राष्ट्राप्रतीची कर्तव्ये पार पाडून राष्ट्राभिमानी बना !

राष्ट्रभक्ती म्हणजे काय ?

जन्मदात्र्या आईवर आपले प्रेम असते, आपण तिचा आदर करतो, तसेच आपली भारतभू ही आपली राष्ट्रमाता आहे, याचा आपल्याला अभिमान हवा. आपण भारतासारख्या सर्वांत प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ संस्कृती असणार्याा राष्ट्रात जन्माला आलो आहोत, याचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. राष्ट्राविषयी आपल्या मनात नितांत आदराची भावना हवी. क्रांतीकारकांनी तर आपल्या राष्ट्रावर प्राणापलीकडे प्रेम केले. हीच राष्ट्रभक्ती होय. केवळ आपल्या राष्ट्रावर आपले प्रेम आहे, असे म्हणून भागणार आहे का ? तर ते आपल्या कृतीतूनही दिसले पाहिजे.

राष्ट्रभक्ती वृद्धींगत करा !

राष्ट्राचा तेजस्वी इतिहास आणि श्रेष्ठतम संस्कृती आपण जाणून घेतली, तर आपल्यामध्ये राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होईल. राष्ट्राविषयी अभिमान असेल, मनात राष्ट्रप्रेम असेल, तर राष्ट्राचे प्रतीक  असणा-या प्रत्येक गोष्टीविषयीही आपल्या मनात आदर राहील. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, वन्दे (मातरम् सारखे) राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा (म्हणजेच मानबिंदू) ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत. यांचा यथायोग्य सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रप्रतिकांचा मान राखणे आणि त्यांचा कुठेही अवमान होत असेल, तर तो थांबवणे, या कृती आपल्याकडून झाल्यास त्यातून आपले राष्ट्रप्रेम दिसून जाईल. आपल्या राष्ट्राचे आदर्श नागरिक म्हणून आपली जी जी कर्तव्ये आहेत, त्यांचे आपण पालन करणे, हीसुद्धा आपली राष्ट्रभक्तीच होय.

राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखाल ?

२६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट हे दिवस साजरे झाल्यावर आपण पहातो की, राष्ट्रध्वज रस्त्यात, रस्त्याच्या कडेला इकडे-तिकडे पडलेले असतात. काही गटारात जातात, तर काही पायदळी तुडवले जातात. राष्ट्रध्वज उंच ठिकाणी फडकवणे, हे आपले राष्ट्र स्वतंत्र असल्याचे प्रतीक आहे. आदल्या दिवशी आपण राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत म्हणतो, तेव्हा आपण या स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि दुस-या दिवशी तोच राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेला, फाटलेला पाहून आपल्याला काहीच कसे वाटत नाही ? राष्ट्रध्वजाचा सदोदित सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य समजून आजपासून आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू, अशी प्रतिज्ञा करूया. काही जण राष्ट्रध्वज तोंडावर रंगवून घेतात, काही जण राष्ट्रध्वजाची रंगसंगती असलेले कपडे घालतात, तर काही जण राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापतात, हेही योग्य नव्हे. असे करणा-यांना आपण त्या त्या वेळी जाणीव करून द्यायला हवी. काही ठिकाणी राष्ट्रध्वज उलटा लावलेला किंवा चित्र काढलेला असतो, हा तर अक्षम्य अपराध आहे. राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, हा कायदेशीर अपराध आहे.

राष्ट्रगीत आणि राष्ट्राचा नकाशा यांच्या सन्मानाविषयी जागरूक रहा !

राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीताची धून कुठेही चालू असेल, तर आपण सावधानमध्ये उभे रहायला हवे. ही कृती करणे, हा आपण आपल्या राष्ट्राला दिलेला सन्मान आहे. काही जण त्या वेळी बसून रहातात. राष्ट्रगीताची धून केवळ ५३ सेकंदाची आहे. एवढा वेळ उभे रहाण्याएवढेही राष्ट्रप्रेम आपल्यात नाही का ? राष्ट्रगीताचा नेहमीच सन्मान राखला जावा, यासाठी राष्ट्रगीताची धूनही योग्य ठिकाणीच वाजवली गेली पाहिजे.

राष्ट्राभिमान कसा जोपासाल ?

१. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे गीत स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीवीरांचे स्फूर्तीस्थान होते, तर वन्दे मातरम् हा जयघोष क्रांतीकारांचे स्फुल्लिंग चेतवणारा स्वातंत्र्याचा मूलमंत्र होता. आजही आपण संपूर्ण वन्दे मातरम् म्हणतांना आपल्या अंगावर रोमांच उभे रहातात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये येथे आपण ते आवर्जून म्हटले पाहिजे आणि आपल्या मातृभूमीला वंदन केले पाहिजे.

२. अनेक जण ट्रेकिंगसाठी जातात. आपल्याला केवळ साहसासाठी गड चढून जायचे नाही, तर छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांसह पराक्रम करून शत्रूकडून हे गड जिंकून घेतले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हा हिंदूंचा तेजस्वी इतिहास सतत आठवायचा आहे. या दृष्टीकोनातून गड, जलदुर्ग यांना भेटी द्या. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडांना झाला आहे, याची जाणीव त्या वेळी ठेवा.

३. परदेशी बनावटीच्या वस्तू न वापरता कटाक्षाने आपल्या देशातील आस्थापनांत सिद्ध झालेल्या वस्तू वापरा. बाबू गेनू हा तरुण स्वदेशीचा वापर करण्याच्या आग्रहापोटी इंग्रजांच्या विदेशी मालाच्या ट्रकला अडवण्यासाठी ट्रकखाली येऊन पडला. ट्रक त्याच्या अंगावरून गेला. स्वदेशी वस्तू वापरण्याच्या आग्रहापोटी प्राणार्पण करणा-या बाबू गेनूच्या राष्ट्रप्रेमाची आपण कल्पना तरी करू शकतो का ?

४. एकमेकांशी आवर्जून मराठीतच बोला. मराठीतून शुभेच्छा द्या. इंग्रजी शब्दांचा वापर टाळा. स्वभाषेचा अभिमान असला, तर राष्ट्राभिमान निर्माण होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment