वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार !

आळंदी येथे श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे झालेल्या १७ व्या वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. अधिवेशनात विविध मान्यवरांनी त्यांची व्यक्त केलेली मनोगते येथे देत आहोत.

व्यासपिठावर उपस्थित मान्यवर वक्ते आणि वारकरी महाराज

शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या शासन निर्णयास विरोध ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात ‘अंड्या’चा समावेश केला आहे. या निर्णयास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध असून शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा; अन्यथा वारकरी संप्रदाय तीव्र आंदोलन उभे करेल.

सर्व समस्यांवर भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे हाच उपाय ! – स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

सज्जन शक्ती मौन असल्याने आज देशविरोधी कारवाया वाढत आहेत. शासनाने ‘डाऊ’च्या आंदोलनकाळात आमच्यावर नोंद केलेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. साधू-संत, तसेच धर्मकार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या साधकांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे. २ वर्षांपूर्वी पालघर येथे साधूंची हत्या झाल्यानंतर मी संन्यास घेऊन धर्मांतराच्या विरोधात कार्य करत आहेत. श्रीराममंदिर हे ज्याप्रकारे धर्मांधांच्या कह्यातून मुक्त झाले, त्याचप्रकारे लवकरच काशी-मथुराही धर्मांधांच्या कह्यातून मुक्त होईल. हिंदूंनी जाती-पातीचे राजकारण सोडून एक हिंदू म्हणून एकत्र यायला हवे. या सर्व समस्यांवर भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे, हाच उपाय आहे.

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी ‘हलाल उत्पादने’ प्रत्येकाच्या घरात पोचली आहेत. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना हलाल प्रमाणपत्र देत आहे. अनेक हिंदु व्यापार्‍यांना उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हे प्रमाणपत्र घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना अतिरेक्यांना न्यायालयीन साहाय्य करत आहे. त्यामुळे हिंदूंनो, हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करूया.

अधिवेशनाला उपस्थित वारकरी

धर्माची मूठ बांधण्यासाठी सनातन संस्था मोठे योगदान देत आहे ! – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

धर्माची मूठ बांधण्यासाठी सनातन संस्था मोठे योगदान देत आहे ! सध्याचे सरकार हे हिंदुत्वाला आणि संतांच्या विचारांना पूरक असे सरकार आहे. माझी भूमिका समन्वयाची असून इंद्रायणीचे प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही चिखली, कुदळवाडी येथे ४ आस्थापनांना तात्काळ ‘सील’ ठोकले. त्यामुळे येत्या २-३ मासांत इंद्रायणीची स्वच्छता चालू करण्याची प्रक्रिया लवकरच चालू होईल.

जो धर्माचे रक्षण करतो, त्याच्या पाठीशी हिंदूंनी उभे रहावे ! – ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते

प.पू. वक्ते महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते म्हणाले, ‘‘वैकुंठवासी पू. निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म हा धर्मकार्यासाठीच झाला होता. तोच आदर्श आपण सर्वांनी यापुढील काळात समोर ठेवावा लागेल. सद्यःस्थितीत भारतात असलेले अनेक कायदे अन्य धर्मियांसाठी नसून केवळ हिंदु धर्मियांसाठीच आहेत, अशी स्थिती आहे. त्यासाठी जो धर्माचे रक्षण करतो, त्याच्या पाठिशी हिंदूंनी उभे रहाणे महत्त्वाचे आहे.’’

या प्रसंगी ह.भ.प. निरंजन कोठेकर शास्त्री महाराज म्हणाले, ‘‘स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा अधिवेशनांची आवश्यकता आहे.’’

धर्माच्या रक्षणासाठी सजग रहावे लागेल ! – ह.भ.प. तुणतुणे महाराज

अनेक ठिकाणी हिंदूच हिंदु धर्माच्या विरोधात उभे रहातात, हे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या वेळी अनुभवले आहे. त्यामुळे यापुढे वारकर्‍यांना नेभळट राहून चालणार नाही, तर धर्माच्या रक्षणासाठी सजग रहावे लागणार आहे. ‘संघे शक्ती कालौयुगे’ या उक्तीप्रमाणे समस्त हिंदूंनी सध्या संघटित रहायला हवे.

अधिवेशनाला उपस्थित वारकरी

तरुणांनो, उठा आणि राष्ट्र-धर्मासाठी कार्य करा  ! – ह.भ.प. कोकरे महाराज

सनातन संस्था आम्हाला ‘माते’समान आहे. आता मोहिमा हातात घेऊन, त्या थेट निकाल लागेपर्यंत राबवण्याची वेळ आली आहे. गोहत्या असेल, सनातन संस्थेच्या साधकांची अन्याय्य अटक असेल, इंद्रायणीचे प्रदूषण असेल, या सर्वांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती होईपर्यंत आपल्याला लढा द्यावा लागेल. त्यासाठी आता बोलण्यापेक्षा तरुणांनो, उठा आणि राष्ट्र-धर्मासाठी कार्य करा.

हिंदु तरुणींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’चे गंभीर परिणाम ओळखून हिंदु तरुणी आणि महिला यांनी सावध झाले पाहिजे. तरुणीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे, तसेच धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास लव्ह जिहादला हिंदु तरुणी बळी पडणार नाहीत.

धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी धारकरी बनून कार्य करावे ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी

केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आज हिंदु धर्म, हिंदुत्व यांवर आघात होत आहेत. बुलढाणा, नंदूरबार, गडचिरोली येथे धर्मांतराने वेग धरला असून आळंदी येथे हिंदु कुटुंबास फसवून ख्रिस्ती करण्याचे प्रयत्न झाले. याचा अर्थ हे संकट आपल्या दारापर्यंत आले ! नक्षलवाद, इस्लामी आतंकवाद यांची गंभीर समस्या आपल्यासमोर आहे. संतांनाही जातीत विभागण्याचे षड्यंत्र चालू आहेत. ‘गजवा ए-हिंद’चे मोठे संकट आपल्यासमोर असून ‘सीमी’ ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या संघटना देश पोखरत आहेत. त्यामुळे हिंदु धर्मावर असलेली विविध संकटे दूर करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला धर्मकार्य करावे लागले आणि धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांना धारकरी बनावे लागेल, असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. ते ‘राष्ट्रासमोरील संकटे’ या विषयावर बोलत होते.

या प्रसंगी अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले,

१. ‘जो जे वांछील तो ते लाभो’, असा महान विचार करणारी भारतीय संस्कृती आहे. ‘सनातन’ म्हणजेच हिंदु संस्कार होय. आज जागतिक स्तरावर पाश्चात्यांनाही योगासनांचे महत्त्व पटलेले आहे. हिंदु संस्कृतीचे महत्त्व सर्व स्तरांवर पटलेले असतांनाच दुसरीकडे या संस्कृतीवर आज चारही बाजूंनी आक्रमणे होत आहेत. ज्ञानाच्या नावाखाली पाश्चात्त्य देशांत विकृती निर्माण होत आहेत. ‘हिंदु धर्म चुकीचा आहे, दुष्ट आहे’, असा प्रचार करून हिंदु धर्माला नावे ठेवण्याचे काम चालू आहे आणि त्यांनाच आज दुर्दैवाने तज्ञ म्हटले जात आहे.

२. मी वारकरी असून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ बसून मी २८ वर्षांपूर्वी गळ्यात माळ घेतलेली आहे. येथे असणारी गर्दी पाहिली की, जोपर्यंत महाराष्ट्रात ‘संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज’ आहेत, तोपर्यंत येथील संस्कृती-परंपरा टिकून राहील, याचा विश्वास वाटतो आणि जोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे, तोपर्यंत भारत जिवंत राहील.

३. बिहारसारख्या राज्यात ‘मुसलमान’ आय.पी.एस्. अधिकारी पकडला जातो, यावरून ‘गजवा-ए-हिंद’चे कारस्थान किती मोठे आहे ? हे लक्षात येते.

प्रत्येक नागरिकाला आता एक सैनिक बनून कार्य करावे लागेल ! – ब्रिगेडिअर (नि.) हेमंत महाजन

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

या प्रसंगी ब्रिगेडिअर (नि.) हेमंत महाजन ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने’ या विषयावर बोलतांना म्हणाले, ‘‘वर्ष २०१४ पासून आपल्यासमोरील संकटे अल्प झाली; मात्र संकटे संपलेली नाहीत ! जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात असेल, तोपर्यंत काश्मीरचे संकट संपणार नाही. अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून अराजकता माजवून जातीय दंगली भडकावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आता दंगलींचे लोण गावापर्यंत पोचले आहे. बांगलादेशी घुसखोर्‍यांची समस्या गंभीर होत असून अर्बन नक्षलवाद, माओवाद, अंतर्गत घुसखोरी वाढत आहे. चीनने आर्थिक घुसखोरी केली आहे. त्यामुळे हिंदु धर्मावर असलेली संकटे गंभीर असून प्रत्येक नागरिकाला एक सैनिक बनून आता कार्य करावे लागेल.

१. चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे आपल्या देशाचे शत्रू आहेत. ते आपल्या सीमेवरती आक्रमणे करतात. तेथे भारतीय सैन्य आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मीरमधील आतंकवाद जवळ जवळ संपुष्टात आला; पण पाकिस्तान असेपर्यंत आतंकवाद संपणार नाही. हा आतंकवाद संपवण्यासाठी पाकिस्तानचे तुकडे व्हायला हवेत.

२. शहरी नक्षलवाद म्हणजे शहरामध्ये रहाणारे काही बुद्धीवादी, ज्यांची वाट चुकलेली आहे आणि ते चुकीच्या गोष्टी समाजात पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. दंगल झाली की, हिंसाचार होतो आणि पुष्कळ मोठी हानी होते. त्यामुळे आज जर देशाची आर्थिक प्रगती थांबवायची असेल, तर काहीतरी कारण काढून दंगल करायची, हिंसाचार करायचा, रस्ते बंद करायचे. हेच रस्ते बंद केल्यानंतर महागाई वाढायला लागते. २ वर्षांपूर्वी शेतकर्‍याचे एक तथाकथित आंदोलन २ वर्षे चालले. त्यांनी २ वर्षे देहलीचे रस्ते बंद करून ठेवले होते. त्यामुळे देहलीची प्रतिदिन ४ सहस्र ते ५ सहस्र कोटी रुपये हानी होत होती.

४. लाखो बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्र, पुणे, मुंबई, संभाजीनगर, भिवंडी, मालेगावमध्ये आहेत. जिथे रस्ते, मोठे पूल, मेट्रोची कामे चालू आहेत, तिथे काम करणारे अनेक कामगार हे बांगलादेशी आहेत. ज्यांना आधारकार्ड, शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रे आपल्याकडीलच भ्रष्ट व्यवस्था उपलब्ध करून देते.

निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचा वारकरी संप्रदायाचा निर्णय कौतुकास्पद ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘आजही १८ लाख १५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते, तसेच हिंदु धर्मावर होणारे आघात वाढतच असून राजकीयदृष्ट्या जरी अनुकूल वातावरण दिसत असले, तरी धर्माच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आलेली नाही. सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’द्वारे गरळ ओकणारे साम्यवादी आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. याचसमवेत हिंदु धर्म विरोधकांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ‘सनातन धर्मरक्षक’ बनावे लागेल. कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यांच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांच्या आणि हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या अटक झाल्या आहेत, त्या अन्याय्य असून या अधिवेशनाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाने ठामपणे हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे रहाण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.’’

१. आता आळंदीच्या भूमीमध्येही धर्मांतराचा घाट घातला जात आहे. त्यामुळे धर्मांतराचे संकट हे आळंदी, देहू, पैठण येथपर्यंत पोचू लागले आहे. कानिफनाथ देवस्थान येथे कीर्तन करणार्‍या वारकरी भक्तांना धर्मांधांनी मारहाण केली. ज्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा सप्ताह होतो, त्या गावात धर्मांतराची घटना घडत नाही, ही संप्रदायाची शक्ती आहे.

२. मागील १० वर्षांमध्ये ४ पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या, या हत्यांच्या पाठीमागे षड्यंत्र आहे. आजपर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नसतांना डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वर्ष २०१६ पासून कारागृहात ठेवण्यात आले आहे. हा निरपराध्यांवरील अन्याय नव्हे का ? या पुरोगाम्यांच्या हत्याकांडातील अन्वेषणात अत्यंत त्रुटी आहेत; मात्र कोणतेही प्रसारमाध्यम त्रुटी पहात नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून सरकारकडून पैसे घेऊन शाम मानव हे हिंदु धर्म, साधू-संत यांचा जाहीररित्या अवमान करत आहेत. त्यामुळे शाम मानव यांची त्या सरकारी समितीवरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या अधिवेशनाच्या माध्यमातून करत आहोत.

१७ व्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आलेले काही ठराव !

अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांवर होत असलेल्या अन्यायाविषयी आणि विविध कथित गुन्ह्यांखाली जे जे अटकेत आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा निर्धार एकमुखाने करून हात उंचावून समर्थन देतांना सर्व मान्यवर

१. संत, संत वाङ्मय, धर्मग्रंथ, हिंदु देवता यांचा अपमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ‘ईशनिंदा कायदा’ लागू करण्यात यावा.

२. पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी येथे सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी.

३. संत साहित्य, संत वाङ्मय, रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अभंग गाथा इत्यादींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा आणि संस्कृत अन् मराठी भाषा यांना अधिक प्राधान्य द्यावे.

४. समस्त वैष्णवजनांची आणि हिंदूंची तीर्थस्थळे श्रीक्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूर आणि पैठण यांसह सर्वच तीर्थस्थळे मद्य-मांस मुक्त करण्यात यावीत. किमान ५०० मीटर अंतरापर्यंत यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी.

५. गायरान भूमीवरील अतिक्रमण हटवून अवैध गोवंश हत्या करणार्‍या कसायांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी.

६. हिंदूंची श्रद्धास्थाने, हिंदु राष्ट्र-धर्म यांविरोधात वक्तव्य करून बहुसंख्य हिंदूंचा, देशभक्तांचा अवमान करून समाजात तेढ निर्माण करणारी द्वेषपूर्ण वक्तव्य (हेट स्पीच) करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

७. ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’, तसेच ‘धर्मांतर बंदीचा कायदा’ देशभरात तात्काळ लागू करावा.

८. न्यायालयाच्या निर्देशांनुसार कोणत्याही धर्मनिरपेक्ष सरकारला मंदिरे कह्यात घेण्याचा अधिकार नाही, तरी सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारमुक्त करून भक्तांच्या कह्यात देण्यात यावीत.

९. देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा त्वरित करण्यात यावा.

१०. गड-दुर्गांवर झालेली अतिक्रमणे सरकारने निश्चित समयमर्यादा ठेवून आणि कालबद्ध कार्यक्रम ठरवून हटवावीत.

११. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धन जमा करणार्‍या संघटनांचे आर्थिक व्यवहार, तसेच त्यांच्याद्वारे आतंकवादी कारवायांना केले जाणारे कायदेशीर साहाय्य यांचे सखोल अन्वेषण करून दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करावा.

१२. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थानात कीर्तन करणार्‍या वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात केवळ कारवाई न करता त्याचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी.

१३. कथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांत निरपराध, हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय कारवाई थांबवावी.

१४. ‘बिअर बार’, मद्यालये यांना संत, देवता, राष्ट्रपुरुष, गडदुर्ग आदींची नावे देण्यात येऊ नयेत’, या शासनाच्या अध्यादेशाची कठोर कार्यवाही करावी.

१५. जादूटोणाविरोधी कायदा कायमस्वरूपी रहित करावा.

१६. ‘जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती’च्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी.

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​