Menu Close

पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था

  • महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि नागरिकांमधील राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव ! 

  • फुटलेले विद्युत् दिवे, तुटलेले पुतळे, परिसराची समाजकंटकांकडून मोडतोड

शून्य मैलाचा दगड

पुणे – पुणे महापालिकेने रेल्वेस्थानकाजवळील मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘झिरो माईल स्टोन’चे ६ सप्टेंबर २०१९ मध्ये पुनरुज्जीवन केले होते. दुर्मिळ आणि प्राचीन वडाच्या सान्निध्यात मोठी रक्कम व्यय करून येथे ग्रॅनाईटच्या शिलांवर उठावदार तोंडावळे कोरले होते, तसेच फायबरच्या व्यक्तीरेखा बसवण्यात आल्या होत्या. पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या या परिसराची सध्या दुरवस्था झाली आहे. येथे बसवण्यात आलेले विद्युत् दिवे फुटले आहेत, येथील पुतळे तुटलेल्या अवस्थेत असून परिसराची समाजकंटकांकडून मोडतोड करण्यात आली आहे. इंग्रजांच्या काळापासून असलेला आणि पुण्याच्या वैभवांपैकी एक असलेल्या या वारसाची दुरवस्था होऊन महापालिका प्रशासन मात्र त्यासाठी काहीच करण्यास सिद्ध नाही, हे दुर्दैव आहे.

प्रारंभी या दगडाची जागा दुर्लक्षित होती. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा दगड पदपथाच्या खाली अर्ध्याहून अधिक गाडला गेला होता. काही जागरूक लोकांनी हा विषय पुणे महापालिकेच्या वारसा समितीकडे मांडला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये याचा जीर्णाेद्धार करण्यात आला. या आयताकृती रचनेवर ठिकाणांची नावे कोरलेली आहेत. त्या काळी बसवण्यात आलेल्या दिव्यांमुळे हे स्थळ रात्रीच्या वेळी उजळून निघत असे. येथे देण्यात आलेली माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून जॉन की यांच्या ‘द ग्रेट आर्क’ या पुस्तकातील उतारे उभ्या फलकावर मुद्रित करून शून्य मैलाच्या दगडामागील इतिहास स्पष्ट केला आहे. हा वारसा पुढे येण्यासाठी ‘हिंदुस्थान टाइम्स’चे माजी संपादक श्री. अभय वैद्य यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता.

श्री. अजय केळकर

काय आहे शून्य मैलाचा दगड ?

बहुतेक मोठ्या शहरांमध्ये एक संदर्भ बिंदू असतो, जिथून इतर शहरांमधील आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणांमधील अंतरे मोजली जातात. प्रमुख शहरांमधील अंतरे या संदर्भ बिंदूपासून निश्चित केली जातात. हा संदर्भ दगड सर्वेक्षण आणि नकाशे बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले मापदंडसुद्धा प्रदान करतो. पुण्यातील शून्य मैलाच्या दगडांवर सिंहगड, पौड, पुरंदर, सोलापूर, आळंदी, नाशिक, बेंगळुरू यांसारख्या ठिकाणांचा उल्लेख आहे. वर्ष १८७२ मध्ये इंग्रजांच्या काळात जेव्हा ‘टपाल कार्यालय’ बांधण्यात आले, तेव्हा हा दगड उभारण्यात आला.

महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष आणि मोडतोड !

अशा या ऐतिहासिक वारशाकडे सध्या पूर्णत: दुर्लक्ष झाले असून परिसरात बसवलेल्या जवळपास सर्व फायबरच्या पुतळ्यांची मोडतोड करण्यात आली आहे. रात्रीच्या अंधारात माहिती कळण्यासाठी जे दिवे लावले होते, ते सर्व तोडण्यात आले आहेत. पुतळ्यांवर ख्रिस्ती धर्मांतराच्या सभांचे पत्रक चिकटवण्यात आले आहे, पक्षांना खायला घालण्यासाठी शून्य दगडावर धान्य ठेवले असून परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. खरे पहाता पहिल्यांदा याची दुरवस्था होण्यास प्रारंभ झाल्यावरच ‘सीसीटीव्ही’ लावणे, सुरक्षा रक्षक ठेवणे, तसेच अन्य काही उपाययोजना महापालिकेने करणे अपेक्षित होते; मात्र यातील काही एक महापालिकेने केले नाही, तसेच पुण्यातील वारसा जतन करण्याऐवजी त्याची मोडतोड करण्यातच नागरिकांनी धन्यता मानली !

शून्य मैलाच्या दगडाचा जिर्णाेद्धार केला, त्या वेळी बसवण्यात आलेली कोनशीला
शून्य मैलाच्या दगडाच्या येथे माहिती देण्यासाठी लावलेल्या चौकोनी दगडांवर बसवलेल्या विद्युत् दिव्यांची केलेली मोडतोड
शून्य मैलाच्या दगडाजवळ असलेल्या पुतळ्यांची झालेली दुरवस्था
शून्य मैलाच्या दगडाजवळ असलेल्या पुतळ्याजवळ ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी असलेल्या व्याखानाचे लावलेले पत्रक, हातात लावण्यात आलेली प्लास्टिकची पिशवी

चांगल्या अशा ऐतिहासिक वारसाचे जतन न होणे, हे दुर्दैवी ! – अभय वैद्य, माजी संपादक, हिंदुस्थान टाइम्स

पुण्यातील ऐतिहासिक वारसांपैकी एक असलेल्या ‘शून्य मैलाचा दगड’ आणि परिसराची सध्या झालेली दुरवस्था पहावत नाही. राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा एका वास्तूची देखभाल दुरुस्ती प्रशासनाकडून होऊ नये, हे दुर्दैवी आहे. आताच्या तरुण पिढीनेही अशा गोष्टींचे जतन कसे होईल ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून याची दुरुस्ती करावी आणि सुंदर असा वारसा चांगल्या स्थितीत लोकांसमोर यावा !

शहराची ओळख असलेल्या वारसाचे जतन-संवर्धन होणे अत्यावश्यक ! –  डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक

‘शून्य मैलाच्या दगडा’ला १५० वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे. हा दगड, म्हणजे शहराचा केंद्रबिंदू आहे आणि तो शहराची ओळख आहे. त्यामुळे हा इतिहास जपणे, हे  प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा दगड, म्हणजे पुण्याचे मानचिन्ह आहे. त्यामुळे याचा योग्य पद्धतीने सन्मान केला गेला पाहिजे. शहराची ओळख असलेल्या वारसाचे जतन-संवर्धन होणे अत्यावश्यक असून त्यासाठी टपाल खाते आणि महापालिका प्रशासन यांनी पुढाकार घ्यावा !

Read more on Exclusive Articles

Latest News