‘सेक्युलॅरिझम्’ आणि हिंदु राष्ट्र !

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलॅरिझम्’ची संकल्पना शिकण्याची आवश्यकता !

‘भारतीय संविधान ‘सेक्युलर’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे’, असा प्रसार बुद्धीजिवींकडून केला जातो. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ‘सेक्युलॅरिझम्’ या शब्दाचा इतिहास आणि त्याची वास्तविकता काय आहे’, हे समजून घेणे आवश्यक ठरते.

भारतीय संविधानातील ‘सेक्युलर’वादाविषयी अपसमज आणि वस्तूस्थिती : आज ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ असा सर्रास केला जात आहे. ‘संविधानानुसार भारत धर्मनिरपेक्ष असल्याने ‘सार्वजनिक जीवनात हिंदु धर्माला स्थान मिळणे’, हे धर्मनिरपेक्षतेच्या म्हणजेच संविधानाच्या विरोधात आहे’, असा अपप्रचार सातत्याने चालू आहे.

प्रत्यक्षात भारत शासनाने राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने प्रकाशित केलेल्या भारतीय संविधानाच्या हिंदी आवृत्तीमध्ये कुठेही ‘धर्मनिरपेक्ष’ असा शब्द वापरलेला नाही. ‘सेक्युलर’ या शब्दाचा अनुवाद ‘पंथनिरपेक्ष’ म्हणून करण्यात आला आहे. याचा अर्थ राज्यकारभार करतांना कोणत्याही पंथाचा आधार न घेणे, म्हणजे पंथनिरपेक्षता आहे !

‘आज भारतातील सर्व राजकीय पक्ष पंथांच्या आधारावर मते मागतात आणि स्वतःला मात्र ‘सेक्युलर’ म्हणतात’, हा मोठा पाखंड आहे.

वक्ते : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

केवळ हिंदूंनाच जातीयवादी ठरवणारा भारतातील पक्षपाती ‘सेक्युलरवाद’ !

१. उपराष्ट्रपती भवनात ईद साजरी करणारे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी म्हणे सेक्युलर !

माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी वर्षभरात केवळ ईदच्या दिवशीच उपराष्ट्रपती भवनामध्ये मेजवानी द्यायचे. ते बहुसंख्यांक हिंदू असलेल्या भारताचे उपराष्ट्रपती असूनही दिवाळी, बिहू किंवा पोंगल असे सण साजरे करत नव्हते. केवळ ईदची मेजवानी देत होते, तरी त्यांना कोणत्याही प्रसारमाध्यमांनी कधी जातीयवादी ठरवले नाही. सर्वांसाठी ते सेक्युलर राहिले; पण याउलट हिंदूंनी धर्माचे पालन केले किंवा राममंदिराविषयी काही वक्तव्य केले, तर हिंदूंना लगेच ‘जातीयवादी’ संबोधले जाते. ‘हिंदूंकडून संविधानविरोधी काही तरी मोठा अपराध झाला आहे’, असे चित्र निर्माण केले जाते.

२. योगदिवस न पाळणारे ख्रिस्ती आणि मुसलमान म्हणे सेक्युलर !

वर्ष २०१४ पासून २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा केला जातो. या विरोधात भारतातील पाद्री आणि मौलाना रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे होते, ‘आम्ही येशू आणि अल्लाह सोडून कुणासमोर वाकणार नाही. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची पूजा असल्याने आम्ही योगदिन मानणार नाही.’ योग शरीरस्वास्थ्यासाठी केला जातो. त्यात सूर्याची पूजा कुठे असते ? तरीही भारताच्या कोणत्याही प्रसारमाध्यमांनी त्यांना जातीयवादी म्हटले नाही.

३. ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता केल्याने हिंदूंवर झालेले गंभीर परिणाम !

आज भारतात ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ करून हिंदूंना अपमानित केले जात आहे. त्यांना प्रसारमाध्यमे आणि बुद्धीजीवी यांच्याकडून वारंवार सांगितले गेले, ‘तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात.’ परिणामी हिंदू धर्मनिरपेक्ष बनले आणि हळूहळू स्वतःच्या धर्माला विसरू लागले. ‘सेक्युलॅरिझम्’ला बळी पडून कोणताही मुसलमान शुक्रवारचा नमाज विसरला नाही, कोणताही ख्रिस्ती रविवारी चर्चमध्ये जाण्यास विसरला नाही. हिंदू मात्र स्वतःची संस्कृती, आपले शास्त्र, आपली परंपरा आणि गोमाता या सर्वांना विसरला. टिळा लावायला घाबरू लागला. मंदिरात आरतीसाठी उभे रहायला लाजू लागला. ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला अवघडू लागला.

अल्पसंख्यांकांनी हवे तसे धर्माचे पालन करावे आणि बहुसंख्यांकांनी स्वतःच्या धर्माचे पालन न करता शांत बसावे, हीच धर्मनिरपेक्षता असेल, तर त्याची अधिकृत व्याख्या शासनाने अन् प्रसारमाध्यमांनी परिभाषित करायला हवी.

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र !

१. अनादि काळापासून भारत हिंदु राष्ट्र !

भारत अनादि काळापासून हिंदु राष्ट्रच होते. त्रेतायुगातील राजा हरिश्‍चंद्र आणि प्रभु श्रीराम, द्वापरयुगातील महाराजा युधिष्ठिर, कलियुगातील राजा हर्षवर्धन, अफगाणिस्तानचा राजा दाहीर, मगधचा सम्राट चंद्रगुप्त, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदींचे राज्य कधीही ‘सेक्युलर’ नव्हते, तर ‘हिंदु राष्ट्र’च होते. वर्ष १९४७ मध्येही ५६६ राजसंस्थाने हिंदु राज्ये होती.

२. हिंदु राजांच्या जिवावर भारतात राज्य करणारे मोगल !

आपल्याला इतिहासात शिकवले जाते की, ८०० वर्षे मुसलमान आणि १५० वर्षे इंग्रज भारतावर राज्य करत होते. याचा अर्थ असा नाही की, सर्वत्र इंग्रजांचे किंवा मुसलमानांचे राज्य होते, उदाहरणार्थ महाराणा प्रताप यांच्या विरोधात लढण्यासाठी अकबरच्या वतीने राजा मानसिंह गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी लढण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंह या हिंदु राजाला पाठवले. त्या काळातही मोगलांचे शासन सर्वत्र नव्हते. राजस्थानमध्ये मोगलांच्या आक्रमणाच्या काळात हिंदु राजा मोगल राज्यकर्त्यांशी न लढता सुरक्षेच्या नावावर त्याच्याशी शस्त्रसंधी करायचे.

३. इंग्रजांच्या काळातही भारतात ५६६ हिंदु राजे !

त्यानंतर इंग्रजांनी आक्रमण केले; परंतु त्यांचेही पूर्ण भारतात राज्य नव्हते. भारताच्या भूभागावर एकाच वेळी ‘ब्रिटीश इंडिया’ आणि ५६६ राजसंस्थाने स्वतंत्रपणे कार्यरत होते. त्यामुळे ब्रिटीश गेल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध राजसंस्थानांना भारतात विलीन करून घेतले. काश्मीर, बडोदा, त्रावणकोर, कलिंग अशी ५६६ हिंदु राज्ये आणि २ मुसलमान राज्ये भारतात सहभागी झाली होती. याचा अर्थ भारतात हिंदु राजांचेच राज्य होते; मग अकस्मात आपण ‘सेक्युलर’ कसे बनलो ?

भारताने नेहमीच शरणार्थी म्हणून आलेल्या अहिंदू पंथियांना आश्रय दिला होता. जेव्हा पर्शियावर मोगलांनी आक्रमण केले, तेव्हा इराणी लोकांना भारताने आश्रय दिला. ज्यू लोकांनाही भारताने आश्रय दिला. आज पारशी असलेले रतन टाटा भारताचे सर्वांत मोठे उद्योगपती बनले. भारतातील कोणताही नागरिक असे म्हणत नाही की, तुम्ही पर्शियातून आला आहात, तुम्ही पारसी आहात ! आम्ही असे म्हणतो की, आम्ही भारतीय आहोत, रतन टाटासुद्धा भारतीय आहेत. भारताची परंपरा स्वतःसमवेत सर्वांना घेऊन जाणारी आहे. त्यामुळे आम्हाला कुणी ‘सेक्युलॅरिझम्’ शिकवण्याची आवश्यकता नाही.

युरोपीय ख्रिस्ती संकल्पना असलेल्या ‘सेक्युलर’ शब्दाचा उगम

१. युरोपमध्ये ख्रिस्ती पंथातील कॅथलिक, प्रोटेस्टंट आदी अनेक उपपंथांमध्ये होणारा भीषण रक्तपात थांबवण्यासाठी ‘सेक्युलॅरिझम्’चा जन्म !

पूर्वी पूर्ण युरोप तथाकथित पावन ख्रिस्ती साम्राज्य होते. तेव्हा युरोपात येशूला ‘ईश्‍वराचा दूत’, बायबल हे ‘धर्मपुस्तक’ आणि पोप म्हणजे ‘ईश्‍वराचा प्रत्यक्ष प्रतिनिधी’, असे मानणे अनिवार्य होते. अन्यथा मृत्यूदंड दिला जात असे.

युरोपमधील ख्रिस्ती लोक ‘कॅथलिक’, ‘प्रोटेस्टंट’, ‘प्रिस्बेरिअन’, ‘ऑर्थोडॉक्स’ आदी नाना उपपंथांमध्ये विभागले आहेत. त्या वेळी युरोपातील विविध देशांचे राजे विविध ख्रिस्ती उपपंथांना राजमान्यता देत. यामुळे राजा ज्या उपपंथाचा पुरस्कर्ता असेल, तो अन्य उपपंथांच्या विरोधात षड्यंत्र रचून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असे. इ.स. १३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत कोट्यवधी महिला, पुरुष आणि मुले या षड्यंत्रामुळे मारली गेली. महिलांवर बलात्कार झाले. अनेकांना जिवंत जाळले गेले.

या आपसांतील युद्धाचा अंत दिसेनासा झाल्यावर वर्ष १६४८ मध्ये युरोपात सर्वांनी परस्परांमध्ये शांतीचा करार केला. हा करार ‘वेस्टफेलियाचा शांती करार’ म्हणून ओळखला जातो. यातच ‘सेक्युलॅरिझम्’चा प्रारंभ झाला. या करारानुसार ‘शासक आपल्या राज्यातील राजमान्यता नसलेल्या अन्य ख्रिस्ती उपपंथातील नागरिकांना ठार मारणार नाही किंवा पंथ परिवर्तनासाठी त्यांच्यावर दबाव आणणार नाही’, असे निश्‍चित झाले. या करारानंतरही विभिन्न पंथांमध्ये आदर-सन्मानाचा भाव आजतागायत आढळत नाही. या करारानंतर केवळ राजा आणि चर्चची धार्मिक सत्ता वेगवेगळी झाली. ‘चर्च केवळ दिव्यतेशी संबंधित (पारलौकिक) नियम करील आणि राजा जीवनाशी संबंधित विवाह, शिष्टाचार, अपराध आदींविषयी (लौकिक विषयांचे) कायदे करील’, अशी विभागणी झाली. धार्मिक जीवनात युरोपीय देशांनी ख्रिस्ती उपपंथातील एकाला अधिकृत पंथ म्हणून घोषित केले; पण राज्यव्यवस्थेद्वारे संचालित नागरी जीवन पंथनिरपेक्ष (सेक्युलर) करून ‘कोणत्याही ख्रिस्ती उपपंथाला वेगळी मान्यता दिली जाणार नाही’, असे निश्‍चित केले.

२. वर्ष १७७६ मध्ये अमेरिकेत प्रथम पंथनिरपेक्ष राज्य !

त्यानंतर वर्ष १७७६ मध्ये स्वतंत्र अमेरिकेची घोषणा झाल्यावर तेथील धार्मिक मतमतांतर (ख्रिस्ती उपपंथांतील मनभिन्नता) पहाता लिखित संविधानासहित ‘प्रथम पंथनिरपेक्ष राज्य, संयुक्त राज्य अमेरिका’ची घोषणा केली गेली.

३. युरोपमध्ये आलेल्या सांस्कृतिक आंदोलनाच्या प्रभावाने चर्चच्या विरोधात ‘सेक्युलर’ शब्दाचा उगम

वर्ष १८५१ मध्ये इंग्रज लेखक जॉर्ज जैकब होलीओक याने ‘सेक्युलॅरिझम्’चा उल्लेख ‘चर्चचे उपदेश आणि अनुशासन यांपासून मुक्त जीवन’, या अर्थाने केला होता. ‘रेनेसां’ म्हणजे मध्यकाळात युरोपमध्ये आलेल्या सांस्कृतिक आंदोलनाच्या प्रभावाने चर्चच्या विरोधात या धारणेचा उगम झाला. या धारणेचा विस्तार पुढीलप्रमाणे आहे.

अ. युरोपीय लेखकांच्या मते, ‘सेक्युलर राज्य’ म्हणजे पंथाच्या कोणत्याही प्रकरणांत शासनाने रस घेऊ नये. ना पंथानुयायांना विशेष संरक्षण द्यावे, ना त्यांचा विरोध करावा, ना त्यांना एकमेकांना विरोध करू द्यावा.

आ. समाजाचे संचालन चर्च किंवा पादरी यांच्या आदेशाने न होता काही सामान्य अन् व्यापक नियमांच्या अंतर्गत राज्यकर्त्यांना करता यायला हवे. चर्चचे आदेश आणि बंधने यांपासून राज्यकर्ते मुक्त हवेत. राजसत्ता वेगळी आणि धर्मसत्ता वेगळी असावी. दोघांनी परस्परांवर कुरघोडी करू नये.

इ. सेक्युलर असलेल्या युरोपातील प्रत्येक राज्याने ख्रिस्त्यांच्या कोणत्या ना कोणत्या उपपंथाला विशेष संरक्षण दिले आहे. कोणता तरी ख्रिस्ती उपपंथ ‘युरोपीय नेशन स्टेट’चा राजधर्म आहेच.

याउलट भारताने स्वतःला सेक्युलर घोषित करतांना कुठल्याही धर्माला राजमान्यता दिली नाही; पण देशातील अल्पसंख्यांकांना (ख्रिस्ती आणि इस्लाम यांना) संवैधानिक संरक्षण देऊन आणि बहुसंख्यांक हिंदूंना ते नाकारून ‘सेक्युलर’ आणि ‘समानता’ या तत्त्वांचे घोर उल्लंघन केलेे.

पंथनिरपेक्षता हिंदूंच्या रक्तातच आहे !

अनादि काळापासून आध्यात्मिक असलेल्या भारतभूमीच्या रक्तात पंथनिरपेक्षता आहे. ५ सहस्र वर्षांपूर्वीच आम्ही शांतीपाठाच्या माध्यमातून घोषणा केली होती की, विश्‍वातील सर्व लोक सुखी आणि रोगमुक्त व्हावेत, सर्व जण मंगलमय घटनांचे साक्षीदार बनावेत आणि कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात दुःख येऊ नये.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची मागणी का ?

वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर येथे भारतीय राज्यघटना आली. स्वतंत्र म्हणजे काय ? स्वतःचे तंत्र, म्हणजेच व्यवस्था ! खरोखर आज भारत स्वतंत्र आहे का ? हिंदु धर्मानुसार आदर्श राज्यव्यवस्थेची अनेक यशस्वी उदाहरणे असतांना आज आपण विदेशी संकल्पनेवर आधारित राज्यव्यवस्थेद्वारे आपला देश चालवत आहोत. याला स्वतंत्र म्हणजे स्व-व्यवस्था म्हणायचे का ? लोकशाहीतील विविध व्यवस्था आणि प्राचीन व्यवस्था, यांचा अभ्यास केला की, हिंदु राष्ट्राची आवश्यकता लक्षात येते.

शिक्षणव्यवस्था

इंग्रज भारतात येण्याआधी गुरुकुल परंपरेद्वारे शिक्षण दिले जात होते. इंग्रजांनी कायद्याद्वारे ‘गुरुकुले’ बंद करून त्यांची ‘मेकॉले शिक्षणप्रणाली’ भारतात आणली. दुर्दैवाने स्वतंत्र भारतात आजही हीच शिक्षण-व्यवस्था चालू आहे. या शिक्षणपद्धतीमध्ये प्रथम ‘डोनेशन’, त्यानंतर ‘अ‍ॅड्मिशन’ आणि त्यानंतर ‘एज्युकेशन’ दिले जाते. ही शिक्षणव्यवस्था भारतियांना ‘बिल गेट्स’ बनवायला शिकवत नाही, तर त्याचे ‘सीईओ’, म्हणजे कार्यकारी अधिकारी बनायला शिकवते. आमच्या ‘आयआयटी’तून बाहेर येणारे सर्व युवक काही विदेशी कंपन्यांच्या ‘पॅकेज’चे गुलाम बनतात. याउलट गुरुकुलामध्ये १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जात. त्यामुळे विद्यार्थी सर्वांगांनी सक्षम बनत. हे शिक्षण विनामूल्य दिले जाई आणि विद्यार्जन झाल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरु विद्यार्थ्याकडून काही महत्कार्य करण्याचे आश्‍वासन घेत. आता आपल्याला ठरवायचे आहे, ‘कोणती व्यवस्था चांगली आहे, गुरुकुलाची कि आजची ?’

कायदेव्यवस्था

आजही भारतात ‘इंडियन पीनल कोड १८६०’ हा कायदा चालू आहे. हा कायदा मुळातच इंग्रजांनी भारतात पुन्हा १८५७ सारखा उठाव होऊ नये; म्हणून क्रांतीकारकांवर अंकुश ठेवण्यासाठी बनवला होता. या कायद्याने गांधी, नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी सर्वांना अपराधी ठरवले होते. हाच कायदा आजही चालू रहाणे आश्‍चर्यकारक आहे. भारतात कायदे करणार्‍या संसदेत अशिक्षित आणि अपराधी लोक निवडले जात असल्याने भारतातील नवे कायदेही सदोष बनतात. प्राचीन काळी राजा, प्रधान, सेनापती हे तक्षशिला आणि नालंदा येथील विश्‍वविद्यालयांतून उच्च शिक्षण घेऊन मग राज्यकारभारात सहभागी होत. आज लोकप्रतिनिधी बनण्यासाठी कुठलीही शैक्षणिक पात्रता लागत नाही, हे गंभीर आहे.

राज्यव्यवस्था

स्वातंत्र्यानंतर देश चालवण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली. प्रथम विश्‍वयुद्धानंतर इंग्रजांनी ‘इंडिया गव्हरनन्स अ‍ॅक्ट १९३५’ची निर्मिती केली. यालाच पुढे ‘इंडिया इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट’ म्हणून भारताच्या संविधानाच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले. इंग्रजांनी भारताला ‘देश चालवण्यासाठी संविधानाची आवश्यकता असते’, असे सांगून मूर्ख बनवले. प्रत्यक्षात आजही इंग्लंडचे स्वतःचे लिखित संविधान नाही.

निवडणूक पद्धत

विद्यमान लोकशाहीतील राजकारण्यांची निवड करण्याची पद्धतही आपली नाही. पूर्वी भारतात ‘सिलेक्टेड’ म्हणजे पात्र व्यक्तीच्या हातात सत्ता जायची. आता ‘इलेक्टेड’ म्हणजे बहुमतांद्वारे निवडलेली व्यक्ती सत्तेवर येते. पूर्वी राजगुरु, धर्माचार्य आणि विद्वान ठरवत होते की, राज्य करण्याचा अधिकार कुणाचा आहे ? धृतराष्ट्र मोठा होता; परंतु जन्मांध असल्याने त्याला राज्य सोपवले गेले नाही. मगधचा राजा नंद जनतेवर अन्याय करू लागल्यावर आर्य चाणक्याने विरोध करून सम्राट चंद्रगुप्ताला राज्य चालवण्यासाठी बसवले. अशा प्रकारे उन्मत्त राजाला काढून टाकण्याची व्यवस्थाही भारताच्या परंपरेत होती.

आज भ्रष्ट किंवा खुनी नेत्याची ५ वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्याविना आपण त्याला पदच्युत करू शकत नाही. ‘राईट टू रिकॉल’चा अधिकार जनतेला नाही. भारताच्या संसदेत जनहितासाठी कायदे बनवणार्‍या खासदारांपैकी अपराधी पार्श्‍वभूमीच्या खासदारांची संख्या ३४.५ टक्के आहे.

ना कायदा, ना शिक्षणप्रणाली, ना राज्यघटना, ना राज्यव्यवस्था ! काहीही आपले नाही. तरीही आपण म्हणतो की, आम्ही स्वतंत्र आहोत ? यांपैकी कोणतीही प्रणाली किंवा व्यवस्था भारताची नाही. इंग्रजांनी दिली आणि ती आम्ही स्वीकारली. त्याला आपण स्वातंत्र्य कसे म्हणू शकतो ?

Leave a Comment