प्राचीन देवस्थानांची दु:स्थिती आणि हिंदु संघटनांचे कर्तव्य !

अलीकडेच उत्तर भारताचा प्रवास झाला. तेथील काही प्राचीन देवस्थानांची दु:स्थिती पाहिल्यावर तेथील अपप्रकार (गैरप्रकार) थांबले पाहिजेत आणि त्यासाठी हिंदु समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी योगदान दिले पाहिजे, या उद्देशाने हा विषय येथे मांडत आहे.

येथे जी उदाहरणे दिली आहे, ती प्रातिनिधिक स्वरूपातील आहेत. त्यातून कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही, हे आपण समजून घ्याल, याची निश्‍चिती वाटते.

१. प्राचीन देवस्थानांत पुजार्‍यांकडून होणार्‍या अयोग्य कृती

मंदिरांमधील पुजारी हे त्या देवतेचे सेवक असतात; पण काही पुजार्‍यांमधील हा सेवाभाव नष्ट झाला आहे. अनेक ठिकाणी मूर्तीचे दर्शन हे पुजार्‍यांच्या अर्थार्जनाचे साधन बनले आणि त्यासाठी पुजारी प्रसंगी गुंडाप्रमाणे वागतात, याची प्रचीती ठिकठिकाणी येते.

अ. कृष्णभूमी वृंदावन येथील बांकेबिहारीच्या मंदिरांत मूर्ती पडदा ओढून झाकली जाते. दर्शनाला आलेल्या भाविकांना तेथील पुजारी किती रुपयांचा भोग लावणार, असे विचारतात. भाविकांनी १००, २००, ५०० असे पैसे दिल्यानंतरच पडदा काढला जातो आणि मूर्तीचे दर्शन दिले जाते. जी व्यक्ती पैसे देत नाही, तिला मूर्तीचे दर्शन मिळत नाही.

आ. अनेक मंदिरांमध्ये देवदर्शन लवकर होण्यासाठी पुजारी पैसे घेतात.

इ. आज हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना झटत आहेत. या धर्मकार्यार्थ मंदिरांचे योगदान आवश्यक आहे; कारण मंदिरे ही हिंदु धर्माच्या आधारशिला आहेत. आजच्या परिस्थितीत किती मंदिरांकडून या धर्मकार्याला साहाय्य मिळते ? सत्संग, प्रवचने इत्यादींसाठीही मंदिरे भाडे वसूल करतात. मंदिरे ही हिंदूंसाठी धर्मशिक्षण केंद्रे राहिलेली नसून व्यापारी केंद्रे बनली आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. अशा मंदिरांविषयी हिंदूंना जवळीक वाटेल का ?

ई. देवाला वहाण्यासाठी पुजार्‍याला केवळ फुले दिली, तर ते ती स्वीकारत नाहीत. पूजेचे संपूर्ण साहित्य आणण्यासाठी ते बळजबरी करतात. पुजार्‍यांकडे दिलेली फुले आणि हार ते मूर्तीवर लांबूनच फेकतात.

उ. देवळात पूजाअर्चा, ओटी भरणे यांसाठी असलेले पुजारी अत्यंत मळकट कपड्यांमध्ये आणि सतत पान-तंबाखू खात असतात.

२. तीर्थक्षेत्री असलेल्या मठ-मंदिरांतील काही साधूंच्या अयोग्य कृती

पुजार्‍यांप्रमाणे धार्मिक स्थळी वावरणारे कथित साधू-महंत हेसुद्धा विविध माध्यमांतून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.

अ. काही मठांमध्ये गुरुमंत्र देण्याच्या पाट्याच लावलेल्या असतात. रुपये २१, ५१, १०० इतके पैसे घेऊन गुरुमंत्र दिले जातात. पैसे घेऊन गुरुमंत्र देणारे खरे गुरु असतील का ?

आ. काही ठिकाणी साधू भस्म लावून, रुद्राक्ष माळा घालून भाविकांकडे पैसे मागत असतात. पैसे मिळेपर्यंत ते भाविकांची पाठ सोडत नाहीत. पैसे मिळावेत, यासाठी ते स्त्रियांच्या अंगाला कसाही स्पर्श करण्यासारखे गैरप्रकारही करतात.

३. मंदिरे अस्वच्छ करून मंदिरांचे पावित्र्य नष्ट करणारे धर्मद्रोही !

अ. बहुतांश मंदिरे अत्यंत अस्वच्छ आढळली. किमान गाभारा स्वच्छ ठेवण्याचे कर्तव्य पुजार्‍यांनी करायला हवे; पण गाभारा, मूर्तीच्या आजूबाजूचा परिसर, समया, पूजासाहित्य, हे सर्वच अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले. अशा ठिकाणी देवता कशा वास करतील ?

आ. गया येथील विष्णुपद मंदिरात असलेल्या विष्णुपदावर भाविक फळे, पूजासाहित्य आदी वस्तू अक्षरश: ओततात.

४. धार्मिक स्थळे अनिष्ट प्रकारांचा अड्डा बनत असणे

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार्‍या अनिष्ट प्रकारांमुळे तेथील पावित्र्य नष्ट होत आहे.

अ. काशी येथे अनेक स्वयंभू मंदिरे आहेत; पण तेथील बहुतेक मंदिरे सकाळी आणि संध्याकाळी १ घंट्यासाठीच (तासासाठीच) उघडतात आणि दिवसभर बंद असतात. याचे कारण म्हणजे दिवसभर तिथे भिकारी आणि दारुडे मंदिरांचा आश्रय घेतात आणि मंदिरे अस्वच्छ करतात. त्यामुळे मंदिरे बंद ठेवणेच तेथील पुजार्‍यांना सोयीचे वाटते.

आ. सर्वांत वाईट म्हणजे काशी येथील गंगातटावर अनेक कथित साधूंच्या झोपड्यांमध्ये विदेशी स्त्री-पुरुषांचा वावर असतो. येथील साधू गॉगल लावून या विदेशींसोबत सिगारेट ओढत बसलेले असतात. हे भोंदू साधू येणार्‍या-जाणार्‍या महिला भाविकांना खुणावून बोलावत असतात. हे साधू व्यभिचारी झाले आहेत. गंगेच्या प्रदूषणापेक्षा गंगेच्या काठांवर भोंदू साधूंनी निर्माण केलेले हे प्रदूषण अधिक गंभीर आहे.

तीर्थक्षेत्रांवरील देवस्थानांच्या अशा दुरवस्थेमुळे ज्या भावाने भाविक येतात, त्यांचा तो भाव नष्ट होतो. दर्शनातील आनंद मिळेनासा होतो, हे धार्मिकदृष्ट्या अतिशय गंभीर आहे; कारण भाविकांना दर्शनाचा आनंद मिळेनासा झाल्यास ते हळूहळू धार्मिक स्थळी यायचेच बंद होतील आणि त्यांचा आध्यात्मिक लाभ त्यांना मिळणार नाही. ही मोठी धर्महानी होईल.

५. तथाकथित संतमहंतांची दु:स्थिती !

५ अ. कुंभमेळ्यातील तथाकथित साधूंची दु:स्थिती !

सिंहस्थ कुंभमेळा ही हिंदूंसाठी पवित्र पर्वणी असते. या कुंभमेळ्यात येणार्‍या साधूसंतांकडे हिंदु समाज मोठ्या श्रद्धेने पहातो; मात्र कुंभमेळ्यातील काही साधूसंतांचे वर्तन हिंदु धर्माला काळीमा फासणारे आणि संत या पदवीचा अवमान करणारे असते, हे अलीकडे झालेल्या प्रयाग येथील कुंभमेळ्यात दिसून आले.

संत म्हणजे वैराग्य. स्पर्धा, ईर्षा, तुलना, देखावा यांतून अलिप्त झालेले जीव; मात्र कुंभमेळ्यात या उलट चित्र दिसून येत होते. कोणाचा तंबू अधिक मोठा; कोणी किती सजावट आणि विद्युत् रोषणाई केली; कोणाचे प्रवेशद्वार भव्य आणि मोठे (तसेच खर्चिक); प्रवेश कमानीवर कोणाचा झेंडा सर्वांत उंच; कोणी कोणते देखावे केले इत्यादी गोष्टी स्पर्धात्मक आणि आम्ही श्रेष्ठ या भावनेतून होत असल्याचे दिसून येत होते. हे करतांना अनावश्यक आणि अधिक पैसा व्यय होत होता.

५ आ. व्यावहारिक जीवनातील दोष कुंभक्षेत्रातील काही साधूसंतांमध्येही दिसून येणे !

कुंभमेळ्यातील काही साधूसंतांचे वर्तन हे राजकारणी आणि पुढारी यांच्याप्रमाणे असे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –

  • १. काही महंतांनी अवैधपणे लाल दिवे किंवा भोंगे (सायरन) असलेल्या गाड्यांचा वापर करणे
  • २. प्रसिद्धी मिळवण्यासाठी पत्रकारांना पैसे, भेटवस्तू आदी देणे
  • ३. विदेशी लोकांना आकर्षित करण्यासाठी विदेशी शिष्यांना महामंडलेश्‍वर करणे
  • ४. विजेचा झगमगाट आणि तंबूच्या सुशोभिकरणावर अनाठायी खर्च करणे
  • ५. गुटखा, तंबाखू, पान, गांजा इत्यादींचे सेवन करणे
  • ६. नागासाधूंनी पत्रकारांकडून पैसे घेऊन हवे तसे छायाचित्र / चित्रीकरण करून देणे
  • ७. ध्वनीक्षेपकांवर कर्णकर्कश आवाजात भजने किंवा मंत्र लावणे
  • ८. द्रोण, पत्रावळी, प्लास्टिकचे पेले इत्यादींचा कचरा इतस्तत: टाकणे

भगवे वस्त्र धारण करणे म्हणजे साधूसंन्यासी होणे नव्हे, तर वृत्ती आणि आचार मायारहित होणे म्हणजे खर्‍या अर्थाने साधूसंन्यासी होणे, हे कोणीच लक्षात घेत नाही.

५ इ. महंत, श्रीमहंत, मंडलेश्‍वर, महामंडलेश्‍वर यांची निवड आणि त्यातील भ्रष्टाचार !

साधनेत टप्प्याटप्प्याने प्रगती होत असते. क्वचित् एखाद्याची शीघ्र उन्नती होऊ शकते; मात्र महंताचा थेट मंडलेश्‍वर किंवा एखादी व्यक्ती थेट महामंडलेश्‍वर होणे यामागे अर्थकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे. महामंडलेश्‍वर होण्यासाठी किमान ५० लाख ते १ कोटी, तर जगदगुरुसारख्या पदावर आरूढ होण्यासाठी ५ ते ७ कोटी रुपये खर्च करणार्‍यांचा लगेच सोहळा होऊ शकतो, अशी माहिती एका मंडलेश्‍वराने सांगितली. ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत, त्यांनीच कोट्यवधी रुपये खर्चून अधिकार प्राप्त केल्याने आता पैशांची वसुली एवढेच कार्य ते करतात, अशी खंत व्यक्त करत त्यांनी ही माहिती दिली.

६. धार्मिक स्थळांची दु:स्थिती सुधारण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी करावयाचे प्रयत्न

हिंदु धर्माचा जबाबदार घटक म्हणून आपण सर्वांनी या समस्यांकडे गांभीर्याने पहायला हवे.

  • अ. आपल्या परिसरातील धार्मिक स्थळी अशा प्रकारची अपकृत्ये चालू असल्यात ती बंद करायला हवीत.
  • आ. संघटनेच्या माध्यमातून देवळांचे महत्त्व जनतेला सांगून तेथील पावित्र्य जोपासण्यासाठी लोकांचे प्रबोधन करायला हवे.
  • इ. मंदिर स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता यांसारखे उपक्रम चालू करायला हवेत.

अशा प्रकारे उपक्रम राबवल्याने भाविकांमध्ये हिंदु संघटनांविषयी विश्‍वास वाढेल.

७. मंदिरांचा लाभ घ्या !

या विषयाच्या निमित्ताने एक वेगळे सूत्र सांगावेसे वाटते की, धार्मिक स्थळांमधील पुजार्‍यांचे प्रबोधन करण्यासह त्यांना प्रतिदिन समष्टी साधना म्हणून देवळातील पूजेनंतर देवतेला भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करा ! यामुळे तीर्थक्षेत्रांवरून प्रक्षेपित होणार्‍या दैवी शक्तीचे बळ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणार्‍या आपणा सर्वांना मिळेल.