
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश सरकारने श्रीकृष्ण जन्माष्टमीला मिळणारी शासकीय सुटी रहित केली आहे. त्यामुळे हिंदू दुखावले आहेत. ढाकेश्वरी मंदिर, चित्तगाव, सिलहट यांसह अनेक मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
१. ‘ढाका ट्रिब्यून’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार या वर्षी २ जानेवारी या दिवशीच बांगलादेशात सरस्वती पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गाष्टमी आणि बुद्ध पौर्णिमा यांच्या दिवशी मिळणार्या सरकारी सुट्या रहित करण्यात आल्या होत्या. हिंदूंनी याला तीव्र विरोध केला आहे.
२. देशातील वृत्तपत्र ‘प्रोथोम आलो’च्या वृत्तानुसार या वेळी मंदिरांमध्ये जन्माष्टमीचे उत्सव, तर होतील; परंतु १० दिवसांपूर्वीपासून बाजारपेठांमध्ये जो उत्साह पहायला मिळायचा, तो या वेळी दिसत नाही. बांगलादेशात एक वेळ अशी होती, जेव्हा हिंदूंच्या सणांसाठी मंदिरांमध्ये मोठा उत्साह असायचा आणि मोठे उत्सव अन् मिरवणुका निघायच्या; पण आता देशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळासारखा उत्साह दिसत नाही.
३. बांगलादेश हिंदू जागरण मंचचे प्रवक्ते निहार हलदर म्हणाले की, अजूनही समाजात भीतीचे वातावरण आहे. काही मंदिरांमध्ये जन्माष्टमीला मिरवणुका काढल्या जातील; परंतु बहुतांश ठिकाणी पूर्वीसारखा रंगतदार उत्साह रहाणार नाही.
मंदिरांमध्ये सुरक्षेची विशेष व्यवस्था ! – बांगलादेशाचे गृहमंत्री
बांगलादेशाचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी सांगितले की, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून मंदिरांसाठी विशेष सुरक्षा दल तैनात केले जाईल.







