पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांमुळे तेथील गांधार कला नामशेष होण्याच्या मार्गावर !

गांधार कला ही प्राचीन शिल्पकला होय. ज्या भूमीवर ही कला साकार झाली, ती पुरातन संस्कृतीने समृद्ध असणारी भूमी दुर्दैवाने कलेचा द्वेष करणार्‍या कट्टर पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांच्या कह्यात गेली. तेथील शासनाला या कलेविषयी किंवा पुरातन संस्कृती असणार्‍या ठेव्याविषयी जतन करण्याची आवड नव्हती. उलट या पुरातन संपत्तीचा द्वेष नसानसांत भिनलेल्या आतंकवाद्यांनी तिचे समूळ उच्चाटन करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. या भूमीशी हिंदूंच्या हृदयाचा संबंध होता. ही कला जतन होण्याऐवजी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यातील उरल्या-सुरल्या पुरातन वस्तूंचे जतन व्हावे, यासाठी भारत शासनाने प्रयत्न करावयास हवेत. या दुर्मिळ कलेची ढोबळ माहिती वाचकांना ज्ञात व्हावी, यासाठी श्री. संजय गोडबोले यांनी मांडलेला वृत्तांत देत आहोत.

१. पाकिस्तान-अफगाण आतंकवाद्यांची कर्मभूमी !

आतंकवादाचे विद्यापीठ आणि आतंकवाद्यांचे माहेरघर, अशी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ओळख झाली आहे. पाकिस्तानचे जनजीवन सततचा आतंकवाद, रक्तपात आणि विविध संकटे यांनी विस्कळीत झाले आहे. तेथील शासन देश चालवण्यास आणि वाढती अराजकता रोखण्यास असमर्थ ठरत आहे. पाकिस्तान-अफगाण सीमेजवळील क्षेत्रात तालिबान आणि इतर आतंकवादी यांची कर्मभूमी सिद्ध झाली आहे.

२. प्राचीन वस्तू विकून पैसे कमावणारा संस्कृतीद्वेषी तालिबान !

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा प्राचीन इतिहास हा बुद्ध धर्माशी संबंधित आहे. तालिबानला प्राचीन संस्कृतीचे कोणत्याही प्रकारचे धागेदोरे त्यांच्या कह्यातील प्रदेशात शेष ठेवायचे नाहीत. तालिबानच्या नियंत्रणाखाली दुर्दैवाने जो प्रदेश आहे, तो प्राचीन अवशेष आणि इतिहास संस्कृतीने इतका संपन्न आहे की, त्यांना ज्यांचा तिरस्कार आहे, त्याच प्राचीन वस्तू तेथे सतत सापडत असतात. तालिबानी या प्राचीन वस्तू विकतात, हेही प्रकाशात येत आहे. काही वर्षांपूर्वी बेल्जियमच्या पोलिसांनी उलगडलेल्या एका रहस्यानुसार पुराणवस्तू आणि हेरॉईन या दोन्हींच्या व्यापारातून तालिबानला पुष्कळ रोकड मिळत आहे.

३. गांधार कलेच्या पुरातन वस्तूंची युरोपीय बाजारात सर्रास विक्री !

पीटर ब्रेम या पत्रकाराने ब्लड अ‍ॅन्टीक्विटीज् हा वृत्तांत लिहिण्यासाठी पाकिस्तानच्या तालिबानव्याप्त प्रदेशातून अफगाणिस्तानात प्रवास केला. त्यात नमूद केले आहे की, ब्रुसेल्सच्या कला दुकानदारांची दुकाने ही या गांधार कलेच्या वस्तूंनी भरली आहेत. अवैधरित्या या सर्व वस्तू ब्रुसेल्सला पोहोचल्या. ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही याची कल्पना आहे. प्राचीन वस्तूंच्या व्यापार्‍यांना या वस्तूंच्या ऐतिहासिक मूल्यापेक्षा त्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्यच आधिक दिसत असल्याने पुरातन वस्तूंचे सातत्याने युरोप बाजारात स्थलांतर चालू आहे.

४. पाकमधील नागरिकांना प्राचीन वस्तू विकून पैसे मिळतात, इतकेच गांधार कलेचे ज्ञान !

पाकिस्तानी जनतेला प्राचीन इतिहास शिकवला जात नसल्यामुळे या प्राचीन कलाकृती या राष्ट्रीय ठेव समजून जतन वा संशोधन करण्याची मुळातच त्यांना आवड नसते. ब्रिटिशांच्या काळापासून इंडोग्रीक नाणी आणि गांधार कलेच्या कलाकृती विकण्याकरता वायव्य सरहद्दीकडे रहिवासी त्या येथे घेऊन येत असत. या वस्तू विकून पैसे मिळतात, इतकेच त्यांना गांधार कलेचे ज्ञान होते. पाकिस्तानात आजही प्राचीन मूर्ती, मृण्मयी, स्टुको, विविध प्रकारचे मणी, रोमन दिवे, पूजेचे स्तूप, हस्तीदंताच्या कलाकृती मिळतात. या वस्तू अखेर कुठेतरी पाश्‍चात्त्य संशोधकाच्या किंवा लिलाव केंद्राच्या हाती पडतात.

५. गांधार कलेच्या प्राचीन शिल्पांचा चोरटा व्यापार !

पाकिस्तानमध्ये प्राचीन कलाकृतीच्या व्यापाराविषयी येथे शारजाह चलो, असे म्हटले जाऊ लागले आहे. हेरॉल्ड ट्रिब्युनने पाकिस्तानात तस्कराकडून पकडलेल्या गांधारच्या पुरातन मूर्तींविषयी वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. कराचीच्या महंमद या कस्टम अधिकार्‍याच्या निवेदनानुसार एका चोरट्या व्यापार्‍याने (स्मगलरने) जुन्या लाकडी वस्तूंसह (फर्निचरसह) २३ लाकडाच्या पेट्या अरब अमिराती येथे निर्यात करण्यासाठी पाठवल्या. कराची बंदरात संशय आल्याने जेव्हा त्या उघडल्या, तेव्हा त्यात गांधार कलेची ६२५ शिल्पे आढळली. एखाद्या संग्रहालयातील साठ्यापेक्षा हा हस्तगत केलेला साठा पुष्कळ मोठा होता.

६. पाकमध्ये पुरातन गोष्टींच्या संवर्धनाचा कायदा होऊनही अंमलबजावणीस हरताळ !

आपल्या प्राचीन अवशेषांचे शिपमेंट (जहाजाच्या माध्यमातून) जगात कुठेही खात्रीने पोहोचवणारा पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे, असे त्या क्षेत्रातील संबंधित म्हणतात. पाकिस्तानात वर्ष १९७५ मध्ये पुरातन गोष्टींच्या संवर्धनाचा कायदा संमत करूनही त्याची अंमलबजावणी तेथे होत नाही; म्हणून डॉन या वृत्रपत्राने त्यावर अग्रलेख लिहिला होता. युनेस्कोने संरक्षित केलेली प्राचीन स्थळे नीट जतन केली जात नाहीत. खुद्द मोहंजोेदडो येथे एका प्राचीन संरक्षित स्थळी खोदकाम करून एका भ्रमणभाष अस्थापनाने टॉवर उभा केल्याचे युनेस्कोच्या सदस्यांच्या भेटीच्या वेळी उजेडात आले होते !

७. तालिबानकडून २ सहस्र प्राचीन शिल्पांचा नाश

पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासिका बेरनीस जेफरी शिफर यांनी स्वत:चे सर्व आयुष्य गांधार कलेच्या अभ्यासात व्यतीत करून एक सचित्र ग्रंथ साकार केला. त्या वेळीच त्यांनी गांधार कलेच्या भवितव्याविषयी प्रश्‍न उपस्थित केला होता. दुर्दैवाने तिचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला आणि तालिबानने अफगाणिस्तानात २ सहस्र प्राचीन शिल्पे आणि असंख्य मृद-भांड्यांचा नाश केला.

८. तालिबानी आतंकवाद्यांनी गांधार पॉटरी विभाग नष्ट करणे

वर्ष १९५९ मध्ये स्वात परिसरात प्राचीन शिल्प आणि वस्तू यांचे प्रसिद्ध संग्रहालय भिगोरा-स्वात येथे उभारण्यात आले. यातील बहुसंख्य वस्तू एक संग्राहक मेजर जनरल अब्दुल हक जहानजेब यांनी दिल्या होत्या. फिल्ड मार्शल अयूब खान यांनी त्याचे उद्घाटन केले. त्यानंतर वर्ष १९९२ मध्ये जपानने मोठे साहाय्य करून हे संग्रहालय वाढवले. तालिबानला हे संग्रहालय डोळ्यांत खुपत होते. त्यामुळे फेब्रुवारी २००८ मध्ये त्यांनी या संग्रहालयावर स्फोटकांच्या साहाय्याने जोरदार आक्रमण केले. मौलाना फझलुल्लाहच्या समर्थकांना या सर्व प्राचीन अवशेषांचा समूळ नाश करावयाचा होता; पण ते पूर्णपणे संग्रहालय नष्ट करू शकले नाहीत. स्फोटाच्या दणक्यात संग्रहाचा इ.स. पूर्व पहिल्या शतकातील गांधार पॉटरी (कुंभार काम) विभाग हा पूर्णपणे नष्ट झाला. यातील १५० बहुमूल्य मृद भांड्यांचे तुकडे शेवटी टॅक्सीला येथील प्रयोगशाळेत प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

९. सुरक्षेअभावी स्वात येथील संग्रहालय बंद !

स्वात संग्रहालयाचे क्युरेटर (देखभाल करणारे) महंमद अकलीम आणि त्यांचे सहकारी या आपत्तीने हताश झाले. इ.स. पूर्व तिसर्‍या शतकापासूनचे अनेक अवशेष येथील ८ दालनात प्रदर्शित केले गेले होते. हे संग्रहालय आता सुरक्षेअभावी बंद करण्यात आले असून, जर स्वात खोर्‍यात भविष्यात पूर्ण शांतता प्रस्थापित झाली, तरच पुन्हा हे संग्रहालय चालू करण्यात येईल, असे स्वात संग्रहालयाच्या आयोजकांनी घोषित केले. सध्या हे स्थळ लष्करी किल्ल्यासारखे दिसते. वाळूची पोती ठेवून आणि बंकर्स उभारून लष्कर त्याचे संरक्षण करते. क्युरेटर अकलीम हे त्यांच्या कुटुंबासह तेथे रहातात. त्यांच्या मते त्यांचे जीवन आता कारागृहासमानच झाले आहे.

१०. तालिबान अन् आतंकवादी यांच्या दहशतीमुळे गांधार कलेचा अभ्यास करणार्‍या संशोधकांचे संशोधक थांबले !

पूर्वी सर्वसाधारण २० परदेशी संशोधकाचे गट येथे काम करत; पण आता त्यांचे संशोधन पूर्णपणे थांबले आहे. पेशावर म्युझियमचे काजी एजाझ म्हणतात, पेशावरला येणारे सहस्रो परदेशी पर्यटक बंद झाले आहेत. तालिबान अन् आतंकवादी यांंमुळे तेथे जाण्याचे कुणी धाडस करत नाही. प्रवासी आस्थापने (कंपन्या) बंद झाली असून पुरातत्त्वीय स्थळे आता ओसाड पडाली आहेत. पेशावरचे सालेह महंमद यांच्या मते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या सर्व कलाकृतींचे सादरीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
तालिबानामुळे अशांतता निर्माण झाल्यामुळे आता परदेशी प्रवासी आणि गांधारकलेचे अभ्यासक या प्रदेशात येण्याचे धाडसच करत नाहीत. टॅक्सीला या संग्रहालयाचे क्युरेटर अब्दुल नासीर खान म्हणतात, आतंकवादी हे संस्कृतीचे मोठे शत्रू आहेत. टॅक्सीला या संग्रहालयात अनमोल कलाकृती आहेत. काही शिल्पात बुद्धाला ग्रीक देवाप्रमाणे दाखवण्यात आले आहे. स्थानिक संघटना भविष्यात आतंकवादी टॅक्सीला संग्रहालयाला लक्ष्य करू शकतात.

११. तक्षशिलेच्या प्राचीन अवशेषांचे ठिकाण असुरक्षित !

अब्दुल खान यांच्या मते तेथे अधिक सुरक्षेची काळजी घेतली जात आहे; परंतु निधीअभावी या संग्रहालयाची सुरक्षा ही अपुरीच आहे. सध्या एक मासात एकही परदेशी अभ्यासक तेथे फिरकलेला नाही. तक्षशिलेच्या प्राचीन अवशेषांचे ठिकाण सुरक्षित राहिले नाही. त्याचे जतनही झाले नाही. जर संशोधन थांबले, तर पाकच्या पुरातत्व खात्याचे पुढचे भवितव्य काय, असा प्रश्‍न अब्दुल नासीर खान करतात. तालिबानने सर्व प्रकारचे संगीत, नृत्य, कला आणि मुलींचे शिक्षण यांवर बंदी घातली असून त्यांचा हा जहालवाद सर्व पाकिस्तानात पसरला आहे. त्यामुळे देशाच्या या सांस्कृतिक आणि प्राचीन वारसांवर मोठे संकट आले आहे. खान यांच्या मते पाकिस्तानच्या पुरातत्त्व खात्याकरता हा सगळ्यात बिकट आणि अंधःकारमय काळ आहे.

१२. पाकमधील गांधार कलेचा अध्याय शेष रहाण्यासाठी पेशावर म्युझियमच्या संरक्षणाची आवश्यकता !

पेशावर म्युझियमची बॉम्बस्फोटात हानी झाल्याने तेथील मुळातील दालने फुटली असल्याने या सर्व इमारतीचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. पेशावर म्युझियमचे एक द्वार बंद करून तेथे सिमेंटच्या बॅरीकेडस उभारल्या आहेत आणि आता केवळ दुसर्‍या दाराने प्रवेश करता येतो. पेशावर म्युझियम शताब्दीकडे वाटचाल करत आहे. गांधार कलेचा येथे जगातील सर्वांत मोठा संग्रह आहे. इ. स. १९०२ ते १९४१ या काळात इंग्रजांच्या पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खनन्नातील वस्तू आणि अवशेष यांचे जतन करण्यात आले आहे. याच भागात तालिबानाचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे या संग्रहाचे रक्षण करण्याचे कार्य पाकिस्तानी लष्करास भविष्यात करावे लागणार आहे अन्यथा गांधार कलेचा अध्याय पाकच्या भूमीवरून कायमचा नष्ट होण्यास अधिक कालावधी लागणार नाही.

– श्री. संजय गोडबोले (संदर्भ : दैनिक लोकसत्ता, ७.३.२०१०)

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​