नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट !

नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल.

१. सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हे सत्य असणे !

१ अ. सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे घाबरून ब्रिटनने भारत सोडला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगणे !

वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजींच्या अहिंसेमुळे ब्रिटीश भारतीय सेनेवर काही फरक पडणार नव्हता. भारतावरची सत्ता भारतीय सेनेविना दुसरे कुणीच काबीज करू शकणार नव्हते. ते काम सुभाषचंद्रांंनी केले; म्हणून ब्रिटनने भारत सोडला.

१ आ. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सेनेची इंग्रजांविषयीची राजनिष्ठा नष्ट केल्याने इंग्रजांनी भारत सोडल्याचे आणि गांधीजींच्या चळवळीचा इंग्रजांवर नगण्य परिणाम झाल्याचे क्लेमंट अ‍ॅटली यांनी सांगणे !

आंबेडकरांची ही मुलाखत झाल्यावर एकच वर्षानंतर वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र करण्याचा पंतप्रधान म्हणून ज्यांनी निर्णय घेतला, ते क्लेमंट अ‍ॅटली कोलकात्यास आले होते आणि राजभवनात राहिले होते. राज्यपाल जस्टिस पी.बी. चक्रवर्ती यांचे ते पाहुणे होते. या राज्यपालांनी पुढे स्वत:चे आत्मचरित्र लिहिले. त्यातील एक प्रसंग फार महत्त्वाचा आहे. त्यांनी अ‍ॅटलींना सरळ प्रश्‍न केला, गांधींनी वर्ष १९४२ मध्ये छोडो भारत चळवळ केली आणि ५ वर्षांत घाबरून इंग्रजांनी भारत सोडला. त्यावर अ‍ॅटली हसले आणि म्हणाले, आम्ही भारत सोडण्याचे एकच कारण होते. तुमच्या सुभाषचंद्र बोसांनी भारतीय सेनेची इंग्रजांविषयीची राजनिष्ठाच नष्ट केली. ज. चक्रवर्ती पुढे लिहितात, गांधीजींच्या चळवळीचा इंग्रजांवरील प्रभाव कितपत होता ?, असे मी अ‍ॅटलींना पुढे विचारले असता ते म्हणाले, अगदी नगण्य.

१ इ. सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांना ६ मासांत (महिन्यांत) भारत सोडण्यास सांगितले असता दबाव आणणे ही एक प्रकारची हिंसाच आहे, असे गांधींनी म्हणणे !

सुभाषचंद्र बोस आरंभीच्या काळात गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते; पण १९३० च्या दशकात त्यातील फोलपणा हळूहळू त्यांना समजू लागला. वर्ष १९३९ मध्ये त्यांची भाषा वेगळी होती. युद्ध चालू झाले होते. ६ मासांत (महिन्यांत) इंग्रजांनी भारत सोडावा, अशी निर्वाणीची चेतावणी (अल्टिमेटम) द्यायला काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र सिद्ध झाले होते. असा इंग्रजांवर दबाव आणणे, म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे, असे गांधीजी म्हणू लागले.

१ ई. गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या वागण्याने सुभाषचंद्रांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र देणे !

सुभाषचंद्रांनी गांधीजींचा उमेदवार असलेल्या श्री. सीतारामैय्या यांचा पराभव केला आणि ते पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आले. सुभाषचा विजय म्हणजे माझा पराभव आहे, असे स्वतः गांधीजींनीच मान्य केले. त्यानंतर गांधीजी, नेहरू आणि पटेल जो रडीचा डाव खेळले, त्याने उबग येऊन सुभाषचंद्रांनी त्यागपत्र दिले. त्यानंतर ते अदृश्य झाले अन् बर्लिन येथे प्रगट झाले.

१ उ. भारत छोडो आंदोलन म्हणजे गांधी आणि व्हॉईसरॉय यांनी केलेला कट असणे !

हम भी कुछ कम नहीं हे दाखवण्यासाठी गांधीजींनी भारत छोडोचे नाटक केले आणि सार्‍या काँग्रेस नेत्यांना एकाच वेळी कारागृहात टाकण्यास इंग्रजांना संधी दिली. अंतस्थ हेतू हा होता की, उद्या सुभाषबाबू आले, तर त्यांना कोणी काँग्रेसवाल्याने साथ देऊ नये. व्हॉईसरॉय आणि गांधीजी यांचा हा कट एका गोर्‍या स्त्री-दूताकडून शिजवण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे ही तथाकथित ऑगस्ट क्रांती ३ मासांत (महिन्यांत) मावळली. (त्यावर विसंबून वर्ष १९५२ च्या निवडणुकांच्या वेळी समाजवाद्यांनी पुष्कळ स्वप्ने रचली होती; पण त्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला आणि काँग्रेसची शेपूट धरूनच आपला प्रवास पुढे नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मराठी समाजवाद्यांना ही अक्कल जरा उशिराच सुचली.)

२. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यातील सुभाषचंद्रांचे योगदान

२ अ. आझाद हिंद सेनेची स्थापना

वर्ष १९४२ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांविरुद्ध शंख फुंकला आणि भारतीय सैनिक, स्त्रिया अन् युद्धकैदी यांतून ६० सहस्र लढवय्यांची एक मोठी सेना निर्माण केली. त्यात स्त्रियांचीसुद्धा एक बटालियन होती. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांचे म्हणणे होते, आता स्वातंत्र्याची भीक मागावी लागणार नाही, आता आम्ही स्वातंत्र्य खेचून आणू !

२ आ. आझाद हिंद सेनेचे कार्य

सुभाषचंद्रांनी स्थापन केलेल्या या सेनेेने जपानच्या साहाय्याने पूर्वोत्तर भारतावर आक्रमण केले. अंदमान, निकोबार बेटे या सेनेेने जिंकून घेतली. त्यानंतर कोहिमा आणि इंफाळ या भागांवर सेनेने चढाई केली. वर्ष १९४५ मध्ये अ‍ॅटमबॉम्बमुळे जपानला शरणागती पत्करावी लागली. आझाद हिंद सेनेेला मिळणारे जपानी साहाय्य बंद पडले. आझाद हिंद सेना शेवटपर्यंत लढली; पण रंगूनमध्ये तिचा पराभव झाला. त्यात आझाद हिंद सेनेचे २६ सहस्र सैनिक मारले गेले आणि २३ सहस्र युद्धबंदी बनले. रंगूनमधून सुभाषचंद्र निसटले. त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या आगीत भाजल्यामुळे त्यांना वीरमरण आले, ही बातमी किती खरी याविषयी शंका आहे.

२ इ. आझाद हिंद सेनेचा पराभव होऊनही देशात विजय झाल्यासारखे वातावरण असणे

सुभाषचंद्रांच्या मृत्यूनंतर युद्धबंद्यांवर राजद्रोह आणि हत्या यांचे आरोप लावण्यात आले आणि लाल किल्ल्यात त्यांच्यावर खटला चालू झाला. नेहरू आणि इतर काँग्रेसवाले यांनी युद्धबंद्यांना राजद्रोही न मानता वाट चुकलेले देशभक्त समजून त्यांना क्षमा करावी आणि त्यांना झालेली शिक्षा मागे घ्यावी, अशी मागणी केली. युद्धबंद्यांवर लावलेल्या आरोपांमुळे लोक चिडलेले होते. आझाद हिंद सेनेेच्या सैनिकांना निर्दोष सोडावे, अशी चर्चा सार्‍या भारतभर चालू होती. आमचा १ सैनिक गेला, तर आम्ही १० इंग्रज सैनिक मारू, अशी भित्तीपत्रके (पोस्टर्स) सर्वत्र लागली होती. आझाद हिंद सेनेचा भले पराभव झाला होता; पण सार्‍या देशाचा उत्साह पाहिला, तर त्यांचा विजय झाल्यासारखेच वातावरण होते.

२ ई. ब्रिटीश भारतीय सेनेतील नौदल, वायूदल आणि पायदळ यांतील सैनिकांनी बंड पुकारल्याने ब्रिटनने भारतातून वर्ष १९४८ च्या आधीच निघून जाण्याची घोषणा करणे

फेब्रुवारी १९४६ मध्ये ७८ जहाजांत विखुरलेल्या ब्रिटीश भारतीय नौदलाच्या २० सहस्र सैनिकांनी बंड पुकारले. त्यांनी त्यांच्या इंग्रज अधिकार्‍यांना बंदी बनवले आणि त्यांना जय हिंद म्हणायला भाग पाडले. या सैनिकांनी ब्रिटीश झेंडा उतरवून त्या जागी भारताचा तिरंगा झेंडा चढवला. या जहाजांना घेऊन नौदलाचे सैनिक मुंबई बंदरात आले. हे अल्प पडत होते म्हणून की काय, वायूदल (एअर फोर्स) आणि जबलपूरमधील पायदळ अशा दोन्ही दलांच्या सैनिकांनी बंड पुकारले. त्या सुमारास भारतात असलेल्या ब्रिटीश सेनेत ४० सहस्र इंग्रज सैनिक, तर २५ लक्ष भारतीय सैनिक होते. इंग्रज राजकारण्यांच्या लक्षात आले की, नीट वागलो नाही, तर ४० सहस्र इंग्रज सैनिकांची गत होळीतील नारळांप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. अ‍ॅटलीने त्यांच्या पार्लमेंटला सांगितले, आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत. भारत सोडण्याची सिद्धता चालू करणे किंवा भारतीय सैनिक आपल्याला कसे बाहेर काढतात, त्याची वाट पहात बसणे. अशी पाळी यायच्या आधीच अ‍ॅटलीसाहेबांनी वर्ष १९४७ च्या आरंभीच जाहीर केले की, ब्रिटन भारतातून वर्ष १९४८ च्या आधीच निघून जाईल.

२ उ. नेहरूंनी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे श्रेय सुभाषचंद्रांच्या आझाद हिंद सेनेऐवजी गांधींच्या चळवळीस देणे

नेहरूंनी हे श्रेय सुभाषचंद्रांना द्यायला पाहिजे होते; पण ते राजकारणी होते. राजकारणी श्रेय घ्यायचे जाणतो, द्यायचे नाही ! नेहरूंनी हे श्रेय सत्य आणि अहिंसा यांच्या आधारे गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या (?) स्वातंत्र्याच्या चळवळीस दिले. त्यांची री भारतीय इतिहासकारांनी गेली ६० वर्षे ओढली.

३. नेहरूंचा खरा रशियन अवतार लोकांना समजण्यासाठी

नेहरू कालखंडाचा पुनर्विचार होऊन त्याचे पुनर्वाचन आणि पुनर्लेखन होणे आवश्यक असणे !

नेहरूंनी काँग्रेसची शत्रू असलेल्या हिंदु महासभेला नष्ट केले आणि संघाला लुळे-लंगडे केले. संघाच्या माहात्म्याने जनसंघाच्या निर्मितीला आणि ऑर्गनायझर या मुखपत्राच्या प्रकाशनाला संमती दिली; म्हणून संघ टिकून आहे, एरवी गुरुजींचे सावरकर झाले असते ! गोडशांची जबानी दडपून टाकली, लोकांना दुसरी बाजू कळूच दिलीच नाही आणि औरंगजेबप्रमाणे एवढे धाकाचे वातावरण निर्माण केले की, वर्ष १९६२ पर्यंत विरोधी पक्ष पंगूच राहिला. हुकूमशहा म्हणून ख्याती प्राप्त झालेल्या इंदिरा गांधी यांनी प्रकटपणे आणीबाणी पुकारली, तर लोकशाहीचा मुखवटा घालणार्‍या नेहरूंनी अप्रत्यक्षपणे आणीबाणी पुकारली. या नेहरू कालखंडाचा पुनर्विचार होऊन त्याचे पुनर्वाचन आणि पुनर्लेखन झाले पाहिजे, तरच नेहरूंच्या लोकशाहीचा बुरखा फाडला जाईल अन् त्यांचा खरा रशियन अवतार लोकांना समजून येईल.

४. गेल्या ६० वर्षांत लिहिला गेलेला विकृत इतिहास

म्हणजे गांधी-नेहरू यांच्यावरील अंधप्रेमातून निर्माण झालेले साहित्य !

बुद्धीवादी ना.ग. गोर्‍यांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणहत्येला क्रांती म्हटले होते आणि अत्र्यांचे शिव्या-शाप मिळवले होते ! नेहरूंच्या कालखंडाचे पुनर्वाचन आणि पुनर्लेखन झाल्यास समाजवाद्यांनी गेल्या ५-६ दशकांत चुकीची केलेली निदाने त्या निमित्ताने बाहेर येतील ! गेली ६० वर्षे जो विकृत इतिहास लिहिला गेला, तो गांधी-नेहरु यांच्यावरील सरकारी अंधप्रेमातून निर्माण झालेले केवळ साहित्य होते !

– दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, मार्च २०१६) [ सनातन प्रभात ]