हिंदूंनो, बाबा बंदा बहादुरजी या हुतात्म्याचे सतत स्मरण ठेवा !

१. लढाई जिंकू शकणार नाही, हे लक्षात येताच मोगलांनी तहाचा प्रस्ताव मांडणे आणि तहासाठी आलेल्या शिखांना कपटाने बंदी करणे

गुरु गोविंद सिंह यांनी बाबा बंदा बहादुरजी यांना शिखांचे पहिले सेनानायक म्हणून नियुक्त केले. बाबा बंदा बहादुरजी यांनीही गुरूंच्या आज्ञेचे पालन करत धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ७२ लढाया केल्या. शेवटची लढाई गुरदास नंगल गडी येथे जवळजवळ ९ मास चालली. जेव्हा मुसलमानांना बाबा बंदा बहादुरजी आणि त्यांच्या सैन्याला जिंकणे कठीण होऊ लागले, तेव्हा त्यांनी संधी करण्याचा प्रस्ताव मांडला. संधीसाठी होणार्‍या बैठकीसाठी जेव्हा गडाची द्वारे उघडण्यात आली, तेव्हा मुसलमानांनी त्यांच्या मूळच्या कपटी वृत्तीनुसार त्यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा शिखांची सैन्यसंख्या ७४० होती, तर मुसलमानांच्या सैन्यात ३०,००० आरक्षक होते. त्यामुळे मोगल सैन्याने शीख शिपायांना सहजपणे बंदी केले आणि अत्यंत क्रौर्याने त्यांच्यावर शस्त्रे चालवली. नंतर अत्यंत निर्दयतेने त्या ७४० जखमी शीख आरक्षकांची मिरवणूक दिल्लीला आणून तेथील आगगाडीच्या स्थानकासमोर त्यांना ठार मारण्यात आले. ते हुतात्मा झाले.

२. शीख नेते बाबा बंदा बहादुरजी यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवूनही ते त्यांना बळी न पडल्याने मोगलांनी त्यांच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देणे

नंतर मोगलांनी बाबा बंदा बहादुरजी यांनी शीख धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारावा, यासाठी विविध प्रलोभने दाखवली; परंतु बाबा बंदा बहादुरजी त्यांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. तेव्हा मोगलांनी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यास प्रारंभ केला. तरीही बाबा बंदा बहादुरजी स्वतःचा शीख धर्म सोडण्यास सिद्ध झाले नाहीत. तेव्हा आरक्षकांनी त्यांच्या चार वर्षांच्या निष्पाप पुत्राला, बाबा अजय सिंहाला त्यांच्या समोर आणले आणि त्यांना धमकावले, ‘‘इस्लाम धर्माचा स्वीकार कर, नाहीतर तुझ्या या मुलाला आम्ही मारून टाकू.’’

३. धर्म आणि राष्ट्र यांसाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या गुरूंचा शिष्य असल्याने धमकावणीला घाबरत नसल्याचे बाबा बंदा बहादुरजी यांनी सांगणे

बाबा बंदा बहादुरजी यांनी प्रथम आपला मुलगा अजयसिंह याच्याकडे पाहिले आणि नेहमीप्रमाणे डोळे बंद करून आपले गुरु गोविंद सिंह यांचे चिंतन केले. नंतर त्यांना गुरु गोविंद सिंह यांच्या मुलांनी धर्मासाठी केलेल्या बलीदानाची आठवण झाली आणि ते स्मित करत डोळे उघडून त्या मारेकर्‍याला (जल्लादाला) म्हणाले, ‘‘ज्यांनी धर्म आणि राष्ट्र यांसाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, अशा गुरूंचा मी शिष्य आहे; म्हणून मी तुझ्या कोणत्याच धमकावणीला घाबरणार नाही. तुला हवे ते कर.’’

४. मारेकर्‍यांनी मुलावर अनन्वित अत्याचार करूनही मी माझ्या गुरूंच्या इच्छेचे पालन करत असल्याने मुलाविषयी अभिमान आणि तुझ्यासारख्या पोटासाठी माणुसकीचा खून करणार्‍याविषयी कीव वाटत असल्याचे बाबा बंदा बहादुरजी यांनी सांगणे

त्या कसायाने बाबा अजय सिंहाचे पाय पकडून त्याला हवेत गरगर फिरवले. त्याच्या शरिराला सुया टोचून त्याचे हाल केले. त्याचा नानाप्रकारे छळ करून त्याला इतके तडफडवून रडवले की ‘मुलाचा छळ आणि त्याला होत असलेल्या यातना सहन न होऊन तरी बाबा बंदा बहादुरजी स्वधर्म सोडून इस्लाम धर्माचा स्वीकार करतील’, असे त्या मारेकर्‍यांना वाटले; परंतु बाबा बंदा बहादुरजी हे सर्व शांतपणे पहात होते. निरागस अशा बाबा अजय सिंहाला कठोर यातना देऊन आणि रडवूनही बाबा बंदा बहादुरजी यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, हे त्या मारेकर्‍याने पाहिले. तेव्हा त्याने बाबा बंदा बहादुरजी यांना विचारले, ‘‘अरे, तू असा कसा बाप आहेस ? कुठल्या मातीने तू घडला आहेस ? तुझ्या या निष्पाप मुलावर इतके अत्याचार होत आहेत आणि तू काय करत आहेस.’’ तेव्हा बाबा बंदा बहादुरजी यांनी त्याला उलट विचारले, ‘‘हे मारेकर्‍या, तू काय करत आहेस ?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मी माझ्या राजाच्या आज्ञेचे पालन करत आहे.’’ तेव्हा बाबा बंदा बहादुरजींनी त्याला सांगितले, ‘‘तू पोटासाठी (भाकरीच्या दोन तुकड्यांकरिता) तुझ्या राजाच्या आज्ञेचे पालन करत आहेस. त्यासाठी तू माणूस आणि माणुसकी यांवर इतके अत्याचार करत आहेस की, ज्याने अजून हे जग पाहिले नाही आणि आई-वडिलांच्या मांडीवर खेळण्या-बागडण्याचे ज्याचे दिवस आहेत, अशा एका निरागस बालकाचे शस्त्र करून तू माझ्यावर आघात करत आहेस आणि या गोष्टीची तुला लाजही वाटत नाही. मग मी तर दोन विश्वांचा (ईहलोक म्हणजे नश्वर आणि दुसरे परलोक म्हणजे शाश्वत) मालक आणि परम दानी असलेल्या १० वे पिता गुरु गोविंद सिंहजी यांच्या इच्छेचे पालन करत आहे. त्यामुळे मला तुझी कीव करावीशी वाटते आणि माझ्या या निष्पाप बाळाचा अभिमान वाटत आहे. तेव्हा तू तुझ्या राजाच्या आज्ञेचे पालन कर आणि मला माझ्या गुरूंच्या इच्छेचे पालन करू दे.’’

५. मारेकर्‍याने मुलाला ठार करून आणि त्याचे मांस बाबा बंदा बहादुरजींच्या तोंडात कोंबूनही ते अविचल रहाणे अन् शेवटी स्वधर्मासाठी हुतात्मा होणे

तेव्हा मारेकर्‍याने त्या कोवळ्या बालकाला, बाबा अजय सिंहाला जमिनीवर आपटून आपटून ठार मारले. कट्यारीने त्याची छाती सोलली. नंतर त्याचे काळीज काढून बाबा बंदा बहादुरजींच्या तोंडात कोंबले आणि त्याचे आतडे काढून त्यांच्या गळ्यात टाकले. तरीही बाबा बंदा बहादुरजी अविचल राहिले आणि म्हणाले, ‘वाहे गुरु, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे.’ शेवटी मारेकर्‍याने बाबा बंदाजी यांनाही अत्यंत शारीरिक यातना दिल्या आणि त्यांच्या शरिराचे तुकडे करून त्यांनाही ठार केले. ते हुतात्मा झाले.’

(पंजाब केसरी, ९ जून २००९ यांच्या सौजन्याने)

(अभय भारत, १५ जून ते १४ जुलै २००९)