उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य असलेले महामना मदनमोहन मालवीय !

Madan_mohan_malaviya_640
मदनमोहन मालवीय

‘काँग्रेसच्या १८८६ मध्ये कोलकात्याला झालेल्या द्वितीय अधिवेशनाला २५ वर्षांचे मदन मोहन मालवीय यांनी जे भाषण केले, त्याने अध्यक्ष दादाभाई नवरोजी इतके प्रभावीत झाले की, ‘मालवीयजींच्या मुखातून साक्षात भारतमाता बोलत होती’, असे उद्गार त्यांनी काढले. मदनमोहन यांचे पिताश्री पं. ब्रजनाथ हे रसाळ कीर्तनकार होते. स्वतः मालवीयजींना संगीतात उत्तम गती होती.

१. काशी हिंदु विश्वविद्यालय स्थापन करायचे ठरल्यावर गडगंज पैसा देणारी वकिली सोडून देणारे त्यागी वृत्तीचे महामना मदनमोहन मालवीय !

पोलीस चौकी जाळली आणि २१ पोलिसांना जाळले म्हणून गांधींनी जे आंदोलन चौरीचौरा येथे मागे घेतले त्या अभियोगात १७० जणांना फाशी झाली. काँग्रेसचे नेते असलेले मदनमोहन मालवीयजींनी आंदोलकांची बाजू इतक्या समर्थपणे मांडली की न्यायमूर्तींनी उठून उभे राहून त्यांना अभिवादन केले आणि बहुतेक जणांची फाशी रहित केली. तथापी गडगंज पैसा देणारी वकिली काशी हिंदु विश्वविद्यालय स्थापन करायचे ठरल्यावर त्यांनी क्षणार्धात सोडून दिली. हिंदूंना त्यांच्या उर्जस्वल भूतकाळाचे साभिमान ज्ञान हवे; पण वर्तमान समस्यांवर मात करण्याइतकी प्रतिकार शक्ती सक्षम हवी, हा हेतू मनात ठेवून एका कुंभमेळ्यात त्यांनी विश्वविद्यालयाचा संकल्प सोडला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काशीच्या काँग्रेस अधिवेशनात १९०५ मध्ये तसा औपचारिक ठराव मांडला गेला. व्हाइसराय लॉर्ड हार्डिग्ज यांनी १९१६ मध्ये कोनशिला बसवितांना ‘आता शिक्षण प्रणालीत परिवर्तन निश्चित होणार या विश्वासाने सर्व उपस्थितांच्या मुखांवर प्रतिबिंबीत झालेला आनंद आपणाला जाणवत आहे’, असे उद्गार काढले होते.

२. वसिष्ठ आणि गौतम या तपस्वी मुनींच्या परंपरेचा मान ठेवणारे विद्यार्थी घडवणारे बनारस हिंदु विश्वविद्यालय !

‘अलीगड मुस्लीम विद्यापिठाप्रमाणे विघटनाचे विचार प्रसृत करणारे विद्यार्थी मदनमोहन मालवीयजींच्या काशी येथील हिंदु विश्वविद्यालयाने निर्माण केले नाहीत. व्हाइसराय लॉर्ड हार्डिग्ज यांनी या विश्वविद्यालयाच्या कोनशिला समारंभामध्ये वसिष्ठ आणि गौतम या तपस्वी मुनींच्या परंपरेचा उल्लेख केला होता. त्या परंपरेचा मान ठेवणारे विद्यार्थी येथून बाहेर पडले.

३. हिंदु विश्वविद्यालयाच्या उभारणी करता अखंड झिजणारे ज्ञानतपस्वी मदनमोहन मालवीय !

हिंदु विश्वविद्यालयाच्या कल्पनेचा प्रचार करण्यासाठी आणि गोहत्याबंदीच्या मागणीसाठी मदनमोहन मालवीयजींनी देशभर पायाला भिंगरी लागल्यासारखा प्रवास केला. बाहेर पडतांना ते त्या दिवसाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट ठरवीत आणि ते पूर्ण झाल्यावाचून अन्नग्रहण करीत नसत. खरे म्हणजे घराबाहेर पडल्यावर इतरांच्या हातचे पाणीही ते पित नसत. इतक्या कर्मठ निस्पृहपणाने त्यांनी इतका प्रचंड लोकसंग्रह आणि इतकी प्रचंड कामे कशी उभी केली, हे एक आश्चर्यच आहे.

४. काँग्रेस पक्षात एकेकाळी मदनमोहन मोलवीय यांच्यासारखे हिंदूंसाठी झटणारे व्यक्तीत्त्व असणे, हे मोठे आश्चर्य !

काँग्रेसचे नेते पंडित मदनमोहन मालवीय यांनी आयुष्यातले पहिले भाषण जे त्यांनी १८७७ मध्ये केले ते आणि १९४६ मध्ये केलेले शेवटचे भाषण गोरक्षणावर आहे. गाभण गायींना मारून आतल्या अर्भकांच्या कातड्यांचे जोडे घालण्याची हौस युरोपात प्रचलित आहे हे कळल्यावर त्यांनी चामड्याची पादत्राणे वापरणे बंद केले. जालियनवाला बाग हत्याकांडावर इंपिरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत त्यांनी सरकारचे वाभाडे काढणारे जे पाच तास भाषण केले, ते ब्रिटिश पार्लमेंटमधील एडमंड बर्कच्या भाषणाची आठवण करून देणारे होते, असे म्हटले जाते. रावळपिंडीला जाऊन ‘हिंदु धर्म केवळ मानवीय मूल्यांचा उद्घोष करतो, तो औषधालाही संकुचित नाही’, असे त्यांनी सांगितले. आपल्याला काशीला मरण येऊ देऊ नका आणि दहनही काशीत करू नका, कारण आपणास मुक्ती नको असून पुनर्जन्म घेऊन भारतमातेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी पुरोहिताला बोलावून सांगितले होते. समग्र क्रांतीची दृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. हिंदूंची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी उदंड संघर्ष केला. त्यांचे मन काठोकाठ करुणेने भरले होते आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यात कसलाही डाग त्यांनी उमटू दिला नाही. फाळणीच्या वेळी हिंदूवर जे अनन्वित अत्याचार झाले, त्या धक्क्याने त्यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षात एकेकाळी अशी माणसे सापडत असत.’

– सुघोष (दैनिक सनातन प्रभात, पौष शु. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (२७.१२.२०११))