यावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड)

राजे निंबाळकर गडाचे संरक्षण आणि संवर्धन करा !

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे ऐतिहासिक राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) असून सद्यःस्थितीत त्याची पडझड होत आहे. हा गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या विदारक अवस्थेकडे प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यांविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

डॉ. अभय रावते

१. महाभारताचे रचयिते श्री महर्षि वेदव्यास यांची भूमी असलेल्या यावल शहरातील निंबाळकर राजांचा ऐतिहासिक भुईकोट गड !

‘सातपुडा पर्वतरांगांतील तापी नदीच्या खोर्‍यात असलेले यावल शहर हे महाभारताचे रचयिते श्री महर्षि वेदव्यास यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. महर्षि व्यासमुनी यांच्या भारतात असलेल्या २ मंदिरांपैकी एक मंदिर यावल येथे आहे. शिरपूर-चोपडा-यावल-बुर्‍हाणपूर या मध्ययुगीन व्यापारी मार्गांवर असलेले यावल शहर हे इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण होते. या शहरात सुरनदीच्या काठावर ‘निंबाळकरराजे यांचा गड’ म्हणून ओळखला जाणारा सूर्याजीराजे निंबाळकर यांचा भुईकोट गड आहे.

गडाचे ढासळलेले बुरूज

२. निंबाळकर राजघराण्याचा इतिहास

वर्ष १७८८ ते १८४३ या काळात यावल येथे सूर्याजीराजे निंबाळकर यांचे राज्य होते. राव निंबाळकर यांचे ते सुपुत्र होते. साक्री, यावल आणि भुसावळ येथपर्यंत त्यांची जहागिरी होती. तेथे ते सरदार म्हणून नियुक्त होते. त्यानंतर त्यांनी यावल गडाची उभारणी केली. जिल्हा ‘गॅझेटिअर’नुसार (भौगोलिक शब्दकोश) वर्ष १७८८ मध्ये ग्वाल्हेरचे शिंदे यांच्या मालकीच्या असलेल्या यावल शहरासाठी राव निंबाळकर यांना अधिपती म्हणून नेमण्यात आले होते. ‘वाठार निंबाळकर (फलटण) येथे सूर्याजीराजे निंबाळकर यांचे घराणे होते, तसेच त्या वेळचे कोल्हापूरचे छत्रपती आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांच्याशी संलग्नित हे राजे निंबाळकरांचे घराणे होते’, असे म्हटले जाते.

गडाचे वरून दिसणारे विहंगम दृश्य आणि ढासळलेली तटबंदी

३. राजे निंबाळकर गड हा मराठे आणि इंग्रज यांच्यातील अनेक संघर्ष अन् घडामोडी यांचा एकमेव साक्षीदार !

१७ व्या शतकाच्या शेवटी मराठेशाहीच्या विस्तारकाव्यात यावल हे परगण्याचे ठिकाण होते. इंग्रज राजवटीत यावल परगणा कह्यात घेण्यासाठी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये अनेक वेळा संघर्ष झाला. हा गड त्या संघर्षाचा एकमेव साक्षीदार आहे. युद्धात हा गड कधी मराठ्यांकडे, तर कधी इंग्रजांकडे असा क्रम अनेक वर्षे चालला. वर्ष १८४४ मध्ये यावल इंग्रजांच्या कह्यात गेले. वर्ष १८१९ मध्ये यावलसाठी मराठ्यांचा इंग्रजांकडून पाडाव झाला. त्यात इंग्रजांना यावल, चोपडा, लोहारा मंडळांतील १२ गावे द्यावी लागली. त्यांचे हस्तांतर वर्ष १८२० मध्ये झाले. त्या काळात राव निंबाळकर यांचा मुलगा सूर्याजीराव यांच्या हाताखालील ३ सहस्रांची सेना इंग्रजांनी निष्प्रभ केली होती. मराठ्यांच्या सेनेत भिल्ल आणि पेंढारी होते. ही जमात आक्रमक आणि लढवय्यी होती. वर्ष १८३७ मध्ये यावलसह चोपडा, पाचोरा आणि लोहारा यांच्यातील १२ गावे इंग्रजांनी पुन्हा शिंदे यांच्या स्वाधीन केली. वर्ष १८४४ मध्ये ब्रिटीश आणि शिंदे यांच्यात ‘ग्वाल्हेर करार’ झाला. त्यानुसार शिंदे यांनी १२ गावे पुन्हा इंग्रजांना परत केली; मात्र लालजी सखाराम नामक मामलेदाराने यावल इंग्रजांना परत देण्यास विरोध केला.

