हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने उभारलेल्या ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियाना’ची प्रशासनाकडून नोंद !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियान’

समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

करूया शुभारंभ हिंदु राष्ट्र जनजागृती अभियानाचा ।
ओघ गुरुकृपेचा, योग अक्षय्य तृतीयेचा ।
संकल्प श्री गुरूंचा, हिंदु राष्ट्र स्थापनेचा ॥
साधकहो, करूनी शुभारंभ हिंदु राष्ट्र जनजागृती अभियानाचा ।
सत्वर चालू मार्ग काळानुसार आध्यात्मिक उन्नतीचा ॥

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०१७)

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कर्नाटक राज्यात सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी रणशिंग फुंंकले !

  • २५ ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ग्राहक न्यायालय यांना निवेदने सादर

  • १४ संघटना, ४ अधिवक्ता आणि १५३ धर्माभिमानी यांचा सहभाग

शिवमोग्गाचे जिल्हाधिकारी श्री. लोकेश (उजवीकडे) यांना निवेदन सादर करतांना हिंदुत्वनिष्ठ

बेंगळुरू : सामाजिक दृष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने उभारलेल्या लढ्याला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने कर्नाटक राज्यात पेट्रोलमध्ये होणार्‍या फसवणुकीच्या संदर्भात २८ एप्रिल या दिवशी बेळगाव, विजापूर, धारवाड, उत्तर कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, मंगळुरू, म्हैसुरू, बेंगळुरू यांसह एकूण २५ ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ग्राहक न्यायालय यांना याकडे लक्ष देण्याविषयी आणि या क्षेत्रातील व्यवस्था नीट करण्यासाठी निवेदन देण्यात आले. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर कर्नाटक राज्यात समाजातील दुष्प्रप्रवृत्तींच्या विरोधात संघटनात्मक लढ्याला प्रारंभ झाला आहे. या अभियानात विविध संघटनांचे प्रमुख आणि धर्माभिमानी उत्साहाने सहभागी झाले. या अभियानाच्या संदर्भात विविध ठिकाणी काही अनुभवही आले. यातून कालमहात्म्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, हे लक्षात आले.

अभियानात १४ संघटना, ४ अधिवक्ता आणि १५३ धर्माभिमानी सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी निवेदन दिल्यावर त्याचे वृत्त आणि छायाचित्रे पाठवली. समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ अभियानात उत्साहाने सहभागी झाले. पूर्ण अभियानात कुणालाही सेवा करतांना ताण आला नाही.

अभियानात लक्षात आलेली सूत्रे

१. कर्नाटक हितरक्षक वेदिकेचे कार्यकर्ते प्रभावित

उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथील तहसीलदार कार्यालयात अन्य एका विषयावर निवेदन देण्यासाठी आलेले कर्नाटक हितरक्षक वेदिके या संघटनेचे ७-८ जण अभियानाचा विषय ऐकल्यावर प्रभावित झाले आणि ते हिंदु जनजागृती समिती अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्यासह ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियाना’च्या अंतर्गत निवेदन देण्यात सहभागी झाले. शिरसी येथील एका धर्माभिमान्याने ‘आपणही असेच कार्य करायला हवे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

२. उडुपीच्या जिल्हाधिकार्‍यांकडून समितीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याला प्राधान्य

उडुपीचे जिल्हाधिकारी प्रियांका मेरी फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या कार्यालयात आले होते; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासह असलेले अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना प्रथम बोलवून घेतले आणि निवेदनाचा विषय लक्षपूर्वक ऐकला. ‘यासंदर्भात मी लक्ष घालीन’, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

३. उडुपी येथील एका संघटनेचे पदाधिकारी श्री. रविकुमार यांनी सांगितले की, यापुढे मी तुमच्यासमवेत (हिंदु जनजागृती समितीसोबत) या अभियानात सहभागी होणार आहे.’’

४. शिवमोग्गा जिल्हाधिकार्‍यांनी सर्व पेट्रोलपंप चालकांची बैठक बोलावली !

शिवमोग्गा जिल्हाधिकारी लोकेश यांना हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिल्यावर त्यांनी अधिकार्‍यांना बोलवून १५ दिवसांत पेट्रोलपंप चालकांची बैठक घेण्यास आणि निवेदनातील सूत्रे सांगण्यास सांगितली. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलेे, ‘‘या क्षेत्रातील भ्रष्टाचार पूर्णपणे बंद करायचा असल्यास तुम्ही ‘इंडियन आईल कॉर्पोरेशन’ या आस्थापनाला याविषयी सांगू शकता. आस्थापनाला यासंदर्भात सर्वाधिकार असतात.’’

५. झोपलेली पोलीस यंत्रणा !

शिवमोग्गा येथील पोलिसाने समितीच्या समन्वयकांना विचारले, ‘‘तुम्ही ही सर्व माहिती कशी गोळा केली ? ही सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कुठले पथक स्थापन केले आहे का ?’’ (छोट्याशा हिंदु जनजागृती समितीला जी माहिती मिळू शकते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळू शकत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

६. शिवमोग्गा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले, ‘या संदर्भात सूत्रे आम्ही पुढे उपस्थित करू. या विषयासंदर्भात काहीही माहिती हवी असल्यास मी २४ घंटे उपलब्ध असेन.’’

७. कोडरू जिल्ह्यातील माडेकरी येथील ‘चित्तारा’ या वाहिनीने या संदर्भात समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. कुशलनगर येथे ३० धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन निवेदन दिले.

८. चामराजनगर येथील समितीच्या कार्यकर्त्याचा ‘स्टुडिओ’ आहे. त्यांच्या कामाच्या वेळेत जेव्हा सेवा करायची असते, तेव्हा त्यांना पूर्वी ताण येत असे; परंतु या वेळी त्यांनी काम करत समितीच्या उपक्रमाच्या अंतर्गत ८ ठिकाणी पाठपुरावा करण्याची सेवा आनंदाने केली.

९. मंगळुरू येथील ‘नम्म टीव्ही’ या वाहिनीने या संदर्भात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

१०. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील ग्राहक सेवा समितीचे श्री. हनुमंत कामत म्हणाले, ‘‘प्रत्येक सामाजिक उपक्रमात मी तुमच्यासोबत आहे.’’ त्यांनी आणखी एका सामाजिक उपक्रमाविषयी माहिती दिली.

अभियान राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. सकारात्मक राहून आणि आज्ञापालन करून सेवा केल्याने सेवेत आनंद मिळाला.

२. जे काही होणार आहे, ते गुरुदेवांच्या संकल्पानेच होणार आहे, याची सतत जाणीव ठेवून सेवा केल्याने सेवा परिणामकारक होते.

३. समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे सेवा केल्याने देवाच्या प्रचंड शक्तीची अनुभूती आली.

४. सर्व धर्माभिमानी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी सिद्धच आहेत, त्यांना केवळ दिशा देऊन समवेत घ्यायचे आहे, हे शिकायला मिळाले.

५. सामाजिक उपक्रमात एक वेगळाच अनुभव येत आहे, हे लक्षात आले.

– श्री. गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनानंतर महाराष्ट्रात शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या धर्मादाय रुग्णालयांची प्रशासनाकडून नोंद

मुंबई : धर्मादाय रुग्णालयांविषयी काही नियमावली शासनाकडून सिद्ध करण्यात आली आहे. ही नियमावली धर्मादाय रुग्णालये पाळत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी वैध मार्गाने लढा आरंभला असून त्यात ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियाना’ला आरंभ केला आहे. २८ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर चालू केलेल्या या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी धर्मादाय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. अनेक ठिकाणी प्रशासनाने अशा नियमबाह्य कृती करणार्‍या धर्मादाय रुग्णालयांची नोंद घेतली असून त्याविषयी पुढील कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पुण्यातील केईएम् रुग्णालयाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे साहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वासन

पुणे : येथील केईएम् रुग्णालयात नियमाप्रमाणे दारिद्य्ररेषेखालील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटा, रिक्त खाटा अशी माहिती फलकावर लावली नसल्याचे आढळून आले होते. तसेच फलकही सर्वांना दिसेल, अशा पद्धतीने लावण्यात आला नव्हता. याच्या विरोधात साहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी जगताप यांनी निवेदन स्वीकारून लगेचच केईएम् रुग्णालयाच्या संबंधित अधिकार्‍यांना भ्रमणभाष करून नियमांचे पालन करण्याविषयी तोंडी सूचना दिल्या, तसेच त्या ठिकाणी तपासणीसाठी अधिकारी पाठवण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. ‘तुम्ही सर्वजण आध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने मी तुमच्याशी वेळ देऊन बोललो. तुम्हाला काहीही सहकार्य लागले तरी सांगा. समितीचे कार्य चांगले असून या योजनेच्या प्रसिद्धीसाठी तुम्हीही आम्हाला सहकार्य करा’, असेही त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना सांगितले.

या वेळी अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मुकुंद मासाळ, दुर्गा वाहिनीच्या सौ. सरिता अंबिके, धर्माभिमानी सौ. शुभांगी आफळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चैतन्य तागडे, दीपक आगवणे, कृष्णाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या वतीने सर्व रुग्णालयांवर देखरेख ठेवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र यात सामाजिक संघटनांनीही सहकार्य केल्यास चांगले होईल. तक्रारींच्या निवारणासाठी प्रत्येक मासाच्या तिसर्‍या शनिवारी नागरिकांची बैठक आयोजित केले जाते. एखाद्या गरीब रुग्णाने उत्पन्नाचा दाखला घेऊन साहाय्य मागितले, तर रुग्णाला त्वरित साहाय्य करण्याचा शासनाचा प्रयत्न असतो; मात्र काही रुग्णालयांकडून शासननियमांची योग्य कार्यवाही केली जात नाही. काही आधुनिक वैद्यांकडूनही रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध नसल्याचे रुग्णांना परस्पर कळवले जाते, असेही जगताप यांनी सांगितले.

