भारताच्या उत्थानासाठी त्यागाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘विवेकानंद कन्या’ भगिनी निवेदिता !

‘भगिनी निवेदिता या वर्ष १८९८ मध्ये भारतात आल्या आणि वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पारतंत्र्यातील राज्यकर्त्यांकडून त्यांना कुठलाही राजसन्मान मिळाला नाही; पण जनसामान्यांनी मात्र त्यांचा ‘विवेकानंद कन्या’, या विशेषणाने सन्मान केला. भारतातील संस्कृती सूक्ष्मतेने समजून घेण्यासाठी समर्पित झालेल्या एका विदेशी महिलेचा याहून मोठा सन्मान कोणता असेल ? निवेदितांचे हे समर्पण दधिची ऋषींच्या वज्राप्रमाणे आणि नवविधा भक्तीतील समर्पण भक्तीप्रमाणे होते. निवेदितांच्या त्यागात भारताच्या उत्थानाचे जे स्फुल्लिंग होते, तेच आज नव्याने चेतवायची आवश्यकता आहे.

१. ख्रिस्ती आणि बुद्ध पंथ अन् विज्ञान यांचा अभ्यास करूनही साशंकता कायम !

‘भगिनी निवेदिता (१८६७-१९११) यांचे मूळ नाव मार्गरेट एलिजाबेथ नोबेल, असे होते. लेखक आणि शिक्षक असलेल्या मार्गरेटने लंडनमध्ये सामाजिक कार्य करण्यासह ख्रिस्ती पंथाचा अभ्यास चालू केला होता; पण तिला या पंथातील विचारांत विरोधाभास अन् त्रुटी जाणवू लागल्या. ‘विज्ञानाच्या अभ्यासाने स्वतःच्या शंका दूर होतील’, असे वाटल्याने तिने विज्ञानाचा अभ्यास केला; पण त्यातही पूर्ण समाधान झाले नाही. तिने बुद्ध पंथाचाही अभ्यास केला; पण समाधान मात्र झाले नाही.

२. मनातील सर्व शंकांचे समाधान करणारी स्वामी विवेकानंद यांची भेट !

वर्ष १८९५ मध्ये स्वामी विवेकानंद लंडनला व्याख्यानासाठी आले होते. तेथे लेडी इझाबेल मार्गेसन यांच्या घरी मार्गरेटची स्वामीजींशी प्रथम भेट झाली. त्यानंतर तिने स्वामीजींची अनेक व्याख्याने ऐकली. प्रत्यक्ष भेटीत त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. स्वामीजींचा उदात्त दृष्टीकोन, वीरोचित आचरण आणि स्नेहाकर्षण, यांचा तिच्यावर प्रभाव पडला. ‘ज्या सत्याच्या शोधात आपण आहोत, त्या सत्याकडे जाण्याचा मार्ग स्वामीजीच दाखवू शकतील’, असा विश्‍वास मार्गरेटच्या मनात निर्माण झाला आणि तीन वर्षांनंतर ती भारतात आली.’ (‘स्व’-रूपवर्धिनी’चा वार्षिक विशेषांक २०१०)

३. मार्गरेट ते निवेदिता !

‘मार्गरेटची आई मेरी नोबेल यांनी लेकीचे नाव ‘मार्गरेट’ म्हणजे, ईश्‍वरी कार्याला समर्पित झालेली, असेच ठेवले होते. स्वामी विवेकानंदांच्या मार्गदर्शनाने प्रभावित झालेली मार्गरेट भारतात आली. पुढे तिने स्वामी विवेकानंद यांच्याकडून ब्रह्मचारिणीची दीक्षा घेतली. त्या वेळी तिचे योगायोगाने नवे नामकरण झाले, ‘निवेदिता’ अर्थात समर्पिता ! या दीक्षाविधीनंतर स्वामींनी तिला पहिला पाठ शिकवला शिवभक्तीचा ! मग आशीर्वाद देऊन स्वामीजी म्हणाले, “जा आणि त्यांचे अनुसरण कर, ज्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेण्यापूर्वी ५०० वेळा लोककल्याणार्थ स्वतःचे समर्पण केले होते.”

४. भारतीय संस्कृती आत्मसात करून स्वामी विवेकानंदांच्या कसोटीला उतरलेल्या निवेदिता !

स्वामीजी ब्रह्मचारिणी दीक्षेपूर्वी निवेदितांना म्हणाले होते, “तुला अंतर्बाह्य ‘हिंदु’ व्हायला हवे ! ऐहिक निकडी, विचारधारणा आणि स्वभाव, यांचेही हिंदुकरण करायलाच हवे. त्यासाठी तुला स्वतःचा संपूर्ण भूतकाळ, त्यातील प्रत्येक घटना यांचा विसर पडायला हवा. संपूर्ण स्मृतिभ्रंश !” कितीही अवघड असले, तरी भारतीय विचारपद्धतीनेच साधना आणि आदर्श, यांचे आकलन करणे साधले पाहिजे, असा स्वामीजींचा आग्रह होता; पण त्या या कसोटीला संपूर्णपणे उतरल्या होत्या.

५. समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी अत्यल्प काळात आभाळासमान कार्य करणार्‍या निवेदिता !

भगिनी निवेदितांकडे अगदी साध्या साध्या गोष्टीत प्रत्येकाला सकारात्मकपणे समजून घेण्याची अद्वितीय कला होती. केवळ १२-१३ वर्षांच्या अत्यल्प काळात त्यांनी आभाळाइतके कार्य केले. निवेदितांच्या कार्याचे विविध अंग पाहिल्यावर जाणवते की, या प्रत्येक अंगात त्यांनी प्रत्येक वेळी नव्याने समर्पण केले होते.

५ अ. समाजकार्य

‘प्लेग’च्या साथीत रुग्णांची सेवा करणे, नवीन शाळा चालू करून त्या चालवणे आणि त्यासाठी परदेशातून व्याख्यानांद्वारे देणगी मिळवणे, जगदीशचंद्र बसूंसारख्या शास्त्रज्ञांच्या संशोधनावरील टिपणावरून हस्तलिखित सिद्ध करणे, विज्ञान मंदिराच्या स्थापनेसाठी परिश्रम घेणे, यांसारख्या विविध उपक्रमांतून निवेदितांनी समाजसेवेसह सर्वांना दिशा देण्याचेही कार्य केले.

५ आ. राष्ट्र आणि धर्म कार्य

दीक्षा मिळाल्यानंतर भगिनी निवेदिता भारतातील जीवनपद्धत, भाषा आणि हिंदु धर्म यांच्याशी पूर्णतः एकरूप झाल्या. या सर्वांचा अभिमान बाळगत त्यांनी स्वदेशी वस्तूंची गाडीतून फिरून विक्री केली. स्वामीजींच्या महानिर्वाणानंतर त्यांनी ‘उत्तिष्ठत जाग्रत…’ हा संदेश आठवून त्यांचेच कार्य पूर्ण करण्यासाठी जोमाने स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून दिले. स्वामीजींचा संदेश हिंदुस्थानभर सांगण्यासाठी त्यांनी दौरेही केले. साहित्य आणि कला क्षेत्रातही निवेदितांनी स्वतःचा ठसा उमटवला.

५ इ. क्रांतीकार्य

क्रांतीकार्यातही भगिनी निवेदिता तसूभरही मागे नव्हत्या. ‘स्वातंत्र्य’ ही भारताची पहिली आवश्यकता’, असे निवेदिता म्हणत. क्रांतीकारकांना प्रेरित करणे, स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी रामकृष्ण मठातून दूर होणे, लॉर्ड कर्झनला नामोहरम करण्याचे धारिष्ट्य आणि बुद्धीमत्ता दाखवणे, स्वामीजींचे धाकटे बंधू क्रांतीकारक भूपेंद्रनाथ यांच्या जहाल लेखामुळे त्यांच्यावर भरलेल्या राजद्रोहाच्या खटल्यातून त्यांना जामिनावर सोडवण्यासाठी स्वतःचे काही सहस्र रुपये न्यायालयात भरणे, अशा अनेक कृतींतून त्यांचे क्रांतीकार्य स्पष्ट होते’. – स्मिता गुरव. (‘मासिक विवेक’, १६.१०.२०११)

६. धर्म हा भारताचा आत्मा आहे, हे सत्य जाणणार्‍या निवेदिता !

‘निवेदितांनी स्वतःची राष्ट्रध्वजाची कल्पना साकारतांना भगव्या वस्त्रावर पिवळे वज्र काढून, ‘वंन्देमातरम्, यतो धर्मस्ततो जयः ।’, असे शब्दही लिहिले होते; कारण ‘धर्म’ हा भारताचा आत्मा आहे, हे सत्य आपल्याला आजही उमगत नाही, ते त्यांना १०० वर्षांपूर्वी उमगलेले होते.
स्त्रीला स्वैराचारी बनवणारा पाश्‍चिमात्य विचार आणि तिला स्वातंत्र्य अन् सुरक्षितता

७. देणारा भारतीय विचार, यांतील निवेदितांनी स्पष्ट केलेला भेद !

निवेदिता म्हणायच्या, “पाश्‍चिमात्य पुरुष स्त्री-दाक्षिण्य (पुरुषांनी स्त्रियांप्रती दाखवलेले सौजन्य) दाखवण्यासाठी स्त्रीला स्वतः द्वार उघडून पुढे जायला मार्ग उपलब्ध करून देईल. भारतीय पुरुष मात्र स्त्रीपुढे चालत राहील; पण त्याच्यामागून येणार्‍या स्त्रीसाठी ‘तो मार्ग सुरक्षित आहे ना’, याचा अंदाज घेऊन, किंबहुना तो अंदाज घेण्यासच तो पुढे चालत राहील. भारतीय पुरुषांच्या स्त्री-दाक्षिण्याच्या कल्पना वेगळ्या असतील; पण स्त्री-दाक्षिण्य त्यांच्याकडे नाहीच, असे म्हणता येणार नाही.”

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात