‘हिंदु’ हा ‘सिंधु’, या शब्दाचा अपभ्रंश नव्हे : एक विश्लेषणात्मक विवेचन

टीका : ‘हिंदु’ हा शब्द ‘सिंधु’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, याबाबत अनेक विद्वानांनी युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.

खंडण : भाषा शास्त्रकारांच्या मते ‘स’ चे ‘ह’ झाल्याने ‘सिंधु’ या शब्दाचा ‘हिंदु’ असा उच्चार झाला, हे तर्कसंगत नाही; कारण अनेक संस्कृत ग्रथांमध्ये ‘हिंदु’ हा शब्द आढळतो. प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये प्राकृत शब्दांचा प्रयोग होत नव्हता. ‘हिंदु’ हा शब्द संस्कृत नाही, तर तो प्राकृत आहे, असे स्वा. सावरकर यांचेही मत आहे. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. ‘हीन गुणांना त्यागणारा तो हिंदु’, अशी एक व्याख्या आहे.

‘एनसायक्लोपीडिया ऑफ रिलीजन’, या पुस्तकामध्ये ‘हिंदु’ या शब्दाबाबत पुढीलप्रमाणे लिखाण केले आहे. ‘इसवी सन पूर्व ४८६ मध्ये डेरियसच्या एका शिलालेखामध्ये ‘हिंदु’ हे नाव ‘हिंदस’च्या रूपाने पहावयास मिळते.’ येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंग्रजी विद्वानांनीही ‘हिंदु’ या शब्दाला ‘हिंदस’ या नावाने स्वीकारले आहे. केवळ पश्चिमी विद्वानांनी नव्हे, तर चिनी यात्री युआन श्वांग यानेही त्याच्या स्मृतीग्रंथामध्ये ‘हिंदु’ या शब्दाचा उल्लेख केला आहे. दुसरा चिनी यात्री युवान्यांग याने ‘या देशाचे ‘इन्दु’ हे नाव यथार्थ आहे’, असे म्हटले आहे. युआन श्वांग हा इसवी सन ६३० मध्ये भारतात आला होता. तेव्हा इस्लाम धर्माचा गंधही येथपर्यंत पोहोचलेला नव्हता. तथापी त्याने त्याच्या यात्रेच्या कालावधीत या देशाला ‘इंदु’ असे संबोधले. ‘इंदु’ हे ‘हिंदु’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. अरब आणि इराण या देशांतील लोक ‘हिंदु’ या शब्दाचा वापर आमच्यासाठी आदराने करत असत. तेथील रहिवाशांकडून हा शब्द घृणास्पदरीत्या कधीच वापरला गेला नाही.’

– ब्रह्मर्षी विश्वात्मा बावरा, ब्रह्मर्षी आश्रम, विराट नगर, पिंजौर, हरियाणा. (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २.७.२००६)