Menu Close

सोलापूर येथील अवैध चर्च अंततः बंद ! – हिंदु संघटनांकडून कारवाईचे स्वागत

धर्मांतराच्या आरोपांची सखोल चौकशी करून फसवणूक करणार्‍या मुख्य सूत्रधाराला अटक कधी केली जाणार ? – हिंदू संघटनांचा प्रश्न

सोलापूर – येथील बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या अवैध चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अंततः टाळे ठोकले. या कारवाईचे हिंदु जनजागृती समितीसह हिंदु राष्ट्र सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने स्वागत केले; मात्र केवळ वास्तू बंद करून विषय संपवू नये, तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. प्रकाश आसादे, अधिवक्ता चंद्रशेखर वारद, श्री. राजन बुणगे, श्री. रवी गोणे, श्री. आनंद मुसळे आणि कु. वर्षा जेवळे

या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष श्री. रवी गोणे, शहर संघटक श्री. आनंद मुसळे, श्री. प्रकाश आसादे, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, कु. वर्षा जेवळे आणि ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता चंद्रकांत वारद उपस्थित होते.

संघटनांनी केलेल्या आरोपांनुसार दत्तात्रय कानेपागूल हे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक म्हणून कार्यरत असून त्यांनी ‘हिंदु मोची’ जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवल्याचा दावा करण्यात आला. ख्रिस्ती धर्म स्वीकारून ‘येहान मार्क’ या नावाने ते ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’च्या चर्चचे पाद्री म्हणून कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांची चौकशी करून अपप्रकार आढळल्यास त्यांना सेवेतून काढून टाकावे आणि त्यांनी घेतलेले शासकीय लाभ अन् वेतन यांची रक्कम परत घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सोलापूर येथील चर्च ‘सील’ करतांना सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी

समाज मंदिराचा अवैध वापर, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि धर्मांतराच्या आरोपांचीही चौकशी करावी, अशी मागणी संघटनांनी केली. कारवाई करणार हे लक्षात येताच चर्चवरील ‘क्रॉस’ काढून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी, तसेच ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा कारभार, नोंदणी आणि समाजमंदिराच्या वापराच्या संदर्भातील कागदपत्रे यांची संबंधित विभागांनी पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या समवेत गरीब आणि भोळ्या हिंदूंना आर्थिक आमीष दाखवून धर्मांतराच्या जाळ्यात ओढले जात असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करावी. या प्रकाराच्या मागे नेमके कोण आहेत ?, त्यांना आर्थिक साहाय्य कुठून मिळते ? याचेही अन्वेषण करावे, तसेच राज्यातील अन्य ठिकाणी समाजमंदिरांचा अशा प्रकारे अपवापर होत असल्यास त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी संघटनांनी केली. या सर्व प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने विलंब केल्यास हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना या संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी या पत्रकार परिषदेत देण्यात आली.


१ जुलै

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि महापालिका सेवकाची गैरकृत्ये यांची चौकशी होणार !

सोलापूर महापालिका आयुक्तांच्या पाठोपाठ राज्य सरकारही कृतीच्या पावित्र्यात

सोलापूर – शहरातील बापूजीनगर येथील शासकीय समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे ‘चर्च’ म्हणून वापर करणे, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि हिंदु आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणार्‍या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागूल उपाख्य येहान मार्क कानेपागूल याच्या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचा आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे. या संदर्भात आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचा लेखी आदेश दिला आहे.

विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर करतांना हिंदु जनजागृती समितीचे पदाधिकारी

या प्रकरणाविषयी हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पाठपुरावा केला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूरचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. महानगरपालिका आयुक्त आणि राज्यमंत्री या दोघांनीही एकाच वेळी चौकशीचे चक्र फिरवल्यामुळे आता या प्रकरणाची सर्व अंगाने चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय वास्तूवर थेट अतिक्रमण

सोलापूर महानगरपालिकेने शासकीय समाजमंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराची मुदत संपलेली आहे, तसेच मूळ कराराच्या अनेक अटी धाब्यावर बसवून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे ‘चर्च’चे स्वरूप देणे हे थेट ‘कायदेशीर अतिक्रमण’ ठरते. परिसरातील लोकांना ध्वनीक्षेपकाच्या मोठ्या आवाजामुळे त्रास देणे, गरीब हिंदूंचे धर्मांतर करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे आदी अनेक गैरकृत्ये तेथे होत असल्याच्या तक्रारी आहेत.

महापालिका सेवक कानेपागूल याने ‘हिंदु मोची’ समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली; मात्र सद्य:स्थितीत त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून तो ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा मुख्य ‘पास्टर’ (धर्मप्रचारक) म्हणून काम पहात आहे. शासकीय सेवेत राहून दुहेरी लाभ घेणे, हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे.

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव

या सार्वजनिक समाजमंदिरात स्थानिक नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो. त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपक लावून हिंदूंच्या देवतांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या

‘जिजस गॉस्पल सोसायटी’चा महानगरपालिकेच्या सोबतचा भाडेकरार रहित करून त्याला त्वरित टाळे ठोकावे आणि सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’चा भंग केल्याप्रकरणी महापालिकासेवक कानेपागूल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. यासोबतच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून शासनाची फसवणूक केल्याविषयी त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत. 

‘‘प्रशासन आणि विधी व न्याय राज्यमंत्री यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुढील १५ दिवसांत संबंधित अनधिकृत चर्चची वास्तू ‘सील’ करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल’’, अशी स्पष्ट चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.

Latest News