Menu Close

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! – स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

अखिल भारतीय हिंदु महासभेच्या वतीने संत संमेलन आणि राष्ट्रीय अधिवेशनातील घोषणा !

उज्जैन : धार येथील भोजशाळा ही हिंदूंची असून वर्षातून केवळ वसंत पंचमीला सरस्वतीपूजन करू देण्यापेक्षा ३६५ दिवस हिंदूंना पूजनाचा अधिकार मिळालाच पाहिजे. त्या ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करू देऊन शासन ८० कोटी हिंदूंचा अपमान करत आहे. यापुढे हिंदूंच्या भोजशाळेतील नमाजपठण बंद न केल्यास मध्यप्रदेश राज्यातील प्रत्येक मशिदीत शुक्रवारी हनुमानचालिसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणी काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्रनंदगिरी सरस्वती महाराज यांनी उज्जैन सिंहस्थपर्वातील संत संमेलनात आणि अखिल भारतीय हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिली. २०१८ पर्यंत अयोध्येत श्रीराम मंदिर न उभारले गेल्यास हिंदू स्वतःच्या पद्धतीने अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी करतील, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (भाजपच्या राज्यात संतांना अशी चेतावणी द्यावी लागणे अपेक्षित नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संतांचा सन्मान, अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना, धार येथील भोजशाळा मुक्ती आंदोलन, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, तसेच गो-गंगा-गीता यांचे रक्षण करण्यासंदर्भात आयोजित संत संमेलन आणि राष्ट्रीय अधिवेशन यांत देशभरातील संत-महात्मे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जय हिंदु राष्ट्र, असा जयघोष करण्यात येत होता.

Shankaracharya-Narendranandgi
काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज बोलतांना

खासदारांच्या वेतनवाढीसाठी एकमताने निर्णय होतो; मग गोहत्या बंदी कायदा का नाही ? – शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती

ज्योतिषमठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणाले की, राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी शासन एकमताने निर्णय का घेऊ शकत नाही ?

शासन नाही, संतच हिंदु राष्ट्र आणणार ! – महामंडलेश्‍वर रामभूषणदासजी महाराज

गुजरात येथील महामंडलेश्‍वर रामभूषणदासजी महाराज म्हणाले की, हिंदुत्व वाचवायचे असेल, तर संस्कार वाचवले पाहिजेत. संस्कार वाचले, तर संस्कृती वाचेल, तरच हिंदु राष्ट्र येईल. शासन काय हिंदु राष्ट्र आणणार ?, संतच प्रत्यक्षात हिंदु राष्ट्र आणतील. संस्कार नसल्यामुळे शासन बिघडले आहे. आज अनेक संत, महामंडलेश्‍वर, शंकराचार्य, जगद्गुरु आहेत, पण ते काय करतात ? आद्य शंकराचार्यांनी घराघरामध्ये जाऊन जसे धर्म आणि संस्कार जागृती यांचे कार्य केले, तसे कार्य चालू केल्याविना हिंदु राष्ट्र कसे येणार ? त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून संस्कार चालू केले पाहिजेत. पूर्वी जसे संस्कार जपले जात होते, तसे जपले गेले पाहिजेत.

हिंदु राष्ट्र लढून मिळवावे लागेल ! – पू. बिंदूजी महाराज

पू. बिंदूजी महाराज म्हणाले की, हिंदु राष्ट्र हे मागून मिळणार नाही. अधिकार कधी मागून मिळत नाही, तर तो लढून मिळवावा लागतो. त्यासाठी हिंदूंनो, आता युद्धाची सिद्धता करा ! हे येरा-गबाळ्याचे काम नाही, तर शूरवीरांचे कार्य आहे. त्यासाठी संघे शक्ती कलौःयुगे । नुसार सर्वांना संघटित व्हावे लागेल. मेकॉलोने जे केले, तेच सध्याचे राज्यकर्ते करत आहेत. आपल्या भारतीय संविधानात संतांना भिक्षुक म्हणून संबोधले आहे. गुरुकुल परंपरा आणि संस्कार तोडण्याचे काम मेकॉलेने केले आहे. तेच शासनही करत आहे. गुरूंपासून दूर झाल्यामुळेच आपली दुर्दशा झाली आहे. आपल्याला हिंदु राष्ट्र आणायचे असेल, तर गुरूंना शरण जावे लागणार आहे. महाराष्ट्रात तृप्ती देसाई नावाची महिला मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यासाठी आंदोलन करून धर्मभ्रष्ट करत आहे. आम्ही तिला विरोध केला; मात्र कुंभला आल्यावर तिने त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. अशा प्रकारे संपूर्ण देशभर धर्मश्रद्धा नष्ट करण्याचे काम चालू आहे. संस्कारविहीन झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

धर्म आचरणानेच धर्माचे रक्षण होऊ शकते ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, सनातन हिंदु धर्म वटवृक्षासारखा आहे आणि या वृक्षाच्या सर्वच फांद्यांवर सध्या चोहोबाजूंनी आघात केले जात आहेत. मग ते गोहत्या असो कि लव्ह जिहाद, धर्मांतरण, आतंकवादी घुसखोरी इत्यादी. या एक-एक समस्या सोडवत बसल्यामुळे हिंदूंची शक्ती विभागली गेली आहे. आपल्याला एक-एक फांदी नव्हे, तर संपूर्ण हिंदु वटवृक्ष वाचवायचा आहे. त्यासाठी एक साधै सब साधै या न्यायानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. धर्म हा आचरमूलक असतो, धर्म आचरणानेच धर्माचे रक्षण होऊ शकते. आज धर्म सोडल्यामुळे ही दु:स्थिती निर्माण झाली आहे. धर्म वाचवायचा असेल, तर प्रथम आपल्याला आपल्याच लोकांशी म्हणजे जे जन्माने हिंदू आहे; पण कर्माने हिंदू नाहीत, अशांशी लढावे लागेल.

हिंदूंनी युद्ध संख्याबळाच्या आधारे नव्हे, तर ईश्‍वरी साहाय्याने जिंकले !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपस्थित बहुतेक संत आणि महंतांनी हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. किमान प्रत्येक हिंदूंनी १० मुलांना जन्म देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शन पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, आतापर्यंत कोणतेही युद्ध हिंदूंनी बाहुबलाने वा संख्याबलाने जिंकलेले नाही, तर देवावरील श्रद्धा, देवाची कृपा आणि देवाचे साहाय्य या आधारे जिंकलेले आहे. केवळ हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याचा विचार केल्यास धर्मनिरपेक्ष हिंदूंची संख्याही वाढेल, म्हणजेच आपल्या शत्रूंची संख्या वाढेल. त्यापेक्षा हिंदूंमध्ये भगवान परशुरामाप्रमाणे साधनेच्या आधारे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण केले पाहिजे. अशा लोकांची संख्या अल्प असली, तरी ते हिंदु राष्ट्राची स्थापना सहज करू शकतात.

उपस्थित संत-महात्मे

उपस्थितांमध्ये ज्योतिषमठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, गुजरात येथील महामंडलेश्‍वर स्वामी रामभूषणदास महाराज, उज्जैन येथील महंत श्री ओमभारती महाराज, चित्रकूट येथील महामंडलेश्‍वर रामनरेशदासजी महाराज, पू. बिंदू महाराज, अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री श्री रामानुज त्रिदंडी महाराज, राष्ट्रीय महामंत्री श्री. देवेंद्र पांडे, प्रदेश संघटनमंत्री श्री. नीलेश दुबे, प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्रसिंह ठाकूर आणि नगर संयोजक श्री. सोनू जयस्वाल यांचा समावेश होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *