आजचा ताजमहाल म्हणजे हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

सध्या ताजमहाल हे ‘तेजोमहालय’ असल्याचे काही हिंदुत्वनिष्ठ म्हणत आहेत, तर काही मुसलमान नेते आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी जमात याच्या विरोधात थयथयाट करत आहे. ‘ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा त्यांचा आरोप आहे. अर्थात् आरोप एका ठिकाणी आणि वस्तूस्थिती एका ठिकाणी असते, हे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांनाही मान्य करावेच लागेल.

‘ताजमहाल’ ही वास्तू मुसलमानांची नसून मुळात ती हिंदूंची आहे. तेथे पूर्वी भगवान शिवाचे मंदिर होते. मुसलमान आक्रमकांनी त्या वास्तूला ‘ताजमहाल’ केले. ‘ताजमहाल’ हे पूर्वी ‘शिवालय’ होते’, असे अनेक पुरावे पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतर पुरातत्वतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक, तसेच देशविदेशांतील तज्ञ सांगतात. मुसलमान आक्रमकांच्या रोजनिशीतही त्यांनी ताजमहाल ही हिंदूंची वास्तू असल्याचे म्हटले आहे, तरीही मुसलमान या वास्तूवर स्वत:चा अधिकार सांगतात. या सगळ्याचा वेध घेणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी पुनर्प्रसिद्ध करत आहोत.

ताजमहालचा कलशाच्या रूपातील कळस
ताजमहालच्या भिंतीवरील फुलांच्या नक्षीतील ॐ
ताजमहालच्या प्रवेशद्वारावर असलेली कमळाची नक्षी (गोलात दाखवली आहे.)

 

१. मुसलमान आक्रमकांची विध्वंसक वृत्ती !

‘मुसलमान आक्रमणकर्त्यांनी भारतातील केवळ गाव आणि शहरे यांचीच नावे पालटली नाहीत, तर तेथील भव्य वास्तू कह्यात घेऊन अन् त्यांत हवे तसे पालट करून त्यांना सर्रास मुसलमान नावे दिली. मुळात मुसलमानांना एवढ्या भव्य आणि सुंदर वास्तू बनवण्याचे ज्ञानच अवगत नव्हते. हिंदूंनी मात्र अजिंठा, वेरूळ यांसह अनेक भव्य मंदिरे इस्लाम पंथाच्या स्थापनेपूर्वीच बांधली होती. मुसलमान आक्रमणकर्त्यांना केवळ भारतातील वास्तूकलेचे सुंदर नमुने उद्ध्वस्त करणे इतकेच ठाऊक होते. मुसलमान आक्रमकांच्या विध्वंसक वृत्तीला गझनीने अनेकदा उद्ध्वस्त केलेल्या श्री सोमनाथ मंदिरापासून ते अफगाणिस्तानात अलीकडेच उद्ध्वस्त केलेल्या बामयान येथील भव्य बुद्धमूर्तीपर्यंतचा इतिहास साक्षी आहे.

कै. पु.ना. ओक

२. इंग्रज शासकांकडूनही विध्वंसच !

मुसलमान आक्रमकांच्या नंतर आलेल्या इंग्रज शासकांना भारतीय संस्कृतीविषयी किंचितही प्रेम नसल्याने त्यांनी मुसलमान आक्रमणकर्त्यांचीच री ओढली.

३. आक्रमकांच्या रोजनिशीतील ताजमहालाविषयीचे सत्य !

आग्रा येथील जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ या वास्तूचीही अशीच कहाणी आहे. डॉ. राधेश्याम ब्रह्मचारी यांनी ताजमहालचा तथाकथित निर्माता शाहजहान याच्याच कारकीर्दीतीत लिहिल्या गेलेल्या कागदपत्रांचा संदर्भ घेऊन ताजमहालचा इतिहास पडताळूून पाहिला आहे. अकबराप्रमाणे शहाजहाननेही ‘बादशाहानामा’ नावाच्या बखरीत स्वत:चे चरित्र आणि कारकीर्दीचा इतिहास लिहून ठेवला होता. हा अरबी भाषेतील ‘बादशाहानामा’ अब्दुल हमीद लाहोरी याने लिहिला होता. तो ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल’ या ग्रंथालयात आजही उपलब्ध आहे. या ‘बादशाहानामा’च्या पृष्ठ क्रमांक ४०२ आणि ४०३ मधील भागांत ताजमहाल या वास्तूचा इतिहास दडला आहे. या भागाचे स्वैर भाषांतर पुढे दिले आहे.

‘‘शुक्रवार दिनांक १५ मास जमदिउलवल या दिवशी शहाजहान याची पत्नी मुमताझुल जामानि हिचे पार्थिव बुर्‍हाणपूर येथून आग्रा (तेव्हाचे अकबराबाद) येथे आणण्यात आले. येथील राजा मानसिंह यांचा महाल म्हणून ओळखल्या जाणार्‍या इमारतीत दफन करण्यात आले. ही इमारत राजा मानसिंह यांचे नातू राजा जयसिंह यांच्या मालकीची होती. त्यांनी ही इमारत शहाजहानला देण्याची स्वीकृती दर्शवली. त्या बदल्यात राजा जयसिंह यांना शरीफाबाद येथील जहागिरी देण्यात आली. येथे दफन केलेल्या महाराणीचे दर्शन जगाला होऊ नये, यासाठी या इमारतीचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले.’’

४. शिवालयाच्या पुराव्याला पुरातत्व शास्त्रज्ञांचाही दुजोरा !

१. प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ डी.जे. काळे यांनीही वरील कागदपत्रास दुजोरा दिला आहे. त्यांच्या संशोधनाप्रमाणे ‘राजा परमार्दीदेव याने २ भव्य संगमरवरी मंदिरे बांधली. त्यातील एक श्रीविष्णूचे, तर दुसरे भगवान शिवाचे होते. कालांतराने मुसलमान आक्रमकांनी या मंदिरांचे पावित्र्य भंग केले. त्या घटनेला घाबरून एका व्यक्तीने ही कागदपत्रे भूमीत गाडून ठेवली असावी. या मंदिरांचे पावित्र्य भंग झाल्याने त्यांचा धार्मिक उपयोग बंद झाला. म्हणूनच ‘बादशाहानामा’चा लेखक अब्दुल हमीद लाहोरी याने ‘मंदिरा’ऐवजी ‘महाल’ असा उल्लेख केला असावा.’

२. प्रसिद्ध इतिहासकार आर्.सी. मुजुमदार यांच्या मते ‘चंद्रात्रेय (चंदेल) राजा परमार्दीदेव याचे दुसरे नाव परमळ होते आणि त्याच्या राज्याला बुंदेलखंड असे नाव होते. आज आग्रा येथे दोन संगमरवरी प्रासाद आहेत. त्यातील एक नूरजहाँनच्या वडिलांची कबर (श्रीविष्णु मंदिर) आहे आणि दुसरा ताजमहाल (शिवमंदिर) आहे.’

५. ताजमहाल हे हिंदूंचे शिवालय असल्याचे आणखी ढळढळीत पुरावे !

प्रसिद्ध इतिहासकार आर्.सी. मुजुमदार यांच्या मताला पुष्टी देणारे पुरावे पुढे देण्यात आले आहेत :

१. ताजमहालच्या मुख्य घुमटाच्या कळसावर त्रिशूळ आहे. ते शिवाचे शस्त्र म्हणून प्रचलित आहे.
२. मुख्य घुमटाच्या वरील छतावर एक साखळी लटकत आहे. सध्या या साखळीचा काहीच उपयोग होत नाही; पण मुसलमानांच्या आक्रमणापूर्वी या साखळीला एक भांडे लावण्यात येत होते आणि त्याद्वारे शिवलिंगावर अभिषेक होत असे.
३. आतच ताजमहाल २ माळ्यांचा आहे. खरी कबर आणि रिकामी कबर खालच्या माळ्यावर आहेत, तर २ रिकाम्या कबरी पहिल्या माळ्यावर आहेत. २ माळे असलेली शिवालये उज्जैन आणि इतर ठिकाणीही आढळतात.
४. मुसलमानांच्या कुठल्याही वास्तूत प्रदक्षिणा मार्ग नसतो; पण ताजमहालमध्ये प्रदक्षिणा मार्ग उपलब्ध आहे.
५. फ्रान्स देशीय प्रवासी तावेर्नियार याने ‘या मंदिराच्या परिसरात बाजार भरत होता’, असे लिहून ठेवले आहे. अशी प्रथा केवळ हिंदु मंदिरातच आढळून येते. मुसलमान प्रार्थनास्थळांत असे बाजार भरत नाहीत.
६. प्रख्यात लेखक कै. पु.ना. ओक यांनी या संदर्भात एक पुस्तकही लिहिले आहे.

६. ताजमहाल हे शिवालय असल्याचे आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाद्वारेही सिद्ध !

वर्ष १९७३ मध्ये न्यूयॉर्क येथील प्रॅट संस्थेचे प्राध्यापक मर्विन मिल्स यांनी ताजमहालच्या दक्षिणेस असलेल्या लाकडी दाराचा एक तुकडा अमेरिकेत नेला. तो ब्रुकलिन महाविद्यालयाचे संचालक डॉ. इव्हान विलियम्स यांना देऊन त्या तुकड्याचे वय ‘कार्बन-१४’ प्रयोग पद्धतीने ठरवण्यास सांगितले. तेव्हा ते लाकूड ६१० वर्ष (अल्प- अधिक ३९ वर्ष) वयाचे असल्याचे निष्पन्न झाले. अशा रितीने ‘ताजमहाल’ ही वस्तू शहाजहानच्या आधी कित्येक वर्षांपासून अस्तित्वात होती, हे सिद्ध होते.

(संदर्भ : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, २८.११.२००४)

ताजमहाल शिवालय असल्याचा शासकीय पुरावा !

ताजमहालपासून ४ कि.मी. अंतरावर आग्रा शहरातील बटेश्‍वर नावाची वस्ती होती. वर्ष १९०० मध्ये ‘पुरातन सर्वेक्षण खात्या’चे संचालक जनरल कनिंघम यांनी केलेल्या उत्खननात तेथे संस्कृतमधील ३४ कडवे असलेले ‘मुंज बटेश्‍वर आदेश’ नावाचे बाड सापडले. ते लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथील संग्रहालयात संरक्षित आहे. त्यातील कडवे क्रमांक २५, २६ आणि ३६ महत्त्वाचे आहेत. त्याचे स्वैर भाषांतर पुढे दिले आहे.

‘‘राजांनी एक संगमरवरी मंदिर बांधले. ते भगवान विष्णुचे आहे. राजांनी दुसरे शिवाचे संगमरवरी मंदिर बांधले. ही बखर विक्रम संवत् १२१२ मास आश्‍विन शुक्ल पक्ष पंचमी, शुक्रवार या दिवशी लिहिण्यात आली.’’ (सध्या विक्रम संवत् २०७४ चालू आहे. म्हणजेच शिवालयाला बांधून ८६२ वर्षांचा काळ लोटला आहे.)

शिवालय (म्हणजे तेजोमहालय) ८६२ वर्षे जुने !

येथील मंदिरात असलेल्या शिवलिंगाला ‘तेजोलिंग’ असे नाव होते आणि मंदिराला ‘तेजोमहालय’ असे संबोधले जात. हे शिवाचे मंदिर ‘अग्रेश्‍वर’ या नावाने प्रसिद्ध होते. त्यावरूनच त्या शहराला ‘आग्रा’ हे नाव पडले. ‘मुंज बटेश्‍वर आदेशा’नुसार हे मंदिर ८६२ वर्षे जुने आहे.’

(संदर्भ : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, २८ नोव्हेंबर २००४)
(वर्ष २०१७ नुसार ही आकडेवारी आहे.)

हिंदूंची मंदिरे बळकावून त्या ठिकाणी कबरी आणि मशिदी बनवण्याचे मुसलमान आक्रमकांचे पूर्वापार चालत आलेले षड्यंत्र !

‘ताजमहाल’ नव्हे, तर ‘तेजोमहाल’ नावाचे शिवमंदिर

‘ताजमहाल’ हे शहाजहानच्या ५०० वर्षे आधी राजा परमार्दीदेवाने उभारलेले ‘तेजोमहाल’ नावाचे शिवमंदिर आहे. यासंबंधीचा संस्कृत शिलालेख ताजमहालच्या समोरच्या बागेत मधोमध उभारला होता. त्या शिलालेखात म्हटले आहे की,

प्रासादो वैष्णवस्तेन रचितोऽन्तर्वहन् हरिम् ।
मूर्ध्ना स्पृशति यो नित्यं पदम् अस्यैव मध्यमम् ॥
अकारयच्च स्फटिकावदातम् असाविदं मन्दिरमिन्दुमौलेः ।
न जातु यस्मिन् निवसन् स देवः कैलासवासाय चकार चेेतः ॥

अर्थ : त्या राजा परमार्दीदेवाने एक राजवाडा बांधला ज्यात श्रीविष्णूंची मूर्ती होती. त्या मूर्तीच्या चरणांवर तो नेहमी नतमस्तक होई. शिवाय त्याने स्फटिकशुभ्र, निष्कलंक असे एक शंकराचे मंदिरही उभारले जे इतके नयनरम्य होते, की त्यात विराजमान झाल्यावर भगवान शंकराला कैलास पर्वतावर परत जाण्याची इच्छाच उरली नाही.

वरील शिलालेख ताजमहालच्या बागेतच उभारला होता, हे ‘इदं मंदिरम्’ या उल्लेखावरून स्पष्ट आहे.

जयपूरचा राजा जयसिंह हा मोगलांचा मांडलिक म्हणून त्याच्या मालकीच्या आग्रा नगरीतील ‘तेजोमहाल’ शहाजहानने बळकावला. त्यात मुमताजचे शव पुरले. तेव्हापासून ‘तेजोमहाल’ नावाचे ते शंकराचे मंदिर ‘ताजमहाल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. १२१२ विक्रम संवताच्या त्या शिलालेखात यासंदर्भात स्पष्ट उल्लेख आहे. याचे सर्व विद्वान आणि सरकारी अधिकारी यांना विस्मरण होऊन ‘मुमताजची कबर’ म्हणूनच ताजमहालची निर्मिती झाली’, अशी अफवा पसरू लागून समस्त जनमानसात तीच रूढ झाली.’
– श्री. पुरुषोत्तम नागेश ओक (मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी अंक २००६, पृष्ठ ६२)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात