धर्मांतरितांचे शुद्धीकरण

सारणी


 

१. व्याख्या

फसवणुकीमुळे, बळाने किंवा प्राणभयाने परधर्म स्वीकारावा लागलेल्या धर्मभ्रष्टांना स्वधर्मात परत घेणे, या धर्मांतराच्या प्रकारास ‘शुद्धीकरण’ असे म्हणतात.

२. शुद्धीकरणाविषयी धर्मशास्त्र काय सांगते ?

स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा स्वीकार करणे, हे हिंदु धर्मात पातक मानले गेले आहे. धर्मशास्त्राचा आचारशुद्धीवर विशेष कटाक्ष असल्याने धर्मांतर वा परधर्मियांशी दीर्घकाळ अनेक प्रकारे संसर्ग केलेल्या धर्मभ्रष्टांशी हिंदु समाज अंतर ठेवून वागतो; तथापी ‘एखादा हिंदू परधर्मात गेला, तर तो हिंदु धर्माला नेहमीचा मुकतो’, असे धर्मशास्त्रकारांनी सांगितलेले नाही. प्रायश्चित्त घेऊन महापातकातूनसुद्धा मुक्त होण्याची सुविधा धर्मशास्त्रकारांनी उपलब्ध करून दिली आहे.

अ. अथर्ववेद

यात आमच्या प्राचीन वैदिक पूर्वजांनी ‘व्रात्यस्तोम संस्कार’ करून वैदिकेतरांना आपल्यात सन्मानाने समाविष्ट करून घेतले, याचा स्पष्ट उल्लेख आहे. व्रात्यस्तोम संस्काराने शुद्धी होते, हे त्यातून स्पष्ट होते.

आ. मनुस्मृति

बळाने लादलेले, अन्यायाने भोगावे लागलेले, छळबळाने लिहून घेतलेले हे सर्व ‘अकृत’, म्हणजे ‘घडलेलेच नाही’, असे मनूने म्हटले आहे.
(मनु. ८.१६८) अर्थात अशा प्रकारे झालेल्या धर्मांतराचा दोष प्रायश्चित्ताने दूर करता येतो. याविषयी मनूचे वचन आहे, ते असे –

अकामतः कृतं पापं वेदाभ्यासेन शुध्यति ।
कामतस्तु कृतं मोहात् प्रायश्चितैः पृथग्विधैः ।।
– मनुस्मृति, अध्याय ११, श्लोक ४५

अर्थ : कोणत्याही लोभामोहावाचून (अकामतः) केलेले पाप वेदाभ्यासाने नष्ट होते आणि लोभामोहाने केलेले पाप विविध प्रकारच्या प्रायश्चित्तांनी नष्ट होते. (आणि तो मनुष्य शुद्ध होतो.)

इ. याज्ञवल्क्यस्मृति

यात महापातकांच्या सूचीसह ३९ उपपातकांची (अल्पस्तराच्या पातकांची) सूची दिली आहे. स्वधर्माचा त्याग हे या सूचीतील ३४ वे उपपातक आहे. या उपपातकातून मुक्त होण्यासाठी याज्ञवल्क्याने प्रायश्चित्त सांगितले आहे, ते असे –

उपपातकशुद्धिः स्यादेवं चान्द्रायणेन वा ।
पयसा वापि मासेन पराकेणाथ वा पुनः ।।
– याज्ञवल्क्यस्मृति, अध्याय ३, श्लोक २६५

अर्थ : उपपातकाची शुद्धी एक महिनाभर चांद्रायण केल्याने, एक मास दुधावर राहिल्याने किंवा पराक प्रायश्चित्त केल्याने होते.

ई. देवलस्मृति

वर्ष ७३२ मध्ये महमंद कासीमने हिंदुस्थानवर स्वारी करून सिंध आणि काश्मीर येथील हिंदूंचे धर्मांतर केले. त्या वेळी धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणाचा प्रश्न प्रथमच उत्पन्न झाला. त्या वेळी गुजरातमधील महर्षी देवल यांनी मुख्यत्वे धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणार्थच देवलस्मृति लिहून काढली. तिच्यात नाना प्रकारचे म्लेंच्छसंसर्ग सांगून त्यांना प्रायश्चित्तेही सांगितली आहेत.

(देवलस्मृति, अध्याय ७, श्लोक २३)

शुद्धीसंस्कारात सर्वांत मोठा प्रश्न बलात्कारित स्त्रीचा असायचा. याविषयी देवलस्मृतीने स्पष्टपणे सांगितले आहे की, बलात्कार झालेली  मुलगी वा स्त्री तिची पुढली मासिक पाळी झाली की, दोषमुक्त होऊन पूर्वीइतकीच शुद्ध होते.

उ. पराशरस्मृति, बृहस्पतिस्मृति आणि यमस्मृति

मुसलमान किंवा खिस्ती यांचे अन्न (पाव आदी) ग्रहण केल्याने मनुष्य बाटला जातो, अशी समजूत मध्यकाळात सर्वत्र रूढ होती; पण यापेक्षाही महाभयंकर असलेल्या गोमांस भक्षणाच्या पापातूनसुद्धा मुक्त होण्याचा मार्ग पराशरस्मृति, बृहस्पतिस्मृति आणि यमस्मृति यांनी दाखवला आहे.

ऊ. शुद्धीकृत होऊ इच्छिणार्‍यांचे शुद्धीकरण न करणे, हे धर्मशास्त्रानुसार पापच !

‘मला प्रायश्चित्त सांगून शुद्ध करून घ्या’, असे विनवणार्‍यास शुद्ध करून घेतले नाही, तर त्याला शुद्ध करण्यास नकार देणारी व्यक्ती त्या शुद्धी न झालेल्या व्यक्तीच्या पापात सहभागी होते’, असे धर्मशास्त्रकारांनी निक्षून सांगितले आहे.

३. शुद्धीकरणाच्या विविध पद्धती आणि विधी

अ. गोमय आणि गोमूत्र यांद्वारे शुद्धीसंस्कार करणे

वर्ष १००० मध्ये इस्लामी आक्रमकांनी बाटवलेल्या हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी तत्कालीन ब्राह्मणांनी त्या हिंदूंना गोमय आणि गोमूत्र यांचे स्नान घालून त्यांची शुद्धी केली अन् त्यांना स्वधर्मात प्रवेश दिला’, असे इस्लामी इतिहासकार अल्बिरूनी याने लिहून ठेवले आहे.

आ. प.पू. करपात्रस्वामींनी आचरलेली शुद्धीची पद्धत

‘प.पू. करपात्रस्वामींनी धर्मांतर झालेल्या हिंदूंना शुद्ध होण्यासाठी विष्णुसहदाानाम आणि श्रीमद्भगवद्गीतेचा १२ वा अध्याय यांचे पठण करणे अन् श्रीरामाचा त्रयोदशाक्षरी जप करणे, ही साधना करण्यास सांगून तुलसीदल आणि तीर्थ दिले. अशा प्रकारे साधना करणारे हिंदु धर्मात सामील झाले.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

इ. धर्मशास्त्राने सांगितलेला शुद्धीसंस्काराचा विधी

‘धर्मभ्रष्ट हिंदूंना शुद्ध करून हिंदु धर्मात परत घेण्यासाठी जो धार्मिक विधी धर्मशास्त्रात सांगितला आहे, त्याला शुद्धीसंस्कार असे म्हणतात. हा शुद्धीकरण विधी म्हणजे प्रायश्चित्ताचाच एक प्रकार असतो. त्यात पुढील क्रिया करायच्या असतात –

 • १. प्रायश्चित्तकथन
 • २. आचमन
 • ३. संकल्प
 • ४. क्षौर
 • ५. पंचगव्यप्राशन
 • ६. दंडप्रदान – यात कृच्छ्रत्रय प्रायश्चित्त घ्यावयाचे असते. ते घेणे शक्य नसल्यास ब्राह्मणाला यथाशक्ती द्रव्यदान करावे
 • ७. जलाभिमंत्रण
 • ८. महाभिषेक – यात ‘सर्व देवता, सर्व ग्रह, ऋषी, गायी, वृक्ष, नाग, दैत्य, अप्सरा, नद्या, तीर्थे ही सर्व तुला अभिषेक करोत’, अशा अर्थाचा मंत्र म्हणून पवित्र वृक्षांच्या पानांनी जलप्रोक्षण करायचे असते
 • ९. तिलकधारण
 • १०. इष्ट देवतेची पूजा
 • ११. नामकरण
 • १२. अभिवादन – परमेश्वरास नमस्कार
 • १३. तीर्थप्राशन
 • १४. मंत्रोपदेश – आवश्यकतेनुसार
 • १५. पुनरुपनयन आणि होम. हा विधी व्यवहाराला सुकर असून धर्मशास्त्रज्ञांनी मान्य केलेला आहे. त्याकरता मोठ्या विद्वान पुरोहिताची आवश्यकता नाही. तो कोणालाही करता येईल, असा सोपा आहे.’ – म.म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव (शुद्धीसंस्कार, १९२७)

४. धर्मांतर करून हिंदु झालेल्यांसाठी साधनामार्ग

 • अ. धर्मभ्रष्ट माणसे विष्णूच्या नामस्मरणाने पवित्र होतात, असे भागवत पुराणात म्हटले आहे.
 • आ. ‘धर्मांतर करून हिंदु धर्मात येणारे वैष्णव पंथीय असतील. भागवताने सांगितलेला भक्तीमार्ग त्यांच्याकरता आहे. यामुळे हिंदु समाज वर्धिष्णु, तेजस्वी अन् ऐश्वर्यशाली होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

५. शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी केलेले शंकानिरसन !

‘धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण’ या विषयावर ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी ‘प्रबुद्ध भारत’च्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

अ. धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करणे आवश्यक !

प्रतिनिधी : धर्मांतरितांना शुद्धीकरणाद्वारे हिंदु धर्मात परत घ्यावे का ?

स्वामी विवेकानंद : ‘निःसंशय धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण केलेच पाहिजे. तसे केले नाही, तर हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटत जाईल. फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की, मुसलमान या देशात प्रथम आले, त्या वेळी हिंदूंची संख्या साठ कोटी एवढी होती. आज (वर्ष १८९९ मध्ये) ती अवघी वीस कोटी एवढी झाली आहे. बहुतांशी धर्मांतर हे मुसलमान आणि खिस्ती धर्मियांकडून  तलवारीच्या सामर्थ्यावर झाले. आजचे परधर्मात असलेले हिंदू हे त्या काळात बाटवल्या गेलेल्या हिंदूंचेच वंशज आहेत. अशांना दूर लोटणे हिताचे नाही. स्वेच्छेने परधर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात येण्याची इच्छा असेल, तर त्यांनाही शुद्ध करायला हवे. अत्याचारांमुळे धर्मांतर करावे लागलेल्या मूळच्या हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देतांना कोणतेही प्रायश्चित्त असू नये.

आ. अहिंदूंना हिंदु धर्माने स्वीकारले होते, हा इतिहास आहे !

प्रतिनिधी : मूलतः अहिंदु असलेल्यांचे शुद्धीकरण अर्थात हिंदुकरण करावे का ?

स्वामी विवेकानंद : भूतकाळात असे कित्येक परवंशीय आपल्या हिंदु धर्मात स्वीकारले गेले आहेत. आतापर्यंत राष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अनेक रानटी टोळ्यांना हिंदु धर्माने आत्मसात केले. मुसलमानांपूर्वीचे शक, हूण, कुशाण इत्यादी सर्व परकीय आक्रमकांनाही हिंदु धर्माने स्वीकारले आहे. अशा रक्ताने परधर्मीय असलेल्यांना हिंदु धर्मात प्रवेश करतांना कोणतेही प्रायश्चित्त असू नये. ५ इ. धर्मांतर झालेल्या हिंदूंनी शुद्धीकरणानंतर पूर्वीची जात स्वीकारावी, तर अहिंदूंनी हिंदु धर्म स्वीकारल्यावर वैष्णव पंथीय व्हावे !

प्रतिनिधी : शुद्धीकरण झालेले कोणत्या जातीत असावेत ?

स्वामी विवेकानंद : बळाने धर्मांतरित झालेले पुनरपि स्वधर्मात येतील, तेव्हा त्यांना त्यांची पूर्वीची जात मिळेल. हिंदु धर्मात जे नव्याने प्रवेश करतील, त्या सर्वांची मिळून एक नवीनच जात घडवावी लागेल. ही जात वैष्णव पंथीय ही असेल. (वर्णसंकर टाळण्यासाठी) त्यांनी त्यांचे विवाह परस्परांत करावेत. त्यांनी त्यांची नावे हिंदु ठेवावीत; कारण त्यात हिंदु ओळख आणि चैतन्य आहे. – ‘प्रबुद्ध भारत’ (एप्रिल १८९९)

६. हिंदु समाजाला आवाहन

अ. हिंदु समाज जिवंत ठेवण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवा !

‘वैयक्तिक किंवा काही शेकड्यांतील शुद्धीकरणाने काय साधणार’, असा प्रश्न मोठ्या आढ्यतेने काही लोक विचारत असतात. ‘थेंबाथेंबाने जसे तळे भरते, तसेच ते आटतेही’, हा न्याय येथे क्रियाशील हिंदूंनी लक्षात घ्यायला हवा. यासंबंधात नाशिक येथील ‘भोसले लष्करी विद्यालया’चे संस्थापक आणि हिंदु समाजाचे तेजस्वी नेते कै. डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे म्हणतात, ‘‘गोमीला सहदााो पाय असले, तरी प्रत्येक वेळी एकेक पाय तुटून जाऊ लागला, तर ती जिवंत राहील का ? हिंहदु समाजाची हीच स्थिती होईल. मर्दुमकीने हिंदु समाज जिवंत रहावा, असे वाटत असेल, तर शुद्धीकरण चळवळ राबवा. म्हणून शुद्धीकरण चळवळ राबवा.’’ – श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी (५३)

आ. धर्मांतरितांचे शुद्धीकरण, हा विषय हिंदूंच्या कार्यक्रम पत्रिकेवर हवा !

‘टिपू सुलतानाला इंग्रजी सैन्यासह ठार मारून मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे परतत होते. तेव्हा टिपूने बाटवलेली अनेक हिंदु कुटुंबे रस्त्याच्या दोन्ही कडांना उभी राहून ‘आम्हाला परत हिंदु करा’, असे हात जोडून मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांना विनवत होती. त्यांना हिंदु धर्मात परत यायचे होते; परंतु मराठ्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर शुद्धीकरण हा विषय नव्हता. आजही हिंदूंच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा
विषय नाही. देवल महर्षी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, प.पू. मसूरकर महाराज, स्वामी श्रद्धानंद आदींचे इतिहासातील तुरळक कालखंड सोडले, तर शुद्धीकरणाकडे हिंदूंनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसते. ‘शुद्धीचे कार्य हे केवळ धार्मिक नाही, ते राजकीयही आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निक्षून सांगितले होते. त्यामुळेच आजच्या राजकीय भाषेत सांगायचे, तर हिंदूंच्या कार्यक्रम पत्रिकेवर
धार्मिक प्रत्याक्रमण, म्हणजेच शुद्धीकरण हा विषय हवा !’ – श्री अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मासिक ‘लोकजागर’, अमरनाथ यात्रा विशेषांक, २००८)

इ. हिंदुस्थानातील धर्मांतरित हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ गतिमान व्हावी !

‘हिंदुस्थानात सर्वत्र बळाने बाटवण्यात आलेल्या हिंदूंच्या वंशजांना पुन्हा हिंदु धर्मात आणून त्यांची धार्मिक मुक्तता करणे, हेच आजच्या काळात काशीच्या यात्रेपेक्षा सर्वाधिक पवित्र कार्य आहे’, असे प.पू. मसूरकर महाराज म्हणाले होते. हे पवित्र कार्य केवळ धर्मांतरित झालेल्या आदिवासी पाड्यांत जाऊनच नव्हे, तर आता प्रत्येक अहिंदु भागात जाऊन केले पाहिजे. सुंता झाल्याविना मुसलमान होता येत नाही. बाप्तिस्मा झाल्याविना कोणी खिस्ती होत नाही. त्याचप्रमाणे शुद्धीसंस्कार झाल्याविना धर्मांतरितांना हिंदु होता येत नाही. यासाठीच
हिंदुस्थानातील धर्मांतरित हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ गतिमान व्हायला हवी. देवळांच्या विध्वंसापेक्षाही हिंदूंचे धर्मांतर अधिक भयंकर आहे. पाडलेली देवळे पुन्हा बांधता येतील; पण परधर्मात गेलेली माणसे पुन्हा परत येणार नाहीत. किंबहुना त्यांचे वंशज पुढे कट्टर हिंदुद्वेष्टे होतील आणि तेच नवी देवळे पुन्हा उद्ध्वस्त करतील. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी धर्मांतरितांच्या हिंदुकरणाचा वसा प्रत्येक हिंदूने घ्यायलाच हवा. ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा कि बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ।।’ या समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे हिंदूंनी धर्मरक्षणासाठी शुद्धीकरणाचा शंखनाद अवघ्या हिंदुस्थानात करायला हवा !

शुद्धीकरण करण्यासाठी पुढील पत्त्यांवर संपर्क करा !

१. मुंबई

मसुराश्रम, मसुराश्रम मार्ग, पांडुरंग वाडी, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०००६३.

दूरभाष क्रमांक : (०२२) २८७४१९९७

२. रत्नागिरी

जगद्गुरु रामानंदाचार्य, दक्षिण पीठ, नाणिजधाम, ता.जि. रत्नागिरी.

भ्रमणभाष क्रमांक : ८८०५४१०१३६

३. पुणे

अ. श्री. भुजंगराव घुगे, विश्व हिंदु परिषद, प्रदेश कार्यालय, १३६० शुक्रवार पेठ, पुणे ४११००२.

दूरभाष क्रमांक : (०२२) २४४७१७०१,

भ्रमणभाष क्रमांक : ९४२२४६६७५७

आ. श्री. मा.का. देशपांडे, पुणे धर्मजागरण ट्रस्ट.

भ्र. क्र. : ९८९०६२३२५४

इ. पं. धर्मवीर आर्य, आर्य समाज, पिंपरी, पुणे. दू.क्र. : (०२०) २७२७४८१३

४. जळगाव

श्री. वामनराव साखरे, धर्म जागरण संस्था, जळगाव.

भ्र.क्र. : ९४२१६३९८२७

५. बेंगळुरू, कर्नाटक

कर्नाटक आर्य प्रतिनिधी सभा, विश्वेश्वरम्पूर, श्रद्धानंद भवन मार्ग, बेंगळुरू.

दूरध्वनी क्रमांक : (०८०) २६६२६३८०

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण