स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि पवित्र अन् तेजस्वी जीवन यांना कोटी कोटी प्रणाम !

veer_savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३ ) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे ! ‘राष्ट्र’ हेच त्यांचे जीवनमूल्य असल्याने त्यांचे एकमेवाद्वितीय साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच प्रसवलेले आहे. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’

स्वा.सावरकरांची मार्सेलिस येथील साहसी उडी

स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना ‘मोरिया’ या आगनावेवर आरक्षींच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. प्रवासात आगनाव फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली. ८ जुलै १९१० ची सकाळ उजाडली. ‘प्रातर्विधीसाठी जायचे आहे’, असे सांगून सावरकर शौचालयात गेले. आपल्या अंगावरील रात्रवेश (नाईट गाऊन) त्यांनी काचेच्या दारावर टाकून पहारेकर्‍यांना आतील काही दिसणार नाही, अशी व्यवस्था केली. उडी मारून गवाक्ष (पोर्ट होल) गाठले. शरीर आकुंचित करून त्यांनी स्वतःला अपरिचित समुद्रात झोकून दिले. छातीची आणि पोटाची कातडी सोलून निघाली. बंदिवान पळाल्याचे पहारेकर्‍यांच्या त्वरित लक्षात आले. त्यांनी पाठलाग केला. एव्हाना ९ फूट उंचीचा धक्का सरसर चढून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवल्याने सावरकर स्वतंत्र झाले. काही अंतर पळाल्यावर ते समोर दिसलेल्या फ्रेंच आरक्षीच्या स्वाधीन झाले.

मागून आलेल्या पहारेकर्‍यांनी फ्रेंच आरक्षीला लाच दिली आणि बळाने, तसेच अवैधरीत्या सावरकरांना परत नौकेवर नेले.

सार्वभौम फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना केलेल्या अटकेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. ज्याचा अभियोग आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला, असा पहिला भारतीय देशभक्त म्हणजे स्वा. सावरकर ! ही उडी देशभक्तांना आजही स्फूर्ती देते !!

मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक व्यासपिठावर नेणारे द्रष्टे स्वा. सावरकर !

‘स्वा. सावरकरांच्या मार्सेलिसच्या सागरी साहसाने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रथमच जागतिक व्यासपिठावर अतिशय आवेगाने चर्चिला गेला. भारताचे स्वातंत्र्य हा सगळ्या दुनियेचा आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला. ‘राजकीय आश्रय’ या विषयाची सखोल चर्चा झाली. ‘फ्रान्सच्या भूमीवर अवैध मार्गाने झालेली अटक हा ब्रिटिशांकडून स्वा. सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे’, असे मत मार्क्सचा नातू लोंगे याने मांडले आणि ते युरोपमधील प्रसारमाध्यमांनी उचलून धरले. स्वा. सावरकरांना ब्रिटनने फ्रान्सकडे सुपूर्द करावे या मागणीने जोर धरला आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावा लागला. स्वा. सावरकरांवर अन्याय झाल्याचे न्यायालयाला मान्य करावे लागले. फ्रान्सच्या पंतप्रधानाला त्यागपत्र द्यावे लागले !’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

अंदमानाच्या कारावासात पाठवण्याच्या आधी कारागृहातील शेवटच्या भेटीत स्वा. सावरकरांनी आपल्या तरुण पत्नीला केलेला उपदेश !

‘‘….बरें ईश्वराची दया असेल, तर पुनः भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुला-मुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत; पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारोजणांच्या घरी धूर निघेल आणि घर घर म्हणून करीत असतांनाही प्लेगने नाही का शेकडो जणांची घरे ओसाड पाडली, लग्नाच्या मंडपातून नवरा-नवरीस विलग हिसडून मृत्यूच्या दाढेत ढकलून दैवाने जोडपी विजोड करून टाकली ! असा विवेक करून संकटास तोंड द्या.’’ – स्वा. सावरकर (संदर्भ : ‘माझी जन्मठेप’ )

राष्ट्राचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता असली पाहिजे !

१९३८ साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून साहित्यिक सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात स्वा. सावरकर म्हणाले, ‘‘आता सरते शेवटी मला हे सांगितल्यावाचून गत्यंतरच दिसत नाही. ‘साहित्य हे आजच्या आपल्या राष्ट्राच्या परिस्थितीत दुय्यम-तिय्यम कर्तव्य आहे. साहित्यिक सज्जनहो, सूज्ञहो, साहित्यासाठी जीवन आहे कि जीवनासाठी साहित्य ? आपले साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो उपासक त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल; पण असे उपासक त्या कलानंदात एखाद्या नाट्यगृहामध्ये रंगून गेले असता, जर त्या नाट्यगृहालाच आग लागली, तर कलेसाठी कलेला झिडकारून ते प्रथम जीव वाचवण्याच्या मार्गास लागतील. त्याचप्रमाणे राष्ट्र्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची काय कथा ?’

लेखण्या मोडा, बंदुका उचला !

त्याप्रमाणे तुम्हीही लेखणी मोडून टाकावी नि बंदूक उचलावी. पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, साहित्य संमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसल्या पाहिजेत !

पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वा. सावरकरांचा बिनतोड युक्तीवाद !

१९६५ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानच्या फौजा भारतीय प्रदेशावर हल्ले करत आत घुसत होत्या. त्यामध्ये भारतीय नागरिक मारले जात होते. नंतर मात्र आमच्या फौजा चुकून भारतीय प्रदेशात गेल्या, असे समर्थन पाकिस्तानकडून केले जायचे. स्वा. सावरकर व मेजर जनरल य.श्री. परांजपे यांच्या भेटीच्या वेळी सावरकर परांजपे यांना म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे सैनिक चुकून आपल्या इथे येतात, मग आपल्याही सैनिकांनी चुकून पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले करायला काय हरकत आहे ?’’

त्यावर जनरल परांजपे म्हणाले, ‘‘तात्या, हे कसे शक्य आहे ? दीड हजार मैलांच्या सरहद्दीवर कुठे कुठे गस्त घालायची ? कुठे त्यांना अडवायचे आणि कुठे आपण काही करायचे ?’’

स्वा. सावरकर लगेच म्हणाले, ‘‘दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, हल्ले करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !’’ मेजर जनरल परांजपे बघतच राहिले.

अंदमानातील मुसलमानांची मुजोरी मोडून काढणारे स्वा.सावरकर !

स्वा. सावरकर अंदमानात होते. त्या वेळी तेथील हिंदु आणि मुस्लीम बंदीवानांसाठी स्वतंत्र स्वयंपाक होत असे. स्वयंपाक झाल्यावर जेवणास बसण्यापूर्वी एक मुसलमान बंदीवान हिंदूंच्या अन्नपात्रांना स्पर्श करून निघून जात असे. ‘मुसलमानाने स्पर्श केलेले अन्न खाल्ले, तर आपण बाटू’, या भितीमुळे हिंदू बंदीवानांनी ४-५ दिवस अन्न घेतले नाही. ही गोष्ट सावरकरांच्या कानावर गेली. हिंदु धर्मावर आक्रमण करणार्‍या या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. त्यामुळे सावरकरांनी एक सोपी; पण नामी युक्ती केली. सावरकरांनी एका करवंटीत पाणी घेऊन ‘अपवित्रः पवित्रो वा …’ , हा शुद्धीमंत्र म्हणत सर्वांच्या अन्नावर शिंपडले आणि म्हणाले, ‘‘हे अन्न आता अभिमंत्रित झाले. त्यामुळे आता जो हे अन्न खाईल, तो हिंदु झाला.’’

असे झाल्यावर मात्र मुसलमानांवर उपासमारीची वेळ आली. त्यांनी नमते घेतले आणि सर्वांनी आपापले अन्नच खाणे सुरू केले..

पठाण अधिकार्‍यांचा जाच व दहशत यांमुळे तेथील हिंदु कैदी मुसलमान होतात, असे सावरकरांच्या लक्षात आले. तुरुंगातील हिंदूंमध्ये इस्लामी धर्माचा प्रसार पद्धतशीररीत्या करण्यासाठी तेथील मुसलमानांचे संगनमताने प्रयत्न चालत. या गोष्टींचा प्रतिकार करण्याचे अवघड कार्य सावरकरांनी अंदमानच्या बंदीगृहात केले. अंदमानातच सावरकरांना हिंदूंच्या शुद्धीकरणाचे कार्य सुरू करावे लागले.’

हिंदूंनो, ‘मी हिंदु आहे’, हे सांगण्यास लाजू नका, हे सांगणारे सावरकर

‘स्वतःला हिंदु म्हणवण्यात उणेपणा किंवा अराष्ट्र्रीयता आहे, असे समजू नका. श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप व गुरु गोविंदसिंग यांचा अभिमान बाळगण्यास लाजू नका. या सूर्यमंडळात हिंदूंसाठी एक देश असलाच पाहिजे व तेथे त्यांची भरभराट झालीच पाहिजे. त्यासाठी शुद्धी (धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेणे) व संघटन यांकडे लक्ष द्या ! शुद्धीचे कार्य हे केवळ धार्मिक नाही, ते राजकीयही आहे.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर

श्रीरामाचा विसर पडला की,….. !

स्वा. सावरकरांना श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याविषयी नितांत आदर वाटे. हे दोघे आपल्या राष्ट्राचे सेनापती, सारथी व श्रेष्ठ अधिपती आहेत, असे ते सांगत. १९०९ मध्ये त्यांनी लंडनमध्ये विजयादशमीचा उत्सव साजरा केला. प्रभु रामचंद्रांच्या अवतारकार्याचे स्मरण करून ते म्हणाले, ‘‘जेव्हा श्रीराम आपले पित्याच्या वचनासाठी वरवर, मुख्यतः राक्षस निर्दालनासाठी राज्य सोडून वनवासात शिरले, तेव्हा त्यांचे ते कृत्य महत होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य व धर्म्य युद्धाला सज्ज होऊन रावणाला ठार मारले, तेव्हा ते कृत्य महत्तर होते; परंतु जेव्हा शुद्धीनंतरही सीतेला उपवनात ‘आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मे व्यथा’ म्हणून सोडून दिली, तेव्हा त्यांचे ते अवतारकृत्य महत्तम होते ! रामाचे व्यक्तीविषयक वा कुलविषयक कर्तव्य त्यांनी त्यांच्या लोकनायकाच्या, राजाच्या कर्तव्यासाठी बळी दिले ! रामाचे अवतारकृत्य व श्रीरामचंद्रांची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत, हिंदूंनो, तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध रहाणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.’’ या श्रीरामाचाच विसर काँग्रेसी राज्यकत्र्यांना पडला आहे; पण त्यांचा कान उपटावा, असे आज एकाही साहित्यिकाला वाटत नाही. याला देशाचे दुर्दैव म्हणावे कि साहित्यिकांची अवनती म्हणावी ?

सावरकरांनी केलेल्या जागृतीमुळे हिंदुस्थानच्या फाळणीच्या वेळी मोठा भूभाग हिंदूंच्या स्वामित्वाखाली रहाणे !

‘१९३७ मध्ये सावरकर रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटले आणि त्यांना राजकारणात भाग घेण्याची अनुमती मिळाली. तोपर्यंत गांधींच्या नेतृत्वाखाली लढवल्या जात असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाचे पर्यवसान, अखंड हिंदुस्थानचे अखंड पाकिस्तान होण्याच्या दिशेने, बरेच अंतर काटले गेले होते. त्याही परिस्थितीत सावरकरांनी असा पराक्रम करून दाखविला की, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ कोटीतले ते असावेत कि काय, अशी शंका यावी. सावरकर एकाकी होते; पण इतिहास आणि परंपरा यांतून प्राप्त होणारी प्रेरणा, नीतीधैर्य आणि इच्छाशक्ती यांनी ओतप्रोत समृद्ध होते. त्यांनी पाकिस्तानच्या लोहमार्गावरून भरधाव सुटलेली भारतीय स्वातंत्र्यसमराची गाडी समोर उडी घेऊन दोन हातांनी रोखून धरली आणि इंजिन उचलून ते अखंड हिंदुस्थानच्या लोहमार्गावर आणून ठेवले. ब्रिटिश शासन, काँग्रेस, मुस्लिमलीग आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भ्रमिष्ट  झालेला हिंदु समाज, अशा चार आघाड्यांवर सावरकर एकटे लढत होते. त्या झटापटीत काही भाग निसटून पाकिस्तान निर्माण झाले; पण बाकी सगळा देश, हिंदूंच्या स्वामित्वाखाली रहाणे शक्य झाले. सावरकर दमले नव्हते. खचले नव्हते. ‘आणखी एक धक्का दिला, तर नवे पाकिस्तानही नष्ट करता येईल’, असा विश्वास गलितगात्र हिंदूंमध्ये उत्पन्न करण्याच्या खटाटोपात ते व्यस्त होते.

स्वातंत्र्यसंपादनाचे श्रेय देवाला केलेल्या अबोल प्रार्थनेलाही !

भारत स्वतंत्र करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या दोन पिढ्यांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे.

मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की, सशस्त्र वा निःशस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत ज्यांनी सक्रिय भाग घेतला नाही; परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृदयात एक सहानुभूती बाळगली आणि ‘देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर’ म्हणून अबोल प्रार्थना केल्या, त्या आमच्या लक्षावधी स्वदेशबांधवांनाही या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे़. – स्वा. सावरकर, १९५२

स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी शब्द बोकाळू देणे ; म्हणजे औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेणे

आपले तदर्थक जुने उत्तम शब्द असतांनाही किंवा नवीन स्वकीय शब्द उद्भावन करणे शक्य असतांही त्या जुन्या शब्दांस लुप्त करून टाकणार्‍या किंवा त्या नव्यांची नाकेबंदी करणार्‍या आणि म्हणूनच अगदी अनावश्यक असणार्‍या विदेशी शब्दांस, मग ते उर्दू असोत वा इंग्लिश असोत वा इतर कोणतेही असोत, स्वभाषेत, निष्कारण वावरू देऊ नये. आपला स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी बोकाळू देणे, हा काही शब्दसंपत्ती वाढविण्याचा मार्ग नव्हे आणि औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेत सुटणे, हा काही वंशविस्ताराचा मार्ग नव्हे. (उदाहरणार्थ, लोकसभा, विधीमंडळ, प्रजासभा इत्यादी शब्द असतां ग्वाल्हेरप्रमाणे मजलिस-अी-आम या शब्दास कवटाळणे हा मूर्खपणा होय.)

(संदर्भ : सनातनचे ‘भाषाशुद्धी’विषयक आगामी प्रकाशन, मुद्दा क्र. १. भाषाशुद्धीचा मुख्य उद्देश)

‘कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल’, असे वृद्धावस्थेतही म्हणणारे स्वा. सावरकर !

श्री. पु. गोखले यांनी वृद्धावस्थेतील स्वा.सावरकरांना एकदा विचारले, ‘‘तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पहाता, आपण जो जांबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल ?’’

यावर सावरकर उत्तरले, ‘‘मी थकलो आहे, माझे वयही होत आले आहे, हे सगळे खरे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करेल, असा संभवही जवळजवळ नाहीच; पण हे सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेले निष्कर्ष आहेत. आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो, तरी काही नुकसान होणार नाही; पण आपला तर्क चुकला तर ? स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूंचा अंदाज चुकणार, हा अंदाज बरोबर केला होता. समज, उद्या माझ्यावर कोणी हल्ला केलाच, तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही. प्रतिकार कमी पडला नि मला पराभव पत्करावा लागला, तर कधीच वाईट वाटणार नाही; पण प्रतिकार न करता मी पतन पावलो, तर मला अतोनात दुःख होईल. ‘झुंजत रहाणे’ हे मी आयुष्यभर केलेले आहे. कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल. शस्त्र वापरण्याची वेळ आयुष्यात सहसा येत नाही; पण कधीही न येईल अशी वाटणारी वेळ आलीच, तर नुसता पश्चाताप करून कार्यभाग साधत नाही. पुष्कळ वेळा नुसते शस्त्र जवळ आहे, यानेच काम भागते.’’

साहित्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विपुल लिखाण केले. त्यामध्ये अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, हिंदुपदपातशी, सहा सोनेरी पाने, शिखांचा इतिहास (अप्रकाशित) या व्यतिरिक्त विविध नाटके, कादंबरी इत्यादी आहेत.

असे थोर क्रांतिकारक, दूरदृष्टीचे नेते, लेखक, नाटककार आणि कवि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयोपवेशन करून २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे देह सोडला. त्यांच्या चरणी सर्व भारतीयांचा शतश: प्रणाम !

अंदमानातील स्वा. सावरकरांच्या स्मृती

IMG_2053_col
समोरच्या बाजूने अंदमान येथील सेल्युलर कारागृह
IMG_2181_col
कारागृहात सावरकरांना ठेवलेली खोली
सावरकर कोठडी
IMG_2145_col
क्रांतीकारकांनी अशा प्रकारे यांतना सोसल्या
IMG_2137
कैद्यांना शिक्षा म्हणून ओढावा लागणारा कारागृहातील कोलू
IMG_2216
कारागृहाचा आतील भाग

अंदमान हे समस्त देशभक्तांचे स्फूर्तीस्थान ! स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी अनेक मरणप्राय यातना सोसल्या, ती हीच भूमी ! त्यामुळेच अंदमानाच्या या सेल्युलर कारागृहाकडे पाहिल्यानंतरही देशप्रेम जागृत होते. त्यांनी देशासाठी सोसलेले आघात आठवतात. आज आझादीच्या घोषणा देऊन देशाशी गद्दारी करणारे ही खरी आझादी मिळवण्यासाठी लढणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा किती खुजे आहेत, त्याची जाणीव होते.

१९०६ मध्ये सातशे कैदी मावतील एवढ्या कारागृहाची उभारणी झाली. सात विभाग असलेली तीन मजली तुरुंगाची इमारत गच्चीवरून पहातांना सायकलीच्या चाकातील आर्‍यांप्रमाणे दिसते. येथे ब्रिटीश भारतीय कैद्यांचा अत्यंत अमानुष छळ करत असत. त्यामुळेच त्या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत असत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मार्पण : मृत्यूंजय जीवनावरील सुवर्णकळस !

veer-savarkar--647_060115042003

आज फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी (१४ मार्च २०१६) म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन (आत्मार्पण) ! त्यांच्या आत्मार्पणाला आज ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या मनात आत्मार्पणाचे विचार कसे आले, त्यासंबंधी त्यांनी निकटवर्तियांशी केलेली चर्चा, आत्मार्पणास खर्‍या अर्थाने झालेला प्रारंभ याविषयीचे लेखस्वरूपातील वर्णन श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारक चळवळीचे धुरीण असलेल्या सावरकरांच्या आत्मार्पणदिनानिमित्त ही माहिती आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

१. युगप्रवर्तक क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर !

वीर सावरकरांनी कुमारवयातच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्रक्रांती करण्याची शपथ घेतली आणि ती शेवटपर्यंत पाळली. तारुण्य, संसार, घरदार, आयुष्य यांची देशासाठी राखरांगोळी करणारा हा द्रष्टा युगपुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना हौतात्म्याची ओढ होती. त्यामुळे त्यांना कधी मृत्यूचे भय वाटलेच नाही. इंग्रज शासनाने काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावली; पण त्यांनी तेथील काळकोठडीतही आपली प्रतिभा जिवंत ठेवली. असा हा सहस्रावधी पानांचे वाङ्मय लिहिणारा युगप्रवर्तक क्रांतीकारक अन्य कोणीही त्या काळात नव्हता. अशा या महायोद्ध्याला भेटायला असंख्य माणसे सावरकर सदनात येत होती. त्यात सरसेनापती करीअप्पा, न.वि. गाडगीळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक पू. गोळवलकरगुरुजी असे विविध क्षेत्रांतील नामवंतही होते.

२. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरीर साथ देत नसतांनाही सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य चालूच !

२८ मे १९६३ या दिवशी त्यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच्या दुसर्‍या दिवशी ते घरात पाय घसरून पडले. त्यांच्या मांडीच्या हाडाला चीर पडली. संध्याकाळी त्यांना रुग्णालयात नेले. तेव्हा त्यांनी सहजतेने त्यांच्या स्वीय सचिवांकडे उद्गार काढले, तुम्ही काल साजरी केलीत माझी जन्मतिथी आणि आता जातो आहे पुण्यतिथीकडे ! त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते. प्रकृतीही क्षीण झाली होती. ती सुधारणार नसल्याने त्यांच्यासारख्या ज्ञानी, विरक्त योग्याला आपल्या हातून आता कोणतेही कार्य घडणार नाही, तर जिवंत रहाणे योग्य नाही, असे वाटू लागले. त्यातच त्यांच्या पत्नी सौ. माई यांनी ८ नोव्हेंबर १९६३ या दिवशी अखेरचा श्‍वास घेऊन इहलोकीची यात्रा पूर्ण केली. तरीही त्यांचे सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य संथ गतीने चालूच होते. सावरकरांना भेटायला येणार्‍या अनेक व्यक्ती असत. ते त्यांची भेटही घ्यायचे.

३. सावरकरांच्या मनात जलसमाधी घेण्याचा विचार येणे

एक दिवस सावरकरांनी त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना समुद्राच्या भरतीच्या वेळी फिरायला जायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. भरती कोठे चांगली येते, याची विचारणा केली. २ आठवड्यांनी सावरकरांनी टॅक्सी मागवली. वरळीला टॅक्सीने अशी सूचनाही केली. तेथे तटाजवळ फारसे पाणी नव्हते. ते पाहून तात्या काही वेळातच घरी परतले. नंतर त्यांनी नरीमन टोकाशी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तो भाग त्यांना आवडला. तिथे फारशी गर्दी नव्हती. बाळाराव सावरकरांना आपल्या जवळ बोलावून ते म्हणाले, वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरात हे कृष्ण हे शाम असा नामघोष करत प्रवेश करून जलसमाधी घेतली. हे ऐकून बाळारावांना सावरकरांच्या मनात कोणते विचार आहेत याचा अंदाज आला. त्यांनी तात्यांना घरी आणले.

४. आत्मार्पणासाठी हक्काने साहाय्य मागणारे सावरकर आणि समाजाचा भविष्यातील रोष पत्करूनही आत्मार्पणास साहाय्य करण्याचे आश्‍वासन देणारे स्वीय सचिव बाळाराव सावरकर !

काही दिवसांनंतर तात्या बाळारावांना म्हणाले, बाळ ! ज्ञानेश्‍वरांना समाधी घेण्यास त्यांच्या बंधूंनी साहाय्य केले. जैन लोकांमध्ये उपोषण करून जीवनसमाधीची पद्धत आहे. पूर्वी आपल्यातही जिला सती जायचे, तिला सुखाने जाऊ देत. मला आता आत्मार्पण करायचे आहे. तू साहाय्य देशील कि नाही, ते सांग. तू नाही म्हटलेस, तरी मला राग नाही; कारण ते अगदी स्वाभाविक आहे. साहाय्य दिलेस, तर तुझ्यावर काही आळ येणार नाही, इतकी व्यवस्था मी करीन. सर्व काही व्यवस्थित लिहून ठेवीन. आत्महत्या आणि आत्मार्पण या माझ्या लेखामुळे मी आत्मार्पण करणार, हेही लोकांना ठाऊक आहे. तेव्हा तू मला ८ दिवसांनी विचारपूर्वक सांग. आठ दिवसांनी बाळारावांना तात्यांनी विचारले, बाळ ! तुझे काय ठरले ? बाळाराव म्हणाले, होय. मी तुम्हाला साहाय्य देईन; पण तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे माझ्यावर तुमच्या हत्येचा आरोप येणार नाही, हे मला पटत नाही. आपल्या भेटीसाठी आलेल्या लोकांना अडवणारा मीच आहे. त्यामुळे ज्यांना आपल्याला भेटता आले नाही, अशा अनेकांचा माझ्यावर राग आहे. माझे काही मित्रही त्यामुळे तुटले. अनेक मला त्यांचा शत्रू मानतात. ते सगळे मला तुमचा हत्यारा म्हणून पहातील आणि बोट दाखवतील. हा धोका गृहित धरूनही मी आपणास तुम्ही म्हणाल, तेव्हा जलसमाधीला किंवा आत्मार्पणाला साहाय्य करीन.

५. सावरकरांनी जलसमाधीचा मार्ग सोडून आत्मार्पणाच्या मार्गाविषयी अनेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे

बाळारावांची ही बाजू सावरकरांना पटली. जलसमाधीचा मार्ग यशस्वी होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो मार्ग अनुसरण्याचा विचार सोडून दिला. सावरकरांनी त्यांचे वैद्यकीय समादेशक आधुनिक वैद्य रा.वा. साठे यांच्या मनावर आपण आत्मार्पण करणे कसे योग्य आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न केला. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, संत ज्ञानेश्‍वर यांच्याप्रमाणे आत्मार्पण करणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांनी रामबाण औषध द्यावे, हे अधिक चांगले ! आधुनिक वैद्य साठे यांच्याप्रमाणे आत्मार्पणाचा विचार कसा योग्य आहे, ते तात्यांनी आधुनिक वैद्य सुभाष पुरंदरे यांना पटवून देण्याचा प्रयत्न चालू ठेवला. तात्यांशी प्रतिवाद करण्याचा दोन्ही आधुनिक वैद्यांनी प्रयत्न केला; पण सावरकरांनी आपल्या तर्ककठोर विचाराने त्यांना निरुत्तर केले. हे आधुनिक वैद्य आपले म्हणणे मान्य करणार नाहीत, अशी तात्यांची निश्‍चिती झाल्यावर पूर्वी ठरलेलाच मार्ग अनुसरायचा, असा त्यांनी निश्‍चय केला. तो मार्ग म्हणजे आता आपण फार जगायचे नाही, तर परलोकी जायचे.

६. सावरकरांनी आत्महत्या आणि आत्मार्पण या लेखातून आत्मसमर्पणाचा मार्ग अप्रत्यक्षरित्या सुचवणे, स्वीय सचिवांना वाङ्मयाचे अधिकार देणे अन् भेटायला आलेल्यांशीही चर्चा करणे

तात्यांनी आत्महत्या आणि आत्मार्पण हा लेख लिहिला. या लेखात वैदिक कर्मकांडाचे पुरस्कर्ते कुमारील भट्ट, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, गौरांगप्रभू, संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ रामदासस्वामी या सर्व महान संतांनी आपले नियोजित कार्य पूर्ण होताच जीवन यशस्वी झाल्यावर समाजाला भारभूत होऊ नये; म्हणून स्वत:ची जीवनयात्रा जलसमाधी वा प्रायोपवेशन करून पूर्ण केली. त्या सर्वांनी ज्या मार्गाने आणि अत्यंत समाधानी, आनंदी चित्ताने देहत्याग केला. त्याला इतिहासाने त्यांचे आत्मसमर्पण म्हणून गौरवले. तात्यांनी हा लेख लिहून मी आत्मसमर्पणाच्या मार्गाने जाणार आहे, असे अप्रत्यक्षरित्या सुचवले. त्याविषयी विचारताच त्यांनी या लेखात मी माझ्यासंबंधी काहीही लिहिलेले नाही, असे उत्तर दिले; पण सावरकरांनी आपणही त्याच मार्गाने जाणार आहोत, हे मनाशी निश्‍चित केले होते. त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले. त्यांच्या सर्व वाङ्मयाचे अधिकार स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना दिले. त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी बाळारावांना उपयुक्त पडणारी सर्व सामग्री दिली. वृत्तपत्र वाचन आणि कात्रणे काढण्याचे काम चालूच ठेवले.

लोकही त्यांच्या भेटीला येत असत; पण त्यांच्या बोलण्यात निराशेचा सूर कोठेच नव्हता. त्यांच्याकडे असलेली अद्ययावत माहिती ते भेटीला आलेल्यांनाही सांगायचे. याच काळात मरीचीचे म्हणजे मॉरीशसचे मंत्री विष्णूदयाळ आणि वीर अर्जुनचे संपादक कुमार नरेंद्र भेटीला आले होते. मरिचीचे मंत्री विष्णूदयाळ यांच्याशी चर्चा करतांना तात्यांनी तेथील हिंदूंची स्थिती आणि मुसलमानी उठाव यांच्याशी संबंधित माहिती दिली. तेव्हा ते मंत्री थक्क झाले. ही भेट ५ फेब्रुवारी १९६५ या दिवशी झाली.

७. पंचज्ञानेंद्रिये तीक्ष्ण असल्याने सावरकर सलग १७-१८ दिवस उपवास करू शकणे आणि शेवटच्या काही दिवसांत त्यांनी स्वीय सचिवांना आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा । असे म्हणणे

जानेवारी १९६६ च्या शेवटी तात्यांनी जेवणखाण बंद केले. आधुनिक वैद्यांनी तात्यांच्या नकळत त्यांना होमिओपॅथिक औषध दिले. तात्यांना तेही जाणवले. तात्यांची आतडी क्षीण झाली होती. पचनक्रिया बिघडली होती; पण पंचज्ञानेंद्रिये पूर्वीइतकीच तीक्ष्ण होती. अन्नत्याग करून ५-६ दिवस झाले. त्यामुळे आधुनिक वैद्य चिंतातूर झाले. याच काळात आधुनिक वैद्य वासुदेवराव पुरंदरे यांना घाम फुटला; कारण अचानक तात्यांचा रक्तदाब अल्प झाला होता. २-४ वेळा तो पडताळला, तरी तेच मापन. त्यांनी तात्यांसाठी औषध दिले आणि रात्रीची वेळ म्हणून घरी गेले. सकाळी लवकर परत येऊन रक्तदाब तपासला. तो प्रमाणात होता. हे कसे काय, असा प्रश्‍न आधुनिक वैद्यांना पडला. त्यावर त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर म्हणतात, तात्यांना योगाभ्यासाची आवड होती, सवयही होती, काही सिद्धी अवगत होत्या. याचा दाखला देतांना सावरकरांनी हिंदु महासभेच्या ध्वजावर अभ्युदयनिदर्शक कृपाण आणि नि:श्रेयस निदर्शक कुंडलिनी अंकीत केली आहे. त्यांची पंचज्ञानेद्रिंये शेवटपर्यंत उत्तमप्रकारे कार्यरत होती. त्यांचे केसही काळे होते. त्यांच्या उपवासाला १७-१८ दिवस झाले. त्यांनी आपल्या स्वीय सचिवांना बोलावून घेतले आणि हात जोडून नमस्कार करत म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा ।

८. जीवनात विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख संगम झालेल्या सावरकरांनी २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी जीवनयात्रा संपवली !

आता कैचे देणे घेणे, आता संपले बोलणे, हेच तात्यांचे शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी बाळारावांनाही कधी बोलावले नाही. कोणाशीही त्यांचा संवाद झाला नाही किंवा भेटही झाली नाही. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या त्या आत्मार्पणास प्रा. शिवाजीराव भोसले यांनी वैज्ञानिक समाधी असे संबोधले. वीर सावरकरांची विज्ञाननिष्ठा जेवढी होती, तेवढीच अध्यात्मावरची निष्ठाही अढळ, अटळ आणि अपराजित होती. विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख संगम त्यांच्या जीवनात झाला होता. त्याचा नेमका निर्देश वैज्ञानिक समाधी या दोन शब्दामधून होतो. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी वीर सावरकरांवर लेख लिहितांना म्हटले, सावरकरांच्या मृत्यूंजय जीवनावर त्यांच्या आत्मार्पणाने जो सुवर्णकळस चढवला, त्याला जगात तोड नाही. जो मृत्यू जन्मभर त्यांच्या मागे हात धुवून लागला होता आणि ज्याला त्यांनी आपल्या अंगाला एकदाही स्पर्श करू दिला नव्हता, त्या मृत्यूला त्यांनी अखेर मारले अन् मग ते मरण पावले.

९. खरा इतिहास लिहितांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती प्रथम रंगवणे आवश्यक !

काँग्रेसच्या राजवटीत भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिला जाणे मुळीच शक्य नाही; पण ही राजवट काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिण्यासाठी उद्याचे इतिहासकार बसतील, तेव्हा २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभी असलेली आणि ब्रिटीश साम्राज्याच्या छाताडावर पाय ठेवून भारतीय स्वातंत्र्यासाठी सार्‍या जगात टाहो फोडणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती प्रथम रंगवावी लागेल. सावरकरांनी आता आपल्या आयुष्यात काही करण्याचे उरले नाही; म्हणून अत्यंत समाधानाने स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन करतांना म्हटले,
धन्योऽहम ! धन्योऽहम !
कर्तव्य मे न विद्यते किंची । धन्योऽहम ! धन्योऽहम !
प्राप्तत्यम सर्वमहा संपन्नम !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली.

 


कारागृहातील धर्मांतरित बंंदीवानांचे शुद्धीकरण करून त्यांना परत हिंदु धर्मात घेणारे धर्मप्रेमी स्वा. सावरकर !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

प्रखर धर्मप्रेमी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अंदमानच्या कारागृहात असतांना काही हिंदु बंंदीवान मुसलमान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी विविध क्लृप्त्या लढवून मुसलमान अधिकार्यांच्या कडक बंदोबस्तातही काही बंदीवानांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करून घेतला !

१. कारागृहातील हिंदु बंदीवानांचे धर्मांतर झालेले असणे

‘जुलै १९११ मध्ये सावरकर अंदमानच्या कारागृहात गेले. काही मासांतच त्यांना आढळून आले की, तेथील हिंदु बंंदीवानांपैकी काही बंदीवान मुसलमान झाले असून त्यांनी त्यांची नावेही पालटली आहेत. असे का घडले, याचा शोध घेण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला.

१ अ. हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्यासाठी मुसलमानांची कारस्थाने

१ अ १. कारागृहे म्हणजे हिंदूंना बाटवणार्या मशिदीच ! : हिंदूंना मुसलमान करण्याच्या उपद्व्यापाचे मूळ भारताच्या विविध नगरांतील कारागृहांत खोलवर रुजले आहे. वर्ष १९११ ते १९२५ या चौदा वर्षांच्या अनुभवानंतर आणि वरील प्रकारास आळा घालण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यावर स्वा. सावरकरांना असे लक्षात आले की, देहली किंवा मुंबई येथील जामा मशिदी जेवढ्या हिंदूंना प्रतिवर्षी धर्मभ्रष्ट करत नसतील (बाटवत नसतील), तेवढ्या हिंदूंना या कारागृहांतील मुसलमान कैदी धर्मभ्रष्ट करतात. कारागृहे म्हणजे हिंदूंना धर्मभ्रष्ट करणार्या मशिदीच आहेत !

१ अ २. हिंदूंचे इस्लामीकरण करण्याचा प्रारंभ मुंबईतील मुसलमानी चोरांच्या अड्ड्यांपासून चालू होणे : हिंंदूंना भ्रष्ट करणे आणि इस्लामीकरणाचा पहिला विधी मुंबईसम नगरांतील चोरांच्या मुसलमानी अड्ड्यांतून होतो.

१ अ ३. प्रत्येक मुसलमानास लहानपणापासून ‘काफिरांना मुसलमान कर’, असे धर्मांध शिक्षण देण्यात येत असणे ! : ‘तू एक-अर्धा, जो काही काफीर मुसलमान करत राहिलास, तर या लोकांत तुझा मान होईलच; पण परलोकीसुद्धा तुझ्या महापापांना क्षमा करण्यात येईल. तुला स्वर्गीय अप्सरा उपभोगासाठी मिळतील’, अशी शिकवण प्रत्येक मुसलमानाला लहानपणापासून देण्यात येते.

१ आ. मुसलमान चोरांच्या अड्ड्यांप्रमाणे हिंदु चोरांच्या अड्ड्यांवर मुसलमान चोरांचे धर्मांतर होत नसणेे : मुसलमानी चोरांच्या अड्ड्यांत गेलेल्या अनाथ, अपंग किंवा उनाड हिंदु मुलांना धाक दाखवून मुसलमान करण्यात येते. याउलट हिंदु चोरांच्या अड्ड्यांत एखादा मुसलमान मुलगा गेला, तर तो तेथे चोर आणि हत्या करणारा होईल, कारागृहात जाईल; पण मुसलमान धर्मापासून भ्रष्ट होईल, अशी भीती नसते !

२. मुसलमान चोरापेक्षा अल्प हानीकारक असल्याने धर्मांतरित हिंदु चोरालाही हिंदु समाजात परत घेणे आवश्यक !

गुन्हेगार वा लबाड, अशा कोणत्याही धर्मांतरित हिंदूला त्याचे शुद्धीकरण करून हिंदु समाजात समाविष्ट करून घेणे समाज आणि राष्ट्र दोघांच्याही दृष्टीने आवश्यक आहे; कारण तो चोर जरी असला, तरी मुसलमान चोराहून हिंदु धर्मास निश्चितच अल्प हानीकारक आहे.

२ अ. बाटलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात न घेतल्यास धर्मांतरितांच्या बीजापासून शत्रू निर्माण होण्याचा धोका ! : हिंदूंनी अशा लोकांना हिंदु धर्मात (स्वगृही) परतण्याची दारे बंद केली, तर १०० वर्षांनंतर त्या धर्मांतरितांच्या बीजापासून हिंदु धर्म, संस्कृती आणि समाज यांचे कट्टर शत्रू उत्पन्न होतील.

३. सावरकरांची चिकाटी आणि धाडसी प्रयत्न यांमुळे हिंदु बंदीवानांचे धर्मांतर होणे थांबणे !

सावरकरांनी अंदमानच्या वास्तव्यात मुसलमानांच्या या धार्मिक आक्रमणाला थोपवण्याचा आणि ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी करून दाखवला. यासाठी त्यांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागले. ‘मुसलमानांनी स्पर्श केलेले किंवा शिजवलेले अन्न खाल्ल्याने हिंदु पतित होऊन बाटला जातो’, ही हिंदु बंदीवानांच्या मनातील धारणा सावरकरांनी हळूहळू दूर केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर धर्मांतरितांना धाक, सक्ती आणि प्रलोभने दाखवत पुन्हा हिंदु धर्मात आणण्यास प्रारंभ केला.

४. प्रत्यक्ष शुद्धीकरण प्रक्रिया

४ अ. सावरकरांनी काही हिंदु धर्माभिमानी बंंदीवानांच्या साहाय्याने २ धर्मांतरित बंदीवानांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदु धर्मात परत आणण्याचे नियोजन करणे : कारागृहातील २५ वर्षांच्या एका धर्मभ्रष्ट केलेल्या बंंदीवानाचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे सावरकरांनी ठरवले. शुद्धीकरण करायचे, म्हणजे निश्चित कोणते कर्मकांड करायचे आणि तेसुद्धा अंदमानच्या मुसलमानबहुल अधिकार्यांच्या गराड्यात, हे ठरवतांना सावरकरांनी स्वतःच्या ओजस्वी वाणीच्या माध्यमातून त्याचा शुद्धीकरणविधी करायचे ठरवले.

याची कुणकुण लागताच आणखी एका बाटलेल्या कैद्याने ‘माझेही शुद्धीकरण करा’, असा आग्रह सावरकरांपाशी धरला. ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या न्यायाने त्या दोघांच्याही शुद्धीकरणाचा दिवस निश्चिात करण्यात आला. कारागृहातील एका हिंदु व्यक्तीनेे यात सहकार्य केले.

४ आ. प्रत्यक्ष शुद्धीकरण संस्कार गुपचूपपणे पार पाडणे : मुसलमान अधिकारी त्यांच्या सेवेत गुंतले असतांना सावरकरांनी या दोन तरुणांना एकीकडे नेऊन स्नान करावयास लावले. धूतवस्त्रे परिधान करून त्या दोघांनी तीन हिंदूंसमक्ष ‘आम्ही हिंदु धर्मात परत येऊ इच्छितो. आमचा स्वीकार व्हावा’, अशी विनंती केली. त्या दोघांना तुळशीपत्र खावयास दिले. गीतेतील काही श्लोकांचे आणि संत तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील एका अध्यायाचे सावरकरांनी केलेले पठण त्यांनी श्रवण केल्यावर त्यांचे शुद्धीकरण झाल्याचे घोषित करण्यात आले. या शुद्धीसंस्कारानिमित्त आधीच गुपचूप सिद्धता करून ठेवलेल्या शिर्याचा प्रसाद सर्व हिंदु बांधवांना वाटून शुद्धी संस्काराची सांगता करण्यात आली !

५. कारागृहातील शुद्धीकरणाने बंदीवानांत मोठी खळबळ उडूनही उघडपणे त्यास कुणीही विरोध करू न शकणे !

अंदमानातील मुसलमान बंंदीवान आणि अधिकारी हे सारे मुकाट्याने पहात होते, असे नाही; पण उघडपणे या शुद्धीकरणास विरोध करण्यास कोणीही धजावले नाही. त्यानंतर स्वा. सावरकर अंदमानात असेपर्यंत शुद्धीकरणाचा हा प्रवाह खळखळत आणि निनादत राहिला !’

– प्रा. अवधूतशास्त्री (मासिक ‘धर्मभास्कर’, जून २००५)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दूरदर्शीपणा आणि मराठीला जिवंत ठेवण्याची तळमळ !

सध्या कोकणात उर्दू शाळा भराभर वाढत आहेत. त्यासाठी सरकारी कोशांतून अनेक शिष्यवृत्त्या सढळ हातांनी मिळतात. आज ना उद्या उत्तरेची मुसलमानी भाषाच राष्ट्रभाषा करण्याची दुराग्रही लाट महाराष्ट्रातही सर्वत्र पसरून सहस्रो मुसलमान उर्दूस डोक्यावर घेऊन स्वतःच्या मातृभाषेच्या छातीवर नाचण्यास कमी करणार नाही. त्यांच्या सहवासात आपण वेळीच मराठीच्या दारावर कडक पहारा ठेवला नाही, तर उर्दू शब्दांचा धुडगूस चालू होऊन तिलाही सत्त्वहीन व्हावे लागेल. जे संकट १० वर्षांनी सर्वांनाच दिसणार आहे, ते आज आम्ही दृष्टोत्पत्तीस आणत आहोत; म्हणून आताच सावध होऊन मराठीला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे हाच शहाणपणा आहे.

– स्वातंत्र्यवीर सावरकर

(सावरकरांनी उर्दू भाषेच्या संदर्भात सांगितलेले भयाण वास्तव सत्यात उतरत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मान्यवरांनी काढलेले गौरवोद्गार !

१२ सहस्र पानांची निर्मिती करणारे सावरकर !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १२ सहस्र पानांच्या साहित्याची निर्मिती केली आहे, तर अन्य लेखकांनी स्वा. सावरकर यांच्यावर १२ सहस्र पाने साहित्याचे लिखाण केले आहे. असा जगातील हा एकमेव नेता आहे.’ – श्री. शरद पोंक्षे, सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत (५.५.२०१४)

‘जर आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा त्याग करून जीवन जगत राहिलो, तर येत्या १०० वर्षांत हिंदु राष्ट्र सोडाच, एक हिंदूही जिवंत रहाणार नाही.’ – डॉ. प.वि. वर्तक, ब्रह्मर्षी

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा केवळ अतुलनीय असाच होता; मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना आवश्यक तो मान आपण देऊ शकलो नाही. स्वतंत्र भारतात त्यांना जो मान मिळायला हवा होता, तो मिळाला नाही.’ – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर

सावरकरांनी तर मृत्यूला नेहमीच चिथावले होते. नेहमीच आव्हान दिले होते. मृत्यूसमवेत तर ते अगदी पोरक्यापासून दांडगाईने खेळत आले होते. फाशीचे खांब त्यांनी अनेकदा गदागदा हलवले होते. यमपाशाचे झोपाळे करून ते झुलले होते. मृत्यूच्या विक्राळ डोळ्यांकडे त्यांनी अनेकदा टक लावून पाहिले होते ! – पु.भा. भावे

राष्ट्रहिताच्या विचारार्थ प्रेरित करणारे सावरकर !

मुसलमानांच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी सावरकरांनी कंबर कसली. त्यांनी हिंदु महासभेच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थान पिंजून काढला. आपल्या बांधवांना सजग करून राष्ट्रहिताचा विचार करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी वस्तूस्थितीकडे पाठ फिरवून स्वप्नरंजनात रंगून जाण्याची चूक केली नाही. – श्री. दुर्गेश परुळकर

सावरकरांनी अर्थनीती, राजनीती समाजनीती आदी अनेक विषयांवर लेखन केले आहे. हे सर्व राष्ट्रवादाच्या भक्कम पायावर उभे आहे. अर्थात हा राष्ट्रवाद त्यांनी मांडलेला असल्यामुळे त्याला ‘सावरकरवाद’ असेही संबोधले जाते. हा एका परीने सावरकरांचा गौरवच नव्हे काय ? – डॉ. सच्चिदानंद शेवडे

‘रावणाच्या वधाविना रामाचे राज्य येऊ शकत नाही’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडन येथे गांधींना सांगितले होते; मात्र गांधी यांनी ते मान्य केले नाही. – श्री. संजय वैशंपायन, माजी अध्यक्ष, हिंदू महासभा, पुणे.(३१.१.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


क्रांतीची प्रेरणा देणारी वीर सावरकर यांची वास्तू आणि राष्ट्रकार्यासाठी झटतांना त्यांनी वापरलेल्या वस्तू यांचा छायाचित्रात्मक वृत्तांत !

  • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी कृतीशील होणे हीच सावरकरांना खरी मानवंदना ठरेल !

  • वयाच्या केवळ १५ व्या वर्षीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘सशस्त्र क्रांतीची शपथ घेणारे पहिले क्रांतीवीर’ सावरकर होते !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संग्रहित छायाचित्र

दादर (मुंबई) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान, वस्तू संग्रहालयातील त्यांच्या वापरातील वस्तू आणि त्यांचे हस्तलिखित वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहोत. या वस्तूंच्या माध्यमातून सावरकर आजही आपल्यात आहेत. त्यांच्या वस्तू केवळ प्रदर्शन म्हणून पाहणे नव्हे, तर त्यांतून सावरकर यांच्या प्रमाणेच राष्ट्रकार्यासाठी प्रेरित होणे आवश्यक आहे !

वाचनाचा पुष्कळ व्यासंग असणारे आणि म्हणून सर्वत्र धारदार लेखणीचे दर्शन घडवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
सावरकरांचा अमृत महोत्सव
सावरकर यांचे निवासस्थान
सावरकर यांनी वापरलेला कोट
सावरकरांचे हस्तलिखित
वीर सावरकर यांचा पंजाचा ठसा
सावरकर यांची गोल टोपी
चष्मा आणि चष्मा ठेवायची पेटी
सावरकर यांनी वापरलेले बूट

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात