लष्करी शिक्षणाच्या सैनिकीकरणाच्या प्रश्नावर सूत्रबद्ध, सडेतोड आणि अभ्यासपूर्वक बोलणारे डॉ. मुंजे

लष्करी शिक्षणाच्या सैनिकीकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय विधीमंडळात सूत्रबद्ध, सडेतोड आणि अभ्यासपूर्वक बोलणारे डॉ. मुंजे हेच एकमात्र सदस्य असणे

सारणी

१. ख्रिस्ताब्द १९३७-३८ मध्ये स्वा. सावरकरांनी ‘राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’, या सूत्राचा उच्चार करणे

२. डॉ. मुंजे यांनी जुलै-ऑगस्ट १९२५ मध्ये लष्करी शिक्षणाचा ठराव प्रस्तुत करण्याची आणि शूटिंग क्लब स्थापण्याचा ठराव आणण्याची सूचना देणे

३. ख्रिस्ताब्द १९२७ ते १९३० या कालावधीत डॉ. मुंजे यांनी मध्यवर्ती-केंद्रीय विधीमंडळात शारीरिक शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण आणि सैन्याचे हिंदीकरण हा विषय सतत लावून धरणे

४. इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानचा लष्करी व्यय मात्र उत्पन्नाच्या ४२ टक्के असल्याचे कारण हिंदुस्थान स्वतंत्र नसून ब्रिटिशांकित आहे, हेच होय !

५. लष्करी व्यय न्यून करण्यासाठी डॉ. मुंजे यांनी सुचवलेला उपाय !

६. डॉ. मुंजे आणि स्वा. सावरकर यांनी आपला देश स्वसंरक्षणक्षम व्हावा, यासाठी अथक प्रयत्न करणे

७. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये व्हॉइसरॉयने डॉ. मुंजे यांना इंग्लंडमधील सँडस्र्ट, बुलविच आणि देहरादून या लष्करी महाविद्यालयांत हिंदुस्थानातून घेतल्या जाणार्‍या उमेदवारांची निवड करणार्‍या मंडळाचे सभासद नियुक्त करणे

८. ‘निजी व्ययातून सैनिकी शिक्षण देणारी शाळा का काढत नाही ?’ या क. क्रॉफर्डने विधीमंडळात विचारलेल्या प्रश्नाला चपखल उत्तर देऊन डॉ. मुंजे यांनी त्या दिशेने पावले उचलून ‘भोसला सैनिकी शाळे’ची स्थापना करणे

९. ख्रिस्ताब्द १९३१ मध्ये डॉ. मुंजे यांनी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असतांना अनेक देशांतील सैनिकी महाविद्यालयांची प्रत्यक्ष पहाणी केली आणि तेथील सैनिकी अधिकार्‍यांशी विस्तृत चर्चा करणे

१०. डॉ. मुंजे यांनी घेतलेल्या दोन उल्लेखनीय भेटी – प्रथम महायुद्धातील जर्मन सेनानी फिल्ड मार्शल मॅकेन्सन आणि इटलीचा मुसोलिनी यांची भेट !

११. भारतात लष्करी शाळा काढणार्‍या डॉ. मुंजे यांच्या विचाराची प्रशंसा करणारे आणि ‘हिंदुस्थानने विचार केला, तर दहा वर्षांत हिंदी सैनिक युद्धकलेच्या दृष्टीने पाश्चात्त्यांंच्या सारखेपणात येऊन बसतील’, असे सांगणारे जर्मन सेनानी फिल्ड मार्शल मॅकेन्सन !

१२. दुसरे महायुद्ध आणि डॉ. मुंजे !


 

१. ख्रिस्ताब्द १९३७-३८ मध्ये स्वा. सावरकरांनी ‘राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’, या सूत्राचा उच्चार करणे !

‘ख्रिस्ताब्द १९३७-३८ मध्ये हिंदुमहासभेचे अ.भा. अध्यक्ष म्हणून स्वा. सावरकरांनी ‘राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’, या सूत्राचा उच्चार केला. स्वा. सावरकरांनी ते सूत्र प्रचारिले आणि द्वितीय महायुद्धाच्या काळात सैनिकीकरणाच्या प्रचारासाठी देशव्यापी दौरा केला.’ – श्री. नरसिंह जोशी (मासिक धर्मभास्कर, मार्च २००९)

२. डॉ. मुंजे यांनी जुलै-ऑगस्ट १९२५ मध्ये लष्करी शिक्षणाचा ठराव प्रस्तुत करण्याची आणि शूटिंग क्लब स्थापण्याचा ठराव आणण्याची सूचना देणे

‘वस्तूतः ख्रिस्ताब्द १९२७ मध्येच हिंदुमहासभेच्या अ.भा. अध्यक्षपदी नामांकित होताच डॉ. मुंजे यांनी याच सूत्रानुरूप प्रचार आरंभला होता. तत्पूर्वी मध्य प्रांताच्या विधीमंडळातही डॉ. मुंजे यांनी जुलै-ऑगस्ट १९२५ मध्ये लष्करी शिक्षणाचा ठराव प्रस्तुत करण्याची आणि शूटिंग क्लब स्थापण्याचा ठराव आणण्याची सूचना दिली होती. प्रांतिक विधीमंडळात डॉ. मुंजे यांनी या ठरावाविषयी बोलतांना स्पष्टच सांगितले, ‘‘आणीबाणीची वेळ आली, तर निदान ५० सहस्र जवान आरक्षक मध्य प्रांताने केंद्रास पुरवावे आणि त्याहीपेक्षा उद्या येणार्‍या स्वराज्यात हिंदी लोकांस हिंदुस्थानचे संरक्षण स्वतः करता यावे, हा या ठरावामागे माझा हेतू आहे.’’

३. ख्रिस्ताब्द १९२७ ते १९३० या कालावधीत डॉ. मुंजे यांनी मध्यवर्ती-केंद्रीय विधीमंडळात शारीरिक शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण आणि सैन्याचे हिंदीकरण हा विषय सतत लावून धरणे

पुढे ख्रिस्ताब्द १९२७ ते १९३० या कालावधीत डॉ. मुंजे यांनी मध्यवर्ती-केंद्रीय विधीमंडळात शारीरिक शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण आणि सैन्याचे हिंदीकरण या विषयाचा घोशाच लावला होता. हिंदुस्थानच्या महसुलाचा एक तृतीयांश भाग लष्करी विभागावर व्यय होत असतांना सामान्य हिंदी तरुण मात्र सैनिकी शिक्षणापासून वंचित रहावा, हे शल्य डॉ. मुंजे स्पष्टच बोलत असत. लष्करी शिक्षणाच्या ठरावावर बोलतांना, तर त्यांनी शासनाला बजावले, ‘वसाहतींना स्वराज्य दिले, तरी हिंदुस्थानचे संरक्षण इंग्रज शासनाला एकट्याच्या बळावर करणे यापुढे अशक्य आहे आणि एकाएकी दुसरे महायुद्ध उद्भवले, तर तहान लागल्यावर विहीर खोदून निभाव लागणार नाही.’

४. इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानचा लष्करी व्यय मात्र उत्पन्नाच्या ४२ टक्के असल्याचे कारण हिंदुस्थान स्वतंत्र नसून ब्रिटिशांकित आहे, हेच होय ! – डॉ. मुंजे

या प्रश्नावर बोलतांना सेनापती सर विलियम वर्डवुड यांनी जेव्हा हिंदुस्थान शासनाच्या अवाढव्य लष्करी व्ययाची प्रशंसा केली आणि सांगितले, ‘आम्ही काटकसर करून हा व्यय केवळ ५५ कोटींवर आणला आहे.’ तेव्हा डॉ. मुंजे त्यांच्यावर तुटूनच पडले. शासकीय (सरकारी) व्ययाने अर्थसंकल्पामधील आकडे, लष्करी कारभारातील उधळपट्टी आणि लष्कराच्या प्रत्येक विभागात काळे अन् गोरे यांच्यातील पंक्तीप्रपंच हा विषय त्यांनी विस्ताराने प्रतिपादला आणि समारोपात डॉ. मुंजे म्हणाले, ‘इंग्रज शासनाने एवढी मोठी ब्रिटिश फौज हिंदुस्थानच्या व्ययाने हिंदुस्थानात ठेवली, ती हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी नसून आशिया खंडातील ब्रिटिश साम्राज्याच्या रक्षणासाठी ठेवली आहे. इंग्लंड स्वतः आपल्या उत्पन्नाच्या १४ टक्के लष्करी व्ययासाठी व्यय करते. इतर देशांकडे पाहिले, तर फ्रान्स आणि इटली शेकडा १० टक्के, जपान साडेदहा टक्के आणि जर्मनी तर केवळ ५ टक्केच व्यय करतात. हिंदुस्थानचा लष्करी व्यय मात्र उत्पन्नाच्या ४२ टक्के आहे ! याचे कारण हिंदुस्थान स्वतंत्र नसून ब्रिटिशांकित आहे, हेच होय !’

५. लष्करी व्यय न्यून करण्यासाठी डॉ. मुंजे यांनी सुचवलेला उपाय !

५.१ हिंदुस्थानातील ६३ सहस्र गोरी फौज न्यून करून केवळ १५ सहस्र ठेवावी आणि ती जागा एक लक्ष हिंदी आरक्षकांच्या नेमणुकीने भरावी, म्हणजे लष्करी सामर्थ्य न घटता व्यय मात्र १०-१५ कोटींनी न्यून होईल !

लष्करी व्यय न्यून करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवले, ‘हिंदुस्थानातील ६३ सहस्र गोरी फौज न्यून करून केवळ १५ सहस्र ठेवावी आणि न्यून केलेल्या गोर्‍या फौजेची जागा एक लक्ष हिंदी आरक्षकांच्या नेमणुकीने भरावी, म्हणजे लष्करी सामर्थ्य न घटता व्यय मात्र १०-१५ कोटींनी न्यून होईल.’ शासकीय सभासदांना डॉक्टरांच्या कोटीक्रमाला उत्तर देता आले नाही. याच प्रसंगी श्रीनिवास आयंगार आणि विधीमंडळाचे अध्यक्ष श्री. विठ्ठलभाई पटेल यांनी डॉक्टर मुंजे यांना ‘कर्नल मुंजे’, म्हणून गौरवपूर्ण संबोधले.

६. डॉ. मुंजे आणि स्वा. सावरकर यांनी आपला देश स्वसंरक्षणक्षम व्हावा, यासाठी अथक प्रयत्न करणे

टिळकांना लोकमान्य म्हणून जेव्हा गौरवांकित केले जाऊ लागले, तेव्हा टिळक-विरोधकांनी ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी’ आणि ‘बू्रटफोर्सचे पुढारी’, या शब्दांनी त्यांची हेटाळणी केली होती. डॉ. मुंजे यांची ‘कर्नल मुंजे’ म्हणून त्यांच्या सैनिकीकरणामुळे प्रशंसा होऊ लागली, तेव्हा मुंजे विरोधकांनी ‘फिल्ड मार्शल मुंजे’, असे म्हणून त्यांची हेटाळणी करण्यास आरंभ केला; परंतु आपला देश स्वसंरक्षणक्षम व्हावा, या दृष्टीने भविष्याच्या गर्भात डोकावून पहाणार्‍या डॉ. मुंजे आणि स्वा. सावरकर यांनी होणार्‍या निंदेचा विचार न करता ‘वरं देशहितं ध्येयं’, म्हणून सैन्याचे हिंदीकरण आणि हिंदूकरण व्हावे, अधिकाधिक हिंदूंनी सैन्यात शिरून व्यूहरचना आणि आधुनिकतम शस्त्रास्त्रांचा उपयोग अन् प्रयोग यांचे शिक्षण प्राप्त करावे, प्रत्यक्ष रणभूमीवर त्यांना युद्धाचा अभ्यास करता यावा, यासाठी अथक प्रयत्न केले. या विषयावरील केंद्रीय विधीमंडळातील डॉ. मुंजे यांची भाषणे त्यांच्या त्या विषयांवरच्या सखोल, सूक्ष्म आणि मूलगामी अभ्यासाची साक्ष देतात. डॉ. मुंजे यांच्या सैनिकीकरणाच्या विचारांचा प्रभाव किती दूरगामी आणि प्रशंसनीय होता, याचे प्रत्यंतर आपण देश स्वतंत्र होण्याच्या दिवसापासून गेली ६० वर्षे सतत पहात आलो आहोत. आपल्या देशावर वायव्य आणि ईशान्य दिशेकडून आक्रमणाचे संकट ओढवण्याविषयी त्यांचे इशारे, तर वस्तूतः भविष्यवाणीच ठरली आहे.

७. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये व्हॉइसरॉयने डॉ. मुंजे यांना इंग्लंडमधील सँडस्र्ट, बुलविच आणि देहरादून या लष्करी महाविद्यालयांत हिंदुस्थानातून घेतल्या जाणार्‍या उमेदवारांची निवड करणार्‍या मंडळाचे सभासद नियुक्त करणे

ख्रिस्ताब्द १९२८ ची केंद्रीय विधीमंडळाची प्रथम बैठक आटोपताच इतर काही सदस्यांसहित डॉ. मुंजे वायव्य सरहद्दीवरील परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी डेराइस्माइलखान, दर्याखान, पेशावर, खैबर, तक्षशिला या ठिकाणी प्रवास करून आले. ख्रिस्ताब्द १९२९ ची बैठक संपल्यानंतर डॉ. मुंजे झेलस आणि जालंदर येथील किंग जार्ज सैनिकी शाळा (मिलीटरी स्कूल) आणि देहरादूनचे प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल सैनिकी महाविद्यालय (मिलीटरी कॉलेज) या संस्था पाहून आले. दोन्ही संस्थांना त्यांनी देणगी दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मेजवानीत डॉक्टरांनी आपले विचार प्रदर्शित केले. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये व्हॉइसरॉयने डॉ. मुंजे यांना इंग्लंडमधील सँडस्र्ट, बुलविच आणि भारतातील देहरादून येथील लष्करी महाविद्यालयांत हिंदुस्थानातून घेतल्या जाणार्‍या उमेदवारांची निवड करणार्‍या मंडळाचे सभासद नियुक्त केले.

८. ‘निजी व्ययातून सैनिकी शिक्षण देणारी शाळा का काढत नाही ?’ या क. क्रॉफर्डने विधीमंडळात विचारलेल्या प्रश्नाला चपखल उत्तर देऊन डॉ. मुंजे यांनी त्या दिशेने पावले उचलून ‘भोसला सैनिकी शाळे’ची स्थापना करणे

‘सैनिकी महाविद्यालयात उमेदवार म्हणून येणार्‍या हिंदी मुलांचा निभाव ब्रिटिश मुलांच्या चढाओढीने लागण्यासाठी हिंदी मुलांच्या प्राथमिक अभ्यासाची, शरीर कमावण्याची सिद्धता हवी आणि या सिद्धतेसाठी इंग्लंडमधील पब्लिक स्कूल्समधून तेथील मुलांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, तसे शिक्षण भारतीय मुलांना मिळावे अशी व्यवस्था आवश्यक आहे’, हा विचार डॉ. मुंजे मांडत असत. विधीमंडळाच्या बैठकीत एकदा ते या विषयावर बोलत असतांना क. क्रॉफर्ड यांनी त्यांना टोला हाणला, ‘निजी व्ययातून सैनिकी शिक्षण देणारी शाळा का काढत नाही ?’ क. क्राफर्डला विधीमंडळात चपखल उत्तर देतांना डॉ. मुंजे म्हणाले, ‘इंग्रज शासन हिंदुस्थानात जो पैसा व्यय करते, तो इंग्लंडमधून आणलेला नसतो. तो आमच्याच खिशातला असतो आणि तो आमचा पैसा इंग्रजांसाठी व्यय होतो. तो पैसा आमच्या श्रमाचा आणि घामाचा असल्याने आमच्या देशाच्या हितासाठी, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यय व्हावा हे सांगण्याचा अधिकार आम्हाला आहेच !’ परंतु क. क्राफर्डच्या प्रश्नातून डॉ. मुंजे यांना वेगळी चालना मिळाली आणि त्या दिशेने त्यांनी पावले उचलली. त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजेच डॉ. मुंजे यांनी स्थापलेल्या ‘दि सेन्ट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटी’ आणि त्या सोसायटीने प्रारंभलेली नाशिक येथील ‘भोसला सैनिकी शाळा’ !

ख्रिस्ताब्द १९३५ मध्ये प्रारंभलेल्या या दोन संस्थांच्या पूर्वी ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये डॉ. मुंजे यांनी ‘सी. पी. अँड बेरार प्रांंतिक रायफल असोसिएशन’ नागपूरमध्ये निर्माण केली होती. या संस्थेच्या शाखा अकोला, यवतमाळ आदी काही ठिकाणी चालू झाल्या होत्या. पुढे हिंदुस्थानात विभिन्न प्रांतात चालू झालेल्या रायफल क्लबमध्ये ही असोसिएशन पहिली होती !

९. ख्रिस्ताब्द १९३१ मध्ये डॉ. मुंजे यांनी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असतांना अनेक देशांतील सैनिकी महाविद्यालयांची प्रत्यक्ष पहाणी केली आणि तेथील सैनिकी अधिकार्‍यांशी विस्तृत चर्चा करणे

ख्रिस्ताब्द १९३१ मध्ये गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असतांना डॉ. मुंजे गोलमेज परिषदेचे काम आटोपल्यानंतर इंग्लंडमधील सँडस्र्टचे सैनिकी महाविद्यालय, बुलविचची रॉयल मिलीटरी अकादमी, क्रम्वेलचे रॉॅयल एअर फोर्सचे कॅडेट महाविद्यालय पहाण्यास गेले. तसेच फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया या देशांतील सैनिकी महाविद्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करून आले. तेथील सैनिकी अधिकार्‍यांशी त्यांनी विस्तृत चर्चा केली.

१०. डॉ. मुंजे यांनी घेतलेल्या दोन उल्लेखनीय भेटी – प्रथम महायुद्धातील जर्मन सेनानी फिल्ड मार्शल मॅकेन्सन आणि इटलीचा मुसोलिनी यांची भेट !

डॉ. मुंजे यांच्या दैनंदिनीत याविषयी विस्तृत उल्लेख आहेत. या दौर्‍यात विभिन्न सैनिकी शाळांच्या पहाणीसह डॉ. मुंजे यांनी सैनिकी अधिकार्‍यांच्याही भेटी घेतल्या. विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रथम महायुद्धातील जर्मन सेनानी फिल्ड मार्शल मॅकेन्सन आणि इटलीचा मुसोलिनी यांची भेट ! निवृत्तीनंतर मॅकेन्सन बर्लिनपासून २० मैलांवर निवासत होते. डॉ. मुंजे यांनी जर्मन विद्यार्थ्यांच्या सैनिकी शिक्षणाच्या पद्धतीविषयी प्रश्न केला असतांना अत्यंत आश्चर्यचकित मॅकेन्सन म्हणाले, ‘डॉ. राधाकृष्णन्, पंडित मालवीय, अलीबंधू आदी भारतीय पुढार्‍यांना मी भेटलो आहे. ते केवळ जर्मन संस्कृती, शिक्षण, उद्योग आदी विषयांवर चर्चा करत असत’; पण सैनिकी शिक्षणाविषयी चौकस बुद्धीने प्रश्न विचारणारे डॉ. मुंजे हेच पहिले होत. त्यांनी आनंदून विस्तृत माहिती दिली.

११. भारतात लष्करी शाळा काढणार्‍या डॉ. मुंजे यांच्या विचाराची प्रशंसा करणारे आणि ‘हिंदुस्थानने विचार केला, तर दहा वर्षांत हिंदी सैनिक युद्धकलेच्या दृष्टीने पाश्चात्त्यांंच्या सारखेपणात येऊन बसतील’, असे सांगणारे जर्मन सेनानी फिल्ड मार्शल मॅकेन्सन !

मॅकेन्सन म्हणाले, ‘हिंदुस्थानने विचार केला, तर दहा वर्षांत हिंदी सैनिक युद्धकलेच्या दृष्टीने पाश्चात्त्यांंच्या सारखेपणात येऊन बसतील.’ त्यांनी भारतात लष्करी शाळा काढणार्‍या डॉ. मुंजे यांच्या विचाराची प्रशंसा केली. मुसोलिनीला भारतातील घडामोडींची बरीच माहिती दिसली. अन्य काही विख्यात सेनाधिकार्‍यांशी झालेल्या भेटीगाठीत त्या सेनाधिकार्‍यांनी स्पष्ट अभिप्राय व्यक्त केला, ‘हिंदुयोद्धा जगातील कोणत्याही योद्ध्याला रणभूमीवर हार जाणार नाही. पाश्चिमात्त्य रणभूमीवर हिंदीविरांनी प्रकट केलेले शौर्य अभिमानास्पद आणि अभिनंदनीय होते !’

१२. दुसरे महायुद्ध आणि डॉ. मुंजे !

१२.१ डॉ. मुंजे यांनी युद्धानंतर हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य आणि लोकशाहीप्रधान उत्तरदायी राज्यपद्धती देण्याचे आश्वासन मागणे

१.९.१९३९ या दिवशी दुसरे महायुद्ध चालू झाले. डॉ. मुंजे यांनी युद्धात इंग्लंडला साहाय्यता देण्याची उत्सुकता प्रकट करतांना मागणी केली की, शासनाने सैन्य-भरतीतील लढाऊ आणि बिनलढाऊ हा भेद काढावा अन् आमचा मार्ग मोकळा करून द्यावा. २२ सप्टेंबरला व्हाईसरॉयच्या निमंत्रणावरून झालेल्या भेटीत व्हाईसरॉयने ‘लढाऊ आणि बिनलढाऊ भेदाविषयी कमान्डर-इन्-चीफशी मी बोलीन’, असे सांगितले. डॉ. मुंजे यांनी युद्धानंतर हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य आणि लोकशाहीप्रधान उत्तरदायी राज्यपद्धती देण्याचे आश्वासन मागितले. सैन्य भरतीसहित विशेषतः देशाच्या सीमाप्रदेशाच्या संरक्षणाविषयी वायव्य आणि ईशान्य सरहद्दीविषयी डॉ. मुंजे यांनी व्हॉइसरॉय समोर आपल्या मागण्या स्पष्ट केल्या. डॉ. मुंजे यांनी काँग्रेसच्या युद्ध धोरणाविषयी प्रसृत वक्तव्यात विशेषरूपाने काँग्रेसने हिंदु नॅशनल मिलिशिया उभारण्याच्या कार्यात सहकार्य देण्याचे आवाहन केले.

१२.२ इंग्रज शासनाने भारतात १२ लक्ष सैनिक भरतीची योजना प्रसिद्ध करताच डॉ. मुंजे यांनी ‘सैन्यात न्यूनतम ९ लक्ष हिंदु सैनिक भरती व्हावे’, असे आवाहन करणे

इंग्रज शासनाने भारतात १२ लक्ष सैनिक-भरतीची योजना प्रसिद्ध करताच डॉ. मुंजे यांनी ‘सैन्यात न्यूनतम ९ लक्ष हिंदु सैनिक भरती व्हावे’, असे आवाहन केले. डॉ. मुंजे यांनी स्पष्टच घोषित केले की, सैन्यात अधिकाधिक हिंदू भरती होण्याने ‘पाकिस्तान’ ही योजना मुळातच गाडून टाकण्यात शासनावर प्रभावी दाब आणता येईल ! दुसरे महायुद्ध होण्याची शक्यता स्वा. सावरकरांच्या चाणक्य दृष्टीक्षेपात आल्यापासूनच ते एकीकडे सैनिकीकरणाचा प्रचार करत होते, तर दुसरीकडे भारताबाहेर जर्मनी, इटली, जपान आदी देशांतील जुन्या भारतीय सशस्त्र क्रांतीनेत्यांशीही त्यांचा गुप्त पत्रव्यवहार चालू होता. सुभाषबाबूंशी त्यांची भेट होण्यापूर्वी वस्तूतः स्वा. सावरकरांचा विचार डॉ. मुंजे यांनाच भारताच्या बाहेर पाठवण्याचा होता.’

(‘सावरकर टाइम्स’, मे २०१०)

(डॉ. मुंजे यांचे चरित्र. लेखिका – श्रीमती वीणाताई हरदास)

– श्री. नरसिंह जोशी (मासिक धर्मभास्कर, मार्च २००९)