बुरुजावर वाढणार झाडी

बेल नामक जिल्हाधिकारी यावलचे नियंत्रण घेण्यास आले असता लालजी सखाराम हे स्वतःचा लिपिक आणि ३०० सैनिक यांच्या समवेत गडावर तैनात होते. त्यामुळे जिल्हाधिकारी बेल यांना माघारी फिरावे लागले. बेल यांनी आशीरगड आणि मालेगाव येथून सैन्याची मागणी केली. यावलच्या एका बाजूला असलेल्या साकळी आणि दुसर्‍या बाजूला असलेल्या भालोद येथे सैन्यासह तळ ठोकला. वर्ष १८३७ मध्ये यावल पुन्हा शिंदे यांच्याकडे गेले आणि वर्ष १८४३ पर्यंत ते त्यांच्याकडेच होते.

बुरुजावर वाढणार झाडी

वर्ष १८४३ च्या सुमारास ग्वाल्हेरचे शिंदे यांच्याकडून सूर्याजीराजे निंबाळकर आणि आसिर गडचा खान यांच्यात युद्ध झाल्याचा उल्लेख आहे. त्यात बरीच मनुष्यहानी झाली होती. अशी नोंद त्या वेळच्या महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये आढळते. वर्ष १९८८ मध्ये झालेल्या ‘यावल शहर विकास योजना’ आराखड्यात या नोंदी आढळतात. झांबरे-देशमुख यांना काही काळासाठी यावल परगणाचे जहागीर म्हणून केल्याच्या नोंदीही आढळतात; पण हा काळ नेमका कोणता होता, याची निश्चिती करता येत नाही. असा हा राजे निंबाळकर गड मराठे आणि इंग्रज यांच्यातील अनेक संघर्ष अन् घडामोडी यांचा एकमेव साक्षीदार आहे.

गडावरील ऐतिहासिक विहीर

४. राजे निंबाळकर गडाच्या विदारक अवस्थेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

४ अ. बुरूज ढासळून त्यांची पडझड होणे : वर्ष १७८८ ते १८४३ या काळात सूर्याजीराजे निंबाळकर यांचे येथे राज्य होते. त्यांच्या काळातच गड बांधला होता. भुईकोट गड अतिशय प्रेक्षणीय असून विटा, चुना आणि दगड यांच्या साहाय्याने गडाचे बांधकाम केले गेले होते. आजही या गडाला भेट दिल्यास तेथे दिमाखात उभे असलेले बुरूज, तटबंदी आणि गडावरील अवशेष आपल्याला पहायला मिळतात. हा गड यावल शहराच्या पश्चिमेस सुरनदीच्या काठावरील एका टेकडीवर बांधण्यात आला आहे. चौकोनी आकाराचा हा गड साधारण दीड एकर परिसरात पसरलेला असून त्याच्या तटबंदीत लहान-मोठे असे ९ बुरूज आहेत. त्यातील २ बुरूज हे पूर्णपणे ढासळले आहेत, २ बुरूजांची काही प्रमाणात पडझड झाली आहे आणि ५ बुरूज अद्यापही दिमाखात उभे आहेत. या गडामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले पहिले पूर्वाभिमुख दार आणि दुसरे उत्तराभिमुख दार आज केवळ अवशेष रूपाने शिल्लक आहे. गडामध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते.

गडावरील ऐतिहासिक वाड्याचे अवशेष

४ आ. गडाच्या पश्चिमेकडील बाजूची पडझड होणे : नदीच्या दिशेने (पश्चिमेकडील) असलेली गडाची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असून बुरूजांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. न्यायालयाच्या बाजूच्या गडाची (उत्तरेकडील) तटबंदी आणि बुरूज अद्यापही पूर्णपणे शाबूत आहेत. इतर बाजूंच्या तटबंदी आणि बुरूज यांच्या तुलनेत या बाजूला पडझड झालेली आढळत नाही; पण त्याकडे सतत दुर्लक्ष झाल्याने हळूहळू त्यांचीही पडझड व्हायला वेळ लागणार नाही. आताच या बुरुजांमध्ये झाडे उगवू लागल्यामुळे तेथे मोठमोठे तडे जाण्यास प्रारंभ झाला आहे.

४ इ. गडाच्या पूर्वेकडील बाजूच्या ३ बुरूजांपैकी २ बुरूज ढासळणे : पूर्वेकडील बाजूने गडाची तटबंदी आणि बुरूज सहज दृष्टीस पडतो. तटाची उंची भूमीपासून ९० ते १०० फूट असल्याचे लक्षात येते. दुर्दैवाने या बाजूने असलेल्या ३ बुरूजांपैकी २ बुरूज ढासळले असून ते शेवटच्या घटका मोजत आहेत. पूर्ण शाबूत असलेल्या एका बुरूजात मोठे झाड उगवल्याने त्याला मोठा तडा गेला आहे आणि तोही आता ढासळण्याच्या मार्गावर आहे. त्याकडे लवकर लक्ष देणे आवश्यक आहे.

४ ई. गडाच्या दक्षिणेकडील बाजूचा बुरूज भुईसपाट होण्याच्या मार्गावर ! : गडाच्या दक्षिणेकडील बाजूने शाबूत असलेली तटबंदी मागील काही वर्षांपासून हळूहळू ढासळायला लागली आहे. बुरूज तर येत्या काही वर्षांत भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत.

गडावर असलेले कुंड

५. गडावर प्रमुख सरदार आणि सैनिक यांचे वाडे असण्याची शक्यता असणे

गडामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या पहिल्या पूर्वाभिमुख दारातून प्रवेश केल्यावर आपण ५ मिनिटांमध्ये गडावर पोचतो. साधारण दीड एकरात गडाचा परिसर असल्यामुळे गड पहायला अर्धा घंटा पुरेसा आहे. डाव्या बाजूला त्या काळातील सुस्थितीत असलेली विहीर आजही दृष्टीस पडते. विहिरीचे बांधकाम पाहून मन थक्क होते. साधारण २०० फुटांहून अधिक खोल असलेल्या विहिरीची पातळी सूर्य डोक्यावर आल्याविना दिसत नाही.

गडाच्या मध्यभागी वाड्याचा एक चौथरा असून त्या काळात गडावर राबता असल्यामुळे तेथे निवासासाठी वाडे होते, हे गडावर असलेल्या आणि शेष राहिलेल्या भिंती किंवा चौथरे यांवरून लगेच लक्षात येते. त्या वेळी यावलमधील इतर ठिकाणांपेक्षा हा गड सुरक्षित ठिकाण असल्यामुळे तेथे प्रमुख सरदार आणि सैनिक यांचेही वाडे असतील, यात शंका नाही.

तटबंदी आणि बुरूज यांच्यावर बंदूक अन् तोफ यांच्यासाठी असलेल्या जंग्या (तोफगोळे डागण्यासाठी बुरुजांना असलेली खिडकी) आजही सुस्थितीत असल्याचे पहायला मिळते. गडावरील कुंड आजही सुस्थितीत असल्याचे दिसते. हे स्नानकुंड आहे, कारंजे आहे कि दुसरे काहीतरी आहे ? याविषयी व्यवस्थित सांगता येत नाही; पण ‘गडावर असलेले राजवैभव कसे असेल ?’, याची साक्ष देण्यासाठी हे कुंड पुरेसे आहे. गडाच्या बाहेरील बाजूला साधारण ७० ते ८० फुटांवर आपल्याला अजून एक संरक्षक तटबंदी पहायला मिळते. तिचे आता केवळ काही अवशेष शेष राहिलेले आहेत.

तोफा आणि बंदुका यांसाठी गडावर असलेल्या जंग्या (तोफगोळे डागण्यासाठी बुरुजांना असलेली खिडकी)

६. गडाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे सहस्रो वर्षांपूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून येणे

काही मासांपूर्वी राजे निंबाळकर गडावर जळगाव येथील ‘हेरिटेज फाऊंडेशन’चे संचालक आणि ‘दख्खन पुरातत्व अन् सांस्कृतिक संशोधन केंद्र, भाग्यनगर’ येथील संचालक श्री. भुजंगराव बोबडे, महाराष्ट्र राज्य कर साहाय्यक आयुक्त श्री. समाधान महाजन आणि श्री. पार्थ महाजन यांनी भेट दिली. तेव्हा त्यांना या ठिकाणी सहस्रो वर्षांपूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले. ‘विशेष म्हणजे सहस्रो वर्षांपूर्वीपासून ते उत्तर मध्ययुगीन कालखंडापर्यंतचे अवशेष येथे आढळले आहेत. ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे’, असे श्री. बोबडे यांनी सांगितले. श्री. बोबडे म्हणाले, ‘‘या बुरुजापासून गढीवर जात असतांना पायाखाली चमकदार लाल-तांबड्या रंगाची काही खापरे आम्हाला मिळाली. तेथे केवळ लाल-तांबड्या रंगाची खापरे नसून गडद काळ्या रंगाची चमकदार खापरेही दिसून आली. त्यामुळे पुष्कळ आनंद झाला; कारण आतापर्यंत हे ठिकाण केवळ मध्ययुगीन किंवा मराठा कालखंडातील गढीचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते; परंतु येथे प्रथमच असे पुरातत्वीय अवशेष मिळाले आहेत.’ श्री. बोबडे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाला माहिती दिली आहे.

गडाचा नकाशा

७. राजे निंबाळकर गडाकडे अधिक दुर्लक्ष झाल्यास तो पुढील पिढीसाठी दंतकथा ठरण्याची भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त करणे

वास्तविक आपल्या देशाला लाभलेल्या सहस्रो वर्षांपूर्वीच्या वारशाचे जतन करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासनाने ठरवले, तर हा गड पूर्ववत् करणे अवघड नाही. तसे झाले, तर जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून हा गड नावारूपाला येऊ शकतो. आज दिमाखात उभा असणारा आणि यावल नगरीपासून आजूबाजूच्या परिसराचे संरक्षण करणारा गड स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहे. जीर्णावस्थेतील या खुणा येणार्‍या काळात पुसल्या जाणार असल्याने भावी पिढीसाठी त्या दंतकथा ठरण्याची भीती इतिहासप्रेमींमध्ये वर्तवली जात आहे, अन्यथा येणार्‍या पिढीला येथील मोकळ्या जागेकडे बोट दाखवून सांगावे लागेल की, एकेकाळी येथे एक गड होता !

– संकलक : डॉ. अभय रावते, संस्थापक सदस्य, ‘एक दिवस राजांसाठी’ संघटना, यावल, जिल्हा जळगाव

स्थानिक शिवभक्तांनी ‘एक दिवस राजांसाठी’ या संघटनेच्या अंतर्गत गडाची स्वच्छता केल्याने तेथे लोकांची वर्दळ वाढणे

यावल येथील राजे निंबाळकर गड एकेकाळी या शहराचे राजवैभव असल्याची प्रचीती देतो. मध्ययुगीन काळातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा सुंदर गड आज केवळ दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होत आहे. या गडाची वेळीच डागडुजी न केल्यास तो केवळ ढिगार्‍याच्या रूपात शेष उरेल. काही वर्षांपूर्वी गडाच्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी घाण आणि काटेरी झुडपे यांनी तो व्यापलेला होता. हे लक्षात आल्यावर स्थानिक शिवभक्तांनी एक दिवस गडाच्या स्वच्छतेला प्रारंभ केला. त्यांनी ‘एक दिवस राजांसाठी’ या संघटनेच्या अंतर्गत कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. ज्या गडावर वर्षानुवर्षे कुणी पाय ठेवत नव्हते आणि जेथे शौचासाठी लोक जात होते, त्याला पायबंद बसला आहे. आता लोक सकाळ-संध्याकाळ गडावर फिरायला जातात.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​