Menu Close

खंडेरायाच्या आशीर्वादाने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे वीर उमाजी नाईक

थोरपुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन तिथीनुसार साजरे करायला हवेत. माघ शुद्ध पक्ष द्वितीया हा दिवस हिंदू तिथीनुसार आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा बलीदान दिवस. या महापुरुषाच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून घेऊया.

उमाजी नाईक

प्रस्तावना

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम बंड पुकारले म्हणून इंग्रजांनी त्यांना फितुरीने पकडून ३ फेब्रुवारी १८३२ या दिवशी फाशी दिली. देवतेच्या आशीर्वादामुळे उमाजी नाईक यांना इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारण्यास मोठे धैर्य मिळाले. आपला देश आणि धर्म यासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडाच्या क्रांतीची पहिली मशाल पेटवणारे उमाजी नाईक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिवीर ठरले !

लहानपणापासून शक्ति व भक्ति यांचे संस्कार

१७९१ मध्ये वज्रगडाच्या पायथ्याशी जांभूळवाडी येथे रामोशी कुळात उमाजी नाईक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पुरंदर किल्ल्याचे सरदार होते. लहानपणापासूनच उमाजी धाडसी व लढवय्या बाण्याचे होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आईने त्यांच्यावर संस्कार केले. धाडसी वृत्तीबरोबरच श्रद्धा आणि भक्ति यांचे बीज त्यांच्या मनात रुजवले. लहानपणापासूनच हत्यार चालवणे, व्यायाम करणे, घोडा फिरवणे या गोष्टींबरोबरच जेजुरीच्या खंडोबाच्या वार्‍या होत.

खंडेरायाच्या आशीर्वादाचा ताईत

दररोज व्यायाम झाल्यावर कर्‍हा नदीत स्नान करून ओलेत्याने घागरभर पाणी गडावर नेऊन ते खंडेरायाला आंघोळ घालायचे. एकदा नेहमीप्रमाणे देवाला आंघोळ घालायला जातांना मंदिराच्या बाहेर त्यांना एक म्हातारा दिसला. उमाजींनी मंदिरात जाऊन खंडेरायावर नेहमीप्रमाणे घागर ओतली. त्याला रानफुलांची माळ घातली आणि मनोभावे प्रार्थना करून ते बाहेर आले. बाहेर बघतात तर काय, बाहेर असलेला म्हातारा ओलाचिंब झाला होता आणि त्याच्या गळ्यात रानफुलाची माळ होती ! प्रत्यक्ष खंडेरायानेच त्यांना दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला ! रात्री उमाजींना स्वप्न पडले. देवाने दर्शन देऊन उजव्या दंडावर बांधण्यास भंडार्‍याचा ताईत दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी रात्रीचे शब्द आठवत उमाजी गडावर गेले. देवाच्या पायावर डोके ठेवले. खंडेरायाच्या मूर्तीतून एक तेजस्वी प्रकाश त्यांच्या अंगावर पडला. त्या तेजाने उमाजींचे डोळे दिपले. त्यांनी आपले डोके देवाच्या पायावर तसेच टेकवून ठेवले. थोड्या वेळ्याने भानावर आल्यावर बघतात तर देवाच्या पायाजवळ भंडार्‍याचा ताईत पडला होता. देवाला नमस्कार करून त्यांनी तो ताईत आपल्या दंडाला बांधला. इंग्रजी सत्तेला घालवायचा निर्धार केला.

त्या दिवसापासून उमाजींच्या अंगी हजार हत्तींचे बळ आले. इंग्रजांविरुद्ध लढण्याचा त्यांचा निर्धार पक्का झाला. इंग्रजी सत्तेला भारतातून हटवण्यासाठी त्यांनी सहकारी गोळा करण्यास सुरुवात केली. तीन-चारशे रामोशी तरुण त्यांना येऊन मिळाले.

क्रांति करायची, बंड करायचे, इंग्रजी सत्तेशी दोन हात करायचे, तर पैसा हवा, शस्त्रे हवीत. हे जाणून त्यांनी लूट करण्यास सुरुवात केली; मात्र सामान्य जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. इंग्रजांविरुद्ध बंड करायला निघालेला, गोर्‍या साहेबाची वाट अडवणारा म्हणून उमाजींची प्रसिद्धि होऊ लागली.

इंग्रजांविरुद्धचे बंड

भारतातील सर्व राजे-रजवाडे, जहागीरदार, सरदार आणि जनता यांना उद्देशून उमाजी नाईक यांनी ४ फेब्रुवारी १८३१ या दिवशी इंग्रज सत्तेविरुद्ध जाहीरनामा काढला. तो पुढीलप्रमाणे होता –

१. सर्व राजे, जहागीरदार, सरदार आणि इतर सर्वांनी इंग्रज अधिकारी भेटतील, तेथे त्यांना ठार मारावे.

२. ज्यांची वंशपरंपरागत वतने नष्ट झाली, त्यांनी प्रामुख्याने आम्हास साहाय्य करावे, त्यांची वतने परत देऊ.

३. सर्व लोकांनी एकाच वेळी दंगल उठवून द्यावी.

४. स्थापन झालेले शासन अशी हत्या करणार्‍या लोकांना इनाम देईल.

५. जे लोक इंग्रजी फौजेत अथवा चाकरीत आहेत, त्यांनी त्या सोडाव्यात आणि गोर्‍या अधिकार्‍यांची धरपकड करावी.

६. युरोपियन मालमत्ता, बंगले जाळावेत, लूट करावी.

७. कंपनी शासनाला दिला जाणारा कर ताबडतोब बंद करावा.

८. जे कोणी हा हुकूम मानणार नाहीत, त्यांना कडक शासन केले जाईल.

९. हिंदु असो वा मुसलमान सर्वांनी हा हुकूम मानून इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून द्या.

अशा प्रकारे सर्वसमावेशक स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढून उमाजी राजे नाईक यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले.

पैसा आणि फितुरीने घात केला

एवढे सगळे केल्यावर इंग्रज त्यांना कसे सोडणार होते ? धूर्त इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी कॅ. मॅकिन्टॉश यांना नेमले. या पिसाळलेल्या इंग्रज अधिकार्‍याने उमाजींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या; पण उमाजी त्यांच्या हाती येत नव्हते. त्यासाठी त्यांनी मोठमोठी बक्षिसे लावली. पैशापुढे इमान झुकत गेले. उमाजींचे साथीदार इंग्रजांना फितुर झाले. खोटेनाटे सांगून त्यांनी उमाजींना इंग्रजांच्या सापळ्यात नेऊन पोहोचवले. भोरजवळील उभोली गावात दबा धरून बसलेल्या इंग्रजांनी उमाजींना पकडले.

फाशीची शिक्षा

पुढे त्यांना पुण्यात आणून त्यांच्यावर खून करणे, दरोडे टाकणे, खंडणी गोळा करणे इत्यादि आरोप ठेवले. पुरावे, साक्षीदार गोळा करून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. काही संस्थानिक आणि सरदार इंग्रजांना फितूर झाले होते. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते त्यांच्या विरोधात गेले.

पण दक्षिणेचा वाघ गवत थोडेच खाणार होता ? उमाजी नाईक इंग्रजांसमोर नमले नाहीत. ते हसतमुखाने खंडोबाचे नामस्मरण करीत शिक्षेस सामोरे गेले. त्यांच्या गळ्यात फास अडकवण्यात आला. गळ्यात अडकवलेला फास एकदा नाही, तर चक्क दोन वेळा तुटला. कॅ. मॅकिन्टॉशला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने उमाजीला याचे कारण विचारले. तेव्हा उमाजी नम्रपणे उत्तरले, ‘साहेब, माझ्या दंडावरचा भंडारा माझे रक्षण करतोय.’ लगेचच उमाजीच्या दंडावरील भंडार्‍याचा ताईत तोडण्यात आला आणि उमाजीला पुन्हा फासावर चढवण्यात आले. पैशाने आणि फितुरीने उमाजीचा घात केला.

या महान क्रांतिवीराची आठवण म्हणून प्रतिवर्षी त्यांची पुण्यतिथि साजरी करण्यात येते. ज्या ठिकाणी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटने’च्या वतीने त्यांचे स्मारक उभारण्यात आले. उमाजी नाईक यांनी देशाकरीता केलेल्या या बलीदानास त्रिवार वंदन !

संदर्भ : सनातन प्रभात