Menu Close

कारागृहातील सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारे थोर क्रांतीकारक जतींद्रनाथ दास !

jatindra_nath_das

जतींद्रनाथ दास यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९०४ या दिवशी कोलकाता येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी इंग्रजांविरुद्ध चालू असलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली. या आंदोलनाच्या अंतर्गत त्यांना २ वेळा कारागृहातही जावे लागले होते. तथापि त्यांचे मनोधैर्य जराही खचले नाही. दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांनी दक्षिण कलकत्ता तरुण समिती स्थापन केली. परिणामतः बेंगाल ऑर्डिनन्स या दंडविधानान्वये जतींद्रनाथांना पुन्हा कारागृहात डांबण्यात आले.

कारागृहातील छळाचा निषेध म्हणून त्यांनी अन्नत्याग केला. त्यानंतर त्यांची सुटका झाली खरी; पण त्यांना लाहोर कटात गोवून पुन्हा कारागृहात डांबण्यात आले. स्वातंत्र्यासाठी कारागृहात जाण्याची ही त्यांची ६ वी वेळ होती. तेथे राजकीय बंदींचा अतोनात छळ केला जात होता. त्यांना मारहाण तर करण्यात येत होतीच; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाई. घालायला पुरेशी वस्त्रेही दिली जात नसे. क्रांतीकारकांना मिळणार्‍या निकृष्टतम वागणुकीचा क्रांतीकारकांमध्ये संताप होता. अनेकांनी त्याविरोधात उपोषण आरंभिले होते.

सहकारी क्रांतीकारकांना छळणार्‍या इंग्रजांचा निषेध म्हणून जतींद्रनाथ दास यांनीही कारागृहातच उपोषण करण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत उपोषण चालू केले. क्रांतीकारकांचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कारागृहाच्या अधिकार्‍याने त्यांना उत्तम भोजन, दूध आदी दिले. तथापि सर्व क्रांतीकारक ते फेकून देत. त्यामुळे इंग्रजांनी हे आंदोलन बलपूर्वक चिरडण्याचा निश्‍चय केला. इंग्रजांनी क्रांतीकारकांचे हातपाय बांधून त्यांच्या नाकातून नळ्या घालून त्यांना अन्न दिले. जतींद्रनाथ यांनाही अशाप्रकारे अन्न देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जतींद्रनाथांनी यास तीव्र विरोध केला. त्यामुळे ७-८ जण त्यांच्या छातीवर बसले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या नाकात नळी घालून त्यांना बलपूर्वक दूध पाजले. त्या वेळी जतींद्रनाथ खोकले. त्यामुळे दूध त्यांच्या फुफ्फूसात जाऊन त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. आधुनिक वैद्यांना पुन्हा बलपूर्वक घशात दूध घालणे अशक्य झाले.

पुढे जतींद्रनाथ दास दिवसेंदिवस अशक्त होत गेले. हात हलवेना. अंगात त्राण नव्हते. शेवटी इंग्रजांनी त्यांना बाहेरील रुग्णालयात नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन देऊन सोडून देण्याचे ठरवले; पण जतींद्रनाथ यांनी खूण करून त्यास नकार दिला. त्या वेळी त्यांच्या खोलीतील अन्य क्रांतीकारकांनी पोलिसांना आमच्या मुडद्यांवरून त्यांना न्यावे लागेल, अशा शब्दांत ठणकावले.

१३ सप्टेंबर १९२९ या दिवशी त्यांच्या उपोषणाचा ६१ वा दिवस होता. त्या दिवशी त्यांच्या तोंडवळ्यावर एक वेगळी प्रसन्नता जाणवत होती. त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या भोवती जमा झाले. त्यांच्यापैकी एकाने वन्दे मातरम् हे गीत म्हटले. हे गीत पूर्ण झाल्यानंतर जतींद्रनाथ यांनी प्राण सोडले.

असा होता भारतमातेचा हा त्यागी सुपुत्र ! सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारा ! राजकीय बंदीचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्नीदिव्य करणारा ! त्यांची स्मृती भारतियांना अखंड स्फूर्ती देत राहील. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या होमकुडांत अशा नरश्रेष्ठांच्या आहुती पडलेल्या आहेत, हे सर्वांनीच विशेषत: तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात