छत्रपती शिवाजी महाराज

अनुक्रमणिका

१. इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

२. महाराजांनी देवांचे आणि देवालयांचे रक्षण केले !

३. शिवरायांची युद्धनीती

४. व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

७. शिवचरित्र विसरण्याच्या कृतघ्नपणाचे दुष्परिणाम !

८. अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध

९. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दूत आणि गुप्तहेर यांचा योग्यरित्या वापर करणारे छत्रपती शिवराय !


१. इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ’खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हाताशी धरून त्यांचे पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब खलिता पाठवला, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर तयार आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्‍यांची जी हानी केली ती भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या. आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्‍यांकडून आली की, मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्‍यांना गाठून त्यांच्यामार्फत सर्व शेतकर्‍यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासोबत हानीभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले.

२. महाराजांनी देवांचे आणि देवालयांचे रक्षण केले !

‘छत्रपती शिवाजी राजांनी पवित्र वेदांचे रक्षण केले. पुराणांचे रक्षण केले. सुंदर जिभेवर घेतले जाणारे रामनाम वाचविले. हिंदूंच्या शेंडीचे रक्षण केले. शिपायांची भाकरी वाचवली. हिंदूंच्या जानव्याचे रक्षण केले आणि त्यांच्या गळ्यात असलेली माळ वाचवली. मोगलांना चुरगाळून टाकले, पातशहांना मोडून टाकले आणि शत्रूंना भरडून काढले. त्यांच्या हातात वरदान होते. शिवरायांनी आपल्या तलवारीच्या बळावर राजमर्यादेचे रक्षण केले. त्यांनी देवांचे आणि देवालयांचे रक्षण केले. स्वदेशात स्वधर्माचे रक्षण केले. उन्मत्त रावणास जसे प्रभू रामचंद्र, क्रूर कंसास जसे भगवान श्रीकृष्ण, तसे म्लेंच्छ कुळास छत्रपती शिवराय आहेत.’ – कवी भूषण

३. शिवरायांची युद्धनीती

१ अ. महान सेनानी ! – औरंगजेब

‘प्रत्यक्ष औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ‘‘ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांचे बळ मात्र वाढतच होते.’’

१ आ. हुशार आणि लष्करी डावपेचात निष्णात ! – गोव्याचा गव्हर्नर

गोव्याचा गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल अंतोनियो पाइश द सांद याने शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा एक अहवाल पोर्तुगालच्या सागरोत्तर मंडळाला पाठवला आहे. त्यात तो म्हणतो, शिवाजीराजे यांनी गोव्यापासून दमणपर्यंतच्या आमच्या सीमेला (सरहद्दीला) लागून असलेला प्रदेश घेतला असून सांप्रत ते मुघलांशी युद्धात गुंतलेले आहेत. हा हिंदुस्थानचा नवा ‘अॅटिला’ इतका हुशार आणि लष्करी डावपेचात इतका निष्णात आहे की, तो बचावाचे आणि चढाईचे युद्धही तितक्याच कुशलतेने खेळतो. तो मुघल प्रदेशात घोडदळ पाठवून प्रदेश जाळून बेचिराख करत आहे.

१ इ. शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरिअस, हानिबॉल, अलेक्झांडर, ज्युलीयस सीझर यांच्याशी करता येईल ! – पोर्तुगीज आणि इंग्रज समकालिन

(हे सर्व जण नावाजलेले सेनानी होते.)

२. युद्धप्रदेशाची पूर्ण माहिती असणे

असे विलक्षण काय होते या शिवाजी राजांमध्ये ? सर्वात पहिली गोष्ट, म्हणजे शिवाजीराजे ज्या प्रदेशात युद्ध खेळले त्या प्रदेशाची त्यांना पूर्ण माहिती होती. या दख्खनमधील डोंगर, नद्या, नाले कसे आहेत, दुर्ग, घाटवाटा कशा आहेत, याचा अभ्यास त्यांनी केलाच होता. एवढेच नव्हे, तर नकाशेही काढले होते.

३. सक्षम हेरखाते

माहिती असण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते महाराजांकडे होते. विश्वासराव नानाजी दिगे, बहिर्जी नाईक, सुंदरजी प्रभूजी अशी त्यांच्या हेरांची नावे मिळतात. शिवाजीराजांचे हेर बिहारमध्ये भेटल्याची नोंद समकालीन इंग्रज प्रवाशांनी केली आहे. ख्रिस्ताब्द १६६४ या वर्षी पहिल्यांदा जेव्हा शिवाजीराजांनी सुरत लुटले, तेव्हा त्या शहराची बित्तंबातमी बहिर्जी नाईकने काढून आणली होती. ‘सुरत मारिलीयाने अगणित द्रव्य सापडेल’, असा सल्लाही त्याने महाराजांना दिला होता. सुरतेत किती पैसा दडलेला आहे, याची माहिती बहिर्जीने आधीच काढून आणली होती. त्यामुळे सुरतेच्या स्वारीत वेळ वाया गेला नाही.

४. बलवान ‘अर्थ’कारण आणि कोष

तिसरी गोष्ट म्हणजे कोष ! सैन्य राखायचे, म्हणजे संपत्ती हवी. प्रदेश संपादन करणे आणि त्याचे संवर्धन करणे, म्हणजे सैन्य हवे. ते सांभाळायचे म्हणजे द्रव्य हवे. त्यासाठी सुरतेसारख्या शहरातील गडगंज संपत्तीची लूट केली. चौथाई आणि गावखंडी यांसारखे करही शिवाजीराजांनी चालवले होते. गोव्यानजिकच्या बारदेशावर गावखंडी कर लावल्याची कागदपत्रांतून नोंद आहे. शिवाजीराजांचे हे ‘अर्थ’कारण फारच बलवान होते.

५. चपळ सैन्य

शिवाजीराजांचे सैन्य चपळ होते. हत्तीसारख्या धीम्यागतीच्या जनावरांस त्यात थारा नव्हता. स्त्रिया आणि बाजारबुणगे यांनाही सैन्यात बंदी होती. लुटीसाठी दुघोडी, तिघोडी स्वार मात्र असत. लष्कराच्या हालचाली चापल्य आणि वेग यांवर आधारलेल्या होत्या.

६. अकस्मात आक्रमण

अकस्मात आक्रमण (हल्ले) हा शिवाजीराजांच्या डावपेचांचा गाभाच होता. शाहिस्तेखानावरील विस्मयकारक छापा हा त्या आक्रमणातील कळसच होता. शिवाजीराजांच्या या आक्रमणानंतर ३ वर्षे पुण्यात असलेला खान आपली १ लक्षाची फौज घेऊन अवघ्या ३ दिवसांत गाशा गुंडाळून औरंगाबादला चालता झाला.

७. गनिमी कावा

शिवाजीराजांनी या प्रदेशात लढण्यासाठी आपली एक खास शैली शोधून काढली. यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात. ही शिवरायांची स्वराज्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ही कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध पद्धतीवर आधारलेली होती. ‘गनीम’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘लुटारू’ असा आहे. लुटारू जसे अकस्मात येतात आणि लूट घेऊन क्षणार्धात पळून जातात, तसेच शिवाजीराजेही करत असत. डेनिस किन्केडने म्हणूनच ‘द ग्रँड रिबेल’ असे म्हटले.

७ अ. गनिमी काव्याची तत्त्वे

अकस्मात छापा, तोही आपल्याला सोयीस्कर अशा जागेवर, स्वत:ची न्यूनतम (कमीतकमी) हानी आणि हातात अधिकाधिक लूट किंवा प्रतिपक्षाची साधेल तेवढी अधिक हानी, ही या गनिमी काव्याची तत्त्वे होती. हे तंत्र जरी शिवाजीराजांनी जोपासले आणि मोठ्या प्रमाणावर वापरले, तरी त्याचे प्रवर्तक शहाजीराजे होते.

८. मराठी अकलेचा एक अस्सल नमुना !

८ अ. बहादूरखानाला फसवले !

मराठी अकलेचा एक अस्सल नमुना महाराजांनी आलमगीराच्या दख्खनच्या सुभेदारास दाखवला. पुण्यापासून २४ कोसांवर भीमेच्या काठी, बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग हा किल्ला बांधून रहात होता. त्याच्यापाशी बादशहाला भेट (नजर) करण्यासाठी म्हणून आणलेले २०० अरबी घोडे आणि १ कोटी रुपयांचा खजिना असल्याची बातमी महाराजांना मिळाली. हेरांनी आपले काम व्यवस्थित पूर्ण केले. आता डावपेच, लढाई आणि लूट असा कार्यभाग राहिला होता. महाराजांनी डावपेच आखले. नऊ सहस्रांची फौज घेऊन महाराजांचा सेनाधुरंधर पेडगावच्या दिशेने निघाला. याचे नाव अज्ञात आहे; पण बहुधा हंबीरराव मोहिते असावा. याने फारच गंमत उडवून दिली. आपल्या फौजेच्या २ टोळ्या केल्या. २ सहस्रांची एक टोळी बहादूरगडावर धावून गेली. काय करावयाचे हे आधीच ठरलेले होते. मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला. जय्यत तयार झालेली मुघल फौज किल्ल्याबाहेर येऊन मराठ्यांच्या दिशेने निघाली. मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठी तुकडी पळत सुटली. हुलकावण्या मारीत त्या मराठी फौजेने मुघल फौजेला फार दूर नेले. बहादूरखान चिडून मराठी फौजेचा पाठलाग करत राहिला. खान फार दूरवर गेला आहे, याची बातमी हेरांनी आणल्यावर ७ सहस्रांची दुसरी मराठी टोळी बहादूरगडावर चालून आली. तेथे असलेल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही. पाचोळा कोठल्या कोठे उडाला आणि मराठ्यांनी मुघली छावणीची मोठी लूट केली. एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले. एवढी मिळकत (कमाई) झाल्याकर मराठ्यांनी मुघली छावणी पेटवून दिली. पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली. सर्व लूट घेऊन मराठे पसार झाले. शिवाजीराजांचा राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला.

८ आ. इंग्रजी दर्यावदींना आश्‍चर्यकारकरीत्या फसवणार्‍या छोट्या चपळ मराठी बोटी !

ख्रिस्ताब्द (इ.स.) १६८९ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शिवाजीराजांनी मायनाक भंडारी याला अलिबाग नजीकच्या खांदेरी या बेटावर पाठवले. समुद्र उसळलेला असतांनाच मायनाकने खांदेरीकर किल्ला बांधावयास प्रारंभ केला. खांदेरी आणि उंदेरी ही बेटे अष्टगरातील थळ समोर समुद्रात आहेत. मुंबईच्या इंग्रजांनी कॅप्टन विल्यम मिनचिन याला हंटर आणि रिव्हेंज या दोन मोठ्या बोटी अन् गुराबा देऊन मायनाकला हाकलून देण्यास पाठवले. थळ येथील बंदरातून मराठी छोट्या बोटी रसद, सामानसुमान घेऊन बेटावर जात असत. हे साहाय्य बंद पाडण्याचे काम कॅप्टन मिनचिनला दिले होते. कॅ. अडर्टन, रिचर्ड केग्विन, फ्रान्सिस थॉर्प, वेल्श, ब्रॅडबरी असे नामांकित दर्यावर्दी कॅ. मिनचिनच्या सोबत होते; पण किनार्‍याकडून समुद्राकडे वहाणारा वारा, भरती-ओहोटीचे कोष्टक, थळपासून खांदेरीपर्यंतचा उथळ किनारा या सगळ्यांची बित्तंबातमी इंग्रजांपेक्षा मराठ्यांना अधिक होती. मोठ्या शिडांच्या इंग्रज बोटी वार्‍यामुळे खडकावर आदळण्याची शक्यता असल्याने मोठ्या बोटींची उपयुक्तता न्यून झाली होती. छोट्या चपळ बोटी मात्र रसद घेऊन रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन बेटावर जात असत. त्या सकाळीच कॅ. मी मिनचिनला दिसत. त्याने मुंबईला पाठवलेल्या एका पत्रात लिहिले आहे, ‘या छोट्या चपळ मराठी बोटी आम्हाला आश्‍चर्यकारकरीत्या फसवतात. अशा बोटी इंग्रज आरमारात हव्यात.’ काय वाक्य आहे हे ! ‘ब्रिटानिया रुल्स द वेव्हज’ म्हणणारे इंग्रजी दर्यावर्दी असे म्हणतात, यातच मराठी सागरीसेनेचा विजय आहे. पुढे याच खांदेरीच्या परिसरात मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याने अकस्मात आक्रमण करून ‘डव्ह’ नावाची एक गुराब पकडली आणि त्यावरील इंग्रजांना सागरगडावर डांबले. या सर्व लढाईत इंग्रजांची मोठी हानी झाली.

८ इ. आगर्‍याच्या कैदेत असलेल्या शिवाजीराजांना घाबरणारा औरंगजेब !

शिवाजीराजे आगर्‍याच्या कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आगर्‍याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्‍चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.

८ ई. अजिंक्य लढवय्या, सुष्टांचा मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता

‘शिवाजी महाराज हे अद्वितीय सेनानी होते. सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची त्यांची मनीषा होती, असे तत्कालीन फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरेने लिहिले आहे. शिवाजी हे अजिंक्य लढवय्ये होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. ते सुष्टांचे मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता होते’, असे बर्नियर म्हणतो.

८ उ. शिवाजी महाराजांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य असणे

रॉबर्ट आर्म याने म्हटले आहे, ‘उत्तम सेनापती ला आवश्यक असणारे सर्व गुण शिवाजी राजांमध्ये होते. शत्रूसंबंधी बातम्या मिळवण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. मोठी रक्कम ते यासाठी खर्च करत असत. कोणत्याही मोठ्या संकटाचा त्यांनी धैर्याने आणि युक्तीने सामना दिला. त्या काळातील सेनानींत ते सर्वश्रेष्ठ होते. हातात तलवार घेऊन आक्रमण करणारे शिवाजीराजे, ही त्यांच्या सैन्याची प्रेरणा होती. त्यांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते.

९. शिवाजी महाराजांनी मुघलांना पाठवलेले पत्र !

९ अ. आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणेसुद्धा कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ? भलत्या खोट्या गोष्टी बादशहाकडे लिहून पाठवण्याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे पत्र मुघलांना पाठवणारे छ. शिवाजी महाराज !

स्वत: शिवाजीराजांनी मुघलांना पाठवलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात शिवाजी महाराज म्हणतात, ‘आज ३ वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. बादशहा हुकूम फर्मावतात की, शिवाजीचे किल्ले तुम्ही काबीज करा. तुम्ही जबाब पाठवता की, आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणेसुद्धा कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ? भलत्या खोट्या गोष्टी बादशहाकडे लिहून पाठवण्याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? कल्याणी बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड आणि डोंगराळ आहे. नद्यानाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे माझे ६० किल्ले सिद्ध आहेत. पैकी काही समुद्रकिनार्‍यांवर आहेत. बिचारा अफजलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहाला का कळवत नाही ? अमीर उल उमरा शाहिस्तेखान या गगनचुंबी डोंगरात आणि पाताळात पोहोचणार्‍या खोर्‍यात ३ वर्षे सारखा खपत होता. ‘शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो’, असे बादशहास लिहून लिहून थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांसमोर आहे. आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही.’ किती सुंदर हे पत्र !’

– निनाद बेडेकर (पुढारी, १७.४.१९९९, १९२१, शिकशक ३२५)

४. व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

‘श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी ‘T. Y. B.C.A.’ या वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे (Principals of Management) हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ.  Forecasting’ (पूर्व अंदाज) शिकवतांना शिवरायांच्या स्वराज्याचे ‘कान-नाक-डोळे’ म्हणून ओळखले जाणारे ‘बहिर्जी नाईक’ यांचे उदाहरण दिले.

आ. Planning (नियोजन) शिकवितांना हिंदवी स्वराज्याचे दूरदर्शी नियोजन करत महाराष्ट्रात ३५० गड बांधणार्‍या शिवरायांचे उदाहरण दिले.

इ. Decision Making (निर्णय घेणे) हे तत्त्व शिकवितांना छ. शिवरायांनी अफजलखान वध, प्रसंगी मिर्झाराजे जयसिंग याच्याशी तह करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटण्याचा निर्णय यांची उदाहरणे दिली.

ई. Leading (नेतृत्व) शिकवितांना सूत्र अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढील वाक्य वापरले –  ‘‘Chhatrapati Shivaji Maharaj was a great Leader in the Indian History; पण औरंगजेबाला तसा नेता होता आले नाही. नेत्याचे सर्व गुण छ. शिवाजी महाराजांमध्ये होते; पण आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, औरंगजेबाच्या नावाने मोठा जिल्हा आपल्याकडे आहे; मात्र छ. शिवरायांच्या नावाने एकही मोठे शहर या महाराष्ट्रात नाही.’’

– प्रा. ज्ञानेश्वर हरिभाऊ भगुरे, निफाड, नाशिक

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत.

१. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच !

अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्तकंठाने गायन करणारे पहिले कवी समर्थ रामदासस्वामी हे ब्राह्मण होते. त्यांनी त्या वेळी केलेले हे वर्णन पहा –

‘यशवंत, कीर्तीवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळाठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकारणे ॥

भारतभर भ्रमण करणार्‍या समर्थ रामदासस्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर माणूस भेटला नाही, ही नोंद महत्त्वाची आहे. छत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना पत्र लिहितांना समर्थांनी ‘शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप’, हाच उपदेश केला.

आ. छत्रपतींच्या हयातीत त्यांच्या गुणांचे वर्णन करणारे कवी भूषण हे ब्राह्मण होते.

इ. छत्रपतींच्या सांगण्यावरून संस्कृत भाषेत ‘शिवभारत’ नावाचे शिवचरित्र लिहिणारे कवी परमानंद नेवासकर, हे ब्राह्मण होते.

याचा अर्थ महाराजांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिणारे अन् थोरवी गाणारे महत्त्वाचे तीनही कवी ब्राह्मण होते.

१ अ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जाज्वल्य एकनिष्ठा असलेले ब्राह्मण !

१. छत्रपती शिवाजी महाराज आगर्‍याहून सुटल्यावर डबीर आणि कोरडे या महाराजांच्या दोन निष्ठावान सेवकांना औरंगजेबाच्या सैनिकांनी अटक केली. वस्तूतः या दोघांनीच संभाजी महाराजांना मथुरेस लपकवून ठेवले होते; पण त्यांनी ही गोष्ट शेवटपर्यंत औरंगजेबाला सांगितली नाही. उलट सुमारे दोन मास औरंगजेबाच्या कारागृहात ते रोज चाबकांचे फटके सहन करत राहिले.

२. ब्राह्मण माणसे विश्वासू आणि एकनिष्ठ असू शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले ठाऊक होते. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले जानंभट अभ्यंकर आणि दादंभट अभ्यंकर यांनी मरेपर्यंत सिंधुदुर्ग किल्ला सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सिंधुदुर्ग किल्ला जिंकून घेतला, त्या वेळी हे दोघे भाऊ किल्ल्यात मारले गेले. ‘आम्ही सिंधुदुर्ग सोडून कुठेही जाणार नाही’, हा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला.

१ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार ब्राह्मणच !

१. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे ब्राह्मण होते.
२. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना फत्तेखानाबरोबर लढतांना सर्वांत महत्त्वाचे साहाय्य करणारे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे ब्राह्मण होते.
३. महाराजांच्या हेरखात्याचे पहिले हेरप्रमुख नानाजी देशपांडे ब्राह्मण होते. पुढे ही जागा बहिर्जी नाईक यांनी घेतली.
४. त्र्यंबकेश्वराचे वेदमूर्ती ढेरगेशास्त्री महाराजांच्या कल्याणासाठी भगवान शंकराजवळ अनुष्ठान करीत असत.
५. लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याप्रसंगी जी साहसी मोहीम आखली होती, त्याचे प्रमुख चिमाजी देशपांडे ब्राह्मण होते.
६. चिमाजीचे वडील लाल महालात जिजाऊबाईंकडे अनेक वर्षे चाकरीला होते; त्यामुळे त्यांना लाल महालाचे बारीकसारीक ज्ञान होते; म्हणून या मोहिमेची सूत्रे त्यांच्या हाती होती.
७. अफझलखानाला भेटण्यासाठी जातांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणाची पूजा केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ही पूजा सांगणारे प्रभाकर भट्ट हे महाराजांचे राजोपाध्ये होते.’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राह्मणांविषयीचा नितांत आदरभाव आणि स्पष्टवक्तेपणा !

१. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदींना अग्रहार (इनाम) दिल्याची ४-५ पत्रे उपलब्ध आहेत. केवळ या पत्रांच्या आधारावर महाराजांना सर्वधर्मसमभावी ठरवण्याची घाई केली जाते; मग ब्राह्मणांना अग्रहार दिल्याविषयीची ८२ पत्रे उपलब्ध आहेत, त्या आधारे अशाच प्रकारचा निष्कर्ष का काढू नये ?

२. ८.९.१६७१ या दिवशी तुकाराम सुभेदार यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘बापूजी नलवडा याणे कल्हावतीकरून तरवारेचा हात टाकीला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिल्हा. हे वर्तमान होऊन गेले. मर्हाटा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली. याचा नतीजा तो पावला.’ या पत्रात छत्रपतींचा ब्राह्मणांविषयीचा आदर तर दिसतोच, पण त्याचबरोबर महाराजांच्या सरदारांना महाराजांचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे कसा धाक होता, हे नलवडे प्रकरणावरून कळते. प्रभावळीतील बापूजी नलवडे नामक मराठा सरदाराने एका ब्राह्मणावर तलवारीने वार केला, पण नंतर त्याला ही भीती वाटली की, ‘महाराजांना ही गोष्ट कळल्यावर महाराज आपल्यास कठोर शिक्षा करतील.’ या भीतीने त्याने स्वतःच्या पोटात सुरी खूपसून आत्महत्या केली. राज्यकर्त्यांचा असा धाक प्रजाजनांवर असला पाहिजे.

