क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी ओतप्रोत असलेले राष्ट्र-धर्माचे रक्षक श्री गुरु गोविंदसिंह !

गुरु गोविंदसिंह

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी ओतप्रोत भरलेल्या श्री गुरु गोविंदसिंह यांविषयी ‘जर ते नसते, तर सगळ्यांची सुंता झाली असती’, असे जे म्हटले जाते, ते शतप्रतिशत खरे आहे. देश आणि धर्म यांसाठी काहीतरी करण्याची उर्मी गुरु गोविंदसिंह यांच्यामध्ये लहानपणापासूनच रुजत होती. त्यामुळेच धर्मासाठी त्यांचे वडील अद्वितीय बलीदानाची सिद्धता करत असतांना, त्यांनी धर्मरक्षणाचे दायित्व स्वीकारले, तेही वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी ! एकीकडे युद्धाच्या व्यूहरचना आणि दुसरीकडे वीररस अन् भक्तीरस यांच्या परिपूर्णतेने भरलेले चरित्रग्रंथ आणि काव्य यांची निर्मिती, अशा दोन्ही अंगांनी गुरुजींनी राष्ट्र-धर्माचे रक्षण केले.

१. श्री गुरु गोविंदसिंहांची क्षात्रवृत्ती दाखवणारे त्यांच्या जीवनातील काही प्रसंग !

१ अ. गोविंद यांना युद्ध करण्याची पुष्कळ आवड होती. त्यामुळे लहानपणी ते आपल्या बालमित्रांचे दोन गट करून त्यांच्यात खोटेखोटे युद्ध खेळत.

१ आ. पाटणा येथील मुसलमान सत्ताधार्‍यांना मान झुकवून अभिवादन न करण्याची धाडसी कृती ते लहानपणापासून करत होते.

१ इ. धर्मरक्षणासाठी स्वतःचे बलीदान देऊ इच्छिणार्‍या गुरु तेगबहादूर यांना पुढील धर्म रक्षणाच्या कार्यासाठी आपण समर्थ असल्याचे स्वतःच्या ओजस्वी वाणीने सिद्ध करणारे गोविंद !

तो काळ मोगल सम्राट औरंगजेबाच्या क्रूर राजवटीचा होता. काश्मीर येथील मोगल शासक अफगाण शेर याच्या अत्याचारांनी काश्मिरी पंडित त्रस्त झाले होते. उच्चवर्णीय आणि ब्राह्मण यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात होते. गुरु तेगबहादूर यांनी संपूर्ण देशात भ्रमण केले होते, त्यामुळे त्यांनी एकूण परिस्थिती जवळून पाहिली होती. तेव्हा स्वरक्षणासाठी काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ पंडित कृपाराम दत्त यांच्या नेतृत्वाखाली आनंदपूर येथे गुरु तेगबहादूर यांना शरण आले. त्याच वेळी औरंगजेब हिंदूंच्या मतांतरासाठी सर्व प्रकारचे अत्याचार आणि कठोर उपाय योजत होता, तर दुसर्‍या बाजूला हिंदू समाजामध्ये दुर्बलता आणि मतभेद यांनी उच्चांक गाठला होता. समाजात एकजूट नव्हती अन् राष्ट्रीयत्वाची भावना न्यून झाली होती. गुरु तेगबहादूर यांनी पंडितांना सांगितले, ‘कोणी महापुरुष या अत्याचारांच्या विरोधात उभा रहात नाही, तोपर्यंत देश आणि धर्म यांचे रक्षण होणे शक्य नाही.’ सभेत स्मशानवत शांतता पसरली. या वेळी बाल गोविंदाने सांगितले, ‘‘पिताजी, हे काश्मिरी पंडित तुम्हाला शरण आले आहेत. आपल्या व्यतिरिक्त यांना कोण धीर देऊ शकणार ?’’ पुत्राची ही निर्भीड वाणी ऐकून पित्याने त्याला स्वतःच्या मांडीवर बसवून विचारले, ‘‘यांचे रक्षण करतांना माझे मुंडके छाटून मला परलोकात जावे लागले, तर तुझे रक्षण कोण करणार ? गुरुनानकांच्या या अनुयायाचे रक्षण कोण करणार ? शिखांचे नेतृत्व कोण करणार ? तुम्ही तर अजून लहान आहात.’’ यावर बाल गोविंदाने उत्तर दिले, ‘‘मी ९ मासाचा मातेच्या गर्भात असतांना त्या कालपुरुषाने माझे रक्षण केले, आता तर मी ९ वर्षांचा आहे, तर मी माझे रक्षण नाही का करू शकणार ?’’ पुत्राची ही ओजस्वी वाणी ऐकून गुरुजींना ‘गोविंद आता पुढील दायित्व पेलण्यास समर्थ आहे’, असा विश्वास वाटला. गुरु तेगबहादूर यांनी त्वरित पाच पैसे आणि नारळ मागवून त्यावर आपल्या पुत्राचे डोके टेकवले अन् आपल्या पुत्राला गुरुपदी आरूढ करून भारतदेशाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आपला देह बलीवेदीवर समर्पित करण्यासाठी प्रस्थान केले.

१ ई. शांती आणि अहिंसा या मार्गाने प्राणांचे बलीदान करण्याऐवजी दुष्प्रवृत्तींशी लढण्याची प्रतिज्ञा घेणारे श्री गुरु गोविंदसिंह !

पित्याच्या महान बलीदानानंतर श्री गुरु गोविंदसिंह यांनी शीख पंथाचे शांती आणि अहिंसा या मार्गाने प्राणांचे बलीदान करण्याचे धोरण मोडून काढणारी पुढील प्रतिज्ञा केली. हीच प्रतिज्ञा पुढे देश आणि धर्म यांसाठी शत्रूंवर निर्णायक विजय मिळवण्यासाठी श्री गुरु गोविंदसिंह यांच्या जीवनाची प्रेरणा बनली. याला इतिहास साक्षी आहे.

१ उ. औरंगजेबाच्या शाही आदेशाला प्रतीआदेश काढणारे आणि त्याच्याशी दोन हात करण्याची सिद्धता करणारे श्री गुरु गोविंदसिंह !

गुरुजींचे रौद्ररूप पाहून दिल्लीचा मोगल शासक चिंतातूर झाला. औरंगजेबाने सरहिंदच्या नबाबाला आदेश दिला, ‘गुरु गोविंदसिंह साधूजीवन व्यतीत करणार असेल, स्वतःला खरा बादशाह म्हणवून घेणे आणि मोठ्या मोठ्या सैनिकांना जमवणे बंद करणार असेल, आपल्या डोक्यावर राजांप्रमाणे तुरा ठेवणे सोडून देणार असेल, किल्ल्याच्या छतावर उभे राहून सैन्याचे निरीक्षण करणे आणि सलामी स्वीकारणे बंद करणार असेल, तर उत्तम आहे. तो एक सामान्य ‘संत’ म्हणून राहू शकतो; परंतु ही चेतावणी दिल्यानंतरही त्याने आपल्या कारवाया बंद केल्या नाहीत, तर त्याला हाकलून लावून सीमापार करावे, बंदीवान करावे किंवा त्याची कत्तल करावी. आनंदपूरचा संपूर्ण विध्वंस करून ते नष्ट करावे.’ औरंगजेबाच्या या शाही आदेशाचा गुरुजींवर काहीच परिणाम झाला नाही, तेव्हा फेब्रुवारी १६९५ मध्ये औरंगजेबाने आणखी एक आदेश काढला, ‘एकाही हिंदूने (जे मोगल राजसत्तेत कर्मचारी आहेत त्यांना वगळून) डोक्यावर शेंडी ठेवू नये, पगडी घालू नये, हातात शस्त्र घेऊ नये. तसेच पालखीत, हत्तींवर आणि अरबी घोड्यांवर बसू नये.’ गुरुजींनी या अपमानकारक आदेशाला आव्हान दिले आणि प्रतीआदेश काढला, ‘माझे शीख बंधू केवळ वेणीच घालणार नाहीत, तर संपूर्ण केशधारी असतील, ते केस कापणार नाहीत. माझे शीख बंधू शस्त्रधारी असतील, हत्तींवर, घोड्यांवर आणि पालखीतही बसतील.’

२. गुरु गोविंदसिंह यांचे ज्ञानकार्य

२ अ. उत्कृष्ट योद्धा असलेल्या श्री गुरु गोविंदसिंहांच्या ब्राह्मतेजाची प्रचीती देणारे वीररस अन् भक्तीरस यांनी परिपूर्ण असलेले त्यांचे साहित्य !

१. ‘नाममाला’ (वयाच्या १२ वर्षी रचलेला ग्रंथ)
२. ‘मार्कंडेय पुराणा’चे हिंदीत भाषांतर
३. तृतीय चण्डी चरित्र
४. चोवीस अवतार
५. विचित्र नाटक
६. रामावतार

या प्रमुख ग्रंथांच्या रचनांसह श्रीकृष्णावतार कथा, रासलीलेतील भक्तीरस आणि युद्धनीती यांसारख्या विषयांवरही गुरुजींनी लेखन केले आहे.

२ आ. इतिहास आणि प्राचीन ग्रंथ यांचे सोप्या भाषेत लेखन करून त्यांचे पुनरुज्जीवन करणारे गुरुजी !

गुरु गोविंदसिंह यांनी आपल्या सैनिकी, साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांना गती मिळवून देण्यासाठी हिमाचल प्रदेशातील नाहन राज्यातील यमुना नदीच्या दक्षिण तटावर ‘पावटा’ या नावाने नगर वसवले. देशभरातील निवडक ५२ कवींना ‘पावटा’ येथे बोलावून देशाचा इतिहास आणि प्राचीन ग्रंथ यांचे सोप्या भाषेत लेखन करवले. अमृतराय, हंसराय, कुरेश मंडळ आणि अन्य विद्वान कवी यांना संस्कृत भाषेतील चाणक्यनीती, हितोपदेश आणि पिंगलसर इत्यादी ग्रंथांचे भाषांतर
करण्याचे कार्य सोपवले. गुरुजी स्वतः उत्कृष्ट साहित्यकार होते. गुरुजींचे हिंदी, ब्रज आणि पंजाबी या भाषांतील अनेक ग्रंथ वीररसाने भरलेले आहेत.

२ इ. गुरु गोविंदसिंह यांनी प्राचीन ग्रंथांच्या सखोल अभ्यासाचे महत्त्व ओळखून पाच शिखांना संस्कृत भाषेच्या विधीवत शिक्षणासाठी काशीला पाठवणे आणि त्यातूनच ‘निर्मळ परंपरे’च्या स्थापनेचा पाया रचणे

गुरुजी आपल्या शीख खालसा पंथामध्ये संस्कृतमधील प्राचीन काव्य आणि ग्रंथ यांच्यातील भावार्थाच्या माध्यमातून नवी चेतना जागृत करू पहात होते. केवळ पौराणिक ग्रंथांचे भाषांतर करून भागणार नाही, तर त्यांचा सखोल अभ्यासही आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यासाठी गुरुजींनी पाच शिखांना ब्रह्मचारी वेश धारण करण्याचा आदेश देऊन विशेष करून संस्कृत भाषेचे विधीवत् शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवले. येथूनच ‘निर्मळ परंपरे’चा श्रीगणेशा झाला. नंतर ‘निर्मळ परंपरा’ आणि संस्था यांच्याकडे धर्मप्रसाराचे कार्य सोपवले.

२ ई. श्री गुरु गोविंदसिंह यांचे ग्रंथ आणि कविता !

‘हिंदु आणि शीख वेगळे नाहीत. त्यांची शिकवण वेगळी नाही. शीख पंथ महान हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहे. हिंदूंचे धर्मग्रंथ, पुराण आणि दर्शने यांतील ज्ञान श्री गुरु गोविंदसिह यांनी ‘गुरुमुखी’त मांडले आहे. हिंदू जिवंत राहिले, तरच शीख जिवंत रहातील. आम्ही आमचा वारसा (पूर्वापार परंपरा) सोडून देणार आहोत का ?’

– मास्टर तारासिंह (२९.८.१९६४ या दिवशी मुंबई येथील सांदिपनी आश्रमात विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेच्या वेळी केलेल्या भाषणाचा अंश) (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)

‘श्री गुरु गोविंदसिंह यांनी औरंगजेबला पाठवलेला स्पष्टवक्तेपणा, आत्मविश्वास आणि वीरता या गुणांचे दर्शन घडवणारा मृत्यूचा खलिता !

औरंगजेब ! मी त्या शक्तीचे स्मरण करून तुला हा मृत्यूचा खलिता पाठवत आहे. जिचे स्वरूप तलवार आणि खंजीर आहे. जिचे दाते तीक्ष्ण आहेत आणि जिचा साक्षात्कार भाल्याच्या टोकावर स्पष्ट दिसत आहे. ती युद्धात जीवदान देणार्‍या योद्ध्यामध्ये आहे. तुझ्यावर वायूवेगाने उडी घेऊन तुझा नाश करणार्‍या अश्वात आहे. मूर्खा ! तू स्वतःला ‘औरंगजेब’ (सिंहासनाची शोभा) म्हणवून घेतोस; पण तुझ्यासारखा ढोंगी, मारेकरी, लबाड कधीतरी ‘सिंहासनाची शोभा’ होऊ शकतो का ? हे विध्वंस करणार्‍या औरंगजेबा, तुझ्या नावातील ‘जेब’ शोभिवंत होऊ शकत नाही. ‘तुझ्या हातातील माळ हे कपटाचे जाळे आहे’, हे कोण जाणत नाही ? ज्याच्या मनात केवळ जाळ्यात अडकवणार्‍या पारध्याचे दाणे आहेत. तुझी देखाव्याची वंदना ही केवळ धूळफेक आहे आणि तू केलेल्या पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. ए पापी ! तो तूच आहेस, ज्याने केवळ राज्याच्या लालसेने स्वतःच्या वृद्ध पित्याला फसवले. तो तूच आहेस, ज्याने आपल्या सख्ख्या भावाला मारून त्याच्या रक्ताने स्वतःचे हात रंगवले आहेत. तुझ्या पेशीपेशीतून निरपराध लोकांच्या रक्ताचा वास येत आहे. हे क्रूरकर्मा ! तो दिवस आता दूर नाही, ‘तुरुंगातून उठणारा तुझ्या वडिलांचा ध्वनी पीडितांच्या रक्ताने माखलेल्या तुझ्या या अत्याचारी सत्तेला जाळून भस्म करील.’

(गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)