सर्व साधनामार्गांचा पाया असलेला गुरुकृपायोग !

भक्तीयोगाचे उदाहरण म्हणजे देवाची भक्ती करण्यास शिकवले जाते, ज्ञानयोगाचे उदाहरण म्हणजे योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन शिकवले जातात आणि कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे नामजप करत कर्म करण्यास शिकवले जाते. हे सर्व गुरुकृपायोगात शिकवले जाते. हठयोग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना करायची असली, तरी गुरुकृपायोगात सांगितलेली अष्टांग साधना व्यष्टी साधनेचा पाया पक्का होण्यासाठी आवश्यक आहे.

१. स्वभावदोष-निर्मूलन : हे अत्यंत आवश्यक आहे; कारण स्वभावदोष हे साधनेतील मुख्य अडथळा असतात. ते दूर केल्याविना कोणतीही साधना करणे कठीण असते.
२. अहं-निर्मूलन : हेही अत्यंत आवश्यक आहे; कारण अहंभाव असेल, तर ईश्‍वराशी एकरूपता साधणे अशक्य असते. अहं-निर्मूलन केल्याविना कोणतीही साधना करणे कठीण असते.
३. नामजप : अखंड नामजप करत असतांना मन नामाशी एकरूप झाले, तर रिकामे मन म्हणजे भुताचे घर ही स्थिती होत नाही. नामजपामुळे सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाणेही शक्य होते.
४. सत्संग : यामुळे साधनेत सर्व प्रकारे साहाय्य होते, उदा. साधनेविषयी योग्य दृष्टीकोन आणि चांगली साधना करण्याची प्रेरणा मिळते.
५. सत्सेवा : यामुळे ईश्‍वराप्रती समर्पणभाव वाढतो आणि अहं-निर्मूलन झपाट्याने होण्यास साहाय्य होते.
६. सत्साठी त्याग : यामुळे मायेची आसक्ती न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होते. साधनेत या अंगाला विशेष महत्त्व आहे; कारण ईश्‍वरप्राप्तीसाठी पुढे सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता करावी लागते.
७. भाव : यामुळे देवाशी जवळीक होणे सोपे होते. भावामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी देव साहाय्यही करतो.
८. प्रीती (निरपेक्ष प्रेम) : प्रीती हा ईश्‍वराचा एक गुण असल्याने तो निर्माण झाल्यास ईश्‍वराचे इतर गुणही निर्माण होण्यास साहाय्य होते, तसेच समष्टी साधनेचा पायाही पक्का होण्यास साहाय्य होते. प्रीतीमुळे व्यापकत्व निर्माण होऊन पुढे मानवजातच नव्हे, तर प्राणीमात्र, वृक्षवल्ली आदींविषयी प्रेम निर्माण होते.

टीप : गुरूकृपायोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या – www.sanatan.org

Leave a Comment