श्री रामेश्‍वरम् मधील ऊर्जास्रोत हे आरोग्यदायी असल्याचेे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध !

rameshwar_640

भारतात बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आढळतो. त्यांपैकी तमिळनाडू येथील कन्याकुमारीजवळ असलेल्या श्री रामेश्‍वरम् ज्योतिर्लिंगांची स्थापना कुणी ? केव्हा ? का ? आणि कशाकरिता केली ?; यामागील उद्देश आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांविषयी पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केलेले संशोधन येथे देत आहोत.

पू. डॉ. रघुनाथ शुक्ल यांचा परिचय

r_n_shukla_pune
पू. डॉ. रघुनाथ शुक्ल

पू. डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल हे पुणे येथील आहेत. ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन्.सी.एल्.) येथील शास्त्रज्ञ (निवृत्त), ज्योतिष महामहोपाध्याय, वास्तूशास्त्रवाचस्पती, विद्यावाचस्पती, विज्ञानाचार्य आणि जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून ओळखले जातात.

भारतातील आणि महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचा विचार करतांना लक्षात येते की, ज्योतिर्लिंग त्यांच्या नावाच्या अर्थाशी निगडीत आहे. त्या ठिकाणी ज्योत आहे आणि प्रतिकात्मक लिंगही आहे. मला वर्ष १९६१ मध्ये निरनिराळ्या विषयांवर संशोधन करून चार वेळा पीएच्.डी. मिळवलेले संन्यासी वंगपुत्र भेटले. त्यांनी मला, तू ज्योतिर्लिंगांचा अभ्यास करावा असे वाटते, असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेचा स्वीकार करून मी संशोधन चालू केले.

श्री रामेश्‍वरम् येथील दोन ज्योतिर्लिंगे

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री रामेश्‍वरम् ज्योतिर्लिंगाला गेलो. त्या ठिकाणी असलेले ग्रंथ, जुन्या पोथ्या वाचल्या. वाचन करतांना लक्षात आले की, या ठिकाणी श्रीरामाने रावणाला हरवण्याकरता शिवाची भक्ती केली. त्या ठिकाणी ठेवण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून शिवलिंगाची स्थापना करण्याची आज्ञा शिवाने दिली. शिवलिंग आणण्यासाठी हनुमानास पाठवले; परंतु मुहुर्ताच्या अगोदर हनुमान येऊ शकला नाही आणि मुहूर्त टळू नये, म्हणून श्रीरामाने तेथील समुद्राच्या वाळूचे शिवलिंग बनवले, असे वर्णन वाचायला मिळाले. हनुमान दुसरे शिवलिंग घेऊन आला. रामाने त्यास सांगितले की, मी बनवलेल्या वाळूच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आता तू आणलेल्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा तू कर. मारुतीने पहिले शिवलिंग तेथून हालवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्याकडूनही ते जागचे हलू शकले नाही. मारुतीने दुसर्‍या जागी त्याने आणलेल्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली. रामेश्‍वरम् ला गेल्यावर आपल्याला दोन शिवलिंगांचे दर्शन घ्यावे लागते. हा कथाभाग झाला.

प्रभु श्रीरामांनी स्थापन केलेल्या वालुकामय शिवलिंगाच्या वैज्ञानिक  संशोधनावरून १० सहस्र वर्षांपूर्वीच रामायण घडले असले पाहिजे, हे सिद्ध होणे

वैज्ञानिक दृष्टीने संशोधनाचा प्रमुख भाग म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या वाळूचे परीक्षण ! आम्ही त्या ठिकाणची वाळू गोळा केली आणि प्रयोगशाळेत त्यावर संशोधन केले. वाळूचे पृथःकरण (Analysis) केले. श्रीरामाने स्थापन केलेल्या मूळच्या वालुकामय शिवलिंगाच्या मिळालेल्या पन्नास ग्रॅम वजनाच्या तुकड्याचे प्रयोगशाळेत विश्‍लेषण केल्यावर असे आढळले की, या मितीला त्या ठिकाणी असलेली वाळू आणि शिवलिंगाचे मिळालेले तुकडे यात संयुग मूलद्रव्ये ही ९६ टक्के एकसारखीच आहेत. त्यावरून वैज्ञानिक म्हणून असा निष्कर्ष काढता येऊ शकतो की, प्रभु श्रीरामाने त्या ठिकाणी असलेली वाळू घेऊन ठराविक तंत्र, मंत्र, यंत्र वापरून एका ठराविक प्रहरात ते शिवलिंग सिद्ध केले आणि विशिष्ट मुहुर्तावर स्थापन केले. त्या वस्तुमानाचे वैज्ञानिक पद्धतीने आयुष्य काढण्यासाठी कार्बन डेटिंग (C-14 Dating) केले. त्यावरून श्रीरामाचा काळ हा किमान १० सहस्र वर्षांपूर्वीचा असला पाहिजे, हे निदान काढले गेले.

या अनुषंगाने रामायणात जे घडले, त्याचे रामायणात वर्णन आहे. (त्यात वाल्मीकि रामायण, तुलसीरामायण हेही येते.) त्या ठिकाणचे प्रसंग, त्यांची वर्णने लक्षात घेता १० सहस्र वर्षांपूर्वीच रामायण घडले असले पाहिजे, हे नि:संदिग्धपणे मान्य केले पाहिजे.

श्री रामेश्‍वरम् शिवलिंगाभोवती ठराविक काळात ठराविक रंगांची वलये दिसणे

श्री रामेश्‍वरम् शिवलिंगाभोवती ठराविक प्रहरी, विशेषत: पौर्णिमा, अमावास्या, प्रदोष या वेळी ठराविक रंगांची वलये अनेक लोकांना या काळात डोळ्यांना दिसली. एखाद्या वस्तूमानाभोवती असणारे वलय हे त्या वस्तूमानाच्या अंतर्गत चैतन्याशी निगडित असते. ते आपल्या डोळ्यांनी पहाता येते. जांपानिहिपिनातां (तांनापिहिनिपाजां) (VIBGYOR) (जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि तांबडा) हे रंग त्या वस्तूमानाचा वातावरणात असणारा चैतन्यमय आविष्कार दाखवते. प्रत्येक रंगातील ठराविक कंपनसंख्या आणि तरंगलहरी यांचे स्रोत वातावरण द्विपाद, चतुष्पाद, वनस्पती, पशूपक्षी यांना उपयुक्त ठरते.

श्री रामेश्‍वरम् येथे असणारी कंपने आणि स्पंदने रामेश्‍वरम् संहितेत दिलेल्या माहितीनुसार ठराविक रोगनिवारणाकरिता उपयुक्त !

रामायणात वर्णन केलेल्या या श्री रामेश्‍वरम् च्या शिवलिंगात एकूण पाच आवरणे सापडली. सगळ्यात मध्यभागी किरणोत्सर्गी आयोडिन, सोडियम, प्लॅटीनम यांचा किरणोत्सर्ग आजही मोजता येईल, असा सापडतो. त्यावर असणार्‍या आवरणात निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या ऑक्साईड्स, सल्फाईड्स, सल्फेट्स, क्रोमेट्स, क्रोमाईट्स, कार्बोनेट्स यांचा लेप (आवरण) मोजता येईल इतक्या सुलभ पद्धतीने निर्माण केला आहे. त्या शिवलिंगाच्या पृष्ठभागावर आजही शिवालयात गेल्यावर निरनिराळी मूलद्रव्ये, धातूंची आवरणे (कवच) त्याच हेतूने टाकली जातात, हे लक्षात येईल.

श्री रामेश्‍वरम् च्या ज्योतिर्लिंगाचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी आसपास एकंदर १६४ शिवलिंगे पहायला मिळतात. त्या ठिकाणी असणारी कंपने, स्पंदने रामेश्‍वरम् संहितेत दिलेल्या माहितीनुसार ठराविक रोगनिवारणाकरिता उपयुक्त आहेत, असे वाचण्यात आले. वैज्ञानिक दृष्टीने आरोग्यविषयक औषधांचा विचार करतांना त्या औषधांचा शरीर या माध्यमात असणार्‍या ऊर्जाकेंद्रांशी संबंध आल्यावर जी रासायनिक प्रक्रिया आणि ऊर्जा निर्माण होते, ती प्रक्रिया आणि ऊर्जानिर्मिती त्या त्या ज्योतिर्लिंगातूनही होते; म्हणूनच तंत्र, मंत्र, यंत्र पद्धतीने रामेश्‍वरम् चे ज्योतिर्लिंग हे एक यंत्र आहे.

त्या ठिकाणी गेल्यावर आपण पूजा-अर्चा, स्वाध्याय करतो ते तंत्र आणि हे करत असतांना आपण शिवयोग, शिवमंत्र, महाशिवयोग, रुद्र यांतील मंत्र शब्दरूपाने उच्चारतो. ध्वनी आणि ध्वनीलहरींचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने केल्यावर असे लक्षात आले की, कोणत्याही अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी वनस्पतींची औषधे न देता पोटाच्या विकारापासून ते कर्करोगापर्यंतचे रोगनिवारण करण्याची क्षमता रामेश्‍वरम् चा शिवयोग केल्यानंतर प्राप्त होते; कारण शिवयोग केल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते, प्राप्त होते, तिच्यातून त्या त्या रोगाच्या निर्मितीपासून निवारणापर्यंतची सगळी संहिता वेदमूर्ती जोगळेकर यांनी उपलब्ध करून दिली. वेदमूर्ती जोगळेकर हे रामेश्‍वरम् ला उपाध्याय म्हणून कार्य करतात.

शिवयोगातील ६४ ज्योतिर्लिंगांपैकी  केवळ १२ ज्योतिर्लिंगांची माहिती उपलब्ध !

जसे रामेश्‍वरम् चे ज्योतिर्लिंग आहे, तसेच रामेश्‍वरम्, कन्याकुमारी परिसरात एक अज्ञात, अप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. त्याला ज्योतिर्लिंग का म्हणायचे ? तर त्याचे कारण, मी जेव्हा शिवयोग आणि महाशिवयोग वाचला, तेव्हा त्यात नमूद केले होते की, एकूण ६४ ज्योतिर्लिंगे भारतात होती. अर्थात त्या काळी भारताची व्याप्ती अधिक विस्तृत होती. त्या वेळी मेक्सिको, चीन, दमास्कस, पाकिस्तान, बलुचिस्तान, म्यानमार (ब्रह्मदेश), सिक्कीम हे सगळे देश भारत म्हणून ओळखले जायचे, म्हणून या बाहेरच्या देशात आजही मोठमोठी शिवलिंगे पहायला मिळतात. ६४ ज्योतिर्लिंगांपैकी आम्हाला १२ ज्योतिर्लिंगे माहीत आहेत.

रामेश्‍वरम् चे ज्योतिर्लिंग हे कोणाच्याही प्राथमिक गरजा  भागवणारे चैतन्यदायी, शरिरातील ठराविक ऊर्जाकेंद्र जागृत करणारे !

रामेश्‍वरम् च्या ज्योतिर्लिंगाच्या वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या अभ्यासातून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आणि ती म्हणजे या ज्योतिर्लिंगातून प्रक्षेपित होणारे चैतन्य, ऊर्जा हे रोगनिवारणाकरिता आजही उपयुक्त आहे. त्या त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेल्यानंतर ठराविक वेळी, ठराविक प्रहरी, ठराविक पद्धतीने तंत्र, मंत्र, यंत्र यांचा विचार करून स्वाध्याय केला, तर माणसाच्या कुंडलिनीतील मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतच्या त्या त्या चक्राची जागृती ही अल्प वेळेत अधिक वेगाने आणि दीर्घकाळ टिकणारी अशी होते. त्यात रामेश्‍वरम् एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग ! त्या ठिकाणी आजही आम्हाला रामायणातील आणि प्राचीन वेदवर्णन केलेल्या ठिकाणांचा अवशेषात्मक असा अभ्यास करता येतो. त्या ठिकाणीच वास्तूशास्त्र, वास्तूदिशा, वास्तूसंकल्पनीय देवदेवता या आजही वैश्‍विक ऊर्जा ग्रहण करणे, साठवणे आणि प्रक्षेपित करणे या माध्यमांचाच अनुभव देऊन जातात. शिल्प जसे विलोभनीय असते, तसे चैतन्याच्या भाषेत प्रत्येक दगड हा बोलका असतो आणि आजही आहे. म्हणून श्रद्धायुक्त अंत:करणाने रामेश्‍वरम् च्या ज्योतिर्लिंगाचा अभ्यास करतांना त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य हे कोणाच्याही प्राथमिक गरजा भागवणारे चैतन्यदायी, शरिरातील ठराविक ऊर्जाकेंद्र जागृत करणारे आहे, हे लक्षात आले.

(संदर्भ : विश्‍व चैतन्याचे विज्ञान, लेखक – डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल)