Menu Close

स्वरा अहमद यांनी क्षमा मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा यांची चेतावणी

अभिनेत्री स्वरा फहाद अहमद हिने ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जोहार’वरील आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

नवी देहली – अभिनेत्री स्वरा फहाद अहमद (पूर्वश्रमीची स्वरा भास्कर) हिने ‘पद्मावत’ चित्रपटात जोहार दाखवल्यावरून केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी म्हटले आहे की, जर तिने त्वरित क्षमा मागितली नाही, तर तिच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलले जाईल.

अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद हिने ३१ ऑगस्ट रोजी ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हटले, ‘२०१८ मध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट पाहत असताना मी पाहिले की त्यात सर्व महिला जौहर करत आहेत. तेव्हा मला असे वाटले की, देवाच्या कृपेने एखादी बलात्कार पीडित महिला जर हा चित्रपट पाहत असेल, तर हा चित्रपट तिला काय शिकवण देईल? तिला स्वतःला ती ‘कायर’ (भित्री) भासेल. तिला असे वाटेल की तिने आपल्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण दिले नाहीत. आपल्या समाजात आधीच बलात्कार सर्वत्र असताना, तुम्ही पीडित महिलांना हेच सांगू इच्छिता का की तुम्हाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही?’

आम्ही केवळ बोलत नाही, आम्ही कारवाई करतो ! – अधिवक्ता अमिता सचदेवा

अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ‘पद्मावत’ चित्रपट कशावर आधारित होता, हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक होते. तुम्हाला हे ठाऊक होते की, यामध्ये राणी पद्मावती आणि चित्तोडच्या त्या महिलांचे शौर्य अन् बलीदान दाखवले गेले आहे, ज्यांनी पकडले जाणे आणि अपमानित होण्यापेक्षा जोहारचा मार्ग निवडला. तुम्हाला हे ठाऊक होते. तरीसुद्धा तुम्ही ते वक्तव्य केले. तो कोणताही गोंधळ नव्हता. ती जाणीवपूर्वक शब्दांची केलेली निवड होती. आता स्वरा अहमद क्षमा मागण्याऐवजी त्यांच्या विधानाचे चुकीचे भाषांतर केल्याचे कारण देत आहे. जर खरोखरच तुम्हाला असे म्हणायचे होते की, पीडितांना जगण्याचा अधिकार आहे, तर राणी पद्मावती यांचे नाव आणि त्यांचा जोहार यात न ओढताही हे सांगता आले असते; पण तुम्ही तसे केले नाही. त्यामुळे आताच क्षमा मागा. ही विनंती नाही. आम्ही केवळ बोलत नाही. आम्ही कारवाई करतो. यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. कारणे सांगणे बंद करा. राणी पद्मावती यांच्या सन्मानात त्या महिलांची क्षमा मागा, ज्यांनी आगीत उडी घेऊन प्राण दिले  आणि ज्यांचा इतिहास तुम्ही इतक्या हलक्यात घेतला.

जोहार ही त्या काळातील, इतिहासाची सत्यता ! – ‘पद्मावत’ चित्रपटाचे सह लेखक प्रकाश कपाडिया यांची स्पष्टोक्ती

‘पद्मावत’ चित्रपटाचे सह लेखक प्रकाश कपाडिया

‘पद्मावत’चे सह लेखक प्रकाश कपाडिया यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही आमचे संशोधन आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या गोष्टींच्या आधारेच चित्रपट बनवला. प्रत्येक व्यक्ती चित्रपटाकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाते. आम्ही जे दाखवले, ज्यामध्ये जोहारच्या दृश्याचाही समावेश आहे, ती त्या काळातील सत्यता होती. आता ती पालटली जाऊ शकत नाही. परिस्थिती ‘करा किंवा मरा’ अशी होती. मला वाटते की, हे व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असते. जर चित्रपट चांगलाही असेल आणि तुम्ही तो वाईट मनःस्थितीत पाहिला, तर तो तुम्हाला निरुपयोगीच वाटेल. ‘तुम्ही त्याकडे एक प्रेक्षक म्हणून पहात आहात की, त्यात काही वादग्रस्त किंवा नकारात्मक शोधण्याच्या उद्देशाने पहात आहात ?’, हा हेतूही येथे महत्त्वाचा आहे. पद्मावतच्या संदर्भात तर लोकांनी चित्रपट पहाण्यापूर्वीच आक्षेप घेतला होता आणि रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. तीच चर्चा वर्षांनंतरही चालू आहे, तर मी काय सांगू शकतो, लोकांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या.

हिंदु धर्मावर आक्षेपार्ह टीका करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! अन्यत्रचे अधिवक्त्ता आणि हिंदू यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

Latest News