‘अर्बन’ नक्षलवाद आणि हिंदु धर्मविरोधक डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खरे स्वरूप !

अर्बन (शहरी) नक्षलवादाचे समर्थक आणि त्यांच्यापासून देशाला असलेला धोका !

‘शहरांमध्ये नक्षलवाद कशा प्रकारे पसरत आहे ?’, ‘त्याचे स्वरूप काय आहे ?’, ‘त्याला छुप्या पद्धतीने खतपाणी घालणारे हस्तक कोण आहेत ?’ अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ या विषयावर २० ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ सामाजिक माध्यमांतून विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या संवादातून अर्बन नक्षलवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याविषयी मांडलेले वास्तव येथे विस्तृतपणे देत आहोत.


जी मार्क्सवादी साम्यवादी चळवळ आहे, तिचा हेतू भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतावर राज्य करणे, हा होता. त्यासाठी मानवेंद्र रॉय यांनी रशियात जाऊन साम्यवाद शिकून घेतला होता. मार्क्सवादी साम्यवादी चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अस्तित्वात होती, तिने पाकिस्तानच्या फाळणीसाठी वैचारिक साहाय्य केले होते; कारण त्या माध्यमातून उर्वरित भारतावर राज्य करण्याची त्यांची सिद्धता होती. पुढे वर्ष १९६२ च्या चीनयुद्धात चीन भारतातील मार्क्सप्रणीत राजकीय चळवळीला समर्थन करील, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्टांनी चीनचे समर्थन केले होते. कुठे तरी भारतात बंड झाले किंवा युद्ध झाले की, त्याचा लाभ उठवून प्रस्थापित राज्यकर्त्यांना हटवण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणे आणि त्याद्वारे मार्क्सवादी राज्य आणणे, ही साम्यवाद्यांची विचारधारा आहे. त्या विचारांना अनुकूल नक्षलवाद नक्षलबारी जिल्ह्यात जन्माला आला किंवा चीनसमर्थित माओवादी हिंसाचारी चळवळ भारतात चालू झाली.

वर्ष २०१४ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवेदन दिले होते की, माओवाद्यांची भारतावर ताबा मिळवण्यासाठी देशव्यापी युद्धाची सिद्धता चालू आहे. यासाठी त्यांना युरोपमधील कम्युनिस्ट देशांचे साहाय्य लाभत आहे. त्यांच्याकडे सापडत असणारी शस्त्रेदेखील युरोपनिर्मित आहेत. वर्ष २०२५ पर्यंत रक्तरंजित क्रांतीद्वारे साम्यवादी राष्ट्र स्थापित करण्याची त्यांची योजना आहे. यावरून लक्षात येईल की, साम्यवादी विचारांचे राजकीय पक्ष अर्थात् विविध नावांचे कम्युनिस्ट पक्ष हे अर्बन नक्षलवादाचे पहिले समर्थक आणि हस्तकही आहेत, असे म्हणू शकतो.

अर्बन नक्षलवादाच्या दुसर्‍या समर्थक आहेत, सेक्युलर पॉलिटिकल पार्टी अर्थात् धर्मनिरपेक्ष विचारांचे राजकीय पक्ष. महाराष्ट्रात कोरेगाव भीमा दंगल घडली. त्यात अर्बन नक्षलवाद्यांचा हात होता, असे अन्वेषण यंत्रणांचे म्हणणे होते. या दंगलीमध्ये दंगल घडवणार्‍यांचे समर्थक कोणते सेक्युलर राजकीय पक्ष होते, हे सर्वांना ठाऊक आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देणार्‍या कन्हैय्या कुमारचे समर्थन करणारे राहुल गांधी होते. हा जो कम्युनिस्ट अजेंडा आहे, याला सातत्याने समर्थन लाभत आहे, ते धर्मनिरपेक्ष (सेक्युलरिस्ट) शक्तींचे ! हे समर्थन केवळ राजकीय हेतूने केलेले आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकारांना अडचणीत आणून स्वतःचा राजकीय उद्देश साधणे, हा त्यांचा हेतू आहे.

अर्बन नक्षलवादाचे तिसरे समर्थक आहेत जिहादी शक्ती. त्यांचाही उद्देश भारताला दारूल हरबपासून दारूल इस्लाम बनवण्याचा म्हणजे राजकीय आहे. भारतातील जिहादी शक्तींना वाटते की, ‘हा पूर्वीचा इस्लामशासित प्रदेश असल्याने यावर पुन्हा आपण सत्ता स्थापित करू शकतो’; म्हणूनच यासाठी पूरक असलेल्या शक्तींना या जिहादी शक्ती साहाय्य करत आहेत.

अलीकडेच सीएए कायद्याच्या विरोधात भारतात सर्वत्र हिंसाचार झाला. शाहीनबागचे आंदोलन असो, संसदेतील गदारोळ असो, विद्यापिठांमधील घोषणाबाजी असो अथवा सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्यांची झुंडशाही असो, हे सर्व आपण या कायद्यानिमित्त अनुभवले. भारतातील ‘सेक्युलरीस्ट’, ‘इस्लामिस्ट’ आणि ‘कम्युनिस्ट’ शक्तींनी ‘सीएए’ कायद्याला विरोध केला. देहली आणि अलीगड येथे दंगल झाली. ‘सीएए’ कायद्याचा (नागरिकत्व सुधारणा कायदा) उपयोग करून भारतातील जिहादी शक्तींनीही भारतावर स्वतःचा प्रभाव स्थापित करण्याच्या दृष्टीने संधी शोधली. या जिहादी शक्तींना कम्युनिस्ट आणि सेक्युलर शक्तींचे राजकीय साहाय्य लाभले, ही मोठी चिंतेची घटना आहे. या सर्व शक्ती केवळ हिंदुविरोधी नव्हे, तर देशविरोधीही आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

थोडक्यात सांगायचे, तर भविष्यात आपला केवल नक्षलवादी किंवा अर्बन नक्षलवादी यांच्याशी नव्हे, तर इस्लामिस्ट-कम्युनिस्ट-सेक्युलरीस्ट या एकत्रित शक्तींविरुद्ध संघर्ष असणार आहे. ‘सीएए’ कायद्याला होणार्‍या विरोधाच्या घटनांवरून हे लक्षात येते.

शहरात राहून नक्षलवाद्यांना समर्थन करणारे, त्यांच्या चळवळीत सहभाग घेणारे, त्यांना विचारशक्ती आणि धनशक्ती पुरवणारे ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून ओळखले जातात. देहलीतील दंगलीमध्ये ‘अर्बन नक्षलवाद्यां’चाही हात असल्याचे पुरावे केंद्रीय यंत्रणा गोळा करत आहेत. या छुप्या नक्षलवाद्यांपासून देशाला मोठा धोका आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आज चित्रपट आणि साहित्य क्षेत्रांत अर्बन नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या ‘बॉलिवूड’ किंवा ‘वेब सिरीज’ यांच्या माध्यमातून देश आणि हिंदु विरोधी प्रचार चालू आहे. आजची चित्रपटसृष्टीतील कलाकारिता धर्माला अफूची गोळी मानणार्‍या कम्युनिस्ट विचारांनी प्रभावीत आहे आणि प्रो-इस्लामिस्ट-सेक्युलरीस्ट शक्तींद्वारे प्रायोजित आहे. साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रांतही अशी अनेक मंडळी कार्यरत आहे, ज्यांचे वेगळी नावे घेण्याची आवश्यकता नाही; पण ती नक्षलवाद्यांच्या अजेंड्यांचे वैचारिक समर्थन करत आहेत. भारत अन् हिंदु धर्म यांना मुळापासून तोडू पहात आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांची मागे हत्या झाली. त्यांना भारत तेरे तुकडे हो, अशी घोषणा देणारे कन्हैय्या कुमार आणि उमर खालिद हे बेटे, म्हणजे पुत्र वाटत होते.

थोडक्यात इस्लामिस्ट-कम्युनिस्ट-सेक्युलरीस्ट शक्ती या अर्बन नक्षलवादाच्या समर्थक असून त्यांचे माध्यम राजकीय क्षेत्र, विद्यापिठे, बॉलिवूड (चित्रपटसृष्टी), पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्र आहे.

नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या यादीत डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही नाव !

नास्तिकतावादाचा प्रचार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू असला, तरी त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्याचे सत्यस्वरूप लोकांच्या पुढे उघड करण्याचे एक मोठे कार्य सनातन संस्थेने केले होते. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली नसती, तर त्यांना निश्चितच आतापर्यंत कारागृहात जावे लागले असते. सनातन संस्थेने त्या दृष्टीने त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले होते; मात्र दुर्दैव आहे की, या प्रकरणात सनातन संस्थेने पुरो(अधो)गाम्यांचा बुरखा फाडण्याचे केलेले कार्य जाणून न घेता संस्थेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे.

आज ‘शहरी नक्षलवाद’ (अर्बन नक्सलिझम) ही एक नवीन संकल्पना उघडकीस आली आहे. याद्वारे मोठ्या शहरांमध्ये विविध सामाजिक कार्ये करत राहून नक्षलवादी चळवळीला समर्थन मिळवून देणे, शहरातील युवकांना सरकारकडून अन्याय होत असल्याचे सांगून नक्षलवादाकडे आकर्षित करणे, असे प्रयत्न केले जातात; मात्र ‘शहरी नक्षलवाद’ या शब्दाचा उगम होण्यापूर्वीच वर्ष २०११ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या गृहमंत्रालयाने नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या ६२ स्वयंसेवी संस्थांची यादी घोषित केली होती. या यादीत डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही नाव पन्नासाव्या क्रमांकावर होते; पण नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍यांना आज महान समाजसुधारक बनवले जात आहे. अंनिसचे गोंदिया जिल्हाप्रमुख नरेश बनसोड यांना ४ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या वेळी डॉ. दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ‘पकडलेले कार्यकर्ते आमचे असून त्यांना सोडून देण्यात यावे’, अशी शासनाला विनंती केली होती.

२ नोव्हेंबर २०११ या दिवशी ‘दैनिक पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षलवाद्यांचे अंनिसशी संबंध-गुप्तवार्ता विभागाचा खळबळजनक अहवाल’ या शीर्षकाखालील वृत्तामध्ये म्हटले होते की, ‘या संघटनेच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याची सूचना राज्यातील पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना देण्यात आली आहे.’

या वृत्तामध्ये डॉ. दाभोलकर यांचे एक कोट प्रकाशित झाले होते, त्यात ते म्हणतात की, ‘साधना’ मासिकाचा मी संपादक आहे. ३ वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित विषयावर मी एक अभ्यासपूर्ण विशेषांक काढला होता. त्यामुळे असे होऊ शकते.’ या वृत्तावरून आणि त्यातील डॉ. दाभोलकर यांच्या वक्तव्यावरून डॉ. दाभोलकर हे किती नक्षलवादी चळवळीच्या जवळ होते, याचा अनुमान बांधता येईल.

डॉ. दाभोलकर आणि त्यांचा ट्रस्ट यांचा उघड झालेला भ्रष्ट अन् देशविरोधी कारभार !

डॉ. दाभोलकरांचा ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ हा न्यास सर्वपरिचित असला, तरी ‘परिवर्तन’ ही संघटना तितकी परिचित नाही. या संघटनेच्या विश्वस्तांच्या सूचीत डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, देवदत्त अच्युत दाभोलकर, प्रसन्न देवदत्त दाभोलकर, शैला नरेंद्र दाभोलकर, डॉ. हमीद नरेंद्र दाभोलकर, मुक्ता पटवर्धन-दाभोलकर आणि मंगला सुभाष वाघ यांची नावे आहेत. ही नावे ऐकल्यानंतर हा दाभोलकरांचा ‘परिवार ट्रस्ट’ आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ही घरगुती संस्था म्हणे व्यसनमुक्तीचे कार्य करते !

डॉ. दाभोलकर यांच्या ‘परिवर्तन ट्रस्ट’ला ‘स्विस एड फाऊंडेशन’ या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे ‘स्विस एड फाऊंडेशन’ ही संस्था भारतविरोधी असून ती भारताचा अविभाज्य अंग असणार्‍या ‘जम्मू-काश्मीर’ला भारताच्या नकाशामध्ये दाखवत नाही. भारताचा अशा प्रकारे अपमान करणार्‍या संस्थेकडून ज्यात थोडे तरी राष्ट्रप्रेम जागृत असेल, तो देणगी घेईल का ? पण डॉ. दाभोलकर या संस्थेकडून करोडो रुपये देणगी घेत होते. भारतात सेंद्रीय शेतीचा प्रचार करण्यासाठी ते ही देणगी घेत होते. अंधश्रद्धा निर्मूलन आणि सेंद्रीय शेती यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, तसेच त्यांनी सेंद्रीय शेती या विषयावर कधी काम केल्याचे दिसले नाही. यातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, ज्या संघटनेचे  नियतकालिक आहे, त्या संस्थेने विदेशातून धन घेणे कायद्याने गुन्हा असून त्याकरिता ७ वर्षांची शिक्षा आहे; मात्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असूनही डॉ. दाभोलकर ‘अंनिस’च्या नावे विदेशातून देणग्या घेण्याचा गुन्हा उघडपणे करत होते. त्याविषयी गृहमंत्रालयाकडे तक्रार केल्यावर मात्र केंद्र सरकारने त्यांचा ‘एफ्सीआर्ए’चा परवाना रहित केला; मात्र विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई अजूनही केलेली नाही.

तथाकथित समाजसुधारक डॉ. दाभोलकर म्हणजे नास्तिकतावादी चळवळीतील हिंदु धर्मविरोधक !

डॉ. दाभोलकर हे डॉक्टर, संपादक, समाजसुधारक म्हणजे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित होते; परंतु त्यांचा इतिहास पाहिल्यानंतर ते एक नास्तिकतावादी चळवळीतील हिंदु धर्मविरोधक होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही चळवळ प्रथम कोल्हापूर येथे ‘मानवीय नास्तिक मंच’या नावाने चालू झाली. यातील नास्तिक म्हणजे देव-धर्म न मानणारे. ज्यांना देव-धर्म मानायचा नाही, त्यांचा हा मंच होता. पुढे त्याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ असे गोंडस नाव ठेवण्यात आले.

स्वतः डॉ. दाभोलकर त्यांच्या ‘भ्रम आणि निरास’ या पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे, ‘हिंदूंची अध्यात्मनिष्ठा व्यवहारात अंधश्रद्धांनाच खतपाणी घालते. हिंदूंचे कर्मकांड, ध्यानधारणा, होमहवन, पूजाअर्चा, मंत्रतंत्र, हे अंधश्रद्धांचे दृश्यस्वरूप आहे.’ यावरून हिंदूंची ईश्वरी आराधना किंवा धार्मिक कार्य हेच त्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धा होती, हे लक्षात येते. याच पुस्तकात डॉ. दाभोलकर लिहितात की, ‘धर्मशास्त्र प्रमाण मानणारे लोक ईश्वर मानतात; पण ते केवळ हायपोथेसिस (गृहितक) आहे.’ यावरून ईश्वरवादी कल्पनाच त्यांना मान्य नव्हती; म्हणून त्यांना निरीश्वरवादी म्हटले जाते. डॉ. दाभोलकरांची पुस्तके आणि भाषणे हिंदु धर्मविरोधी विचारांनी भारलेली होती.

सनातन धर्मात प्रत्येकाला स्वतःचे विचार जोपासण्याची मोकळीक आहे. त्यामध्ये विचारांच्या स्तरावर मतभेदही असू शकतात. डॉ. दाभोलकर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सरकारच्या साहाय्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि नरबळी प्रथा विरोधी कायदा’ करण्याचा प्रयत्न करत होते. यात अनिष्ट रुढींच्या निर्मूलनाला कोणाचाही विरोध नव्हता; मात्र त्या नावाखाली हिंदु धर्मातील अनेक श्रद्धांना गुन्हा ठरवण्यास सनातन संस्थेचा विरोध होता. डॉ. दाभोलकरांनी कायद्यातील कलमे करतांना हेतूपुरस्सर केवळ हिंदु धर्मातील धर्माचरणावर बंदी येईल, अशाप्रकारे रचलेली होती, उदा. त्यात एक कलम होते की, ‘कोणत्याही मूर्तीसमोर बळी देणे, हा अंधश्रद्धेचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला शिक्षा म्हणून ५ वर्षांचा कारावास अन् १ लाख रुपयांचा दंड होईल.’ यावर आमचा आक्षेप होता की, ‘कायद्यातील समानता या तत्त्वाने कोणत्याही प्राण्याची कोणत्याही कारणासाठी हत्या करणे गुन्हा मानले गेले पाहिजे, फक्त मूर्तीसमोर बळी देण्यालाच गुन्हा ठरवणे अयोग्य आहे. त्यामुळे मूर्तीसमोर बळी दिल्यामुळे हिंदु समाजावर कारवाई होईल आणि ईदची कुर्बानी म्हणून करोडो पशूंची हत्या करणारे मात्र त्या कायद्याखाली येणार नाहीत. तसेच चिकन-मटण दुकानांमध्ये प्रतिदिन लाखो-करोडो प्राण्यांची हत्या करणारे मात्र गुन्हेगार ठरणार नाहीत. म्हणजे एकाच कृतीसाठी हिंदु समाजालाच गुन्हेगार ठरवायचे; मात्र इतरांना नाही, हे अयोग्य आहे. अशा हिंदूविरोधी कलमांमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांनी त्या कायद्याला वैध मार्गाने विरोध चालू केला.

