जिहाद आणि स्त्रिया

अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी याच्या एका पत्नीने, उमायमा अल जवाहिरीने जिहादी स्त्रियांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. २००९ च्या डिसेंबरमध्ये लिहिलेले हे पत्र ‘जिहादिका’ नावाच्या वेबसाइटवर वाचायला मिळते. ‘मुस्लिम स्त्रियांनी जिहादाचा मार्ग सोडू नये, आपला विजय जवळ आला आहे,’ असे सांगतानाच बुरखा वापरण्याचा पुरस्कारही तिने या पत्रात केला होता. जिहादी स्त्रियांनी संघटनेतील पुरुषांना पूरक भूमिका घ्यावी, असा पत्राचा आशय होता. दहशतवादी जग आता अधिक आक्राळविक्राळ झाले आहे. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेच्या वर्चस्वामुळे कट्टरपंथीयांची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर घातपाती कारवायांमध्ये कट्टरपंथीय स्त्रियांच्या सहभागाच्या घटनाही वाढल्या आहेत.

दहशतवादातील सहभाग

‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’पासून ते चेचेन्यातील ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’पर्यंत सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. जिहादी स्त्रियांनी घर राखावेच; परंतु शक्य असल्यास आत्मघाती कृत्यांमध्येही भाग घ्यावा, असा विचार पुढे आल्याने या संघटनांमधील स्त्रियांचे महत्त्वही वाढले आणि तो जगभराच्या चिंतेचा विषय ठरला.

फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, कॅनडा, नॉर्वे, स्वीडन आणि अमेरिका या देशांमधून लक्षणीय संख्येने स्त्रिया सिरीयात जाऊ लागल्याची वृत्ते थडकल्याने इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतील स्त्रियांच्या सहभागाकडे लक्ष वेधले. त्यामुळे स्त्रिया दहशतवादाकडे का आकृष्ट होतात, याचा अभ्यास युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.

सोशल मीडियाचा वापर

आयएस ही दहशतवादी संघटना आपले जाळे विस्तारण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करते, याचे भीतीदायक दर्शन ‘इन द स्किन ऑफ ए जिहादिस्ट’सारख्या पुस्तकातून घडते. एका फ्रेच पत्रकार स्त्रीची ही सत्यकथा आहे. मुस्लिम कट्टरवादाकडे आकृष्ट होऊन १५-१६ वर्षांच्या मुली युरोपात पळून सिरीयात जाण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्यावर याच शोध घेण्यासाठी ही पत्रकार ‘मेलडी’ या खोट्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट ओपन करते. या अकाउंटवर तिला आयएसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा निकटवर्तीय दहशतवादी बिलाल याचा मेसेज येतो. मेलडी त्याला आपले वय वीस आहे आणि आपण ख्रिश्चन धर्म सोडून गुप्तपणे मुस्लिम धर्मात प्रवेश केल्याचे भासवते. तेथून महिनाभराच्या घटनाक्रमात दोघांचेही फेसबुकवरून झालेले संभाषण पुस्तकात दिले आहे. या दरम्यानच्या काळात बिलाल तिला आपली छायचित्रे पाठवतो आणि तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याच्या गोड शब्दांना भाळून आपण विवाह करण्यास तयार आहोत असे ती सांगते आणि फेसबुकवरच हा विवाह होतो. मग तो तिला सिरीयात बोलावतो. ती अॅमस्टरडमर्यंत पोहोचते आणि तिथेच तिचे सत्य उघडकीस येते. ती मेलडी नसून पत्रकार असल्याचे समजल्यावर पिसाळलेला बिलाल, तिच्याविरोधात फतवा काढतो. ‘ती कुत्र्यापेक्षाही अशुद्ध आहे,’ असे सांगणारा एक व्हिडिओ यू ट्यूबवर झळकतो. अॅनी या काल्पनिक नावाने हे पुस्तक लिहिणारी ही पत्रकार आपली ओळख लपवून आजही फ्रान्समध्ये पत्रकारिता करीत आहे.

साधारणतः दोन वर्षांपूर्वी आलेल्या या पुस्तकातून मुलींना विवाहाच्या भूलथापा देऊन, त्यांना भुरळ पाडून आएस दहशतवादी तरुण मुलींना संघटनेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि त्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत परिणामकारक वापर केला जातो, हे ठळकपणे समोर येते. अशा मुली बऱ्याचदा अल्पवयीन असतात. या संबंधीच्या अभ्यासात अशा मुलींना ‘जिहादी ब्राइड’ असे संबोधले जाते.

स्त्रियांना आकृष्ट करण्याची ही एक पद्धत आहे. मात्र, दहशवादी संघटनांमध्ये दाखल होण्यास स्त्रियांना जसे वश केले जाते; तसेच त्या इस्लामी कट्टरतावादी विचारांकडे आकृष्ट होतात, असा दावाही करण्यात येतो. पुरुष दहशतवाद्यांप्रमाणेच त्यांच्या मनातही खलिफातचे (इस्लामिक भूभाग) स्वप्न रुजलेले असते आणि त्या मृगजळामागे चालत त्या सिरीयात पोहोचतात, असे म्हटले जाते.

तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुस्लिम अल्पसंख्य देशांमध्ये बहुसंख्यांकडून मुस्लिमांना एकाकी करण्याची रीत. मुस्लिमांना मुख्य प्रवाहाबाहेर फेकून, त्यांना त्यांच्या धर्माची ओळख विसरू न देण्याने आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, ही भावना त्यांच्या मनात कायम जागती राहते आणि त्यांना दहशतवादाकडे जाण्यास एकप्रकारे भाग पाडले जाते. ब्रिटनमधील मुस्लिम वुमेन्स नेटवर्कच्या मुसरत झिया यांनी या विषयावर प्रकाश टाकला आहे. युरोपातील मुस्लिम स्त्रियांच्या सिरीयात होणाऱ्या पलायनाचे हे एक कारण मानले जाते.

चौथा मुद्दा म्हणजे, स्त्रियांना दहशतवादात सामील होण्यास भाग पाडणे. उदा. याझदी स्त्रिया. आयएसच्या क्रुरकर्मांनी २०१४मध्ये याझदींना इस्लामविरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ले केले. अनेकांना ठार केले. याझदी स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवून मोसूलमध्ये डांबले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. काही स्त्रियांना विकले. काहींनी आत्महत्या केल्या.

संघटनेतील भूमिका

स्त्रियांनी जिहादात सहभाग कसा घ्यावा, हे त्यांनीच आपल्या क्षमता ओळखून ठरवावे, असे ‘आयएस’ने आपल्या प्रचारात एका ठिकाणी नमूद केले आहे. स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाची देखभाल करायची असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर जरूर करावा. मात्र तिने स्वसंरक्षणार्थ शस्त्र चालविणे शिकून घ्यावे, असे म्हटले आहे. संघटनेच्या म्होरक्याने परवानगी दिली, तर घातपाती कारवायांमध्ये भाग घ्यावा. मात्र स्त्री आणि पुरुषांचे एकत्रित दल असू नये, असे आयएस सांगते.

स्त्रियांच्या कामाचे स्वरूप दोन प्रकारात विभागता येते. पहिला म्हणजे पुरुष दहशतवाद्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे, संदेशांची देवाणघेवाण करणे, संशोधनात्मक, प्रलोभने दाखवून संघटनेला भरतीसाठी मदत करणे. या प्रकारातील महत्त्वाचे काम म्हणजे महान आई बनण्याचे! अशी आई आपल्या मुलांना जिहादी तत्त्वज्ञानाचे बाळकडू पाजते आणि जिहादींची नवी पिढी उदयास आणण्यास मदत करते. आएससंबंधी जाहीर करण्यात आलेल्या काही अहवालांनुसार या संघटनेने खास मुलींसाठी शाळा स्थापन केल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिकांसाठी बुरखा आणि अंगभर कपडे घालणे सक्तीचे असून, शालेय अभ्यासक्रमात विज्ञान, क्रीडा आणि तत्त्वज्ञान या विषयांवर बंदी आहे. आयएस तत्त्वज्ञानाला वाहून घेतलेली पिढी निर्माण करणे, हे या शाळांचे एकमेव उद्दिष्ट आहे. शरीयत कायद्याचे पालन करणाऱ्या काही स्त्री डॉक्टरही जिहादी संघटनांमध्ये कार्यरत आहेत. एकूणच या प्रकारातील आयएसच्या जिहादी मुली सोशल मीडियावरून आपण खलिफातमध्ये कशा सुखी आहोत, हे दाखविण्याची धडपड करताना दिसतात. ट्वीटरवरून पोस्ट केलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये त्या फास्ट फूड खाताना, मोफत घरांमध्ये राहाताना दिसतात. अल् कायदामध्ये दाखल झालेल्या स्त्रियांकडे प्रामुख्याने पुरुष दहशतवाद्यांची सेवा करण्याचे काम दिले आहे.

दुसरी भूमिका म्हणजे आत्मघाती हल्ले, गोळीबार, अपहरण अशा प्रत्यक्ष कारवायांमध्ये सहभागी होणे. या दहशवादी स्त्रियांना बॉम्बफेक, शस्त्रास्त्रे चालवणे, स्फोटके हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. आयएसने घातपाती कामे करणाऱ्या स्त्रियांची अल्-खन्सा ब्रिगेड स्थापन केली आहे. या ब्रिगेडचा प्रभाव रक्का आणि मोसूलमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. या ब्रिगेडमधील स्त्रिया तथाकथित खलिफातच्या सीमांचे रक्षण करण्याचे कामही करतात.

जिहादात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे. तो अत्यंत चिंताजनक आणि नव्या प्रश्नांना जन्म घालणारा आहे. असे असूनही त्याला आवर घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. पुरुष दहशतवादी आणि स्त्री दहशतवादी असा फरक मानणे योग्य नसले, तरी स्त्रियांना आकृष्ट करण्याच्या आयएसच्या वेगवेगळ्या योजनांना सुरूंग लावणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी बळाच्या वापराबरोबरच स्त्री दहशतवादी असा वेगळा अभ्यास करण्याची आणि वेगळी धोरणे आखण्याची गरज आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​