Sign Petition : ‘विजयदुर्ग’ किल्‍ल्‍याची झालेली दुरावस्‍था पाहता त्याच्या संवर्धनासाठी त्‍वरित आदेश देण्‍यात यावे !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्‍य ठेवा आणि हिंदवी स्‍वराज्‍याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्‍ल्‍याकडे होणारे अक्षम्‍य दुर्लक्ष !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या निर्मितीमध्‍ये किल्‍ल्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘ज्‍याच्‍या हाती आरमार त्‍याची समुद्रावर सत्ता,’ हे मर्म ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या आरमाराची निर्मिती केली. त्‍यासाठी त्‍यांनी समुद्राकाठावर आणि समुद्रात जलदुर्गांची निर्मिती केली. त्‍या माध्‍यमातून समुद्रातून स्‍वराज्‍यावर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी आदींकडून होणार्‍या आक्रमणांचा बिमोड करत स्‍वराज्‍याचे रक्षण केले; म्‍हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्‍ही’ (भारतीय नौदलाचे जनक) असे म्‍हटले जाते. जलदुर्ग किल्ले हे त्‍यांंच्‍या दुर्गबांधणीच्‍या तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व अविष्‍कार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यांचे मावळे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील एक जलदुर्ग म्‍हणजे विजयदुर्ग किल्ला ! भावी पिढीमध्‍ये धर्माभिमान आणि राष्‍ट्राप्रती निष्‍ठा अन जाज्‍वल्‍य अभिमान निर्माण करण्‍यासाठी अशा किल्‍ल्‍यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने आज या किल्‍ल्‍यांची स्‍थिती दयनीय झाली आहे. छत्रपती शिवरायांच्‍या हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या आरमाराचे प्रमुख केंद्र झालेल्‍या विजयदुर्ग किल्‍ल्‍याचे जतन, दुरुस्‍ती आणि संवर्धन होणे आवश्‍यक आहे. सरकारच्‍या पुरातत्‍व विभागाने आवश्‍यक ती पावले उचलायला हवीत. शासनकर्त्‍यांनीही इच्‍छाशक्‍ती दाखवून किल्‍ल्‍याचे जतन आणि संवर्धन करायला हवे.

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंनी या ऑनलाईन याचिकेद्वारा आपल्या मागण्या कराव्या !

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की कृपया खाली दिलेल्या ‘Send Email’ या बटनवर क्लिक करून आपल्या मागण्या इ-मेलद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री, मा. पालक मंत्री, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रआणि भारतीय पुरातत्त्व खात्याचे पश्चिम भारत प्रादेशिक संचालक यांना पाठवाव्या ! त्यासह या इ-मेलची एक प्रत (Copy) आम्हाला [email protected] या इमेल पत्त्यावर पाठवावी ! 
(Note : ‘Send Email’ हे बटन केवळ मोबाईलवर क्लिक केल्यानेच कार्यान्वित होते. डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर चालत नाही !)

Send Email

विजयदुर्ग किल्‍ल्‍याचा इतिहास

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील देवगड तालुक्‍यात ‘विजयदुर्ग’ हा अतिशय बळकट जलदुर्ग वाघोटन खाडीजवळ उभा आहे. तिन्‍ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूला खुष्‍कीचा म्‍हणजे जमिनीचा मार्ग, अशी विशिष्‍ट भौगोलिक रचना असल्‍याने हा जलदुर्ग अभेद्य झाला आहे. शिलाहारांनी वर्ष ११९६ ते १२०५ या कालावधीत ‘घेरिया दुर्ग’ बांधला. पुढे तो देवगिरीच्‍या यादव सत्तेकडे आणि त्‍यानंतर विजयनगरच्‍या सम्राटांच्‍या कह्यात आला. पुढील कालखंडात हा जलदुर्ग ५ शकले झालेल्‍या बहमनी सुलतानी सत्तेपैकी एक असलेल्‍या विजापूरच्‍या आदिलशहाकडे आला. वर्ष १६५३ मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांनी किल्‍ल्‍याच्‍या निशाणकाठी टेकडीवर स्‍वहस्‍ते भगवा ध्‍वज फडकावला. प्रवेशद्वारावर श्री हनुमंताचे मंदिर उभारण्‍यात आले. मूळचा ५ एकरांच्‍या विस्‍ताराच्‍या ‘घेरिया’ किल्‍ल्‍याच्‍या जागी शिवरायांनी १७ एकर १९ गुंठे विस्‍ताराचा तिहेरी तटबंदीमध्‍ये २७ बुरुज असलेला नवा जलदुर्ग म्‍हणजेच विजयदुर्ग घडवला. किल्‍ल्‍यातील ३ बुरुज तीन मजली आहेत. त्‍याच्‍या उंच, रुंद आणि मजबूत चिरेबंदी तट-बुरुजांपुढे परकीय शत्रूंच्‍या भेदक तोफांनीही हार मानली होती. इंग्रज म्‍हणायचे, ‘घेरियावर (विजयदुर्गावर) आम्‍ही आक्रमण केले; परंतु तेथे आमच्‍या तोफांचे गोळे कापसाचे किंवा लाकूड तासून शेष राहिलेल्‍या भुसाचे केले होते, असा अनुभव आला.’

विजयदुर्ग किल्‍ल्‍याची मन विषण्‍ण करणारी दुरवस्‍था !

१. तटबंदीवर वाढलेले गवत आणि झाडे

किल्‍ल्‍यात प्रवेश केल्‍यावर शिवकालीन श्री मारुती मंदिरासमोरील वाटेने किल्‍ल्‍याकडे जातांना किल्‍ल्‍याची भव्‍य तटबंदी दिसते; या तटबंदीवर गवत आणि झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यामुळे तटबंदीला धोका उत्‍पन्‍न झाला आहे.

२. दरवाजा नसलेली जिबी

पडकोट खुष्‍क भागातून पुढे गेल्‍यावर जिबीचा दरवाजा लागतो. किल्‍ल्‍याचे हे दुसरे प्रवेशद्वार आहे. येथे ‘जिबीचा दरवाजा’ म्‍हणून पाटी लावलेली आहे; मात्र येथे दरवाजा दिसत नाही. दरवाजाजवळील दगडी जिन्‍यावर गवताचे साम्राज्‍य आहे.

३. अनेक ठिकाणी कोसळलेली तटबंदी

अ. विजयदुर्ग किल्‍ल्‍याचे वैशिष्ट्‌य म्‍हणजे तिहेरी तटबंदी. किल्‍ल्‍याच्‍या महाद्वारासमोरील पहिली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहे.

आ. ३ ऑगस्‍ट २०२० या दिवशी जिबीचा दरवाजा आणि किल्‍ल्‍याचे महाद्वार यांमधील दुसरी चिलखती तटबंदी (अनुमाने ३० ते ४० फूट) कोसळली. त्‍याच्‍या पहाणीसाठी राजकारणी, नेते आणि लोकप्रतिनिधी येथे येऊन गेल्‍यावर त्‍याची वृत्ते छायाचित्रांसह प्रसिद्ध झाली. पुरातत्‍व विभागानेही आश्‍वासने दिली; मात्र अद्याप तटबंदीचे काम करण्‍यात आलेले नाही.

४. महाद्वाराला दरवाजे नाहीत !

किल्‍ल्‍याचे भूषण म्‍हणजे महाद्वार ! शत्रूसैन्‍याला महाद्वारापर्यंत येऊ न देण्‍यासाठी सैनिक प्राणांची बाजी लावत; मात्र सद्यःस्‍थितीत गडाच्‍या महाद्वाराला दरवाजेच नाहीत. हे पाहून मन विषण्‍ण होते.

५. महाद्वारासमोरील भव्‍य चिलखती तटबंदी झाडे आणि गवत यांनी पोखरलेली असणे

जिबीच्‍या दरवाजातून किल्‍ल्‍याच्‍या महाद्वाराकडे जातांना डावीकडे भव्‍य चिलखती तटबंदी दिसते. त्‍यावर झाडे आणि गवत वाढून ती पोखरलेली आहे. स्‍वच्‍छता न केल्‍यास ही तटबंदी ढासळण्‍याची शक्‍यता आहे.

६. देवडी आणि नगारखाना यांची दूरवस्‍था

किल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारातून आत गेल्‍यावर डाव्‍या आणि उजव्‍या बाजूला देवड्या आहेत. डाव्‍या बाजूच्‍या देवडीत अस्‍ताव्‍यस्‍त पडलेले लाकूड आणि महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अतिशय खराब झालेला फलक दिसतो. फलकावरील लिखाण नीट वाचताही येत नाही. देवडीच्‍या वरच्‍या भागात नगारखाना आहे; मात्र तेथे बसण्‍यासाठीच्‍या फळ्‍या तुटलेल्‍या आहेत. नगारखान्‍यावर छप्‍पर नाही.

७. नगारखान्‍यासमोरील परिसराची दुस्‍थिती

नगारखान्‍यासमोरील तोफांच्‍या मागे पोलीस चौकी आणि पुरातत्‍व विभाग कार्यालयाची वास्‍तू आहे. वास्‍तूच्‍या दोन्‍ही बाजूचे बांधकाम ढासळले आहे. छप्‍पर मोडकळीस आले असून कौलेही पडली आहेत. यावरूनच किल्‍ल्‍याचे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने केले गेले असेल, याची कल्‍पना दुर्गप्रेमींना आल्‍यावाचून रहात नाही. नगारखान्‍यासमोर खलबतखाना असून त्‍याच्‍याजवळ वडाचे प्रचंड झाड कोसळले आहे. त्‍याच्‍या फांद्या आणि झाडाचे तुकडे पडलेले आहेत.

८. टेहाळणी बुरुजाच्‍या दुभंगलेल्‍या भिंती आणि दुर्लक्षित शिवमंदिर

खलबतखान्‍यासमोरील टेहाळणी बुरुजाच्‍या ठिकाणी ध्‍वजस्‍तंभ आहे. यावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकत असे; पण आता तेथे ध्‍वज नाही. बुरुजाच्‍या भिंती गवत आणि झाडे वाढून दुभंगल्‍या आहेत. तेथे असलेल्‍या छोट्या शिवमंदिराची स्‍थिती खराब झाली आहे.

९. दारूगोळा कोठाराच्‍या छपरावर उगवलेले गवत आणि झाडे यांच्‍यामुळे धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता

शत्रूंच्‍या तोफगोळांच्‍या मार्‍याने दारूगोळा कोठार उद़्‍ध्‍वस्‍त होऊ नये, यासाठी त्‍याचे छप्‍पर लाकडाऐवजी चिर्‍यांनी बनवलेले आढळते. छपरावर गवत आणि झाडे उगवली आहेत. ती वेळीच स्‍वच्‍छ न केल्‍यास छप्‍पर कोसळण्‍यास प्रारंभ होऊ शकतो.

१०. सदरेची तटबंदी आणि भिंती यांची झालेली विदारक स्‍थिती

दारूगोळा कोठार ओलांडून पुढे गेलो की, सदर (राजसभा) लागते. तिच्‍या तटबंदीजवळचे वडाचे झाड ५ ऑगस्‍ट २०२० या दिवशी कोसळले होते. अजूनही तो वड त्‍याच स्‍थितीत आहे. वड कोसळून तटबंदी दुभंगली आहे. ती केव्‍हाही कोसळू शकते. सदरेच्‍या भिंतीत झाडांची मुळे वरपासून तळापर्यंत भिंत पोखरत गेलेली स्‍पष्‍टपणे दिसून येते. सदरेच्‍या अन्‍य भिंतींवरही गवत आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असून त्‍या भिंती केव्‍हाही कोसळू शकतात. हे दृश्‍य विदारक आहे.

११. राजदरबाराची दुर्लक्षित वास्‍तू

सदरेनंतर राजदरबाराची भव्‍य वास्‍तू आहे. छत्रपती शिवाजी महाराज गडावर यायचे, त्‍या वेळी येथे राजदरबार भरत असे. राजदरबाराचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे दरबाराच्‍या एका टोकाकडे अगदी हळू आवाजात बोलले, तरी दुसर्‍या टोकास ते स्‍पष्‍टपणे ऐकू येते. वास्‍तूशास्‍त्र आणि ध्‍वनीशास्‍त्र यांचा उत्तम संयोग करून बांधलेली ही वास्‍तू हा शिवकालीन वास्‍तूशास्‍त्राचा आदर्श नमुना म्‍हणायला हवा. भिंतींवर गवत आणि झाडे वाढलेली असून ती वास्‍तूच्‍या बांधकामाला छेद देत आहेत. राजदरबाराची उंची आणि बांधकामातील समोरासमोरील चिर्‍याच्‍या भिंतींमध्‍ये असलेल्‍या खोबणी (लाकूड भिंतीमध्‍ये बसवण्‍यासाठी बनवलेली खाच) पाहिल्‍यावर ही वास्‍तू दुमजली असावी, हे लक्षात येते. राजदरबाराचे जतन अन् संवर्धन करण्‍यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. याकडे वेळीच लक्ष न दिल्‍यास आपण अमूल्‍य ऐतिहासिक ठेव्‍याला मुकू शकतो.

१२. घोड्यांच्‍या पागेची दुस्‍थिती !

पागेच्‍या चिरेबंदी भिंतींवर गवत अन् झाडे उगवून त्‍या कमकुवत झाल्‍या आहेत.

१३. राण्‍यांच्‍या महालांची दूरवस्‍था

किल्‍ल्‍यावर राण्‍यांसाठी बांधलेले ३ मजली दोन महाल आहेत. महालांच्‍या चिरेबंदी भिंतींवर आणि महालाच्‍या भोवतीचा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी अन् गवत उगवले आहे.

१४. निशाणकाठीच्‍या टेकडीवर हिंदवी स्‍वराज्‍याचा पवित्र भगवा ध्‍वज नाही !

निशाणकाठीच्‍या टेकडीवर शिवरायांनी स्‍वहस्‍ते हिंदवी स्‍वराज्‍याचा पर्यायाने हिंदूंचा पवित्र भगवा ध्‍वज फडकावला होता. आज येथे भगवा ध्‍वज दिसत नाही. येथे शिवप्रेमींनी भगवा ध्‍वज लावण्‍याचा प्रयत्न केल्‍यास तो काढला जातो. ‘येथे भगवा ध्‍वज होता’, याचा पुरावा मागितला जातो. वादळाच्‍या शक्‍यतेमुळे झेंडा लोखंडी कमानीवर लावण्‍यात येतो. शिवरायांनी बांधलेले आणि जिंकून घेतलेले किल्ले हिंदवी स्‍वराज्‍याचे प्रतीक आहेत. म्‍हणून प्रत्‍येक गडावर हिंदवी स्‍वराज्‍याचा भगवा ध्‍वज असणे, यात काय गैर आहे ? स्‍वतंत्र भारतात शिवरायांच्‍या गडावर भगवा ध्‍वज उभारण्‍यास होणारा अटकाव यापेक्षा महाराष्‍ट्राचे दुर्दैव कोणते ?

१५. संकटप्रसंगी बाहेर जाण्‍याचा मार्ग असलेले धुळपांचे भुयार बंद स्‍थितीत

निशाणकाठी टेकडीच्‍या डाव्‍या बाजूच्‍या तटबंदीस लागून एक भुयार आहे. ते कान्‍होजी पुत्र तुळाजी आंग्रे यांच्‍यानंतरचे विजयदुर्गचे किल्लेदार सरदार आनंदराव धुळप यांच्‍या विजयदुर्ग गावातील घरापर्यंत जाते. संकटकाळी शत्रूने आक्रमण केल्‍यास किल्‍ल्‍यातील महिला आणि लहान मुले यांना तेथून सुरक्षित बाहेर काढता यावे, म्‍हणून भुयार सिद्ध केले होते. ते किल्‍ल्‍यातून समुद्रकाठाजवळून भूमीखालून जेथे पाण्‍याची पातळी न्‍यून असते, तेथून गावातील सरदार धुळप यांच्‍या घरापर्यंत जाते. सध्‍या भुयार बुजलेल्‍या स्‍थितीत असून त्‍याच्‍या तोंडावर झाडी वाढली आहे. तो मार्ग मोकळा केल्‍यास शिवकालीन इतिहासातील गोष्‍टींचा शोध लागू शकतो.

१६. मंदिराविना असलेली छत्रपती शिवरायांची आराध्‍यदेवता श्री भवानीदेवीची मूर्ती !

निशाणकाठी टेकडीच्‍या पुढे पठरावर श्री भवानीदेवीची मूर्ती दिसते. मूर्तीजवळ चार चिर्‍याचे खांब आणि त्‍यावर छोटेखानी कौलारू छप्‍पर आहे. हे नंतर बांधले असावे; कारण मूर्तीभोवती पडलेल्‍या भिंतींचे अवशेष दिसतात, त्‍याअर्थी येथे पूर्वी मंदिर असावे. असे असले, तरी ‘तेथे मंदिर होते का ?’, याचा पुरावा मागितला जातो, असे स्‍थानिकांकडून कळले. शिवरायांचे आराध्‍यदैवत असलेली श्री भवानीमातेची मूर्ती मंदिराविना असणे शक्‍य वाटत नाही. प्रत्‍येक गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यांचे सरदार यांनी मंदिरे बांधल्‍याचा उल्लेख आढळतो. हिंदूंच्‍या देवतांप्रती आताच्‍या प्रशासनासारखा जाणवत असलेला गौणभाव शिवरायांच्‍या काळात असणे असंभव ! त्‍यामुळे तेथे मंदिर होणे अनिवार्य आहे.

१७. झाडे आणि गवत यांनी वेढलेले धान्‍याचे कोठार

धान्‍याचे कोठारावर आणि भोवतालीही मोठ्या प्रमाणात झाडी आणि गवत वाढले आहे. वेळीच हे साफ न केल्‍यास या वास्‍तूची पडझड होऊ शकते.

१८. तलावाची दुर्दशा

धान्‍य कोठाराच्‍या बाजूला एक मोठा तलाव आहे. यात झाडी आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. तलावाची अस्‍वच्‍छता मन अस्‍वस्‍थ करणारी आहे.

१९. शिवकालीन चुन्‍याच्‍या घाणीकडे दुर्लक्ष

पाण्‍याच्‍या तलावाच्‍या बाजूला असलेल्‍या पश्‍चिमेकडील दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्‍या मधोमध तुटका बुरुज अन् शिवहरा बुरुज यांच्‍यामध्‍ये चुन्‍याची घाणी दिसते. शिवकाळात चुना, गूळ, रेती, हिरण्‍याचे पाणी आणि नारळाचा काथ्‍या विशिष्‍ट प्रमाणात एकत्र मिसळून ते मिश्रण चुन्‍याच्‍या घाणीत मळले जाई. या मिश्रणाने केलेले बांधकाम भक्‍कम असे. चुन्‍याच्‍या घाणीवर गवत वाढल्‍याने ती दिसेनाशी झाली आहे.

२०. तलावाच्‍या बाजूची तटबंदी झाडे आणि गवत यांमुळे ढासळली आहे.

२१. धोकादायक बनलेली विहिर

किल्‍ल्‍यातील ८ पैकी ५ च विहिरी सध्‍या पहाण्‍यात येतात. पठारावर असलेल्‍या विहिरीत झाडे-झुडपे वाढल्‍याने धोकादायक बनली आहे. त्‍याला संरक्षक कठडेही नाहीत. पर्यटक दुर्गदर्शन करतांना तेथे जाऊन एखादी दुर्घटना घडू शकते.

२२. तटबंदीच्‍या तळाचा भाग समुद्राच्‍या पाण्‍याने पोखरला जाऊन धोकादायक झालेला दर्या बुरुज

किल्‍ल्‍याच्‍या पश्‍चिमेला समुद्रात असलेला आणि गावाच्‍या दिशेने असलेला दर्या बुरुजाच्‍या तटबंदीचा तळाकडील भाग समुद्राच्‍या पाण्‍यामुळे पोखरला गेला आहे. त्‍यामुळे बुरुज कोसळण्‍याचा धोका आहे. बुरुजाला लागून असलेल्‍या तटबंदीच्‍या तळाचा भाग कोसळला आहे. तटबंदीवर झाडे वाढलेली आहेत.

२३. ऐतिहासिक शिवकालीन गोदीची पुसत चाललेली ओळख

विजयदुर्ग किल्‍ल्‍यापासून २ – ३ कि.मी. अंतरावर शिवकालीन गोदी आहे. खाडीचे पाणी आत घेऊन आरमारी गोदी हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या कालखंडात बनवण्‍यात आली होती. गोदीतून ५०० टनाची जहाजे जा-ये करत असत. युद्धात नादुरुस्‍त झालेल्‍या नौका भरतीच्‍या पाण्‍याने गोदीत नेण्‍यात येत. ओहोटीच्‍या वेळी आतील पाणी बाहेर ओढले जायचे, तेव्‍हा लाकडी फळ्‍या लावून गोदीचा प्रवेशमार्ग बंद करण्‍यात येत असे. त्‍यानंतर जहाजांची दुरुस्‍ती होत असे. दुरुस्‍त झालेली जहाजे भरतीच्‍या वेळी खाडीत नेली जात. सध्‍या गोदीची डागडुजी करून तेथे फलक लावणे आवश्‍यक आहे.

२४. ‘हेलियम’चा शोध लागलेली जागा ‘हेलियमचे पाळणाघर’ दुर्लक्षित !

१८ ऑगस्‍ट १८६८ या दिवशी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्‍यास करण्‍यासाठी ब्रिटीश खगोलशास्‍त्रज्ञ सर जे. नॉर्मन लॉकीयर यांनी विजयदुर्ग किल्‍ल्‍यावर ओटे बांधले. त्‍यावर दुर्बिण ठेवून सूर्याचा वेध घेतला. त्‍यांना ‘स्‍पेक्‍टोग्राफ’वर ५८७.४९ नॅनो मीटर लहर लांबी (वेव्‍ह लेंथ) असलेली एक पिवळ्‍या रंगाची रेषा दिसली. ‘या रेषेचा स्रोत सूर्याच्‍या तप्‍त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्‍यापैकी असला पाहिजे’, असा निष्‍कर्ष काढून त्‍यांनी त्‍यास ‘हेलियम’ (ग्रीक भाषेत ‘हेलिऑस म्‍हणजे सूर्य’) हे नाव दिले. २५ वर्षांनी विल्‍यम रॅम्‍से या स्‍कॉटिश शास्‍त्रज्ञाने हेलियमच्‍या शोधावर शिक्‍कामोर्तब केले. पृथ्‍वीबाहेर सूर्यासारख्‍या ग्रहावर मूलद्रव्‍याचे अस्‍तित्‍व शोधले गेले. कालांतराने ते मूलद्रव्‍य पृथ्‍वीवरही अस्‍तित्‍वात आहे, याचा शोध लागणे, ही घटना विज्ञानाच्‍या इतिहासातील अद्वितीयच आहे. अशा ठिकाणी केवळ तत्‍संबंधी माहिती फलक लावून प्रशासनाने दायित्‍व झटकलेले दिसते; कारण वैज्ञानिकदृष्‍ट्या महत्त्व असलेल्‍या या जागेचे जतन होणे आवश्‍यक आहे; मात्र तेथे गवत वाढलेले दिसते. जेथून सूर्याचे निरीक्षण झाले, त्‍या ओट्यांभोवती संरक्षक कठड्याची बांधणी दिसत नाही.

वरील सर्व बाबी सामान्‍य व्‍यक्‍तीला कळू शकतात, तर मग पुरातत्‍व विभागाला का लक्षात येत नाहीत. याकडे वेळीच लक्ष न दिल्‍यास अमूल्‍य अशा ऐतिहासिक ठेव्‍याला आपण कायमचे मुकू शकतो. भावी पिढीमध्‍ये राष्ट्राप्रती निष्ठा अन जाज्ज्वल्‍य अभिमान निर्माण करण्‍यासाठी अशा किल्‍ल्‍यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. च्‍या दृष्टीने आम्‍ही पुढील मागण्‍या करत आहोत –

१. किल्ले विजयदुर्गची शासकीय अधिकारी, किल्‍ल्‍यांशी संबंधित तज्ञ व्‍यक्‍ती, स्‍थानिक ग्रामस्‍थ यांच्‍यामार्फत संपूर्ण पाहणी करून त्‍याचा अहवाल बनवण्‍यात यावा.

२. किल्‍ल्‍यावर सर्वत्र वाढलेली झाडी-झुडपे-गवत काढून त्‍यांमुळे पडझड रोखण्‍यासाठी तत्‍काळ आदेश द्यावेत. या सर्व ठिकाणांची दुरुस्‍ती, संवर्धन आणि देखभाल यांसाठी तातडीने शासकीय निधी उपलब्‍ध करून तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या मार्गदर्शनाखाली हे काम आरंभण्‍यात यावे.

३. विजयदुर्गजवळ वाघटन खाडीच्‍या मुखाशी असलेली सागरातील संरक्षक भिंत आणि किल्‍ल्‍यापासून काही अंतरावर असलेली आरमाराची गोदी यांचे जतन आणि संवर्धन करण्‍यात यावे.

४. किल्ले विजयदुर्गबाबात आतापर्यंत ज्‍या शासकीय अथवा खाजगी संस्‍थांनी संशोधन केले आहे, त्‍या संशोधनाला व्‍यापक प्रसिद्धी दिली जावी.

५. विजयदुर्गशी संबंधित युद्धांच्‍या आणि स्‍थानांच्‍या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्‍तकांतही करण्‍यात यावा.

६. जिल्‍हा प्रशासन आणि राज्‍य शासन यांच्‍या संकेतस्‍थळांवर किल्‍ल्‍याचा इतिहास सचित्र प्रसिद्ध केला जावा.

७. किल्‍ल्‍याशी संबंधित शिवकालीन वस्‍तूंचे वस्‍तुसंग्रहालय (म्‍युझियम) किल्‍ल्‍यावर उभारले जावे.

८. विजयदुर्ग किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश यांचा अभ्‍यास अन् पाहणी ‘नॅशनल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या गोवास्‍थित शासकीय संस्‍थेने वर्ष १९९८ मध्‍ये केली होती. या पहाणीमधील काही महत्त्वाचे शोध त्‍यांनी ते प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने अजून पुढील संशोधन केले जावे.

९. किल्‍ल्‍याच्‍या विविध वास्‍तूंच्‍या इतिहासाची माहिती देणारे फलक त्‍या ठिकाणी लावण्‍यात यावेत.

१०. सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे किल्‍ल्‍याच्‍या या दुरवस्‍थेला जबाबदार संबंधित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाईही करावी.

भारतीय पुरातत्‍व विभाग महाराष्‍ट्रातील किल्‍ल्‍यांकडे केव्‍हा लक्ष देणार ?

‘युनेस्‍को’ने (संयुक्‍त राष्‍ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्‍कृतिक संघटना) जागतिक वारसा स्‍थळांच्‍या सूचीत उत्तरप्रदेश येथील आग्रा किल्ला १९८३ या वर्षी, लाल किल्ला २००७ या वर्षी, तर महाराणा प्रताप यांची कर्मभूमी असलेल्‍या राजस्‍थानमधील अरवली पर्वतराजीच्‍या डोंगरी प्रदेशातील चित्तोड गड, कुंभाळ गड, रणथांबोर गड, जैसलमेर गड, आंबेर गड, गागरोण गड हे ७ व्‍या ते १६ व्‍या शतकातील ६ डोंगरी किल्ले २०१३ या वर्षी समाविष्‍ट केले. या सूचीत महाराष्‍ट्रातील ३५० हून अधिक किल्‍ल्‍यांपैकी एकालाही स्‍थान न मिळणे दुःखदायक आहे. मोगल आक्रमक हुमायूच्‍या कबरीला वर्ष १९९३ मध्‍ये जागतिक वारसा म्‍हणून घोषित केले; मात्र शिवरायांचे किल्ले, तसेच त्‍यांची रायगडावरील समाधी यांचा जागतिक वारसा सूचीत समावेश झाला नाही, हे देशाचे दुर्दैवच ! हा किल्ला ‘राष्‍ट्रीय स्‍मारक’ म्‍हणून घोषित केला आहे; मात्र सद्यस्‍थिती पहाता किमान ‘राष्‍ट्रीय वारसा’ म्‍हणून जपण्‍याचा प्रयत्न भारतीय पुरातत्‍व विभाग करणार का ?

चला, छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्‍यासाठी सिद्ध होऊया !

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्‍ट्रातील १२ गडकोट किल्ले हे ‘सैनिकी स्‍थापत्‍य’ आणि ‘गनिमी कावा युद्धनीती’ या संकल्‍पनांचा जागतिक वारसा म्‍हणून प्राथमिक अवस्‍थेत (वारसा स्‍थळांची तात्‍पुरती सूची जी अजून अंतिम झालेली नाही) वर्ष २०२१ मध्‍ये ‘युनेस्‍को’ने स्‍वीकारल्‍याची वृत्ते अलीकडेच प्रसिद्ध झाली आहेत. व्‍हिएतनाम देशाचे राष्‍ट्रपती हो चि मिन्‍ह यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या युद्धनीतीचा धडा आम्‍ही गिरवला; म्‍हणूनच आम्‍ही मोठ्या अमेरिकेला नमवू शकलो. हा महापुरुष आमच्‍या देशात जन्‍माला आला असता, तर आम्‍ही जगावर राज्‍य केले असते’, असे गौरवोद़्‍गार काढले होते. लंडन आणि न्‍यूयॉर्क येथील ‘वॉर म्‍युझियम’मध्‍ये (युद्धाविषयीचे संग्रहालय) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाशी दिलेल्‍या झुंजीला सर्वोत्तम स्‍थान देऊन त्‍याचा अभ्‍यास केला जातो. जागतिक स्‍तरावर गुणगौरव प्राप्‍त झालेल्‍या छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात मात्र त्‍यांच्‍या गडकोटांची झालेली दुरवस्‍था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्‍या माना शरमेने खाली जात असल्‍यास नवल ते काय ? शासकीय आणि राजकीय अनास्‍थेच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवप्रेमी अन् दुर्गप्रेमी यांना आवाहन करावेसे वाटते, ‘चला, आता आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्‍यासाठी सिद्ध होऊया !’

॥ जय भवानी ॥ ॥ जय शिवराय ॥

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​