होळी-रंगपंचमी यांनिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम

सलग १८ वर्षे पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान शतप्रतिशत यशस्वी !

पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाला नागरिकांचा कृतीशील प्रतिसाद

  • खडकवासला आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घेतला सहभाग
  • धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी केलेल्या प्रबोधनातून नागरिकांमध्ये जागृती
  • पोलिसांकडूनही अभियानाला उत्तम सहकार्य
  • हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे सर्वांकडून कौतुक
अभियानस्थळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाला या वर्षीही कृतीशील प्रतिसाद मिळाला. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी नागरिकांचे प्रबोधन केल्यामुळे त्यांच्यात पुष्कळ जागृती झाली. अनेकांनी अभियानाचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले. अभियानात विविध माध्यमांतून सहभागी होण्याची सिद्धता दाखवली. सकाळी ९ वाजता प्रारंभ झालेले हे अभियान सायंकाळी ७ पर्यंत चालू होते. यंदाच्या वर्षी खडकवासला आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, तसेच हवेली आणि ग्रामीण पोलीस, प्रशासन यांचाही सहभाग लाभला. अभियानस्थळी उपस्थित असलेल्या अनेक पोलिसांनी अभियानाचे कौतुक केले. सर्व प्रतिसादामुळे अभियानस्थळाच्या ठिकाणी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला. उपस्थित मान्यवरांनी अभियानाविषयी आपले मत व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीच्या अखंडपणे चालू असलेल्या कार्याचे कौतुक वाटते ! – विजय कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य, खडकवासला

मागील १८ वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीचे जलरक्षणाचे कार्य मी पाहिले आहे. प्रारंभी काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन अभियानाला पाठिंबा दिला. पूर्वी अनेक अडचणी येऊनही ग्रामस्थांचे सहकार्य, तसेच पोलीस प्रशासनाचा सहभाग वाढल्याने या मोहिमेस हातभार लागला. समितीचा ‘सण-उत्सवांतील गैरप्रकार रोखणे’ हा व्यापक उद्देश ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांचाही या अभियानाला नेहमीच वाढता पाठिंबा राहिला. हिंदु जनजागृती समिती अखंडपणे हे कार्य करत आहे. समितीच्या या कार्याचे मला अतिशय कौतुक वाटते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही आमच्याकडून पुष्कळ शुभेच्छा !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे परिसरातील नागरिक जागृत झाले आहेत ! – ऋतुजा मोहिते, साहाय्यक पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे

सध्या अनेक ठिकाणचे जलाशय अधिक प्रमाणात प्रदूषित आहेत. रासायनिक रंगांमुळे त्याचा शरिरावरही घातक परिणाम होतो. जलरक्षण अभियानामुळे खडकवासला जलाशयात चांगला परिणाम दिसून आला. अभियानाद्वारे प्रबोधन केल्याने जनजागृती होऊन नागरिकांचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी येथेे येण्याचे प्रमाण घटले. हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे परिसरातील नागरिकही पुष्कळ जागृत झाले आहेत. यासाठी मी या उपक्रमाचे आणि हिंदु जनजागृती समितीचे कौतुक करते.

जलरक्षणाच्या कार्यासाठी आम्ही सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत ! – आनंद मते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी खडकवासला जलाशय प्रदूषित होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून हे अभियान मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येत आहे. आम्हालाही या अभियानात सहभागी होता आले. या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे रक्षण होत आहे. हे व्यापक कार्य असून या कार्यासाठी आम्ही सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत.

उपस्थित मान्यवर

रंगपंचमीच्या दिवशी पाटबंधारे विभागाचे धोंडिभाऊ भागवत, गोर्‍हे बुद्रुक माजी उपसरपंच पुंडलिक खिरीड, गोर्‍हे बुद्रुक उपसरपंच बाबा खिरीड, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कापसे, खडकवासला ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद मते, खडकवासला माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप मते, खडकवासला ग्रामपंचायत सदस्य आशिष मते, मध्य रेल्वे सदस्य प्रवीण शिंदे, वडगाव बुद्रुक व्यापारी संघाचे अध्यक्ष केतन शिंदे, किरकटवाडी गावाचे सरपंच गोकुलशेठ करंजवणे यांसह अन्य मान्यवरांनी अभियानस्थळी भेट देऊन समितीच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

विशेष सहकार्य

१. १० मार्च आणि १३ मार्च या दिवशीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानामध्ये स्थानिक पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.

२. हवेली पोलीस ठाण्याचे (पुणे ग्रामीण) पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे दिवसभर अभियानस्थळी उपस्थित राहिले. त्यांनी पोलिसांचे पथक देऊन अभियानस्थळी सुरक्षा पुरवली.

३. रंगपंचमीच्या दिवशी पोलीस फौजदार रवींद्र भोसले, रामदास बाबर, प्रशांत दरेकर, मल्हारी राऊत, कोमल लोखंडे यांच्या पथकाने अभियानस्थळी सुरक्षा पुरवली.

४. पाटबंधारे विभागानेही उत्तम सहकार्य केले. त्यांनी दिवसभर रिक्शामधून ध्वनीवर्धकाद्वारे उद्घोषणा केली.

वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद

  • वडगाव बुद्रुक येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. केतन शिंदे यांना अभियान अतिशय आवडले. त्यांनी उत्स्फूर्तपणे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःहून आणून दिल्या. ‘तुमचे कार्य अतिशय चांगले आहे, हे अशाच पद्धतीने चालू ठेवा’, असेही त्यांनी सांगितले.
  • अभियानात हडपसर येथील धर्मप्रेमी श्री. दीपक कुलकर्णी दिवसभर सहभागी झाले होते. वडगाव बुद्रुक येथील स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील कु. आकांक्षा घाडगे आणि कु. अनुष्का घाडगे या मोहिमेत दुपारपासून सायंकाळपर्यंत सहभागी झाल्या. खानापूर येथील प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सर्वश्री रोहित वाघ, आकाश जावळकर आणि सौरभ जावळकर हे अभियानात सहभागी झाले.
  • अभियानस्थळी उपस्थित पोलीस रवींद्र भोसले यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला पाण्याची बाटली दिली.
  • श्री. अखिलेश वशिष्ठ हे देहलीहून त्यांच्या नातेवाइकांसह खडकवासला येथे आले होते. त्यांनी अभियान पाहिल्यानंतर आभार व्यक्त केले. ‘तुम्ही जे करता, ते पुष्कळ चांगले कार्य आहे’, असे सांगून समितीचे कौतुक केले. त्यांनी समितीचे अन्य उपक्रमांतील कार्य जाणून घेतले आणि ‘समितीच्या संकेतस्थळावरून कार्यात सहभागी होईन’, असे सांगितले.

 

 

 

मानवी साखळी आणि प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण

पुणे : धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्राविसंगत आहे. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षे प्रबोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; कमिन्स इंडिया लिमिटेड, पुणे आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे. यंदा अभियानाचे १८ वे वर्ष आहे. यामध्ये ‘रंग खेळून कोणी जलाशयात उतरू नये’ आणि ‘पिण्याचे पाणी पुरवणार्‍या या जलाशयाचे प्रदूषण होण्यापासून रक्षण व्हावे’ यासाठी जलाशयाभोवती मानवी साखळी करून प्रबोधनही करण्यात येते.

१० मार्चला भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन केले. या वेळी भाजपचे बाजीराव पारगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद मते, माथाडी कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भरत चावट, वरदाडे गावचे सरपंच विठ्ठल ठाकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पत्रकार राजेंद्र कापसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

खडकवासला पाटबंधारे विभाग उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, स्थापत्य अभियंता धोंडीभाऊ भागवत, शाखाधिकारी राजेंद्र राऊत यांनी, तसेच ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते विलास मते यांनी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ कक्षाला सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनीही अभियानाला धावती भेट दिली, तसेच हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुकही केले. या अभियानात पोलीस, प्रशासन आणि खडकवासला ग्रामस्थ यांचा प्रतिवर्षीप्रमाणे सक्रीय सहभाग लाभला.