या कायद्यातील चुकीच्या कलमांविषयी कायदेतज्ञांची मते घेऊन ती शासनाकडे मांडल्याने शासनाने मूळ कायद्यात डॉ. दाभोलकर यांनी घातलेल्या २७ कलमांपैकी १६ कलमे वगळली आणि केवळ ११ कलमांचा कायदा बनवला. काँग्रेसचे सरकार सत्तेत असतांना त्यांना १६ कलमे काढावी लागली; कारण ती अयोग्य आणि हिंदु धर्माला लक्ष्य करणारी होती, हे सिद्ध झाले. हा वैचारिक संघर्ष होता. त्यात कायद्यातील निम्म्याहून अधिक कलमे काढण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

या कायद्यात हिंदूंच्या धर्माचरणावर बंदी आणणारे सर्वांत घातक कलम म्हणजे ‘कलम १३’ होते. यानुसार ‘केवळ मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा न पोचणारे धार्मिक विधी आणि कृती यांना सवलत देण्यात आली आहे. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे वरील माध्यमातून बाधा पोचणारे सर्व धार्मिक विधी आणि कृती यांना हा कायदा लागू होणार आहे, उदा. उपवास, व्रते, होमहवन, मुलाचे कान टोचणे, केस किंवा वेणी दान, माध्व संप्रदायानुसार तप्तमुद्राधारण यांसारख्या अनेक धार्मिक गोष्टी या कायद्यानुसार गुन्हा ठरणार होत्या. यात चमत्कारांच्या प्रचारावर प्रतिबंध करण्यात आल्याने चमत्कारांचे वर्णन असलेले विधी, उदा. श्री सत्यनारायणाची महापूजा, नारायणबली आणि या विधींमधून प्राप्त होणारे फळ, यांविषयी कोणी आक्षेप घेतल्यास संबंधित विधी, त्यासाठी लागणारे साहित्य अन् पुस्तके यांवर बंदी येऊ शकते. या कलमामुळे श्री विठ्ठलाच्या चमत्कारांची उदाहरणे दिली म्हणून वारकर्‍यांनाही अटक होऊ शकणार होती.

अनुसूची कलम १२ मध्ये तर अवलिया, संत आणि महात्मा यांना वेडसर ठरवण्यात आले होते. त्यामुळे हे कलम शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज आणि भक्त यांचा अवमान करणारे होते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक एकदा का संमत झाले, तर त्या कायद्यात हिंदूंच्या प्राचीन विद्यांमधील ‘वास्तूशास्त्र’ आणि ‘ज्योतिषशास्त्र’ यांचा समावेश करून कायदा आणखीन कठोर करण्यात येईल’, अशी स्वीकृती ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दिली होती.

सश्रद्ध आणि नास्तिकतावादी यांच्यातील वैचारिक संघर्ष !

आजच्या प्रसारमाध्यमीय भाषेत निरीश्वरवाद्यांना ‘पुरोगामी’ म्हटले जाते, तर ईश्वरवाद्यांना ‘सनातनी’, असे हिणवले जात आहे. आमच्या भाषेत हा वैचारिक संघर्ष नास्तिक लोक आणि सश्रद्ध यांमधील आहे.

श्रद्धा म्हणजे ‘श्रत् सत्यं धीयते यस्यां सा श्रद्धा ।’ ‘श्रत् म्हणजे सत्य. ज्या भावनेत सत्याचे अधिष्ठान आहे, ती श्रद्धा.’ याज्ञवल्क्यऋषि ‘शतपथ ब्राह्मण’ या धर्मग्रंथात म्हणतात, ‘श्रद्धेच्या योगाने सत्य सापडते.’ श्रद्धा ‘अंध’ नसते. डोळसच असते. श्रद्धा भावना आहे. तिला ‘अंध’ कसे म्हणता येईल ?

‘स्वामी विवेकानंद यांनी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यासमोर एका व्यक्तीच्या विश्वासाला ‘अंधविश्वास’ म्हटले. त्या वेळी श्रीरामकृष्ण परमहंस म्हणाले, ‘‘पण तू अंधविश्वास कशाला म्हणतोस, हे समजावून देऊ शकशील का ? विश्वास तर सगळाच अंध. विश्वासाला परत डोळे कुठले ? विश्वास काही आंधळा असतो आणि काही डोळस असतो, हे कसे काय ?’’ स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘खरोखर या शब्दाचा अर्थ मला सापडला नाही. श्रीरामकृष्ण परमहंस यांचे म्हणणे बरोबर आहे, त्या दिवसापासून मी हा शब्द उच्चारणे सोडून दिले.’’ स्वामी विवेकानंद हे विवेकाची मूर्ती होते. डॉ. दाभोलकर यांच्यापेक्षा ते कैकपटींनी विवेकी होते. त्यांनी ‘अंधश्रद्धा’ हा शब्द उच्चारणे सोडून दिले. ‘श्रद्धा दिसत नाही; म्हणून ती खोटी असते’, असे म्हणणे अयोग्य असून विज्ञानातही श्रद्धा ठेवावीच लागते.

श्रद्धेचा प्रसार करणार्‍या संतांनाच दांभिकतेचे चांगल्या प्रकारे निर्मूलन करता येते !

‘धार्मिक क्षेत्रांत खोटारडेपणा, ढोंगीपणा किंवा भोंदूगिरी अशी दांभिकता नाही’, असे आमचे म्हणणे नाही. ती पूर्वीही होती आणि आजही आहे. ‘मनात एक, ओठात एक आणि कृतीत भलतेच’, अशा प्रकारच्या दांभिकतेचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. आम्ही नेहमीच दांभिकतेचा निषेध केला आहे. सनातन संस्थेने भोंदूबाबांच्या दांभिकपणाविषयी ४ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘समाजातील दांभिकता, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा आणि अयोग्य रूढी यांचे निर्मूलन आवश्यकच आहे’, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

समाजात माजलेल्या दांभिकतेचे निर्मूलन करण्यासाठी भक्तीयोगातील संतांनी केलेले अमूल्य कार्य हे सर्वविदित आहे. आद्यशंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञान सांगतांना ‘ब्रह्म हे सत्य आहे आणि जग ही माया आहे’, असे सांगितले. त्याच शंकराचार्यांनी प्रसंगी अघोरी प्रथांचा अवलंब करणार्‍या कापालिकांचा नाश करण्यासाठी संन्याशांना एकत्र केले होते. संत ज्ञानेश्वरमाऊली, संत तुकाराम महाराज या सर्वांनीच दांभिकतेवर प्रहार केले.

हे सर्व सांगायचे तात्पर्य, श्रद्धेचा प्रसार करणार्‍या संतांनाच चांगल्या प्रकारे दांभिकतेचे निर्मूलन करता येते; कारण भाव आणि श्रद्धा कळण्यासह त्यांना भोंदूपणा आणि दंभ यांचे उत्तम ज्ञान असते. आज मात्र ही चळवळ दुर्दैवाने धर्म न मानणार्‍या लोकांच्या हाती गेली आहे. ज्यांना समाजात नास्तिकतावाद पसरवायचा आहे, ज्यांच्या संघटनेचे पूर्वाश्रमीचे नाव ‘मानवीय नास्तिक मंच’ होते, ती मंडळी आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने नास्तिकवादाचा प्रसार करणारी श्रद्धाविरोधी चळवळ राबवत आहेत. ‘श्रद्धेचा प्रसार करणार्‍या संतांना कारागृहात टाकू’, अशा धमक्या उघडपणे देणार्‍या नास्तिकांना शासन राजमान्यता देत आहे. शासन त्यांनी सांगितलेले कायदे करत आहे. हे चित्र भयावह आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मानणारे हे व्यक्तीशः नास्तिकतावादी आहेत. त्यांचा सामाजिक विचार अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा आधुनिकतावादाचा आहे, तर त्यांचा राजकीय विचार हा कम्युनिस्टांचा आहे. ते शारीरिक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा ते नक्षलवादी ठरतात आणि हीच मंडळी जेव्हा बौद्धिक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा अर्बन नक्षलवादी ठरतात.

म्हणूनच आम्ही आवाहन करतो की, धर्म न मानणार्‍या चळवळींपासून समाजाने दूर रहावे; कारण त्या चळवळी केवळ धर्मविरोधी नसून देशविरोधीही आहेत.  श्रीमद्भगवद्गीता सांगते की, ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।’ अर्थात् ‘श्रद्धेने ज्ञानप्राप्ती, म्हणजेच प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती होते.’ यासाठीच सर्वांनी श्रद्धायुक्त जीवन जगले पाहिजे.’

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​