हिंदुत्वनिष्ठांना सहकार्य करण्याचे कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांचे आश्‍वासन

कोल्हापूर : येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्याकडे हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार दिल्यावर त्यांनी ‘धर्मादाय आयुक्त कार्यालय हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करेल’, असे आश्‍वासन दिले. या वेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री दिनेश परमार, हिंदु महासभेचे राज्य संघटक संजय कुलकर्णी, मनोहर सोरप, हिंदु महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. दीपाली खाडे, जिल्हाध्यक्ष नंदु घोरपडे, हिंदुत्वनिष्ठ गोविंद देशपांडे, शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे शरद माळी, पतित पावन संघटनेचे आकाश नवरुखे यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील ‘लोटस मेडिकल फाऊंडेशन, वाय.पी. पोवारनगर आणि न्यू शाहूपुरी येथील दाभोलकर मेमोरिअल चॅरिटेबल कॅन्सर जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या रुग्णालयांनी दर्शनी भागात सूचना फलक लावलेे नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. समितीच्या वतीने ‘रुग्णालयांतील अपप्रकारांना आळा घालण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमधील प्रतिनिधी घेऊन एखादी समिती स्थापन करू शकतो का’, असे विचारल्यावर चव्हाण म्हणाले की, ‘तुम्ही तसे पत्र द्या. त्यावर विचार केला जाईल.’

शासकीय योजनेची प्रसिद्धी न करणार्‍या रुग्णालयांना धर्मादाय आयुक्त कार्यालय निरीक्षकांकडून अकस्मात भेटी

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा परिणाम

संभाजीनगर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कृतीविषयी त्यांचे अभिनंदन ! इतर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयांनीही हा आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करतांना मध्यभागी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले आणि अन्य अधिकारी

संभाजीनगर : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्त अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ एप्रिल या दिवशी येथील धर्मादाय सहआयुक्त यांना शासकीय योजनेची प्रसिद्धी न करणार्‍या रुग्णालयांसंबंधी निवेदन देण्यात आले. त्या वेळी धर्मादाय सहआयुक्त श्री. श्रीकांत भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. २९ एप्रिल या दिवशी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील २ निरीक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्या निरीक्षण पथकाने शहरातील रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. तेथे आढळलेल्या स्थितीविषयी तात्काळ पंचनामेही करण्यात आले.

१. कमलनयन बजाज रुग्णालयात शासकीय योजनेची माहिती देणारे फलक लावलेले नव्हते. शासनाच्या योजनेनुसार उपलब्ध जागा आणि आरक्षित जागा यांची माहिती देणारा फलकही लावलेला नव्हता.

२. महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गरजूंसाठी शासनाने दिलेल्या योजनांचा फलक लावला नव्हता.याव्यतिरिक्त धर्मादाय सहआयुक्तांनी स्वतः निर्देश करून अतिरिक्त २ रुग्णालयांची तपासणी करण्यास सांगितले.

धर्मादाय सहआयुक्तांना निवेदन देतांना भाजपचे श्री. अमित लोखंडे, बजरंग दलाचे श्री. सुभाष मोकरिया, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. सुभाष कुमावत, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी, पेशवा संघटनेचे श्री. प्रदीप कळगावकर, जैस्वाल युवा मंचचे श्री. राजेश जैस्वाल, संस्कृत वेदपाठशाळेचे श्री. श्रीराम धानोरकर, श्री. अनिकेत तिवारी, श्री. प्रवीण वैष्णव, श्री. अनंत जैस्वाल, सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा आणि रणरागिणीच्या कु. प्रतीक्षा कोरगांवकर यांसह धर्माभिमानी उपस्थित होते.

धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांचा सकारात्मक प्रतिसाद !

धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. भोसले म्हणाले की, समाजाला अशा प्रकारे कार्य करणार्‍यांची आवश्यकता आहे. समितीच्या उपक्रमामुळे गोरगरिबांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य होईल, अशी अपेक्षा आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर भोसले यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळासह कार्यालयातील साहाय्यक धर्मादाय आयुक्त, धर्मादाय उपायुक्त, अधीक्षक आणि निरीक्षक यांची एकत्रित बैठक घेऊन समितीची भूमिका समजून घेतली. भोसले यांनी समितीने निवेदनात नमूद केलेल्या रुग्णालयांना २९ एप्रिल या दिवशी अकस्मात भेटी देऊन त्यांचा पाहणी अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच या भेटीच्या वेळी समितीचे २ कार्यकर्ते आणि पत्रकार यांना घेऊन जाण्यास सांगितले.

क्षणचित्रे

१. निवेदन देण्यासाठी हिंंदुत्वनिष्ठ वेळेत आले.

२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याचे पाहून धर्मादाय सहआयुक्तांनी कामकाज चालू करण्यापूर्वी १५ मिनिटे आणि कामकाज झाल्यानंतर १ घंटा त्यांना वेळ दिला.

३. धर्मादाय सहआयुक्तांनी दिलेला प्रतिसाद पाहून कार्यालयातील एका कर्मचार्‍याने यापूर्वी अशी बैठक कधीही झाली नसल्याचे सांगून ईश्‍वरी कार्याची प्रचीती दिली.

४. एका महिला निरीक्षकाने हिंदुत्वनिष्ठांची नि:स्वार्थ सेवा बघून धर्मकार्यासाठी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​