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील धर्मप्रेमींनी साजरी केली ‘आदर्श होळी’ !

सोलापूर : महाराष्ट्रात सर्वत्र होळी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोदूताई विडी घरकुल येथील वज्र मारुति मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी शास्त्रानुसार आदर्श होळी साजरी करून होळीच्या नावाखाली बळजोरी करणारे, तसेच अपप्रकार करणारे यांच्यासमोर आदर्श ठेवला आहे. हा उत्सव धर्मप्रेमी श्री. अशोक माचल यांच्या पुढाकाराने वज्र मारुति मंदिरासमोर साजरा करण्यात आला. या वेळी धर्मशिक्षणवर्गाला येणारे धर्मप्रेमी, परिसरातील नागरिक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळीचे पौरोहित्य पुरोहित श्री. कृष्णहरी क्यातम यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंचे धार्मिक सण, उत्सव यांमध्ये होणारे अपप्रकार रोखून ते आदर्श आणि शास्त्रशुद्ध कसे साजरे करावेत ? याविषयी धर्मशिक्षणवर्गामध्ये मार्गदर्शन केले जाते. येथे होलिकोत्सवाचे पूजन झाल्यानंतर सर्व धर्मप्रेमींनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा दिल्या.


संभाजीनगर आणि अंबड येथे रंगपंचमीच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

अंबड येथे निवेदन नायब तहसीलदार बी.के. चंडोल यांना निवेदन देतांना समितीचे श्री. रवींद्र अंबिलवादे आणि श्री. अजय देशमुख

संभाजीनगर आणि अंबड येथे रंगपंचमीच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


सांगली येथे महापौर सौ. गीता सुतार यांना निवेदन

महापौर सौ. गीता सुतार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीच्या कार्यकर्त्या

रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा आणि महिला सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी सांगली, मिरज अन् कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीता सुतार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने उपस्थित होत्या. या वेळी महापौरांना होळीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे हस्तपत्रकही देण्यात आले.


होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कुर्ला-मुलुंड येथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन

१. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवि सरदेसाई यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

होळी आणि रंगपंचमी या काळात होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठीचे निवेदन कुर्ला-मुलुंड येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप थोरात आणि मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबि सरदेसाई यांना देण्यात आले. या वेळी भाजप, शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


कळवा (जिल्हा ठाणे) येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे होळीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याची निवेदनाद्वारे मागणी

ठाणे : होळीनिमित्त होणारे अपप्रकार रोखावेत, यासाठी येथील कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय दरेकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात ‘आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांची विक्री करणार्‍यांवर आणि बळजोरीने रंग फासून फुगे मारणार्‍यांवर कठोर कारवाई करावी यासाठी पोलिसांच्या वतीने पहारा पथके सिद्ध करून विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहावे’, अशी मागणी करण्यात आली. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री विश्‍वास धांगडे, विलास राणे आणि सुनील कदम, तसेच सौ. राधा सुर्वे, सौ. सुरेखा जोशी, श्री. राजेश उमराणी अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी ‘अपप्रकार थांबवण्यासाठी स्थानिक केबल वाहिनीवर प्रबोधनात्मक तळपट्टी दाखवू आणि शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये जागृती करू’, असे सांगितले, तसेच अपप्रकार लक्षात येताच कठोर कारवाई करणार असल्याचे समितीच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले.


कराड येथे प्रशासनास निवेदन

पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कराड : दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी ! दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी अनेक अपप्रकार घडतांना दिसून येतात. ‘कचर्‍याची होळी करा, पुरणाची पोळी दान करा’ असे अधार्मिक, तसेच धर्मश्रद्धांचे भंजन करणारे उपक्रम काही नास्तिकतावादी संघटनांकडून राबवण्यात येतात. अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांची विक्री करणार्‍यांवर आणि बळजोरीने रंग फासून फुगे मारणार्‍यांवर कठोर कारवाई करून हे अपप्रकार थांबवावेत. तसेच पोलिसांच्या वतीने पहारा पथके सिद्ध करून विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहाण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना देण्यात आले.

या वेळी गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष सुनील पावसकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अनिल सागावकर, विनोद देवकर, वारूंजी येथील महेश पाटील, श्री. सावंत, सनातनचे श्री. लक्ष्मण पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कडणे उपस्थित होते.


वणी येथे पोलीस अन् प्रशासन यांना निवेदन

उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

वणी (यवतमाळ) : दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी हा पवित्र सण ! दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. याला आळा घालावा, यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रहित संवर्धन समितीचे सर्वश्री अनुराग काठेड, उदय जोबनपुत्रा, गोपाल मालधुरे, दीपक चौधरी, लक्ष्मण उरकुडे, कमलेश त्रिवेदी, धवल पटेल, तसेच समितीचे लोभेश्‍वर टोंगे आणि लहू खामणकर उपस्थित होते.


मुंबईत ८ पोलीस ठाण्यांत निवेदन

मुंबई : होळी आणि रंगपंचमी या दिवशी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्याविषयी, तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहाण्याविषयी हिंदु जनजागृती समिती अन् स्थानिक धर्मप्रेमी यांनी ५ मार्च या दिवशी मुंबईतील एकूण ८ पोलीस ठाण्यांत निवेदन दिले. या वेळी स्थानिक धर्मप्रेमी, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.

मीरारोड

मीरारोड येथील कनकिया पोलीस ठाण्यात निवेदन देतांना डावीकडून श्री. हरीश मिश्रा, श्री. विजयचंद चौबे, श्री. माणिकसिद्ध भांबुरे, श्री. पांचाळ, श्री. घनश्याम चोबीसा (उजवीकडे)

मीरारोड येथील कनकिया पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्मप्रेमी सर्वश्री हरीश मिश्रा, विजयचंद चौबे, माणिकसिद्ध भांबुरे, घनश्याम चोबीसा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सदानंद पांचाळ आणि श्री. परेश साटम उपस्थित होते.

दहिसर

निवेदन स्वीकारतांना दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम्.एम्. मुजावर

दहिसर येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम्.एम्. मुजावर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री विनोद शुक्ला, माणिकसिद्ध भांबुरे, विजयचंद चौबे, तसेच समितीचे श्री. सदानंद पांचाळ आणि श्री. परेश साटम उपस्थित होते.

बोरीवली

निवेदन स्वीकारतांना बोरीवली येथील एम्.एच्.बी. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे

बोरीवली (पश्‍चिम) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांना, एम्.एच्.बी. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांना, तसेच बोरीवली (पूर्व) पोलीस ठाण्यातही ५ मार्चला निवेदन दिले. ‘समितीचे कार्य चांगले आहे. कुठे अपप्रकार आढळल्यास आम्हाला कळवा’, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांनी दिली, तर पोलीस निरीक्षक ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले काम करत आहात. आम्हीही असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सतर्क असतो.’’ निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. देवांग भट, श्री. शशिकांत पडवळ, श्री. ध्रुव भांबुरे, सनातन संस्थेच्या सौ. पूनम भुजबळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. देवीसाद देवळे उपस्थित होते.

कांदिवली

कांदिवली (पश्‍चिम) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम यांना निवेदन दिले. ‘तुम्ही करत असलेले कार्य चांगले आहे’, असे ते या वेळी म्हणाले. निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. शशिकांत पडवळ, श्री. योगेश गग्गर, सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चारकोप (कांदिवली)

चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. देवांग भट, श्री. शशिकांत पडवळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. देवळे उपस्थित होते.

जोगेश्‍वरी

जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. सुरेश ठाकुर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिगंबर काणेकर उपस्थित होते.


कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नायब तहसीलदार अनंत गुरव (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालणे, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी ५ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी निवेदन स्वीकारले.


नगर येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे

होळीच्या कालावधीत होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांची विक्री करणार्‍यांवर आणि बळजोरीने रंग फासून फुगे मारणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. पोलिसांच्या वतीने गस्ती पथके सिद्ध करण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना हिंदु जनजागृती समिती आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने ४ मार्चला देण्यात आले.

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​