१२ वर्षांनंतर अनुभवास येणारा अद्भुत आणि पवित्र सोहळा : कन्यागत महापर्वकाल !

कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने…

kanyagat_mahaparv

सह्याद्री पर्वतावर सातारा जिल्ह्यात श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर हे ठिकाण आहे. येथे सात नद्यांचे उगमस्थान असून येथील आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा उगम होतो. सध्या येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागीरथी आणि सरस्वती अशी सात कुंडे बांधण्यात आली आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडांतून निरंतर जलप्रवाह चालू असतो. सरस्वती नदी गुप्तरूपाने येथे वास करते, तर गायत्री कुंडातून ६० वर्षांतून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर गंगा भागीरथी कुंडातून जलस्रोत येतो आणि तो वर्षभर चालू रहातो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात.

kanyagat_mahaparv1

१. कन्यागत म्हणजे काय ?

कन्यागत हा शब्द कन्या आणि गत या दोन शब्दांच्या एकत्रीकरणामधून सिद्ध झाला आहे. गत याचा अर्थ गेलेला. कन्यागत म्हणजे कन्या राशीमध्ये गेलेला. गुरु ग्रहाने कन्या राशीतून तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंड पुढील ११ वर्षे कोरडे रहाते. १२ वर्षांनंतर गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंडातून जलप्रवाह चालू होतो. या वेळी गंगा नदी कृष्णा आणि वेण्णा या नद्यांना भेटायला येते. तसेच १ वर्ष त्यांच्यामध्ये वास करून रहाते, अशी आख्यायिका आहे. या संदर्भात पुराणकाळात एक कथा सांगितली जाते.

kanyagat_mahaparv_2

२. गंगा नदीच्या संदर्भातील पुराणकथा

२ अ. हैह्य कुळातील राजांनी काशीवर आक्रमण करून काशी क्षेत्रात उच्छाद मांडणे

काशीक्षेत्री दिवोदास नावाचा राजा राज्य करत होता. काशीक्षेत्र ही भरतवर्षातील सर्वांत पुण्यवान नगरी मानली जायची. सर्व प्रकारचे साधू, संत, तपस्वी, मुनी, योगी, ऋषी, विद्वान, मुमुक्षू, तसेच विद्यार्थी यांची एकच मांदियाळी या क्षेत्री जमलेली असे. दिवोदास राजा धर्मशील आणि आचरण संपन्न होता. त्या वेळी हैह्य या कुळातील राजांनी काशीक्षेत्रावर सतत आक्रमणे करून दिवोदास राजाचा पराभव केला. हैह्यांनी काशीक्षेत्राचे राज्य बळकावले आणि तेथे उच्छाद मांडला.

२ आ. सर्वांनी काशीनगरीचा त्याग करून दक्षिणेकडे प्रयाण करणे

हैह्यांची सत्ता येताच काशीनगरीतील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण पूर्णपणे बिघडले. अखंड ज्ञानदान करणारी ज्ञानसत्रे उजाड झाली. यज्ञ, कीर्तने बंद झाली. काशी विश्‍वेश्‍वर मंदारपर्वतावर वास्तव्यासाठी निघून गेले, तसेच राजाश्रय संपुष्टात आल्याने तेथील विद्वान, ऋषी, मुनी, साधू, संत यांनीही काशीनगरीचा त्याग केला आणि दक्षिण दिशेकडे प्रयाण केले. त्यापैकी काही जणांनी नाशिकजवळ गोदावरी नदीकिनारी वास्तव्य केले, तर व्यासमुनी, श्री दत्तात्रेय यांसह अन्य ऋषीमुनींनी दक्षिण दिशेकडे आपला प्रवास चालूच ठेवला.

२ इ. गंगा नदी दक्षिणेतही अवतरण्यासाठी ऋषीमुनी आणि महायोगी यांनी श्रीविष्णूकडे प्रार्थना करणे

तीर्थयात्रा करत ते सह्याद्री पर्वतावर येऊन पोचले. तेथून जवळच जोर या गावी कृष्णा नदीचा जलौघ धबधब्याच्या रूपाने पडतांना त्यांना दिसला. प्रत्यक्ष श्रीकृष्णावेणी नदीचे (कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम असलेली नदी) भूतलावर दर्शन झाल्याने ते आनंदाने पुलकित झाले. त्या परमपावन कृष्णावेणीच्या प्रवाहाकडे पहातांना त्यांना काशी क्षेत्रातील गंगेची तीव्रतेने आठवण आली. त्यांच्या मनामध्ये इथेही गंगा माता अवतरावी, अशी इच्छा निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी भगवान श्रीविष्णूकडे साकडे घातले. तेथे साक्षात् श्रीविष्णु प्रकट झाले. ऋषीमुनी आणि महायोग्यांनी अनन्यभावे शरण जाऊन गंगा आणि कृष्णा यांचा येथे संयोग होऊन सह्याद्री पर्वत आणि ही दक्षिणभूमी पावन व्हावी, अशी प्रार्थना सर्वांच्या उद्धारासाठी केली.

२ ई. भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेने गंगा नदी कृष्णावेणी नदीमध्ये अवतरणे

सर्वांची जगत्कल्याणकारक मंगलमय प्रार्थना ऐकून भगवान श्रीविष्णूंना संतोष झाला. त्यांनी तात्काळ गंगेचे स्मरण केले. तेथे गंगा प्रकटली. भगवंतांनी तिला सर्वांची इच्छा सांगितली. कृष्णा नदी हे साक्षात् विष्णूचेच जलरूप आहे, हे गंगेने जाणले. अनेक पातकी लोकांनी स्नान केल्यामुळे आणि संपर्कामध्ये आल्याने त्या सर्वांच्या पापांचे ओझे गंगेच्या डोक्यावर होते. त्यामुळे प्रत्यक्ष विष्णुतनु असलेल्या कृष्णावेणी नदीमध्ये एक वर्षभर निवास करून आपले साचलेले पापांचे ओझे हलके करावे, असे गंगेला वाटले. आपल्यासाठी ही उत्तम पर्वणी आहे, असे मानून तिला अतिशय आनंद झाला. त्या वेळी भगवान विष्णूंच्या पायाच्या अंगठ्यापासून गंगा बाहेर पडली आणि कृष्णेच्या जलौघामध्ये विलीन झाली. त्याच वेळी सर्वांनी भगवान विष्णूंच्या समोर गंगामातेकडून वचन घेतले की, ती प्रत्येकी १२ वर्षांनी पुन्हा कृष्णा नदीला भेटण्यासाठी याच प्रकारे या ठिकाणी येईल. गंगेनेही त्याला आनंदाने अनुमती दिली. त्यावेळेपासून गंगा नदी श्रीकृष्णावेणी नदीच्या भेटीला प्रत्येक बारा वर्षांनी नित्यनियमाने येते. अत्यंत पवित्र अशा या आनंदमय मीलनालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. जणू दोन बहिणी एकत्र याव्यात, तसा बारा वर्षांनी हा आश्‍चर्यकारक सोहळा घडतो.

२ उ. कन्यागत महापर्वात गंगा नदीने समवेत सर्व तीर्थांना घेऊन येणे

या वेळी श्रीविष्णूंनी संपूर्ण भरतखंडातील सर्व तीर्थांना आपल्या समवेत घेऊन येण्याची आज्ञा गंगेला केली. सर्व तीर्थांनाही त्यांच्यामध्ये साचलेल्या पापापासून शुद्धी करून घेण्याची या निमित्ताने सुवर्णसंधी मिळाली. संपूर्ण जंबुद्वीपामध्ये (संपूर्ण भारतामध्ये) एकूण साडेतीन कोटी तीर्थे आहेत, अशी श्रद्धा आहे. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, मुक्तीनगरी, काशी, बद्रीकेदार, कैलास मानसरोवर, सप्तपुरी, द्वारका, प्रभास, प्रयागक्षेत्र, कुरूक्षेत्र, गया, डाकोर, जगन्नाथपुरी, रामेश्‍वर, दक्षिण काशी, कोल्हापूर, व्यंकटाचल तिरूपती, सोरटी सोमनाथ, श्रीशैल्य, गोकुळ वृंदावन, कन्याकुमारी, शबरी मलाई ही सर्व तीर्थे गंगेसमवेत एक वर्ष कन्यागत महापर्वकालामध्ये कृष्णावेणीमध्ये येऊन वास करतात.

kanyagat_mahaparv3

३. कन्यागत महापर्वाचे माहात्म्य

कृष्णा नदी म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचेच जलरूप आहे. कृष्णा ही साक्षात् विष्णुस्वरूपिणी आहे आणि वेण्णा ही साक्षात् शंकरस्वरूपिणी आहे. कृष्णावेणी म्हणजे हरिहरांचे ऐक्यरूप आहे; म्हणूनच तिला ज्येष्ठ भगिनीचे स्थान दिले आहे.

कन्यागत महापर्वकाल हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी अन् सर्व प्रकारच्या कायिक, वाचिक आणि मानसिक पापांपासून, दुष्कृत्यांपासून मुक्ती देणारा आहे. या पर्वकालामध्ये कृष्णा नदीच्या उगमापासून ती सागराला मिळेपर्यंत सर्वत्र स्नान, दान, होम, हवन, पूजन, यज्ञ इत्यादी धार्मिक विधी करणे, हे अत्यंत पुण्यदायी आहे. ते सर्व प्रकारच्या पातकांपासून आपली मुक्ती करते, तसेच तर्पण, श्राद्ध इत्यादी विधी या काळी केले असता पितर संतुष्ट होतात. ग्रहपीडा नाश पावते आणि सर्व प्रकारची प्रगती होते. शारीरिक आजार, पीडा, क्लेश नाहीसे होतात, अशी श्रद्धा आहे.

४. महाभारतकाळात, तसेच श्रीगुरुचरित्रातही कन्यागत पर्वाचा संदर्भ असणे

अज्ञातवासात असतांना ११ वर्षे पांडवांनी तीर्थाटन केले आणि १२ व्या वर्षी ते कृष्णातिरी माहुली आणि वाई येथे आले. तेथे कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम होतो. जणू हरिहरांचे तेथे मीलन होते. पांडवांनी त्या परिसरामध्ये वर्षभर निवास केला, तेव्हा कन्यागत महापर्वकाल चालू झाला. संपूर्ण वर्षभर त्यांनी तेथे विविध प्रकारचे धार्मिक विधी, होम-हवन आणि यज्ञ केले. त्यामुळे नंतर त्यांचे भद्र झाले म्हणजे कल्याण झाले.

श्रीगुरुचरित्रात यासंदर्भात एक श्‍लोक आहे, कन्यागती कृष्णेसी । त्वरित येते भागीरथी । तुंगभद्रा तुळागती । सुरनदी प्रवेश ॥ (संदर्भ : गुरुचरित्र अध्याय १५, ओवी ६२)

साक्षात् दत्तावतार नृसिंहसरस्वती स्वामी सुद्धा जेव्हा कर्दळीवनाकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा गुरु कन्या राशीमध्ये होता आणि कन्यागत महापर्वकाल चालू होता, असाही उल्लेख श्रीगुरुचरित्रात आहे. याचा अर्थ कन्यागत महापर्वकालाची परंपरा प्राचीन असून सहस्रो वर्षांपासून चालू आहे, असे दिसून येते.

५. प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी रचलेल्या संस्कृत काव्यातही कन्यागत महापर्वाचे वर्णन

प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी श्रीकृष्णालहरी या नावाचे कृष्णावेणी नदीवर सर्वांगसुंदर असे काव्य संस्कृतमध्ये रचले आहे. त्यामध्ये कन्यागत महापर्वकालासंबधी त्यांनी खालील वर्णन केले आहे.

गते जीवे कन्यां जगति बहुमान्यां शिखरिणी । ह सह्ये त्वां धन्यां जननि भगिनीवामरसरित ॥
समागत्याप्यब्दं परमनियमात्तिष्ठति मुदा । नम: श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गूरूमते ॥११॥

महाजंबुद्विपे वृजिनहरतीर्थानि वरदे । समायान्ति त्वान्तु त्रिविधमलदे तानि परदे ॥
कदा त्वत्स्नानादे: फलमपि न वक्तुं प्रभुरजो । नम: श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते ॥१२॥

अर्थ : देवनदी गंगेमध्ये पापी लोक त्यांची पापे सतत विसर्जित करतात. ११ वर्षांमध्ये अशी साठून राहिलेली पातके घेऊन गंगा नदी आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजेच कृष्णावेणी नदीला भेटायला येते. येतांना ती साडेतीन कोटी तीर्थांना समवेत घेऊन येते. वर्षभर अन्यत्र कोठेही न जाता ती कृष्णावेणीमध्ये वास करून रहाते आणि साचलेल्या सर्व पापांपासून मुक्त होते. अग्नीमध्ये ज्याप्रमाणे सर्व काही भस्म होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णावेणी प्रत्यक्ष हरितनू असल्याने सर्व प्रकारच्या पापांचे तिच्यामध्ये परिमार्जन होते.

६. कन्यागत महापर्वातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे विशेष महत्त्व !

कन्यागताच्या या संवत्सर महापर्वकालामध्ये कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर या उगमस्थानापासून वाई, माहुली, कराड, नीरा नरसिंहपूर, औदुंबर, ब्रह्मनाळ, श्रीनृसिंहवाडी, खिद्रापूर, उगार, कुरवपूरपासून ते कृष्णा सागराला मिळेपर्यंत सर्व ठिकाणी विविध प्रकारे श्रीकृष्णा उत्सव साजरा केला जातो. यांतील नृसिंहवाडी हे पुण्यदायी आणि पवित्र क्षेत्र आहे. या पर्वकाळात नृसिंहवाडी येथे स्नान, होम-हवन, यज्ञ आणि इतर धार्मिक विधी केल्याने सर्व प्रकारची समृद्धी होते. नृसिंहवाडी ही साक्षात् दत्तप्रभूंची अत्यंत प्रिय अशी राजधानी आहे. श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी येथे १२ वर्षे राहून तप:साधना केल्याने या क्षेत्राला दिव्य झळाळी प्राप्त झाली आहे. ज्याप्रमाणे कुंभमेळ्यात हरिद्वार आणि सिंहस्थपर्वात त्र्यंबकेश्‍वर या ठिकाणांचे विशेष महत्त्व आहे, त्याप्रमाणे नृसिंहवाडी येथील उत्सवाचे महत्त्व विशेष आहे.

६ अ. नृसिंहवाडीविषयी प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांनी काढलेले उद्गार !

नृसिंहवाडीविषयी प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांनी म्हटले आहे की,
नरसोबाची वाडी जे लोकमान्या । कृष्णातीरा शोभवि जे सुधन्या ॥
अन्या तैशी देखिली म्या ना साची । श्रीदत्ताची राजधानी सुखाची ॥

६ आ. श्रीक्षेत्रनृसिंहपूर येथे होणार्‍या कन्यागत महापर्व सोहळ्याचे स्वरूप

कन्यागत महापर्वकालाचा आरंभ होतांना नृसिंहवाडी येथे फार मोठा शिबिकोत्सव साजरा होतो. शिबिकोत्सव म्हणजे पालखी सोहळा. या वेळी श्रीदत्तप्रभूंची उत्सवमूर्ती पालखीमध्ये बसवून ती मिरवणुकीने साधारणपणे ४ मैल अंतरावर असणार्‍या शुक्ल तीर्थ या ठिकाणी नेली जाते. अनुमाने २२ ते २४ घंटे ही मिरवणूक चालते. शिबिकारोहणाच्या कालावधीत भगवंताच्या ६ ऐश्‍वर्यांचे दर्शन होते.

ही ६ ऐश्‍वर्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. स्वारींचे दिव्य दर्शन
२. त्यांच्या समवेत येणारा शाही लवाजमा, हत्ती, घोडे, वाजंत्र्या, सनई, चौघडे, वाद्यवृंदे
३. दैनंदिन विधींचे दर्शन
४. गंगा आणि कृष्णा यांचे स्नान
५. अष्टतीर्थांचे दर्शन
६. संतसज्जनांचा पुण्यसहवास

६ इ. पालखीचे होणारे स्वागत !

नृसिंहवाडीतून पालखी जात असतांना घराघरातून सुवासिनी आरतीचे तबक घेऊन स्वारींची पंचारतींनी ओवाळणी करतात. मार्गामध्ये प्रारंभी पुजार्‍यांची घरे आहेत. तेथून स्वागत, ओवाळणी आणि पूजा स्वीकारत स्वारी पुढील सर्व घरांतून आरती स्वीकारते. पालखी शुक्लतीर्थावर जाऊन तेथे औदुंबर वृक्षाखाली स्थिरावते. तेथे भव्य सभामंडप उभारलेला असतो. त्या वेळी करवीर पिठाचे पूजनीय शंकराचार्य आणि इतर शेकडो साधू-संत आणि सत्पुरुष हा दिव्य सोहळा अनुभवायला आलेले असतात. त्यानंतर येथे गायन आणि कीर्तन यांच्या रूपाने श्रीचरणी सेवा रूजू होते. त्यानंतर पहाटे सुमुहूर्तावर स्वारी स्नानासाठी शुक्लतीर्थावर नदीमध्ये उतरते. परंपरागत नरहर खातेदार पुजारी यांच्याकडे हा अधिकार असतो. १२ वर्षांनी एकदाच होणारा हा परमपवित्र सोहळा सर्वांच्याच अंरात्म्यामध्ये विलक्षण ऊर्जा आणि दैवी स्पंदने यांची निर्मिती करतो. या वेळी भावविभोर होऊन भक्त नाचू लागतात.

६ ई. पालखीचे स्नान आणि अन्य धार्मिक विधी अन् उत्सव !

स्वारींचे स्नान झाल्यानंतर वाजत गाजत पालखी पुन्हा सभामंडपामध्ये औदुंबर वृक्षाखाली आणली जाते. याच कालावधीत शिरोळ येथून भोजनपात्र मंदिरातून स्वारींची पालखी स्नानासाठी येते आणि विधीपूर्वक स्नान घातले जाते. समोरच्या तीरावर अमरेश्‍वर मंदिरातून स्वारींची पालखी येते. तिथेही स्नानाचा कार्यक्रम पार पडतो. यानंतर मात्र जमलेल्या भाविकांची स्नानासाठी एकच झुंबड उडते. या वेळी श्रीदत्तघोषाने आकाश दुमदुमून जाते. औदुंबर वृक्षाखाली मग पुण्याहवाचन पूजा आणि इतर धार्मिक विधी पार पडतात. त्यानंतर अष्टके, पदे, आरत्या, वाद्यवृंद, लेझीम, हलगी, टाळ, झांज, मृदुंग यांच्या गजरात पालखी हळूहळू मंदिराकडे परत येते. उत्सवमूर्तीची महापूजा नारायणस्वामींच्या देवळातच होते. त्यानंतर पादुकांची पूजा, धूप, आरती, इंदुकोटी, मंत्रपुष्प, विडा, शेजारती होऊन उत्सवाची सांगता होते.
१२ वर्षांतून एकदा येणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदातरी नक्कीच अनुभवला पाहिजे !

(संदर्भ : प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या पुस्तकातून आणि www.kanyagat.com हे संकेतस्थळ)

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​