वेदांमध्ये हिंदु शब्द नाही; म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे अयोग्य !

पू. (डॉ). चारूदत्त पिंगळे

टीका : वेदांमध्ये सनातन धर्माला हिंदु असे नाव दिलेले नाही किंवा तो शब्द वेदांत नाही; म्हणून हिंदु हा शब्द वापरू नका.

खंडण : वेदांमध्ये हिंदु शब्द नाही; म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे अयोग्य ठरते; कारण –

१. एखादे मूल जन्माला येते, त्या वेळी त्याला कोणतेही नाव नसते. पुढे त्या मुलाचे बारसे झाल्यानंतर त्याला नाव प्राप्त होते. त्याचे नक्षत्रावरून ठेवलेले नाव याहून वेगळे असू शकते. समजा एखाद्या मुलाचे नाव विजय असेल, तर लहानपणी त्याला आई-वडील विजू म्हणून हाक मारतात. पुढे सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यानंतर त्याला विजयराव म्हणतात. पुढे मुले झाल्यानंतर ती त्याला बाबा म्हणून हाक मारतात. असा हा विजय जन्म झाल्यानंतर लगेचच बाबा या नावाने ओळखला जात नाही. हिंदु धर्माच्या संदर्भातही असेच आहे. वेदांमध्ये हिंदु हे नामाभिधान नसले, तरी पुढे या धर्माला जर हिंदु असे नाव पडले असेल, तर ते अयोग्य आहे, असे म्हणण्यात अर्थ नाही.

२. वेदांमध्ये सिमेंटची घरे आणि मोटरगाड्या यांचा उल्लेख नाही, तरी आज या गोष्टींना मान्यता आहे.

३. वेदांमधील ज्ञान हे गूढ आहे. एकोणिसाव्या शतकात पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी भारतीकृष्ण तीर्थ यांनी या वेदांमधूनच वैदिक गणितचा शोध लावला. त्यापूर्वी वैदिक गणिताची सूत्रे कोणालाही ठाऊक नव्हती. तोपर्यंत गणित वेदांग आहे, हे किती जणांना ज्ञात होते ?

वेदांचा नुसता शब्दार्थ लक्षात घेऊन चालत नाही, तर वेद समजण्यासाठी आध्यात्मिक पात्रताही लागते. ती नसतांना केवळ हिंदु हा शब्द वेदांमध्ये नाही, असा शाब्दिक पोरखेळ करण्यात काहीच अर्थ नाही.

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (३१.३.२०१५)