भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कुठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ?

१. तेव्हाचा भारत आणि आजचा भारत !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे. जेमतेम १० ते २० परदेशी कंपन्या असणारा भारत आज ५,००० हून अधिक परदेशी कंपन्या उरावर वागवत आहे. एकही संवेदनशील जिल्हा नसलेल्या भारतात आज ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील झाले आहेत. प्रत्येक नागरिकामागे एक-दोन गायी असे प्रमाण असणारा भारत अनिर्बंध गोहत्येपायी आज १२ व्यक्तींमागे एक गाय बाळगतो आहे. परदेशात जाऊन अत्याचारी कर्झन वायली, ओडवायर अशांना ख्रिस्तसदनी पाठवणार्‍या भारताने आज संसदेवर आक्रमण करणार्‍या अफझलला फाशी द्यायला १३ वर्षे घेतली !

देशाभिमान जागृत असलेला भारत ते देशाभिमान गहाण टाकलेला भारत, भ्रष्टाचार निचांकावर असलेला भारत ते भ्रष्टाचाराच्या उच्चांकापर्यंत पोहोचलेला भारत, अटकेपार झेंडा रोवणारा भारत ते ‘काश्मीर हातातून आज जातोय कि उद्या’, याची वाट पहाणारा भारत… ही सूची लिहितांनाही मन आक्रंदत आहे; पण ‘जनाची सोडाच, मनाचीही लाज’ न बाळगणारे राज्यकर्ते मात्र वर तोंड करून सर्वत्र मिरवत आहेत. मुसलमान आक्रमक आणि धूर्त ब्रिटीश यांनीही भारतीय जनतेला जेवढे नागवले नाही, त्याच्या शतपटीने लोकशाहीने दिलेल्या शासनकर्त्यांनी अवघ्या ६ दशकांत येथील जनतेला नागवले, हे ठळक सत्य आहे.

‘लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकांचे शासन’, ही लोकशाहीची व्याख्या भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या देशासाठी मात्र ‘स्वार्थांधांनी स्वार्थासाठी निवडून दिलेले स्वार्थी शासनकर्त्यांचे शासन’, अशी झाली आहे.

२. हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथम मांडण्यात आलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीत विरुन गेली. कारण काँग्रेसने एकगठ्ठा मतांचे राजकारण करण्यासाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे त्याचबरोबर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे भारत देशातून समूळ उच्चाटणे असा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. त्यातून हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारणे म्हणजे राष्ट्रदोहच होय, अशी हिंदुद्वेषी परिस्थिती राजकीय आणि सामाजिक पातळीवर निर्माण करण्यात आली. असे असतांनाही सनातन संस्थेने दोन-अडीच दशकापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. अशी नुसती घोषणा करून सनातन थांबले नाही, तर देशातील हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी जोमाने कार्याला आरंभ केला. वर्ष २०१२ पासून रामनाथी, गोवा येथे होत असलेले ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ हे त्याचेच फलित आहे. देशभरातील हिंदूंच्या लहान-मोठ्या संघटना आणि हिंदु धर्मातील संप्रदाय यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्र म्हणजे राजकारण नव्हे, तर ही जीवनपद्धती आहे. या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

अ. असुरक्षित हिंदू !

कालपर्यंत नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र म्हणून ओळखले जात होते; मात्र दुर्दैवाने साम्यवाद्यांची हे हिंदु राष्ट्र गिळंकृत केले. त्यामुळे हिंदूंचे स्वतःचे एकही राष्ट्र पृथ्वीतलावर नाही. भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही स्वातंत्र्यापासून हिंदूंना जाणीवपूर्वक हिंदु राष्ट्रापासून वंचित ठेवण्यात आले. याउलट जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे; मात्र हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. एक प्रकारे हिंदू जगाच्या पाठीवर अनाथ बनले आहेत. भारतातील अस्तित्वात असलेल्या राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थेसमोर हिंदुहिताचे प्राधान्य नाही; म्हणून हिंदू बहुसंख्येने असूनही ते एकार्थाने भारतात अश्रीत म्हणून अनुभव घेत आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. याचा परिणाम म्हणून आज हिंदूंची दयनीय अवस्था झाली आहे. हिंदूंची ही दुःस्थिती भारतातील निधर्मी शासनव्यवस्थेच्या माध्यमातून पालटू शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी आणि भारतासमोरील आंतर्बाह्य समस्या सोडविण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे, ते पाहू.

१. निधर्मी शासनप्रणालीतील हिंदूंची दुःस्थिती : हल्ली धर्मनिरपेक्ष राज्याचा उदोउदो चालला आहे. भारतात मागील ६८ वर्षांच्या लोकराज्यात (लोकशाहीत) कुठल्याही पक्षाने हिंदूंच्या प्रश्‍नांची सोडवणूक तर दूरच; ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही केले नाहीत. हिंदूंवर सातत्याने धर्मांधांची दंगलसदृश्य आक्रमणे होत आहेत. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्थ होत आहे. हिंदूंच्या सुरक्षिततेचा विचार केला, तर सामान्य हिंदूंना कुणीच वाली नाही. गोमातेची राजरोस हत्या होत आहे. हिंदूंची मंदिरे शासनाच्या ताब्यात आहेत आणि त्याचा पैसा अल्पसंख्यांकांसाठी जात आहे. महागाईने, दुष्काळामुळे जनता होरपळत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्याचे कायदे, धोरणे आणि राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे या निधर्मी शासनात जिहादी, भ्रष्टाचारी, बलात्कारी सुखाने नांदत असतील, तर असे राज्य खरे हिंदुहित कधीतरी साधेल काय ? आंतरराष्ट्रीय आस्थापने, परधर्मियांच्या हातात असलेल्या दूरचित्रवाहिन्या, कॉन्व्हेंट शाळा, निधर्मी शिक्षणपद्धती आदी सर्वांमुळे जन्माने हिंदु असलेला हिंदु मनाने आणि आचरणाने परधर्मीय किंवा अधर्मी झाला आहे.

  • काश्मिरींच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न बिकट : काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना पुनर्वसनासाठी दिल्या जाणार्‍या वसाहतींमधील जागा मुसलमानांनाही दिली जाणार आहे. काश्मीरमधील बहुतांश स्थानिक मुसलमान हे पाकधार्जिणे आहेत आणि आतंकवाद्यांनी त्यांच्याच साहाय्याने काश्मीरमधून हिंदूंना विस्थापित केले आहे. असे असतांना काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या वसाहतीत मुसलमानांनाही जागा देणे आतंकवाद्यांचे अत्याचार सहन केलेल्या काश्मिरी पंडितांसाठी अत्यंत क्लेशदायक आणि असुरक्षिततेचे आहे. अशा या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करणार्‍या पीडीपी पक्षाला पाठिंबा देऊन भाजपने या पक्षाला जम्मू आणि काश्मीर राज्याच्या सत्तेवर बसवले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या घरवापसीच्या आशा आणखी धूसर झाल्या आहेत; म्हणून काश्मिरी हिंदू पंडितांचे काश्मीरमधील पुनर्वसनासाठी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचीच आवश्यकता आहे.
  • हिंदूंचे नेते असुरक्षित : हिंदुबहुल भारतात आतापर्यंत १२७ हिंदू नेत्यांच्या धर्मांधांनी हत्या केल्या आहेत. तसेच अनेकांवर प्राणघातक आक्रमणे करून त्यांना घायाळ केले आहे. हिंदूंचे नेतेच जिथे मारले जातात, तिथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याची कल्पना येते. हे हत्यांचे सत्र आजही सुरूच आहे. पूर्वांचल, दक्षिण भारतात हिंदू नेते तेथील स्थानिक राजवटीच्या विरोधात जाऊन हिंदूंच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.

२. इसिसच्या आक्रमणापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्र : सध्या जागतिक पातळीवर इसिस या सिरीयातील अत्यंत क्रूर इस्लामी आतंकवादी संघटनेने दहशतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. एक-एक राष्ट्र करत अवघ्या जगावर इस्लामी राजवट आणण्याचा या संघटनेचा हेतू आहे. त्यासाठी या संघटनेने एकेका राष्ट्रावर आक्रमण करून ती राष्ट्रे काबीज करण्याचे सत्र आरंभिले आहे. आता या संघटनेने पाक आणि बांगलादेशात पाय रोवले आहेत. नुकतेच या संघटनेने भारतात प्रथम हिंदूंवर आक्रमण करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे. निष्पापांचे गळे चिरणार्‍या आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणार्‍या इसिसच्या या आतंकवादी संघटनेपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी, तसेच हिंदूंना या आतंकवादी संघटनेच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचे मानसिक आणि शारीरिक बळ वाढवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. सध्या सत्तास्थानी असलेल्या नेत्याकडून हिंदूंच्या अपेक्षा आहेत; परंतु प्रत्यक्षात हिंदूंच्या पदरी निराशा पडत आहे. कारण या शासनाला निधर्मी व्यवस्था असलेले भारतीय राज्यच हवे आहे. हिंदु राष्ट्र हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नाही.

३. हिंदु राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्माधिष्ठित असेल ! : भारतातील राज्यप्रणाली आणि कायदेप्रणाली ही अल्पसंख्यांकांसाठी विशेषतः मुसलमान आणि ख्रिस्त्यांना मोकळीक देणारी आहे, तर हिंदूंना सापत्न वागणूक देणारी आहे. यामुळे हिंदूंना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सर्व क्षेत्रांत कायम असुरक्षित वाटत आले आहे. स्वातंत्र्यापासून ७ दशके हिंदूंना देण्यात येणार्‍या सतत अपमानास्पद वागणुकीमुळे या देशात हिंदूंचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांच्या श्रद्धास्थानांवर सतत आघात करून त्यांच्यातील धार्मिकतेचा एकप्रकारे खून करण्यात आला आहे; मात्र त्याच वेळी अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानांचा पराकोटीचा आदर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकज हिंदू वगळता अन्य धर्मीय आणि पंथीय संघटित आहेत, मात्र हिंदू विखुरलेले आहेत. काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीच्या कटकारस्थानाचे हिंदू बळी ठरले आहेत. त्यामुळे आपल्याच देशात हिंदूंच्या मनात परकेपणाची भावना वाढीस लागली आहे. अखिल मानवजातीचे कल्याण साधण्याची क्षमता असलेले हिंदु धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा वारसा लाभलेला हा भारत देश निधर्मी राज्यप्रणालीमुळे अधोगतीला जाऊ लागला आहे. म्हणून देशाच्या पर्यायाने हिंदूंच्या उत्कर्षासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे निकडीचे बनले आहे. हिंदु राष्ट्र ही संकल्पना म्हणजे राजकारण नव्हे तर धर्माधिष्ठित अन् राष्ट्रनिष्ठ जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती आणि व्यवस्था असेल. मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, झाडे आणि वेली यांपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी ती एक ईश्‍वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; शिवाय जनता सुखी होऊन समृद्ध राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून जीवनाला व्यापणारी सर्व अंगे विकसित होणे आवश्यक असते. धर्म हा जीवनाच्या सर्वांगांना व्यापत असल्याने राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्माधिष्ठित असणेच आवश्यक आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठितच असेल !

काहींच्या मनात शंका उत्पन्न होईल की, ‘हिंदु राष्ट्रा’त तरी समस्या कशा काय सुटतील ? असे इतिहासात तरी कधी घडले आहे का ? अशांनी हे समजून घ्यावे की – होय, इतिहासात असे घडले आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र (हिंदवी स्वराज्य)’ स्थापन होताच त्या वेळच्या अशाच समस्या दूर झाल्या होत्या !

३. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’स्थापन होताच सर्व ठीकठाक !

आजच्यासारखेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही हिंदु स्त्रियांचे शील सुरक्षित नव्हते, प्रत्यक्ष जिजामातेच्या जाऊबाईंनाच पाणवठ्यावरून यवन सरदाराने पळवून नेले होते. त्या काळी मंदिरे भ्रष्ट केली जात होती आणि गोमातेच्या मानेवर कसायाचा सुरा कधी फिरेल, हे सांगता येत नसे. महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच मंदिरे पाडणे थांबले एवढेच नव्हे, तर मंदिरे पाडून उभ्या केलेल्या मशिदींचे पूर्ववत् मंदिरांत रूपांतर झाले. डोळ्यांतून मूकपणे आसवें गाळणार्‍या गोमाता आनंदाने हंबरू लागल्या. ‘गोहत्या बंद करा !’, अशा मागणीसाठी शासनाकडे लाखो स्वाक्षर्‍या गेल्या नाहीत कि महाराजांनींही एखादे ‘गोहत्या प्रतिबंधक विधेयक’ मंत्रीमंडळात मांडले नाही. केवळ ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हिंदुद्वेष्ट्यांच्या उरात धडकी भरवायला पुरेशी ठरली ! आज आपल्याला महागाई दिसते. ‘महाराजांच्या सत्ताकाळात महागाईने प्रजा भरडून निघाली होती’, असे कधी वाचले आहे का ? ‘जय जवान, जय किसान’ची घोषणा करणारे शासनकर्ते आज जवान आणि किसान या दोघांनाही कुत्र्याच्या मोलाने मरू देत आहेत. महाराजांना तर शेतकर्‍यांचे प्राणच नव्हेत, तर त्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपालाही मोलाचा वाटत होता. ‘शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये’, अशी आज्ञाच त्यांनी केली होती. महाराजांनी ‘किसानां’च्या बरोबरीने ‘जवानां’चीही काळजी घेतली होती. लढाईत घायाळ झालेल्या अनेक सैनिकांना पुरस्कारासह सोन्याचा अलंकारही देऊन ते सन्मानित करीत. कारगील लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या विधवांसाठी वर्ष २०१० मध्ये ‘आदर्श’ सोसायटी बांधली गेली; पण तिच्यात एकाही सैनिकाच्या विधवेला सदनिका (फ्लॅट) मिळाली नाही. भ्रष्टासुरांनीच त्या सर्व सदनिका लाटल्या ! याउलट महाराजांनी तर सिंहगडच्या लढाईत कामी आलेल्या तानाजीच्या पुत्राचा विवाह लावून देऊन त्याच्या कुटुंबियांची काळजी घेतली !

४. भारतासमोरील बाह्य समस्याही ‘हिंदु राष्ट्रा’त सुटतील !

‘हिंदु राष्ट्रा’त अंतर्गत समस्या सुटतील, तशाच बाह्य समस्याही सुटतील. बाह्य समस्यांमध्ये पाकिस्तान आणि चीन यांचे भारतावर केव्हाही होऊ शकणारे आक्रमण, ही मुख्य समस्या आहे. शिवकाळातही अशीच स्थिती होती. औरंगजेब ‘सिवा’चे टीचभर राज्य बुडवण्यासाठी टपून बसला होता; मात्र ‘महाराजांना राज्याभिषेक होऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची विधीवत् स्थापना झाली’, हे ऐकूनच तो हादरला ! त्यानंतर पुढे महाराज स्वर्गारोहण करीपर्यंत तो केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेतही उतरला नाही ! एकदाका ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना झाली की, आपले सर्व शेजारी सुतासारखे सरळ होतील !

५. ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?

‘हिंदु राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक फाजील प्रश्‍न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?’ खरे म्हणजे हा प्रश्‍न मुसलमानांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. ते ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान !’ असेच म्हणत रहातात. अर्थात् या प्रश्‍नालाही उत्तर आहे. आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांनाच नव्हे, तर सर्वच पंथियांना शिवशाहीत दिली गेली, तशीच वागणूक मिळेल !

थोडक्यात, सूर्य उगवण्यापूर्वी सर्वत्र काळोख दाटून राहिलेला असतो, भूमीवर विसर्जित केलेल्या मल-मूत्राचा दुर्गंध येत असतो; परंतु सूर्य उगवताच काळोख आपोआपच नष्ट होतो, सर्व दुर्गंध वातावरणात विरून जातो. काळोखाला किंवा दुर्गंधाला कोणी सांगत नाही की, ‘दूर जा, सूर्य उगवतो आहे !’ आपोआपच हे सारे घडते. त्याचप्रमाणे आज भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख आणि दुर्गंध ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होताच नष्ट होईल. धर्माचरणी राज्यकर्त्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल !

६. एकट्यादुकट्या समस्येच्या विरोधात लढण्यापेक्षा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे आवश्यक !

केवळ भारतातीलच लोकांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन करावयाचे ‘हिंदु राष्ट्र’ मात्र आपोआप स्थापन होणार नाही. पांडवांना केवळ पाच गावे हवी होती, तीही त्यांना सहजासहजी मिळू शकली नाहीत. आपल्याला तर काश्मीर ते कन्याकुमारी असे अखंड ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे. यासाठी अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतासमोरील एकट्यादुकट्या समस्येच्या (उदा. गोहत्या, धर्मांतर, गंगेचे प्रदूषण, काश्मीर, राममंदिर, स्वभाषारक्षण) विरोधात स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा सर्व समविचारी व्यक्ती आणि संस्था यांनी मिळून ‘हिंदु राष्ट्र स्थापना’ हेच ध्येय बाळगून कृती केली, तर हा लढा थोडा सुकर होईल. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, प.पू. गोळवलकर गुरुजी अशा हिंदु धर्मातील थोर-थोर पुरुषांनी चिंतिलेले असे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य हिंदुत्वनिष्ठांना मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात