संत एकनाथ (१५३३-१५९९)

sant_Eknath_Maharaj_640

संत ज्ञानेश्‍वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदु साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यांवर अधिक भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटवल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. बये दार उघड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी होते. रंजन आणि प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागवला. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. फाल्गुन कृष्ण पक्ष षष्ठी, शके १५२१ (वर्ष १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलिन झाले.

अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० सहस्र ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

१. दास्यत्वात सुख मानणार्‍या हिंदूंना अंधःकारातून बाहेर काढण्यासाठी जन्माला येणे

‘संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या जीवनकालात महाराष्ट्रात देवगिरीच्या रामदेवराय यादव यांची संपन्न आणि बलशाली राज्यसत्ता होती; पण दुर्दैवाने त्यांच्यानंतर महाराष्ट्रात यवनांची राज्यसत्ता आली. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांनी चालू केलेल्या देवळाचे काम जवळ जवळ थांबल्यासारखे झाले. लढाया, परचक्र यांमुळे समाजजीवन ढवळून निघाले होते. गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. लोकांना काय करावे, ते समजत नव्हते. संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांनी निर्माण केलेली परंपरा निस्तेज होऊन काळवंडून गेली होती. हिंदूंची वृत्ती दास्यत्वात सुख मानू लागणारी झाली होती. जवळ जवळ दोनशे वर्षे अशा अंधःकारमय, निराशाजनक परिस्थितीत महाराष्ट्रातील समाजजीवन चालू होते. अशा वेळी पैठणच्या एकनाथांच्या रूपाने दुसरे ज्ञानदेव जन्माला आले.’

२. पाचव्या वर्षी गुरूंच्या शोधार्थ घर सोडणे आणि गुरुभेट होणे

२४.४.२००७ या दिवशी पू. मणेरीकरबुवा यांनी गोव्यातील माणगाव येथील दत्तदेवळात कीर्तन केले. त्यांच्या कीर्तनात त्यांनी सांगितले, ‘प्रारब्ध कोणाच्या हातात नसते. सटवी बाळाच्या जन्मानंतर त्याच्या कपाळावर लिहिते, तेच व्यक्तीचे प्रारब्ध होय आणि त्याप्रमाणेच घडते.’ संत एकनाथांनी लहानपणी एका कीर्तनात गुरुचरित्राचे महत्त्व ऐकले. त्यांच्या मनात ते रुजले आणि त्यांनी  ‘गुरु कसा भेटणार ?’ असा प्रश्न विचारला. कीर्तनकारांना त्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी ‘गोदावरीमातेलाच हा प्रश्न विचार’ असे सांंगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी एकनाथ महाराजांनी गंगारूपी आईला तळमळीने, कळवळून आणि रडकुंडीला येऊन विचारले. तेव्हा गोदावरीमातेने सांगितले, ‘दौलताबाद गडाचे गडकरी तुझे गुरु आहेत. त्यांच्याकडे जा.’ पाच वर्षांचे असतांना त्यांनी घर सोडले आणि गुरूंना शोधण्यासाठी निघाले. पंत जनार्दनस्वामी एका मुसलमान राजाच्या दौलताबाद येथील गडाचे गडकरी होते. ते दर गुरुवारी सुटीवर जायचे. पाच वर्षांचे एकनाथ महाराज जेव्हा गडाच्या अनेक पायर्‍या चढून स्वामींसमोर आले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘ये, मी तुझीच वाट पहात होतो.’’ गुरुही शिष्याची वाट पहात असतात. त्यांनी एकनाथांना पूजेची सिद्धता करण्याची सेवा दिली. ती त्यांनी अत्यंत भावपूर्ण केली. गुरु प्रसन्न झाले. त्यांनी त्याला गणित शिकवले.’ –  कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. जनजागृतीसाठी कुलस्वमिनी जगदंबेला प्रार्थना

‘त्या काळी देवगिरी गड निजामशाही राजवटीत होता. संत एकनाथांचे वास्तव्य तेथेच असल्यामुळे या राजवटीचे अत्याचारी स्वरूप जवळून पहाता येत होते. महाराष्ट्र परकीय सत्तेच्या हाती हतबल होऊन राहिला होता. लोक होईल तो अत्याचार मुकाट्याने सहन करत दिवस ढकलत होते. महाराष्ट्राची अवस्था ‘लोक मेले नाहीत; म्हणून जिवंत आहेत’, अशी होती. संत एकनाथांना ही भयाण परिस्थिती पालटण्यासाठी ‘समाज जागृती चळवळ उभी करावी’, असे वाटू लागले. त्यांनी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी जगदंबेला ‘बया दार उघड’, असे आवाहन करून या जनजागरणाच्या गोंधळात सहभागी होण्याची प्रार्थना केली.’ (विश्वपंढरी, वर्ष १ ले, अंक २ रा, पृष्ठ १३)

४. जनजागृतीचा परिणाम

नाथांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम समाजावर हळूहळू होऊ लागला होता. समाजाला ‘आपण पारतंत्र्यात आहोत’, याची निदान जाणीव होऊ लागली होती. प्रजेचा असंतोष डोके वर काढू लागला होता.’

५. क्षात्रधर्म !

दया तिचे नाव भूतांचे पालन ।
आणिक निर्दाळण कंटकांचे ।।

एकदा जनार्दनस्वामी समाधीत निमग्न असतांना देवगडावर परचक्र आल्याची वार्ता आली. एकनाथांनी जनार्दनस्वामींचा लढाईच्या वेळचा पोषाख अंगावर चढवला आणि शस्त्रे घेऊन कमरेला तलवार लटकवून ते अश्वारूढ होऊन बाहेर पडले. स्वामींचा समाधीभंग होऊ न देता ४ घटका घनघोर युद्ध केले. शत्रूसैन्य नामोहरम होऊन पळाले. जनार्दन वेशधारी एकनाथांच्या शौर्याची सर्वांनी स्तुती केली. गुरु-शिष्यांचा अंतर्बाह्य पूर्ण अभेद असतो, हे कृतीने एकनाथांनी दाखवले. गुरूंचा पोषाख जेथल्या तेथे ठेवून एकनाथ कामाला लागले. जनार्दन महाराजांना एका शब्दानेही काही सांगितले नाही. स्वामींना ही गोष्ट कळल्यावर या थोर शिष्याची धन्यता वाटली. वेगळेपणाचा अभिमान लोपवून निरहंकारपणाने गुरुकार्य करणारे असे एकनाथांसारखे शिष्य दुर्मिळ आहेत. (एकनाथ महाराज चरित्र, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, रम्यकथा प्रकाशन, पुणे २, पृष्ठ ६२) (दैनिक सनातन प्रभात ३.८.२००६)

६. लोकजागृतीसाठी केलेल्या रचना

नाथांना मायबोलीचा एवढा अभिमान की, त्यांनी पंडितांना बाणेदारपणे विचारले, ‘संस्कृतभाषा देवे केली । मराठी काय चोरापासून  झाली ?’ लोकजागृतीसाठी त्यांनी भारूडे, गोंधळ, जोगवा, गवळणी, कोल्हाटी यांच्या रचना केल्या. तसेच आदर्श रामराज्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी भावार्थ रामायणाची रचना केली.

६ अ. भावार्थ रामायण

‘संत एकनाथकृत मराठी ओवीबद्ध रामायण’ नाथांचा हा सर्वांत मोठा ग्रंथ होय. याची सात कांडे असून अध्याय २९७ आणि
ओवीसंख्या जवळ जवळ ४०,००० आहे.

रामायणकथा ही मुख्यत्वे ऐतिहासिक आहे, तरी त्या कथेतही नाथांनी ठिकठिकाणी अध्यात्मरूपके योजण्याचा प्रयत्न केला आहे. समग्र रामकथेवर त्यांचे मोठे रूपक आहे. अज म्हणजे परब्रह्म किंवा परमात्मा. त्यापासून दशरथ म्हणजे दशेंद्रिये उत्पन्न झाली. मूळचे अजत्व न ढवळिता राम म्हणजे अहमात्मा दशरथाच्या पोटी आला. देवांची साकडी फेडायची आणि स्वधर्माची वाढ करायची, हा अवतारांचा मुख्य हेतू होता. दशरथाच्या तीन राण्या होत्या. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्धबुद्धी आणि कैकयी ती अविद्या होय. कैकयीची दासी मंथरा म्हणजे कुविद्या. आनंदविग्रही श्रीरामाचे तीन बंधू होत. लक्ष्मण तो आत्मप्रबोध, भरत तो भावार्थ आणि शत्रुघ्न तो निजनिर्धार होय. विश्वामित्र म्हणजे विवेक आणि वसिष्ठ म्हणजे विचार. त्या दोघांपाशी श्रीराम शस्त्रे आणि शास्त्रे शिकला. राम आणि सीता म्हणजे परमात्मा अन् त्याची चिच्छक्ती होय. त्यांची एकात्मता सहजच आहे.’ – भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृष्ठ ५०६

६ आ. नाथांनी वर्णिलेले भूत इतर भुतांहून वेगळे असून त्याचा संबंध पंचमहाभूतांशी असणे

‘नाथांनी वर्णिलेले भूत इतर भूतांहून फार वेगळे आहे. हे भूत लागले, म्हणजे संसाराचे येणे-जाणे उरत नाही. याचे वास्तव्य भीमातीरी पंढरपुरी आणि वैकुंठातही असते. हे भूत जसे अलौकिक आहे, तसे त्याला झाडण्याचे उपायही अलौकिक आहेत. या भुताचा अंगिकार करणे हाच त्याला झाडण्याचा सर्वांत मोठा उपाय होय. नाथांच्या घरची उलटी खूण ती हीच.’ – भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृष्ठ ५०३

७. देवाचे दर्शन होण्याचे टप्पे

माझी आर्तता, तळमळ आणि सद्गुरूंचे कृपाशीर्वाद या तिन्हींच्या संयोगाने भगवान श्रीकृष्णाने मला दर्शन देण्याचे मान्य केले. हे दर्शन भगवान श्रीकृष्णाने मला एकदम न देता टप्याटप्याने खालीलप्रमाणे दिले.

१ ला दिवस : मला केवळ श्रीकृष्णाच्या चरणकमलांचेच दर्शन झाले. ज्याचे चरणरूपी कमल अती सुकुमार, म्हणजेच कोमल आहेत. ज्याच्या चरणांवर ध्वज, वङ्का आणि अंकुश दर्शविणार्‍या शुभचिन्हमूलक रेखा आहेत, ज्याच्या पायांमधील तोडे ते भक्तवात्सल्याचे जणू ब्रीदच असल्याचे सांगत आहेत, अशा प्रकारचे दर्शन मला त्या वेळी घडले. त्यामुळे आरतीच्या पहिल्या कडव्याची निर्मिती माझ्याकडून खालीलप्रमाणे झाली.

चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।
ध्वजवज्रांकुश (रेखा चरणीं) ब्रीदाचा तोडर ।।१।।

सनातन-निर्मित लघुग्रंथात ध्वजवज्रांकुश रेखा चरणी या दोन शब्दांच्या रचनेतील ‘रेखा चरणी’ हा भाग वगळण्यात आलेला आहे. आरती लयीत म्हटल्याने भावजागृती होण्यास साहाय्य होते, हा दृष्टीकोन बाळगून सनातन संस्थेने मूळ रचनेत थोडासा पालट केलेला आहे. सनातन संस्थेचा उद्देश शुद्ध असल्यामुळे अपभ्रंश होऊनही आरतीमधील चैतन्यात अधिकच वाढ झालेली आहे.

२ रा दिवस : मला मुखविरहीत श्रीकृष्णाचे दर्शन झाले. हे मुखविरहीत दर्शन झाले, तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. मी हे काय पहात आहे ? त्या वेळी ‘मी हे भगवान श्रीविष्णूचे शरीर तर पहात नाही ना ?’ असा विचार माझ्या मनात आला; कारण नाभीकमलाजवळ साक्षात ब्रह्मदेव विराजीत असलेला मला दिसला, तर भगवान श्रीविष्णूच्या हृदयस्थानी जसा पांढर्‍या केसांचा भोवरा आहे आणि ज्याला ‘श्रीवत्सलांछन’, असे संबोधिले जाते, अगदी तीच चिन्हे भगवान श्रीकृष्णाच्या शरिरावर मला आढळली. त्यामुळे माझ्याकडून आरतीच्या दुसर्‍या कडव्याची निर्मिती झाली.

नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।।

३ रा दिवस : श्रीकृष्णाचे मुखकमलासह दर्शन झाले. हे दर्शन घडल्यावर माझ्या जीवनातील उत्कट आनंदाच्या स्थितीचे वर्णन करण्यास मी असमर्थ ठरलो. या दर्शनाचे वर्णन करण्यास मी अनेक उपमा, अलंकार शोधले; परंतु योग्य असे उत्तर मला सापडेना. त्यामुळे मी अक्षरशः थकून गेलो. शेवटचा पर्याय म्हणून मी नाईलाजाने त्या दर्शनाचे वर्णन ‘श्रीकृष्णाचे दर्शन घडल्यामुळे नेहमीच्या सुखाच्या एक कोटीपट सुख मला लाभले’, असे ढोबळमानाने केलेले आहे. हे दर्शन घडल्यावर माझे मन त्या नितांत सुंदर अशा मुखकमलाकडे इतके वेधले गेले की, माझी दृष्टीच हरवल्यासारखी झाली आणि इतर काही मी बघूच शकत नव्हतो. त्यामुळे आरतीच्या तिसर्‍या कडव्याची निर्मिती माझ्याकडून खालीलप्रमाणे झाली.

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।

४ था दिवस : रत्नजडीत मुकुट परिधान केलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले. हे दर्शन घडल्यावर त्या मुकुटामधून निघणार्‍या तेजामुळे मी अत्यंत प्रभावीत झालो. हे दिव्य अलौकिक तेज म्हणजे ‘सार्‍या त्रिभुवनाची तेजप्रभावळ यात दडलेली आहे’, असा साक्षात्कार मला त्या वेळी माझे ज्ञानचक्षू संपूर्णपणे जागृत झाल्यामुळे झाला. त्यामुळे माझ्याकडून आरतीच्या चौथ्या कडव्याची निर्मिती झाली.

जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघें ति्रभुवन ।। ४ ।।

५ वा दिवस : श्रीकृष्णाच्या सर्वांग सुंदर अशा रूपाचे दर्शन आणि साक्षात्काराच्या संबंधी कृतज्ञतेचे विचार निर्माण झाले. ‘श्रीकृष्णाच्या सर्वांग सुंदर अशा रूपाचे दर्शन आणि त्याच्याशी तद्रूपता, हे केवळ माझे सद्गुरु श्री जनार्दनस्वामी यांच्या कृपाप्रसादामुळेच मला प्राप्त झाले’, असा कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात सारखा त्या दिवशी दाटून येत राहिल्याने आरतीच्या पाचव्या कडव्याची निर्मिती झाली.

एका जनार्दनीं देखियलें रूप ।
पाहतां अवघें झाले तद्रुप ।। ५ ।।

६ वा दिवस : श्रीकृष्णाच्या सर्वांग सुंदर अशा रूपगुणसंपन्नतेच्या वर्णनासंबंधी विचार निर्माण झाले. गेल्या पाच दिवसांत मला घडलेल्या श्रीकृष्णाच्या सर्वांग सुंदर अशा दर्शनाचे मी जेव्हा सखोल चिंतन केले, तेव्हा त्याच्या रूपगुणसंपन्नतेची महती माझ्याकडून थोडक्यात खालीलप्रमाणे लिहिली गेली.

अ. मदन : मदनासारखे अलौकिक सौंदर्याची खाण असलेला
आ. गोपाळ : गायी पाळणारा
इ. श्यामसुंदर : श्यामवर्ण आणि सुंदर कांती असलेला
ई. वैजयंती माळ परिधान केलेला : ज्या वैजयंती माळेमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांचे दर्शक म्हणून नील, मोती, माणिक, पुष्कराज आणि हिरा ही रत्ने सुशोभित आहेत, अशी माळ परीधान केलेला.

अशा सर्व रूपगुणसंपन्न श्रीकृष्णाच्या आरतीच्या धृपदाची निर्मिती माझ्याकडून सहाव्या दिवशी खालीलप्रमाणे आपोआप झाली.

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।।धृ.।।

साधकांनो, वरील आरतीची रचना ही भगवान श्रीकृष्णाने माझ्याकडून व्हावी, या उद्देशानेच मला अशा प्रकारची अनुभूती दिली. या आरतीमध्ये माझी अनुभूूती आणि भगवान श्रीकृष्णाची विभूती, हे दोन्ही आहेत. त्यामुळे यात वेगळे असे चैतन्य निर्माण झालेले आहे, हे तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो. ही आरती भावपूर्ण म्हणायला शिका. ‘भाव तेथे देव’, या नियमानुसार तुम्ही स्वतःच याची अनुभूती घ्यावी, असे मी तुम्हाला आवर्जून सांगू इचि्छतो.

वरील आरतीची रचना करत असतांना भगवान श्रीकृष्णाने मला ‘देवाचे दर्शन कसे घ्यावे’, हेही प्रत्यक्ष कृतीतून शिकवले. ‘देवाचे दर्शन चरणांपासून घेत घेत त्या देवाची सर्व चिन्हे व्यवस्थित निरीक्षण करत सर्वांत शेवटी मुखाचे दर्शन घ्यावे’, असे त्याने मला त्यातून शिकवले.

संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा अभिमान आणि सत्चारित्र्याविषयी निष्ठा जागृत करणे

‘संत एकनाथ महाराजांची संतकृपा ही की, त्यांनी ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती आपल्या हाती ठेवली. संत एकनाथ महाराजांच्या भारुड आणि भावार्थ रामायण यांतून तत्कालीन मुसलमानी अमलाखालील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दुरावस्थेचे चित्रण आपल्याला पहिल्यांदाच वाचावयास मिळते. त्या काळात धार्मिक क्षेत्रात कमालीची अधोगती अन् दांभिकपणा माजला होता. संत एकनाथ महाराजांनी त्या संधीसाधूंचा चांगला समाचार घेतला आहे. त्या अधोगतीमुळे त्यांना उपरती झाली आणि ते लोकउद्धारार्थ उभे ठाकले. ‘भक्ती वाङ्मयाद्वारे गृहस्थाश्रम सांभाळून संतत्व टिकवता येते’, हे त्यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रास शिकवले. प्रपंच हाच परमार्थ, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून पटवले. संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा अभिमान आणि सत्चारित्र्याविषयी निष्ठा जागृत केली. दुर्दैवाने हा अभिमान अन् ही निष्ठा खोलवर रुजण्याआधीच महाराष्ट्रावर परचक्र आले आणि हा डाव उधळला गेला.’

ranjan
संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात श्रीखंड्याच्या रूपात साक्षात पांडुरंगाने पाणी भरलेला रांजण

 

काळ रुळतो चरणी । देवा घरी वाहे पाणी ॥ १ ॥
ज्यांचे अनुग्रहे करून । झालो पतित पावन ॥ २ ॥ – श्री संत निळोबाराय

sahan
पांडुरंगाने गंध उगाळलेली सहाण

द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥ १ ॥
श्रीखंड्या चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातिरी धूत असे ॥ २ ॥
सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥ ३ ॥
निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करितसे ॥ ४ ॥ – श्री संत निळोबाराय

samadhi_mandir
संत एकनाथ महाराज यांचे समाधीमंदिर

सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥ १ ॥
ज्यांचे घेताचि दर्शन । पुन्हा नाही जन्म मरण ॥ २ ॥
ज्यांचे वाचिता भागवत । प्राणी होय जीवन मुक्त ॥ ३ ॥
निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥ ४ ॥ – श्री संत निळोबाराय

devghar
पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील देवघर

आणिका दैवता नेघे माझे चित्त ।
गोड गाता गीत विठोबाचें ॥ ३ ॥
भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझे ॥ – संत भानुदास महाराज

ashthbhuja_murti
श्रीकृष्णदयार्णव महाराज यांच्यापुढे प्रकटलेली अष्टभुजा स्वयंभू श्रीकृष्णमूर्ती

चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपडें ।
पाहतां आवडे जीवा बहु ॥ १ ॥
वैजयंती माळा किरीट कुंडले ।
भूषण मिरवलें मकराकार ॥ २ ॥ – संत भानुदास महाराज

abhishek
संत एकनाथ महाराजांच्या पूजेतील श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला पंचामृत स्नान

उन्मनीं समाधीं नाठवे मानसी ।
पहातां विठोबासीं सुख बहु ॥ १ ॥
आनंदाआनंद अवघा परमानंद ।
आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥ २ ॥ – संत भानुदास महाराज

samadhi
संत एकनाथ महाराज यांची समाधी
तुमचे चरणी राहो मन । करा हे दान कृपेचे ॥
नामी तुमचे रंगो वाचा । अंगी प्रेमाचा आविर्भाव ॥
हृदयी राहो तुमची मूर्ती । वाचे कीर्ती पोवाडे ॥
निळा म्हणे ठेवा ठायी । जीवभाव पायी आपुलिये ॥ – संत निळोबाराय महाराज

– श्री. प्रवीण कवठेकर (संतकृपा, मे २००७)