३. सुमारे ८-१० पत्रांमध्ये, ‘एखादा विशिष्ट नियम पाळावा’, म्हणून महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणांची शपथ घ्यायला लावल्याचा उल्लेख आहे.

४. अनेक पत्रांमध्ये ब्राह्मण-भोजनाचे प्रावधान (तरतूद) असून ‘हा सर्व पैसा धार्मिक खात्याकर व्यय (खर्ची) करावा आणि याविषयी कुठलीही काटकसर करू नये’, अशी कडक सूचना महाराज देतात (सन १६४८). यावरून त्यांची ब्राह्मणांसंबंधांची भूमिका स्पष्ट होते.

५. अनेक ब्राह्मणांना भूमी अग्रहार देतांना महाराजांनी त्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे, उदा. ३ ऑगस्ट १६७४ला मुरारी त्रिमल विभूते यांना छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘स्वामी सिव्हासनी बैसता समयी तुम्ही स्वामीसनीध बहुत खस्त मेहनत केली. थोर पराक्रम करून स्वामीचे नवाजीस उतरला. तुमचे स्वामीकार्य जाणून तुम्हावर मेहेरबान होऊन सर्फराजीविषयी हे इनाम.’

६. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यात यश यावे’, म्हणून जिजाऊबाई अनेक ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घेत, असा स्पष्ट उल्लेख १८ फेब्रुवारी १६५३ ला वेदमूर्ती गोपाळ भट यांना लिहिलेल्या पत्रात आहे. महाराज लिहितात, ‘वेदमूर्ती प्रभाकर भट यांच्या विद्यमाने स्वामी पासून मंत्र उपदेश संपादिला. स्वामीस आपण आपले आभ्योदयार्थ सूर्यप्रित्यर्थ अनुष्ठान सांगितले.’

२. छत्रपती ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते !

ब्राह्मण कारभार्‍याच्या हातून चूक झाली त्याविषयी १९ जानेकारी १६७५ ला लिहिलेल्या पत्रात महाराजांनी ब्राह्मण कारभार्‍याची हजेरीदेखील घेतली आहे. महाराज लिहितात, ‘ऐशा चाकरास ठिकेठीक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ? याउपरी बोभाटा आलीया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही.’ याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मण जातीविषयी आदर असला, तरी ते ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते; पण त्याचसमवेत अशा १-२ पत्रांचे भांडवल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लपून ब्राह्मणद्वेष वाढवण्याचीही आकश्यकता नाही. ‘ब्राह्मणांना नष्ट करणे, हे ज्यांचे जीवनव्रत आहे’, त्यांनी अवश्य ब्राह्मणद्वेष करावा; मात्र असे करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्या थोर महात्म्यास कलंकित करू नये.

३. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रितपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी ‘गोब्राह्मण’ शब्दावरून कांगावा का करावा ?

छत्रपतींची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत. २०० पैकी सुमारे १०० पत्रे त्यांनी वेगवेगळ्या ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याविषयी किंवा अग्रहार दिल्याविषयी आहेत. माणसाचे अंतःकरण जाणून घेण्यासाठी पत्र हे अतिशय मौलिक साधन आहे. ऐतिहासिक घटनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना जवळ केले. त्यांचा हा कल आपल्याला त्यांच्या पत्रां मध्ये देखील पहायला मिळतो. महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटले की, काही लोकांचे डोके फिरते. परंतु इ.स. १६४७ या वर्षी मोरेश्वर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘ब्राह्मण अतिथ अभ्यागतास पावते. महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती. गाईचा प्रतिपाल केलीया बहुत पुण्य आहे.’ जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी गोब्राह्मण शब्दावरून कांगावा का करावा, ते कळत नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘‘महाराजांचा उल्लेख कोणी कोणी ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणून करतात. मला या उपाधीचे आकर्षण वाटते. भूमीला समृद्धीचा कर देणारे गोधन, तसेच आपल्या तपोबलाने आणि अध्ययनाने समाजाची उंची वाढवणारा ब्रह्मवेत्ता महाराजांना रक्षणीय वाटला, यात काहीच अप्रस्तूत नाही; पण शब्दांची ओढाताण केली जाते. अर्थाचा विपर्यास केला जातो. आजकाल मान्यता पावलेली ‘दुधाचा महापूर’ ही कल्पना आणि अवघडात अवघड परीक्षा घेऊन केली जाणारी अधिकार्‍यांची निवड, या प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात गोब्राह्मणप्रतिपालनाचे स्मरण घडवणार्‍याच नाहीत का ? एकविसाव्या शतकात ब्राह्मण हा शब्द विद्वत्ता, बुद्धीमत्ता, विज्ञाननिष्ठा आणि स्वतंत्रप्रज्ञा यांचा वाचक ठरला, तर किती बरे होईल !’’

४. छत्रपती शिवाजी महाराजांना साहाय्य करणारे ब्राह्मण आणि विरोधक असलेले मराठे !

अ. शिवचरित्रात शिवछत्रपतींच्या भोवताली जी महत्त्वाची प्रभावळ आहे, त्यात कितीतरी मंडळी ब्राह्मण होती.
आ. बंगळुरूहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहाय्यासाठी शहाजी महाराजांनी पाठवलेले दादोजी कोंडदेव हे अत्यंत विश्वासू कारभारी ब्राह्मण होते.
इ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्री मंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते.
ई. डबीर, कोरडे, अत्रे आणि बोकीलकाका हे महाराजांचे सगळे वकील ब्राह्मण होते.
उ. अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता, म्हणून आरडाओरड केली जाते; परंतु अफझलखानाचा वकील ब्राह्मण होता, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील गोपीनाथपंत बोकील हा सुद्धा ब्राह्मण होता.
ऊ. औरंगजेबाच्या छावणीत सहस्रो मराठे सरदार होते’, याविषयी मौन पाळले जाते.
ए. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे अडतीस नातेवाईक अफझलखानाच्या छावणीत खानाला साहाय्य करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला अफझलखान आला, त्या वेळी त्याच्या निवडक दहा देहरक्षकांमध्ये मंबाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, तर पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते हे महाराजांचे दोन चुलत सासरे होते.’

– श्री. सुनील चिंचोळकर (संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने प्रकाशित केलेली, ‘समाज जागृती पुस्तिका’)

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी उभारलेला अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला

भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून तेथे आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता. कंबोडियातील अंकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले.

उत्तरेकडील खैबरखिंड आणि बोलण खिंडीतून हिंदुस्थानशी होणारा व्यापार थांबल्यावर पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा याने आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या समुद्रकिर्नायावर येण्याचा नवा मार्ग शोधून ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या युरोपीय सत्तांनी व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात येऊन जागोजागी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. पुढे त्या वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले, जलदुर्ग बांधले. स्वतंत्र नौदल उभारले आणि पुढे हिंदुस्थानात त्यांच्या सत्ताही स्थापन केल्या. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी धर्मप्रसाराचे आणि धर्मांतराचे कारस्थान चालवले. त्यासाठी प्रसंगी स्थानिक हिंदु प्रजेचा अतोनात छळ केला. ज्याप्रमाणे उपरोल्लेखित सत्तांनी हा उद्योग चालवला होता, तोच प्रकार आफ्रिकेतून गुलाम म्हणून आलेल्या हबशी अथवा सिद्दी लोकांनी कोकण किनारपट्टीवर जंजिर्याच्या परिसरात त्यांची सत्ता स्थापून चालवला होता. या सर्व परकीय सागरी सत्तांकडे बळकट जलदुर्ग आणि शक्तीशाली नौदले होती. याउलट एकाही स्थानिक भारतीय सत्ताधिशाने या शत्रूंचा धोका ओळखून स्वतःच्या नौदलाच्या निर्मितीचा अथवा जलदुर्ग उभारण्याचा प्रयत्न केला नाही. संपूर्ण हिंदुस्थानचे बादशहा म्हणवून घेणार्‍या मोगल सत्ताधिशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता या युरोपीय सत्तांच्या अनुज्ञप्तीची शक्ती निमूटपणे मान्य करावी लागत होती. या पार्श्वुभूमीवर साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी स्कत:चे नौदल स्थापन करून कोकण किनारपट्टीवर अनेक अभेद्य जलदुर्गांची निर्मिती केली. जंजिरेकर सिद्दीबरोबरच पोर्तुगीज, इंग्रज, डच यांसारख्या आधुनिक युरोपीय सत्तांवर वेळोवेळी मात करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले आणि परकियांपासून देशाचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

लेखक – श्री. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहाससंशोधक

सिंधुदुर्ग उभारणीची सिद्धता !

ख्रिस्ताब्द १६५७ मध्ये शिवरायांनी कोकणावर स्वारी करून कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. कल्याण बंदरात असलेल्या शत्रूच्या नावा कह्यात घेऊन हिंदवी स्वराज्याच्या नौदलाच्या स्थापनेचा शुभारंभ केला आणि तेथेच नव्या युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. युद्धनौका बांधण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पदरी अनेक पोर्तुगीज आणि इतर युरोपीय कारागीर नोकरीस ठेवले. त्यांच्या माहितीचा वापर करून घेत आधुनिक युरोपीय पद्धतीच्या जहाजांची निर्मिती चालू केली. सभासद बखरकार लिहितो, राजियांनी जागा जागा डोंगर पाहून गड वसविले की, जेणेकरून दर्या जेर होईल आणि पाणियातील राजे जेर होतील, असे जाणून पाणियातील कित्येक डोंगर बांधून दर्यांमध्ये गड वसविले. गड आणि जहाजे मेळवून राजियांनी दर्यास पालण घातले. जोवर पाणियातील गड असतील, तोवर आपली नाव चालेल, असा विचार करून अगणित गड, जंजिरे भूमीवर आणि पाणियात वसविले. देश काबीज केला. गुराबा, तरांडी, तारक, गलबटे, शिबाडे अशी नाना जातीची जहाजे करून दोनशे जहाजांचा एक सुभा थाटीला. दर्या सारंग मुसलमान सुभेदार आणि मायनाईक म्हणोन भंडारी असे दोघे सुभेदार केले. त्यांनी शिदीची (सिद्दीची) जहाजे पाडाव केली. मोगलाई, फिरंगी, कळंदेज (डच), इंग्रज अशा सत्तावीस पादशहा पाणियात आहेत, त्यांची शहरे मारून जागा जागा युद्ध करीत समुद्रामध्ये एक लष्कर उभे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विशद केलेले जलदुर्गाचे महत्त्व : जंजिरेवर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा शिवरायांच्या महत्त्काकांक्षेला मोठे आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवावी लागेल, हा विचार करून महाराजांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर एक बेलाग सागरी दुर्ग बांधायचा निर्णय घेतला. महाराजांच्या मनी विचार आला, चौर्यांऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. शिवरायांच्या अद्भुत बुद्धीला या स्थानाचे महत्त्व चमकून गेले. दर्याला पालाण घालायला ही जागा उत्तम आहे. त्यांनी ये बंदरी नूतन जंजिरा वसवावा, असा निश्‍चाय केला. भूमीपूजनासाठी योग्य मुहूर्त काढण्यासाठी मालवण गावचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना आमंत्रित केले गेले. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया, शके १५८६, म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ हा शुभमुहूर्त काढला. महाराजांच्या हस्ते शास्त्रीबुकांनी विधीवत भूमीपूजन केले. सुवर्णाचे श्रीफळ समुद्रार्पण करून सागराचे पूजन झाले. मग महाराजांच्याच हस्ते मुहूर्ताचा चिरा बसविला गेला. सुरतेच्या स्वारीत मिळालेली प्रचंड संपत्ती या शिवलंकेच्या अभेद्य निर्मितीसाठी खर्ची पडू लागली. निष्णात वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली हजारो पाथरवट, गवंडी, वडारी, लोहार, सुतार, शिल्पकार आणि मजूर अहोरात्र झटू लागले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये; म्हणून महाराजांनी २ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. महाराज जातीने लक्ष घालून आवश्यक रसद आणि अन्य साहित्य यांचा पुरवठा करत होते. प्रसंगी आवश्यक सूचनाही देत होते. महाराज एका पत्रात लिहितात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे. अवघे काम चखोट करणे. पाया योग्य घेणे. पायात ओतण्यासाठी शिसे धाडावयाची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजोन माल कह्यात घेणे. वाळू धुतलेलीच वापरणे, चुनकळी घाटावरोन उटण पाठवित आहो. रोजभरा हररोज देत जाणे. त्यास किमपी प्रश्‍नच न ठेवणे आणि सदैव सावध रहाणे.

या पत्रावरून महाराजांचा बारकावा आणि काटेकोरपणा दिसून येतो. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा, शके १५८९, म्हणजे २९ मार्च १६६७ या दिवशी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद सापडते. या वास्तुशांती प्रसंगी महाराज स्वत: जातीने उपस्थित होते. त्यांच्या आगमनप्रसंगी तोफांचे आवाज करण्यात आले आणि साखर वाटली गेली. महाराजांनी सर्व कारागिरांना भरघोस पारितोषिके वाटली. विशेष कामगिरीबद्दल सोन्या-रुप्याची कडीदेखील वाटली.

स्वराज्याची सागरी राजधानी !

गडास सिंधुदुर्ग नाव प्रदान करून मोठा उत्सव साजरा केला. चित्रगुप्त बखरीत सिंधुदुर्गाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. र्चौयाऐंशी बंदरी हा उत्तम जंजिरा. अठरा टोपीकरांच्या उरावरी शिवलंका अजिंक्य जागा उभारिली. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा, जैसे मंदिराचे मंडन. राज्याचा भूषणप्रद अलंकार, जणु पंधराके रत्न महाराजांस प्राप्त झाले. स्वराज्याची सागरी राजधानी खडी केली, असे ते वर्णन आहे.

नंतरच्या काळात महाराजांनी राजकोट, सङ्कोकोट, खांदेरी, कुलाबा, सुकर्णदुर्ग इत्यादी जलदुर्ग निर्माण केले; तर विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून अवघी कोकणपट्टीच नियंत्रणाखाली आणली. सिंधुदुर्ग चार किलोमीटर तटबंदीने सजकिला असून बेचाळीस बुरुजांनी अभेद्य केला आहे. दहा मीटर उंचीची तटबंदी आणि वर-खाली जाण्यासाठी पंचेचाळीस जिने आहेत. पहारेकर्यांसाठी चाळीस शौचकूप उभारले आहेत. किल्ल्याचा मुख्य द्वार गोमुखी रचनेने सुरक्षित केले आहे.

चुन्यात उमटकलेल्या महाराजांच्या हाता-पायांच्या ठशांवर उभारलेल्या घुमट्या आम्हांस भावुक करतात. शिवप्रभुंचे मूर्तीरूपातील साकारलेले एकमेव मंदिर येथेच आहे. सिंधुदुर्गाच्या भूमीपूजनास २५ नोव्हेंबर २०१४ या दिकशी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.

शिवरायांच्या कर्तृत्वाचा हा महान वारसा देखभाली अभावी आज उद्ध्वस्त होत आहे. याची चिंता ना शासनाला, ना शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍यांना !

(संदर्भ : दैनिक तरुण भारत)

७. शिवचरित्र विसरण्याच्या कृतघ्नपणाचे दुष्परिणाम !

इंग्रज जेव्हा या देशात आले, तेव्हा त्यांनी रायगड ताब्यात घेतला व महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट केले. तसेच सर्व संस्थाने खालसा करून टाकली. रायगडावर केलेल्या बाँबहल्ल्यामुळे रायगड १८ दिवस जळत होता. रायगडावरील शिवाजी महाराजांनी बांधलेले आठ महाल इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकले. रायगडावरील सिंहासनाचे काय केले, ते माहीत नाही.

सर रिचर्ड टेंपल हे भारताचे गर्व्हनर होते. त्यांना एकदा विचारले, ‘‘औरंगजेब ७ लाख मुसलमानांची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. २५ वर्षे तो लढत होता; पण २५ वर्षांत त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट करता आले नाही. औरंगजेबाला ७ लाख माणसांच्या साहाय्याने प्रचंड दारूगोळा असतांना जे २५ वर्षांत जमले नाही, ते तुम्ही १०-१५ वर्षांत कसे काय साध्य केले ? इतक्या कमी शस्त्रांनी कसे काय हे साध्य केले ?’’ त्या वेळी रिचर्ड टेंपल यांनी दिलेले उत्तर अगदी मौलिक आहे. त्यांनी सांगितले, ‘‘जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, तेव्हा अवघ्या महाराष्ट्रातील लोकांना शिवचरित्राचे स्मरण होते. त्यानंतर त्याला सर्व लोक विसरले; म्हणून आम्हाला हा महाराष्ट्र प्राप्त झाला.’’

म्हणूनच, हिंदूंनो, आजचे राज्यकर्ते शिवचरित्र विसरले असले, तरी तुम्ही ते विसरण्याचा कृतघ्नपणा करू नका. शिवचरित्र विसरण्याचा परिणाम पराधीनतेत होतो, हे सत्य जाणा ! ते जाणून तुम्ही शिवचरित्रानुसार मार्गक्रमण केले, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ने आजच्या अंकातून केलेली शिवचरित्राची उजळणी श्रीकृष्णाच्या चरणी रूजू झाली, असे म्हणता येईल !

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

८. अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध

afzal-khan-vadh
अफझलखानाचा वध ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करतांना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.

१. फितूर चंद्ररावाला ठार करून जावळी कह्यात घेणारे शिवराय !

     जावळी शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्याही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण ! एका बाजूला सह्याद्री, तर दुसर्‍या बाजूला महाबळेश्‍वरचा डोंगर अशा खाचेत वसलेल्या जावळीला घनदाट जंगलाचे चिलखत होतेच. कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून आदिलशहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी उपाख्य चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६ या दिवशी राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणार्‍या चंद्ररावाला ऑगस्ट मासात ठार केले आणि खर्‍या अर्थाने जावळी राजांची झाली.

२. प्रत्यक्ष औरंगजेबालाही कारागृहात डांबणारा अत्यंत पराक्रमी; परंतु तेवढाच क्रूर आणि अहंकारी अफझलखान !

      महाबळेश्‍वरच्या पश्‍चिमेला असलेल्या भोरप्या डोंगरावर राजांनी प्रतापगड बांधला. भविष्यातील एका फार मोठ्या युद्धनाट्यासाठी प्रतापगड तयार झाला. बड्या बेगमेने छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी धर्मवेड्या, अत्यंत पराक्रमी, आदिलशहावर आत्यंतिक निष्ठा असलेल्या, क्रूर, अहंकारी अशा अफझलखानाची नियुक्ती केली. खानाच्या शिक्क्यातून खानाचा अहंकार जाणवत असे. त्याने शिक्क्यावर लिहिले होते –

     गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल

अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.

    त्याचा हा अहंकार सार्थ होता. बीदर कल्याणी भागात लढतांना त्याच्यामुळे प्रत्यक्ष औरंगजेबावर कैदैत पडण्याची वेळ आली होती; पण औरंगजेबाने खान महंमदाला आपल्या बाजूला वळवून घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली; मात्र हे कळताच अफझलखान ती मोहीम तशीच टाकून विजापूरला परतला. त्याचा राग दूर करण्यासाठी बड्या बेगमेने खान महंमदाला परत बोलावले आणि विजापुरात शिरता शिरता त्याची हत्या केली. असे अनेक पराक्रम अफझलखानाच्या नावावर होते. हा खान भोसले घराण्याचा मात्र द्वेष करत होता. शहाजीराजांना बेड्या घालून विजापूरला नेणारा, राजांचा मोठा भाऊ संभाजी याच्या मृत्यूला कारण ठरलेला अफझलखानच होता.

     राजांविरुद्धची मोहीम खानाने एप्रिल १६५९ मध्ये चालू केली. असे सांगतात की, ही मोहीम चालू होण्यापूर्वी अफझलखानाने विजापूरमध्येच असलेल्या त्याच्या अवलिया गुरूची भेट घेतली; पण त्या गुरूला अफझलखानाचे मुंडकेविरहित धड दिसले होते. त्याने आशीर्वाद देण्याऐवजी अफझलखानाला यश येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अफझलखान चिंता, नैराश्य यांनी पछाडला गेला. त्याच अवस्थेत त्याने आपल्या अनेक स्त्रियांसमवेत काही दिवस भोग आणि विलासात काढले अन् शेवटच्या दिवशी या सर्व स्त्रियांना ठार केले. (वेध महामानवाचा, डॉ. श्रीनिवास सामंत, पृ. ७२, शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भ. मेहेंदळे, पृ. २०१). या सगळ्यावरून अफझलखानाची मानसिक अवस्था लक्षात येते.

३. कौटिल्याने सांगितलेले गुण असल्याने राजकीय जीवन आणि व्यक्तीगत जीवन यांची सरमिसळ होऊ न देणारे शिवराय !

     अफझलखानाचा पहिला मुक्काम विजापुराजवळ तोरवे गावी पडला आणि खानाला पहिला अपशकुन झाला. त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती तडकाफडकी मेला. आदिलशहाने आपला खास बिनीचा हत्ती लगोलग खानाकडे पाठवला. मोहीम चालू राहिली, तरी शकुनापशकुन मानणार्‍या त्या काळातील लोकांवर याचा कसा आणि किती परिणाम झाला असू शकेल, त्याचा अंदाज करता येतो. खानाचा हत्ती मेला हा अपशकुन मानला, तर इकडे राजांची पत्नी सईबाईसाहेब यांना भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी, ५ सप्टेंबर १६५९ या दिवशी देवाज्ञा झाली. तसे पहाता हा मोठा अपशकुन मानायला हवा; पण राजाचे जे विविध गुण कौटिल्याने दिले आहेत, त्यानुसार निश्‍चयी स्वभाव, देश, काल आणि पुरुष यांचे प्रयत्न यांनी साध्य होणार्‍या कार्याला प्राधान्य देणारे असे छत्रपती शिवाजी महाराजे असल्याने त्यांनी आपले राजकीय जीवन आणि व्यक्तीगत जीवन यांची सरमिसळ होऊ दिली नाही.

४. राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, या कौटिल्याच्या सूत्राचा वापर करणारे शिवराय !

     खानाशी लढतांना शिवाजी महाराजांनी मंत्रयुद्धाचा प्रयोग केला. मंत्रयुद्ध म्हणजे कारस्थाने रचणे ! तिकडे अफझलखानाला अपशकुन होत होते आणि इकडे राजांना मात्र शुभशकुन झाला. प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली, हे वत्सा, त्याला तलवारीच्या जोराच्या वाराने भूमीवर पाड. हे दैत्यशत्रो, सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या साह्यर्थच मी स्वत: जवळ आले, असे समज. (अणूपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).

    सभासदकारांच्या मते दुसर्‍या दिवशी राजांनी जिजाऊसाहेब, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक हंकी, मोरोपंत आणि निळोपंत, नेताजी पालकर अशा मातब्बर लोकांना स्वप्न सांगून अफझलखानाला धुळीस मिळवण्याचा हेतू स्पष्ट केला; पण तरीही या सर्वांच्या मनात कार्यसिद्धीविषयी शंका होती, असे दिसते. यावर राजांनी भारतीय युद्धनीतीतील सर्वांत शेवटचा पर्याय सुचवला. ते म्हणाले, सला केलियाने प्राणनाश होईल. युद्ध करिता जय जाहलियाने उत्तम आणि मेलियानेही कीर्ती आहे. याजकरता युद्ध करावे. यानंतर आपला मृत्यू झाला, तरी पुढची सर्व तजवीज करून राजांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

     अर्थशास्त्रात ईश्‍वरी साहाय्याचा उपयोग युद्धात कसा करून घ्यावा, हे कौटिल्य पुन:पुन्हा सांगतो. दुर्गलम्भोपाय या तेराव्या अधिकरणात, विजिगीषू परग्राममवाप्तुकाम: सर्वज्ञदैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुद्धर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत। (१३.१.१) येथे संदर्भ शत्रूची राजधानी घेण्याचा आहे. शत्रूची राजधानी घ्यायची असेल, तर विजिगीषूने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी घोषित करून स्वत:च्या लोकांना उल्हासित करावे आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे. याच अधिकरणात पुढे ७ ते १० या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतो, भविष्यकथन करणारे, शकुन सांगणारे, मुहूर्त पहाणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञतेची आणि दैवतसंयोगाची गोष्ट स्वत:च्या देशात पसरवावी. शत्रूच्या देशात त्यांनी विजिगीषूला देवतांचे दर्शन होत असल्याचे आणि दिव्य कोश अन् दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचे सांगावे. राजाची सर्वज्ञता आणि देवता संपर्क याविषयीचा उल्लेख दहाव्या अधिकरणात कूटयुद्धाच्या ठिकाणीही येतो. असाच उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळ्या व्यूहरचनांच्या अध्यायात येतो. त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, असे कौटिल्याचे मत आहे (१०.६.४८-५०). राजांची ईश्‍वरनिष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील देवता संपर्क या उपायाचा उपयोग शिवरायांनी केलाच नसेल, असे ठामपणे सांगता येत नाही.

५. अफझलखानाला येण्यासाठी मुख्य मार्ग स्वच्छ करणारे; पण इतर छोट्या वाटा बंद करून त्याच्या सैन्याची कोंडी करणारे शिवराय !

     पुढे खान राजांच्या भेटीला येणार, हे निश्‍चित झाल्यावर राजांनी आणखी एक गोष्ट केली. खानासारखी मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर त्यांचा योग्य तो मानसन्मान ठेवला पाहिजे; म्हणून वाई ते प्रतापगड हा अवघड रस्ता आपल्यासाठी आम्ही सुघड करून देतो, असे पंतांनी खानाला सांगितले. खानाला यात काहीही चुकीचे वाटले नाही. राजांनी वाई ते प्रतापगड या रस्त्यावरची झाडे तोडून मार्ग स्वच्छ करवला; पण त्याच वेळी त्या तोडलेल्या फांद्यांनी इतर छोट्या वाटा बंद केल्या. कौटिल्य सांग्रामिक या दहाव्या अधिकरणात अगदी हीच सूचना करतो. शत्रुणामापाते कूपकूटावपातकण्टकिनीश्‍च स्थापयेत् । (१०.१.१२) शत्रू येण्याच्या मार्गावर विहिरी, झाकलेले खड्डे, काटेरी तारा टाकाव्यात. राजांच्या संदर्भात शत्रू येऊन पोहोचला होता. आता तो परत जाऊ नये, याची तजवीज करायची होती; म्हणून राजांनी मुख्य मार्ग स्वच्छ केला; पण इतर छोट्या वाटा बंद करून टाकल्या. कोणत्याही परिस्थितीत शत्रूला संपवण्याची सर्व सिद्धता राजांनी केली आणि विकारी नाम संवत्सर, शके १५८१, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी भर दुपारी राज्याचा एक मोठा शत्रू संपवला. आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला गेला. न भूतो न भविष्यति, असा विजय राजांना मिळाला. या विजयामुळे राजांचा दरारा सर्वत्र पसरला. राजे एक शूर, मुत्सद्दी आणि विजिगीषू व्यक्तीमत्त्व म्हणून मान्यता पावले.
– आसावरी बापट (संदर्भ : दैनिक लोकसत्ता – १७ एप्रिल २०१५)

९. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दूत आणि गुप्तहेर यांचा योग्यरित्या वापर करणारे छत्रपती शिवराय !

    अफझलखान युद्धात दोन व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे दूत आणि दुसरा गुप्तहेर ! अर्थशास्त्रात मंत्रयुद्धामध्ये दूताचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. उद्धृतमन्त्रो दूतप्रणिधि:। (१.१६.१), म्हणजे सल्लामसलतीने निर्णय घेतल्यानंतर दूताची कामगिरीवर योजना करावी.

    राजांनी खानाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यावर गोपिनाथपंतांसमवेत बसून दोघांनी शपथ घेतली. तेव्हा राजांनी खानाकडून आलेल्या पंताजींना खानाचा हेतू विचारला. तुम्हाला मारण्याचा खानाचा हेतू आहे, असे सांगून पंतांनी राजांना हिंमत असेल, तर खानास जावळीस आणण्याची सिद्धता दर्शवली. अर्थशास्त्रात दूत म्हणून सांगितलेली सारी कर्तव्ये गोपिनाथपंतांनी पूर्ण केली. दूतप्रणिधि: या अध्यायात शत्रूगोटात गेल्यावर दूताने करावयाची कार्ये सांगतांना कौटिल्य म्हणतो, पत्रे पाठवणे, तहाच्या अटींचे पालन करणे, मित्र मिळवणे, फितुरीस प्रोत्साहन देणे, दोन मित्रराष्ट्रांत भेद उत्पन्न करणे, शत्रूचे बांधव आणि मौल्यवान वस्तू यांचा अपहार करणे इत्यादी (१.१६.३३-३४).

     गोपिनाथपंतांनी राजांकडे शत्रूच्या वैभवाची इत्थंभूत वार्ता आणली. हे वैभव प्रतापगडावर कसे आणले गेले, याची सुंदर गोष्ट परमानंदांच्या अणूपुराणांत आहे. ते म्हणतात, या आलेल्या पाहुण्यांना शिष्टाचारास अनुसरून देणग्या दिल्या पाहिजेत. त्यासाठी राजांनी खानाच्या छावणीतीलच व्यापार्‍यांना आवताण दिले. अफझलखानाच्या आज्ञेवरून ते व्यापारी राजांकडे गेले. राजांनी त्यांच्याकडून सर्व रत्ने घेतली आणि त्या व्यापार्‍यांनाही आपल्याजवळ ठेवून घेतले. परमानंद पुढे म्हणतात, पुष्कळ लोभाच्या आशेने आपण पर्वतशिखरावर सर्व बाजूंनी कोंडले गेलो आहोत, हे त्यांनी ओळखले नाही. अगदी अशाच प्रकारे राजांनी आग्यात असतांना १५ सहस्रांचे हत्ती खरेदी केले होते आणि त्याचे पैसे दिले नसल्याची बातमी मुहम्मद अमीन खानने औरंगजेबाला दिली होती.

     राजनीतीमध्ये गुप्तहेरांचे महत्त्व कौटिल्याइतके आधुनिक काळात आपल्याकडे मानले आहे का, याविषयी शंका यावी, अशी परिस्थिती अनेकदा दिसते. कौटिल्य मात्र संस्था आणि संचारी मिळून नऊ प्रकारच्या गुप्तहेरांचा उल्लेख करतो. संपूर्ण गुप्तहेर खाते कसे उभे करावे आणि त्यांनी कोणकोणत्या वेशांत कार्य करावे, याची विस्तृत चर्चा अर्थशास्त्रात येते. यात इतर विविध वेशांसमवेत सिद्ध, तापस, भिक्षुकी या वेशांना कौटिल्य महत्त्व देतो. एकेका बातमीसाठी तो तीन-तीन गुप्तहेर नियुक्त करावे, त्यांनी अत्यंत वेगाने बातम्या आणाव्यात, अशा अनेक गोष्टी सांगतो. हेरखात्याची गुप्तता ही कौटिल्यासाठी फार महत्त्वाची आहे; म्हणून तो न चान्योन्यं संस्थास्ते वा विद्यु: (१.१२.१२) थोडक्यात या हेरसंस्था किंवा सर्व हेरांमध्ये एकमेकांशी कोणताही संपर्क नसावा, यावर भर देतो.

     शिवाजीची गुप्तहेर व्यवस्था अगदी याच धर्तीवर कार्य करतांना दिसते. बहिर्जी नाईक सोडल्यास अगदी क्वचित त्याच्या गुप्तहेरांविषयी माहिती मिळते; पण शत्रूच्या पावलापावलाची बित्तंबातमी राजांना अत्यंत वेगाने मिळत असे. राजांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्त असलेल्या हेरांचे महत्त्व अढळ आहे. अफझलखानाच्या मोहिमेतसुद्धा अर्थातच प्रत्येक बातमी राजांकडे येत होती. बहिर्जी नाईकविना दुसरा एक हेर खानाच्या छावणीत फकिराच्या वेशात होता. त्याचे नाव नानाजी प्रभु मोसेगावकर !

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.

शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.

कोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.

‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.

मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.

आदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे.

आजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.

शिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळून येते.

आजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन ठरेल.

  • दिनेश कचकुरे(इतिहास संशोधक)

संदर्भ : लाेकमत

देशप्रेमी शिवराय : मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारास लिहिलेले पत्र

     इसिसने वर्ष २०२० पर्यंत भारतापासून युरोपपर्यंतचा भाग इस्लाममय करायचा मनोदय घोषित केला आहे. काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ?

नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा…

      शिवरायांचा आठवावा साक्षेप
      माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !

      छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकार्‍यांना पाठविलेले एक फार्सी पत्र दोन जुन्या पत्रसंग्रहांमध्ये समाविष्ट आहे. त्यावर तारीख नसली, तरी ते शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर लिहिले आहे, हे त्यातील उल्लेखांवरून स्पष्ट समजते. पत्राचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.

       गेली तीन वर्षे (औरंगजेबाचे) तालेवार उमराव या प्रदेशात येत आहेत. माझा मुलुख आणि माझे किल्ले काबीज करण्याचा हुकूम बादशाह त्यांना देतो. लवकरच काबीज करतो, असे उत्तर ते देतात. या दुर्गम मुलखात अफाट कल्पनाशक्तीचा घोडा दौडवणेही शक्य नाही. मग तो काबीज करणे तर दूरच. तरीही सत्य दडवून खोट्या गोष्टी लिहिण्यास त्यांना लाज वाटत नाही.

     (बादशहाने पूर्वी काबीज केलेले) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. माझी मायभूमी तशी नाही. तिच्यात २०० कोस लांब आणि ४० कोस रूंद अशा उत्तुंग डोंगरांच्या रांगा आहेत आणि ओलांडण्यास अवघड अशा नद्या आहेत. तिथे ६० किल्ले बांधले आहेत, ज्यांपैकी काही समुद्रकिनार्‍यावर आहेत.

     आदिलशहाचा उमराव अफझलखान मोठे सैन्य घेऊन जावळीस आला आणि मृत्यूमुखी पडला. जे घडले, ते तुम्ही प्रामाणिकपणे बादशहाला का कळवत नाही ? गगनचुंबी पर्वतांच्या आणि पाताळापर्यंत जाणार्‍या दर्‍यांच्या या मुलखात मोहीम करण्यास अमीरूल उमरा (शाहिस्तेखान) याची नेमणूक झाली. त्याने तीन वर्षे खपून बादशहाला कळवले की, माझा (म्हणजे शिवाजी महाराजांचा) पूर्ण पराभव झाला आहे आणि थोड्याच दिवसांत माझा मुलुख काबीज होईल. शेवटी या खोटेपणाचे फळ तो कसे पावला आणि नामुष्की होऊन परत गेला ते जगजाहीर आहे.

    माझ्या मायभूमीचे रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. आपली इज्जत राखण्यासाठी या उमरावांनी बादशहाला खोट्या गोष्टी लिहून कळवल्या असल्या, तरी ईश्‍वराच्या कृपेने, या विरक्त मनुष्याच्या प्रिय देशावर आक्रमण करणार्‍या कोणाच्याही इच्छेची कळी कधी उमललेली नाही.

     ज्या रक्ताच्या नदीतून कोणी मनुष्य आपली होडी पलीकडे नेऊ शकला नाही त्या या नदीपासून शहाण्या मनुष्याने दूर रहावे.

    या पत्रात महाराजांनी स्वत:चा उल्लेख विरक्त असा केला आहे. समर्थ रामदासस्वामींनी या जाणत्या राजाला लावलेले श्रीमंत योगी हे विशेषण किती सार्थ आहे.

– डॉ. अनुराधा कुलकर्णी, देशप्रेमी शिवराय