातन प्रभात हे नियतकालिक हिंदुत्वाचे मुखपत्र म्हणून कार्यरत ! –  संदेश गावडे

राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी दैनिक सनातन प्रभातने स्वत:ला वाहून घेतले आहे. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध’ हेच त्याचे ब्रीदवाक्य आहे.  दैनिक सनातन प्रभात राष्ट्र, धर्म यांवर होणार्‍या आघातांना वाचा फोडण्याचे कार्य करते. जे त्यागातून साकारते तेच समाजात उभे रहाते. त्याप्रमाणे दैनिक सनातन प्रभात आहे. धर्मरक्षणाच्या कार्याकरता ४ वेळा दैनिक सनातन प्रभातच्या संपादकांना अटक झाली आहे. दैनिक सनातन प्रभातमधून धर्माचे शिक्षण दिले जाते. सण-उत्सव कसे साजरे करायचे, हे सांगितले जाते. दैनिक सनातन प्रभातचा आलेख म्हणजे किती वाचक साधनेला लागले, किती जण राष्ट्र आणि धर्मजागृतीच्या कार्यात कृतीशील झाले हा आहे. त्यामुळेच दैनिक सनातन प्रभात हे नियतकालिक हिंदुत्वाचे मुखपत्र म्हणून कार्यरत आहे.

राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील भागीदार होऊया ! – मनोज खाडये

ज्या मातीत रामायण घडण्यापूर्वी लिहीले गेले, त्याच मातीतील संत आपत्काळाविषयी सांगत आहेत. धर्माला ग्लानी आल्यावर पंचमहाभूते आपल्या कार्याला लागतात. जेव्हा पंचमहाभूते कार्याला लागतात तेव्हा भयानक आपत्काळ येतो. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, आताच्या शस्त्रसामुग्रीचा विचार करता दुसरे महायुद्ध खेळण्यातील असल्याप्रमाणे वाटेल. ज्या दुसर्‍या महायुद्धाची झळ हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे आजही भोगत आहेत. यातून लक्षात येईल की, आपल्याला किती सिद्धता करावी लागणार आहे. यासाठी साधनाच करायला हवी आणि भगवंताच्या कृपाछत्राखाली यायला हवे. यासाठी राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील भागीदार होऊया.

या वेळी श्री. मनोज खाडये यांनी साधना, नामजपाचे महत्त्व, स्वभावदोष निर्मूलन, लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती, हिंदु राष्ट्र का हवे? हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा या ग्रंथांविषयी माहिती दिली. याशिवाय परकीय आक्रमणांमध्ये तक्षशीला, नालंदा ही प्राचीन विद्यापिठे नष्ट झाली. त्या विद्यापिठाप्रमाणे शिक्षण देणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची निर्मिती परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत.

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​