धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांचे अलौकिक कार्य !

काशी येथे नारायण केदार घाटावर स्वामीजींनी स्थापन केलेल्या शिवमंदिरातील देवतांच्या मूर्ती

धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांच्याविषयी त्यांचे शिष्य गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेला संक्षिप्त जीवनपट येथे देत आहोत.

१. करपात्र स्वामीजी यांचा जन्म आणि त्यांनी केलेली साधना

‘वर्ष १९०७ मधील श्रावण शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील भटनी या गावी करपात्र स्वामीजींचा जन्म झाला. त्यांचे ‘हरनारायण’ असे नाव ठेवण्यात आले. वयाच्या १९ व्या वर्षी अर्थात् वर्ष १९२६ मध्ये त्यांनी गृहत्याग केला. त्यांचे वास्तव्य गंगातीरावर होते. स्वामी विश्‍वेश्‍वराश्रम यांच्याजवळ त्यांनी वेदशास्त्राध्ययन केले. हिमालयात निवास करून तपश्‍चर्या केली. त्यांना समाधी अवस्थेत धर्मसंस्थापनेकरता कार्य करण्याचा दैवी आदेश झाला. वयाच्या २४ व्या वर्षी श्रीब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून ते काशीला गेले. संन्यास ग्रहण करून ते ‘हरिहरानंद सरस्वती’ झाले.

२. राष्ट्र आणि धर्मजागृती यांसाठी स्वामीजी यांनी केलेले दैवी कार्य !

  • वर्ष १९३९ मध्ये स्वामीजी यांनी काशीला ‘सन्मार्ग’ हे दैनिक आणि ‘सिद्धांत’ हे साप्ताहिक ही वृत्तपत्रे चालू केली.
  • त्यानंतर त्यांनी ‘धर्मसंघा’ची स्थापना करून धर्मयात्रा चालू केली. शासनाच्या ‘सेक्युलर’ प्रणालीच्या शिक्षणातून लोकांना मुक्त करण्याकरता या संघाची स्थापना करण्यात आली होती. धर्मरक्षणाकरता त्यांनी भारतभर पायी यात्रा केल्या. त्यांनी अनेक अधिवेशने, चर्चासत्रे, वेदशाखा संमेलने, शास्त्रार्थ सभा इत्यादी घेतल्या.
  • १९ जानेवारी १९४० या दिवशी त्यांनी ‘धर्मयुद्ध सत्याग्रहा’ची घोषणा केली. त्यामुळे त्यांना ६ मासांचा कारावासही भोगावा लागला.
  • ‘धर्मसंघ शिक्षण मंडळ’, काशी या संस्थेद्वारा काशी, विठूर, चुरु (राजस्थान), मुज्जफ्फरपूर, वृंदावन, बिहार, देहली, अमृतसर आणि लाहोर अशा ५० पेक्षा अधिक ठिकाणी स्वामीजींनी संस्कृत विद्यालये स्थापन केली. आजही ती कार्यरत आहेत.
  • ‘धर्मवीर दल’ आणि ‘महिला संघ’ यांचीही त्यांनी स्थापना केली. सर्व वेदशाखा संमेलने, धार्मिक पत्रकार संमेलने, साधु संमेलने यांचे त्यांनी भव्य आयोजन केले.
समाधी मंदिरातील करपात्री स्वामी यांची मूर्ती अन् पादुका

३. देहत्याग

वर्ष १९८० मध्ये स्वामीजींनी हरिद्वार येथे कुंभस्नान आणि धर्मप्रचार केला. ज्वरग्रस्त असतांनाही संक्रांतीस्नान केले. ७ फेब्रुवारी १९८२ या दिवशी चतुर्दशीला पुष्यनक्षत्रावर करपात्र स्वामीजी यांनी गंगास्नान झाल्यावर काशीच्या केदार घाटावरच्या आश्रमात ‘शिवऽ शिवऽऽ शिवऽऽऽ’ नामोच्चारण करत देहत्याग केला.

संदर्भ : प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका ‘घनगर्जित’, वर्ष तिसरे, अंक ४.

हिंदूंच्या रक्षणासाठी स्वामीजींनी केलेले अविश्रांत कार्य !

१. वर्ष १९४६ मध्ये बंगाल येथे हिंदूंचे सामूहिक हत्याकांड झाले. भयंकर संहार झाला. प्रचंड धर्मपरिवर्तन झाले. करपात्र स्वामीजी त्वरित बंगालला गेले. त्यांनी नौखाली इत्यादी ठिकाणी जाऊन हिंदु समाजाला धीर दिला अन् घोषणा केली, ‘जो कोणी संकीर्तन करून रामनामाचे उच्चारण करील, तो विशुद्ध हिंदूच राहील.’ अशा प्रकारे जबरीने धर्मांतर होणार नाही, याची त्यांनी खात्री केली. करपात्र स्वामींनी ३ सहस्र बेघर झालेल्या हिंदु परिवारांची पुनर्स्थापना केली.

२. करपात्र स्वामीजी यांनी ‘हिंदु कोड बिल’ला कडाडून विरोध केला. त्यासाठी त्यांनी देशभर दौरा केला. ‘हिंदु कोड बिल’च्या विरोधात तुफानी आंदोलनात स्वामीजींच्या कार्याकरता २ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्ची पडला. स्वामीजींनी ‘हिंदु कोड बिल प्रमाणाच्या कसोटीवर’ हा ग्रंथही प्रसिद्ध केला. त्यांनी भारतभर गोवध बंदीसाठीही आंदोलने चालवली.

करपात्र स्वामीजी यांनी लिहिलेले विविध ग्रंथ !

‘शांकरभाष्य – आक्षेप और समाधान’; ‘समन्वय साम्राज्य संरक्षण’; संस्कृत ग्रंथ ‘मार्क्सवाद आणि रामराज्य’; ‘वेदस्वरूप आणि प्रामाण्य’; ‘वेदप्रामाण्य मीमांसा’; ‘अहमर्थ व परमार्थ’; ‘वेदस्वरूप विमर्श’; ‘ज्योतिष्यती कायाकल्प ?’; ‘चातुर्वर्ण्य संस्कृति विमर्श’; ‘श्रीविद्यारत्नाकर’ हा तांत्रिक ग्रंथ; ३ सहस्र पृष्ठांचा ‘वेदार्थ पारिजात’; ‘रामायणमीमांसा’ इत्यादी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात