कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

१. सनातन धर्मातील ज्ञानाची व्याप्ती !

सनातन धर्मात वेद-उपनिषदांसह अनेकानेक ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान खूप विस्ताराने सांगितले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे घटक, विभिन्न देवता तसेच ईश्‍वर म्हणजे काय ? देवतांना कसे प्रसन्न करून घ्यायचे आणि त्यामुळे काय मिळते ? मोक्ष म्हणजे काय ? ब्रह्म म्हणजे काय आणि ते का प्राप्त करायचे ? इत्यादी अनेक गहन विषयांपासून ते कर्मकांड, विभिन्न उपासना, तसेच त्यांची फळे यांसारख्या अनेक विषयांचे ज्ञान आपल्या ग्रंथांमध्ये आहे.

२. व्यासांच्या बुद्धीची विशालता !

व्यास सर्वज्ञ होते. व्यासांविषयी एक उक्ती आहे, व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । म्हणजे जगात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते, लिहीले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते. या अर्थाने जगातले सर्व ज्ञान व्यासांचे उष्टे आहे, असे म्हटले जाते.

३. लोकांना सन्मार्गाला लावण्याचे आणि मुक्तीचा मार्ग दाखवण्याचे व्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य !

लोकांविषयीच्या अत्यंत करुणेने त्यांच्या कल्याणासाठी हे ज्ञान व्यासांना सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. लोकांना दु:खांपासून शाश्‍वत मुक्ती द्यायची होती; पण सामान्य मनुष्यांना हे सर्व किचकट आणि समजायला कठीण वाटते. त्यामुळे अधिकांश लोक अशा ग्रंथांचा अभ्यास करतच नाहीत. लोकांचा कल केवळ मनोरंजनाकडे असतो. त्यांना गोष्टी, कथा आदी वाचायला आवडतात; पण तत्त्वज्ञानावरचे ग्रंथ वाचायला मुळीच आवडत नाहीत. लोकांना ज्ञानाच्या गोष्टी ऐकायच्या नसतात, तर त्यांना करमणूक हवी असते. ही लोकांच्या मनाची घडणही व्यास जाणत होते; म्हणून व्यासांनी अठरा पुराणे आणि महाभारत यांचे लिखाण केले. या ग्रंथांमध्ये अनेकानेक कथाच आहेत. पुराणांमध्ये मनुष्यांच्या, भक्तांच्या, राक्षसांच्या, संतांच्या, देवतांच्या, ईश्‍वराच्या अवतारांच्या आणि महाभारतामध्ये भरतवंशियांच्या कथाच कथा आहेत.

अशा सर्व कथानकांमध्ये व्यासांनी भक्ती, कर्म, योग, अध्यात्म, आत्मज्ञान इत्यादी सहजतेने आणि हळूवारपणे गुंफले आहे. इतकेच काय, व्यासांच्या कृपेने महाभारतातून प्रत्यक्ष भगवद्गीताच आपल्याला मिळाली आहे. गोष्टी वाचता वाचता नकळत हे सर्व ज्ञान मनुष्याच्या गळी उतरते. वेगवेगळ्या गोष्टींतून, वेगवेगळ्या प्रकारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान पुनःपुन्हा वाचले गेल्याने मनुष्याच्या मनावर त्याच्या नकळत या सगळ्यांचे संस्कार होत जातात. वाईट वागण्याचे दुष्परिणाम आणि सद्वर्तनाचे लाभ मनावर ठसत जातात. दु:खांपासून सुटण्याचे उपाय लक्षात येतात. अशा रितीने लोकांच्या कलाकलाने जाऊन, मनोरंजनाचा वापर अतिशय चातुर्याने करून व्यासांनी लोकांना सन्मार्गाला लावण्याचे आणि मुक्तीचा मार्ग दाखवण्याचे कार्य केले.

४. सर्वजनहिताय (सर्वांच्या कल्याणासाठीचे) लिखाण

व्यासांची आणखी एक महानता उल्लेखनीय आहे. सनातन धर्मातील काही ग्रंथ काही वर्णांना निषिद्ध होते; पण व्यासांनी त्या ग्रंथांतील अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांच्यासह सर्वच्या सर्व ज्ञान, अगदी हातचे काहीही राखून न ठेवता, पुराणे आणि महाभारत यांतून सर्वांना दिले. सर्व वर्णांचे आबालवृद्ध, तसेच स्त्री-पुरुष व्यासांचे सर्व ग्रंथ वाचू शकतात. त्यांचा अभ्यास करू शकतात. यासाठी कोणालाही प्रतिबंध नाही. त्यांनी सर्वांच्याच कल्याणाची सोय करून ठेवली आहे.

५. कृतज्ञतापूर्वक नमन

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : पूर्ण फुललेल्या कमळाच्या पाकळीसारखेे टपोरेे डोळे असलेले विशाल बुद्धीचे व्यास ! ज्यांनी महाभारतरूपीतेलाने पूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला, त्या तुम्हाला नमस्कार असो.

– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू), गोवा (९.८.२०१७)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात