संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६)

sant_dnyaneshwar_640

 

१. ज्ञानदेवे रचिला पाया !

१ अ. धर्म आणि समाज यांची स्थिती

‘ज्ञानदेवांच्या काळात धर्माला एखाद्या विशाल डबक्याचे स्वरूप आले होते. धर्माचे प्रवाही स्वरूप केव्हाच नाहीसे झाले होते. सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी धर्माला काहीच देणे-घेणे नव्हते. धर्म म्हणजे केवळ व्रत-वैकल्य करणे, प्रायश्चित्त घेणे, पुरोहितवर्ग सांगेल त्याप्रमाणे योग्यायोग्यतेचा विचार न करता वागणे, असेच वाटत होते. धर्म म्हणजे ‘प्राणहीन कलेवर’ उरले होते. सर्व समाज त्यामुळे स्थितीशील झाला होता.

१ आ. पूर्वीपासून असलेल्या धर्मदेवळाची अवस्था

यापूर्वी असे देऊळ नव्हते, असे नाही. ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून, पुरातन काळापासून धर्माचे देऊळ उभे होतेच; पण ज्ञानदेवांनी  पाहिले की, या देवळात केवळ उच्च वर्णियांना प्रवेश आहे. बाकीचे वर्ण, जाती, स्त्रिया, शूद्र यांना या देवळाच्या बाहेरसुद्धा उभे रहाण्याची चोरी आहे. त्या देवळात देव होता; पण भाव नव्हता. उपचार होते, ते औेपचारिक होते. प्रथा, परंपरा, रूढी यांच्यात देवळातील देव बद्ध होऊन पडला होता.

१ इ. नवीन धर्मदेऊळ उभे करण्याचे ठरवण्यामागचे कारण

१ इ १. ‘बुडते हे जन न देखवे डोळां । म्हणूनी कळवळा येतसे ।’

संत ज्ञानदेव समाजाची स्थिती डोळसपणे पहात होते. या रूढीत अडकलेल्या धर्मामुळे ते स्वतः आई-वडिलांसह, बहीण-भावांसह बहिष्कृत जीवन जगत होते. दुर्दैवाने शत्रूंनासुद्धा त्यांच्या सुखदुःखात भागीदार होण्यासाठी त्यांचे गणगोत आणि जात होती; पण ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे ‘संन्याशाची पोरे’ असल्यामुळे या विश्वात त्यांना कुणीच गणगोत उरले नव्हते. स्वतःला शुद्रापेक्षाही भयंकर अशा सामाजिक छळाला तोंड द्यावे लागत होते. अशा परिस्थितीत हे सर्व पालटून टाकण्यासाठी त्यांनी या नवीन देवळाची उभारणी करायची ठरवली. ‘बुडते हे जन न देखवे डोळां । म्हणूनी कळवळा येतसे ।’ अशी त्यांची अवस्था झाली होती. समाजाला या स्थितीशील, गतानुगतिक अवस्थेतून बाहेर काढून त्याला कर्मप्रवण करायला धर्मकीर्तनाचे जागरण करायचे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने त्यांचा विचार चालू झाला. समाजाला कार्यप्रवण करण्यासाठी त्यांनी गीता हाताशी घेतली.’

१ ई. ‘गीते’च्या पायावर धर्म-देवळाची नव्याने रचना करणे

बहिणाबाई ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे म्हणतात. नुसती डागडुजी-किरकोळ दुरुस्ती करायची असती, तर पायाला हात घालण्याची पाळी आली नसती; पण ज्या अर्थी ‘रचिला पाया’ असे म्हणतात, त्या अर्थी ज्ञानदेवांनी या भागवतधर्म देवळाची रचना नव्यानेच केली.

आता ‘पाया रचणे’ असा शब्द आहे. रचना म्हटली की, ती जाणीवपूर्वक केलेली असते. ‘जसे सुचले, तसे करत गेले’, असे नसते. त्यासाठी विचारपूर्वक आराखडा सिद्ध करून त्याच्या पूर्ततेसाठी अविश्रांत श्रम घ्यावे लागतात. कुठल्याही नवीन बांधकामाचा प्रारंभ ‘पाया काढण्या’पासून होते. पाया काढणे, म्हणजे नियोजित वास्तूची लांबी, रुंदी आणि उंची यांच्या मानाने खोली गाठावी लागते. त्याचा विचार न करता पाया उथळ आणि कच्चा असला, तर वास्तू लवकरच जमीनदोस्त होते, कळस मातीत मिसळून नामशेष होतो. पाया काढतांना आपण भूमी खणतो. त्यातील भुसभुशीत माती काढून त्याऐवजी टिकाऊ आणि कठीण अशा वस्तू भरल्यावर पाया त्या वास्तूचे वजन-भार अनंत काळपर्यंत पेलू शकतो. ज्ञानदेवांनी या देवळाचा पाया कसा असावा, यासाठी सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने ‘कुरुक्षेत्र’ या युद्धभूमीवर अर्जुनाला उपदेश केलेली ‘गीता’ पाया म्हणून अतिशय योग्य वाटली; कारण खरेखुरे युद्ध नसले, तरी सत् आणि असत्, विचार अन् विवेक, योग्य आणि अयोग्य यांच्यातील द्वंद्व प्रत्येकाच्या मनाच्या कुरुक्षेत्रावर चालू असते.

१ उ. मनातील आगळे ‘ज्ञानदेऊळ’

ज्ञानदेवांच्या मनात एक आगळे देऊळ उभे करायची आकांक्षा होती. त्यांना जिव्हाळा, प्रेम, करुणा आणि निरपेक्ष भक्ती या खांबांवर आधारलेले, चैतन्याने रसरसलेले ‘ज्ञानदेऊळ’ उभे करायचे होते. ज्या देवळातला देव, ‘दर्शनाला भक्त केव्हा येतो’, याची वाट पहाणारा नाही, तर स्वतःहून भक्तांच्या दर्शनाला धडपडणारा देव (विठ्ठल) असेल.

१ ऊ. ‘ज्ञानदेवळा’तील ‘जनसामान्यांचा देव’

भक्तांच्या सुखदुःखाशी समरस होणारा हा पांडुरंग ज्ञानदेवांनी निर्माण केला. त्या आधी तो केव्हापासून केवळ वीटेवर उभा होता. ज्ञानदेवांनी त्याला ज्ञानोत्तर भक्तीच्या संजीवनीने चेतन केले. त्यांनी चराचरात भरून राहिलेल्या ईश्वरी शक्तीचे प्रतीक म्हणून पांडुरंगाची प्रतिष्ठापना केली. ‘सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे’ असा जयघोष करत उच्चवर्णियांच्या पारतंत्र्यात पडलेल्या देवाला ज्ञानदेवांनी मुक्त केले, स्वतंत्र केले, त्याला ‘जनसामान्यांचा देव’ केले !’

(विश्वपंढरी, वर्ष १ले, अंक २रा)

२. आद्य शंकराचार्य आणि संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे अवतार म्हणून जन्माला येणारे जीव

२ अ. वैशिष्ट्ये

२ अ १. जन्मतःच विश्वबुद्धी आणि विश्वमन यांकडे झेप

असे जीव जन्मतःच पारदर्शक असल्याने यांची बुद्धीची क्षमता विश्वबुद्धीकडे झेप घेणारी, म्हणजेच तत्त्वज्ञानरूपी सिद्धांत सांगणारी, तर मनाची क्षमता लहान होण्याकडे, म्हणजेच विश्वमनाकडे धावणारी असल्याने प्रत्येक जिवाला आपल्या सरळ, सुलभ, नैसर्गिक अशा निरागस भावाच्या स्तरावर आकृष्ट करणारी असते.

२ अ २. हे जीव जन्मतःच बुद्धी आणि मन यांच्या स्तरावर शून्यत्वाकडे जाणारे असणे

यांचे मन आणि बुद्धी यांना जन्मापासूनच वय नसल्याने त्यांनी बंधनातीत अशा जडत्वधारणविरहित अवस्थेत प्रचंड कार्य केले. यावरून जन्मतःच अवतारत्व असणार्‍या जिवांचे मन आणि बुद्धी यांना वयच नसते, म्हणजेच स्थळरूपी कालधारणाच नसते, हे लक्षात येते.

२ अ ३. वैयक्तिक प्रारब्धभोग नसल्याने जन्मतःच समष्टी भोग भोगणे

अवतारत्व जन्मापासूनच धारण करणार्‍या जिवांना जडत्वरूपी वैयक्तिक असे प्रारब्धभोग नसल्याने हे जीव जन्मतःच समष्टी भोग भोगतात.

२ अ ४. सांगितलेले सिद्धांत ब्रह्मवाक्याप्रमाणे असणे

या दोघांचे जीवन अद्वैतरूपी धर्मसिद्धांत मांडणारेच असल्याने यांच्या जीवनाला आणि मार्गदर्शनात्मक शैलीला ब्रह्मरूपी कर्मसिद्धांताची झालर प्राप्त झाल्याने हे सिद्धांत ब्रह्मवाक्याप्रमाणे अनुकरणीय झाले आहेत.

२ अ ५. अभंगत्व

ते जन्मतः अनंत आणि अगाधरूपी तत्त्वज्ञानस्वरूप शिवमायेने नटलेले असल्याने ते शिवरूपी स्मरणातूनच प्रेरणादायी कार्य करून अभंगत्वाला पोहोचतात. अभंगत्व, म्हणजेच आदिशक्तीरूपी कालधारणेच्या जोरावर आलेले सिद्धरूपी संयमी शिवस्वरूपी कर्तृमयी स्थळरूपी जीवनातून उलगडणारे अवतारत्व.

२ अ ६. लहान वयातच अवतारकार्य संपवणे

यांच्या अंगी लहानपणापासूनच दिव्य प्रकाशमयी असे ब्रह्मत्व असल्याने यांचे जीवन म्हणजेच सान (छोट्या कालधारणेच्या रूपातील) अवतारधारणाच आहे; म्हणूनच यांनी लहान वयातच शून्याकडे जाणार्‍या मन आणि बुद्धी यांच्या धारणेतून प्रचंड कार्य करून आपल्या विश्वव्यापकत्वाची ओळख सर्वांनाच करून देऊन लहान वयातच अवतारकार्य संपवले. जे जीव अवतार म्हणून जन्मतःच जन्माला येतात, त्यांची अवतारधारणाही अल्प कालावधीतच संपते; कारण यांच्या जीवनाला जडत्ववादाची, म्हणजेच वैयक्तिक स्तरावरील प्रारब्धभोगाची परिसीमाच नसते.

२ अ ७. प्रत्यक्ष स्थूल स्थळरूपी कार्यप्रक्रियेला आरंभ होण्यापूर्वीच समाधी घेणे

ते कालधारणेच्या जोरावर चमत्कारजन्य जीवनातून दर्शवून अल्प कालावधीत प्रत्यक्ष स्थूल स्थळरूपी कार्यप्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वीच अवतारत्व त्यागतात, म्हणजेच समाधी घेतात किंवा देह त्यागतात.

२ आ. कार्य

२ आ १. कृतीशीलतेतील कार्यभागातील गर्भितार्थाचे आकलन करून घेणे फार अवघड असणे

यांच्या जीवनात घडलेली प्रत्येक कृतीशील घटना म्हणजे १०० टक्के चैतन्यशक्तीच्या स्तरावर घडलेला तत्त्वज्ञानरूपी एक परिपूर्ण असा बीजमय आध्यात्मिक प्रवासरूपी गाभाच असतो; म्हणून यांचे चलतपट अभ्यासतांनाही त्या त्या कृतीशीलतेतील कार्यभागातील गर्भितार्थाचे आकलन करून घेणे फार अवघड असते.

२ आ २. चैतन्यमय तत्त्वज्ञान सोपे करून सांगण्याचे कार्य भक्तीयोगी संतांना करावे लागणे

अशा अवतारी जिवांचे चैतन्यमय तत्त्वज्ञान सोपे करून सांगण्याचे कार्य मग इतर भक्तीयोगी संत जिवांना करावे लागते; कारण भक्तीयोगातील धारणेत साधेपणा हेच शब्दांचे सौंदर्य असते, तर ज्ञानयोगी धारणेत शब्दांतील कठीणपणा किंवा क्लिष्टता हेच वाक्यांचे सौंदर्य असते.

२ आ ३. सर्वसामान्य जिवांना यांच्या कार्याचे आकलन न होणे आणि भक्तीयोग्यांना त्यांच्या कार्यातील अवतारत्वाचे बीज ओळखून सर्वसामान्य जिवांना सांगावे लागणे

अशा जिवांचा कार्य करण्याचा वेग फार असल्याने यांचे जीवन कधी चालू झाले आणि कधी संपुष्टात आले, म्हणजेच त्यांनी आपले अवतारत्व कधी संपवले, हे कळणेही सर्वसामान्य जिवांच्या बुद्धीपलीकडचे असते; कारण या गोष्टी आकलन करणे जडत्ववादी भोग भोगणार्‍या जिवाच्या बुद्धीला शक्य नसते.

असे जन्मजात अवतारत्व घेऊन जन्माला आलेल्या जिवांनी अवतार संपवल्यानंतर त्यांचा जनसामान्यांवरील निर्गुणत्वाचा प्रभाव अल्प झाल्यावरच सगुणरूपी प्रवाहाच्या ओघात इतर भक्तीयोग्यांना यांच्या कार्यातील अवतारत्वाचे बीज ओळखून ते सर्वसामान्यांना विशद करून सांगणे शक्य होते आणि मग त्यांना इतर जनांमध्ये प्रसिद्धी मिळते. तसेच या दोघांचे झाले.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.९.२००७, सायं. ६.५२)

३.  ज्ञानेश्वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला, हे खरे आहे का ?

‘समस्त वारकरी भक्त ज्ञानेश्वरांचे अलौकिक व्यक्तीमत्त्व आणि त्यांचे दिव्यातिदिव्य सारस्वत यांनी विनम्र झाले. आमच्या समस्त महाराष्ट्र समाजाला ‘ज्ञानेश्वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला’ असल्या क्षुद्र तामसी शंका कधीच स्पर्शत नाहीत.

हे सगळे तामसी आंग्लाळलेल्यांनी (त्यांनाच गौरवाने ‘अभिजन’ म्हणतात, म्हणजे निधर्मी, नास्तिक, आग लावणारे) वाद निर्माण केले आहेत आणि ब्राह्मणवर्गावर प्रचंड चिखलफेक करण्यात अनेकांनी हातभार लावलेला आहे.

३ अ.  छळासंबंधी पुरावे नसणे

ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटते प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ? संशोधकांनी जी ज्ञानेश्वर चरित्रे लिहिली आहेत, त्यांत ज्ञानेश्वरांचा विलक्षण छळ इत्यादी झाल्यासंबंधात काही पुरावे आहेत का ? ज्ञानेश्वर चरित्र आणि वाङ्मय यांसंदर्भातील ख्यातनाम अशा अभ्यासपूर्ण ग्रंथांत छळासंबंधी तसे पुरावे आढळत नाहीत.

ब्राह्मणांविरुद्ध म्हणजे पुरोहितांविरुद्ध, वेदांविरुद्ध, संस्कृत भाषेविरुद्ध दंड थोपटून उभे रहाणार्‍या ज्ञानेश्वरांचे जे चित्रण सर्वत्र झाले आहे, त्यासंबंधी विद्वान काय सांगतात ? प्रा. श्री.मा. कुलकर्णी सांगतात, `तसे काहीच घडले नाही. तसे कुठेही अधिकृत पुरावे नाहीत. ही सर्व कपोलकल्पिते आहेत.’ डॉ. शं.गो. तुळपुळे, पेंडसे, शं.वा. दांडेकर, म.रा. जोशी असे कुणीही ‘छळ झाला’, असे म्हणत नाही.

३ आ.  छळासंबंधी गोबेल्सच्या प्रचारतंत्रासारखा प्रचार !

ज्ञानेश्वर चरित्राच्या आधारे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यावर अशी विलक्षण चिखलफेक केली जात आहे की, सागरातील चिखलही न्यून पडावा. हिंदु समाजाचा महाविलक्षण बुद्धीभेद केला जात आहे. ज्ञानेश्वर हे साक्षात विष्णूचा अंश आहेत. त्यांचे जीवन तुमच्या आमच्या डोळ्यांनी कसे पहाता येईल ? त्यांचे वाङ्मय हेच वास्तविक त्यांचे चरित्र आहे ! ज्ञानदेवादी भावंडांचा आणि त्यांचे पिता विठ्ठलपंतांचा भयंकर छळ झाला, अमानुष छळ झाला इत्यादी जो काही प्रकार आहे, तो गोबेल्सच्या प्रचार तंत्रासारखाच आहे.

१. ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ हा प्रा. सरदार यांचा ग्रंथ आहे. मानवता, धर्म सुधारणा, ब्राह्मणशाही, सनातनी पंडित, दास्यत्व, वर्गभेद, पुरोगामी, सुधारणावादी, सामाजिक विषमता, परिवर्तनादी असे हिंदूंच्या वर्णव्यवस्था समाजव्यवस्थेची निंदानालस्ती करणारे साम्यवादाचे घुटके घेऊन ते आधुनिकांचे शब्दप्रयोग देतात. प्रा. सरदारांप्रमाणे सुंठणकर, ओतुरकर असे आधुनिक अभिजन (आंग्लाळलेले पंडित) सांगतात. आणखी काही प्रसंगी तर ते परस्परांचे खंडनही करतात.

२. ज्ञानेश्वर चरित्राचे संशोधक प्रा. सुंठणकर सांगतात, ‘लोकांचा धर्मभोळेपणा आणि बौदि्धक दास्यत्व हाच ब्राह्मणशाहीचा आधार होता. आर्थिक दास्यत्वाहूनही हे दास्यत्व भयंकर होते.’

ज्ञानेश्वरांचा काळ ७०० वर्षांआधीचा आहे. त्या काळी हे शब्द रूढ होते का ? या शब्दांना काय अर्थ होता ? हे साम्यवादाचे घुटके आहेत. ७०० वर्षांआधी ज्ञानेश्वरकाळी साम्यवादाची बिजे अंकुरत होती, असे काही ते सांगत नाहीत. आधुनिकांचे हे शब्द बुडबुडे, पोकळ वारा असे आहेत.

३. प्रा. सरदार त्यांच्या `संतांच्या सामाजिक कार्याची फलश्रुती या ग्रंथात सांगतात, `ज्ञानेश्वर हे कडवे धर्मसुधारक होते.’ ज्ञानेश्वरांनी शास्त्रप्रमाणावर भर दिला आहे ! सर्व जनसामान्यांना विधीनिषेध कटाक्षाने पालन करण्याचा आदेश दिला आहे. ज्ञानदेव जर धर्मसुधारक असते, तर त्यांनी वेदप्रामाण्य, शास्त्रप्रामाण्य यांची टवाळी केली असती आणि त्यांनी त्यांच्या सर्वज्ञतेच्या बळावर एखादा नवा सुधारक पंथही काढला असता. तसे त्यांनी काही केले नाही आणि पावलोपावली वेदप्रामाण्यावरची निष्ठा, पराकाष्ठेची निष्ठा अभिव्यक्त केली.

४. आधुनिक संस्कृतीद्वेष्टे विठ्ठलपंतांच्या देहांत प्रायश्चित्ताच्या संदर्भात, पैठणच्या ब्राह्मणांनी अन्याय केला, असा सूर लावला आहे. ही त्यांना पर्वणीच होती; परंतु संतांनी मात्र कुणालाच दोष दिला नाही. जे घडले, तेच त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरांनी अभावानेही त्रागा केला नाही. स्वधर्म म्हणजे वेदप्रतिपाद्य धर्म. पैठणच्या ब्राह्मणांनी शास्त्रविधीनुसार संन्याशांच्या मुलांचा व्रतबंध करण्यास नकार दिला आणि आधुनिकांनी ब्राह्मणांवर शस्त्र धरले. कोणताही, कोणत्याही जातीतील संत श्रुती-स्मृती प्रतिपादित धर्माचे आचरण अभावानेही टाळत नाही आणि तसा उपदेशही करत नाही.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २२ मार्च २००७, अंक ८)

४. ज्ञानेश्वरीची वैशिष्ट्ये

अ. ‘ज्ञान + ईश्वरी = ज्ञानेश्वरी
आ. ज्ञानाचे गूढ रहस्य जाणून लिहिलेली, ती ज्ञानेश्वरी.
इ. जिच्यातून ज्ञानाचा झरा वहात आहे, ती ज्ञानेश्वरी.
ई. जिचे ज्ञान झाल्याने आपला ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, ती ज्ञानेश्वरी.
उ.  जी ईश्वरी चैतन्याने भारित आहे, ती ज्ञानेश्वरी.
ऊ.  जी ईश्वरानेच निर्माण केलेली आहे, ती ज्ञानेश्वरी.
ए.  जी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी.
ऐ.  जी ज्ञानदेवांच्या वाणीतून शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडली आणि लिहिली गेली, ती ज्ञानेश्वरी.
ओ.  जनकल्याणासाठी जिची उत्पत्ती झाली, ती ज्ञानेश्वरी.

(श्री. परशुराम गोरल यांच्या माध्यमातून, ७.१२.२००५, सकाळी ७.०४)

५. विठ्ठलभक्ती

‘निवृत्ती, ज्ञानेश्वरांनी नाथपंथ स्वीकारला. पुंडलिक मुनीने मस्तकी शिवलिंग धारण करणार्‍या पांडुरंगाची भक्ती केली. पुढे हाच भागवत धर्म झाला. पुंडलिकाने रोप लावले आणि पहाता पहाता त्याचा विशाल वृक्ष झाला. निवृत्तीनाथ सांगतात, `अद्वैत प्रतिपादक परमात्मा विठ्ठलदेव भीमातिरावर विराजमान आहे. त्या पांडुरंगाची नामभक्ती मला श्रीगहिनीनाथांच्या कृपेने लाभली.’ निर्गुण निराकार परब्रह्म विश्वजनांना आनंदित करण्याकरिता विठ्ठल कृष्णरूपाने नामरूपास आला. नामसंकीर्तनाने आम्ही धन्य झालो, असे निवृत्ती, ज्ञानदेव, सगळे वारकरी आणि भागवत संप्रदायाचे संत सांगतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २२ मार्च २००७, अंक ८)

1 thought on “संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६)”

Comments are closed.