उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी

पणजी – मागील काही वर्षांपासून गोवा राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात आणि विक्री यांवर शासनाने बंदी लागू केलेली असतांनाही इतर राज्यांतून गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आणून त्यांची विक्री निर्बंध न पाळता गेल्या वर्षीपर्यंत चालूच होती. गोवा राज्य प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने या बंदीची प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी श्री. अंकित यादव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. अनिता नाईक, मानसी चोपडेकर आणि सौ. रुक्मिणी रायकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. अंकित यादव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवतांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची गोव्यात आयात होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशाच स्वरूपाचे एक निवेदन हिंदु जनजागृती समितीने पेडणे तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांना दिले आहे.

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनात पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचा प्रसार करणे, शाडूमातीच्या मूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवणे, गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात व्हावे, यासाठी काळजी घेणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात आणि विक्री यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्पादन शुल्क विभाग, व्यावसायिक कर विभाग अन् पोलीस यांचा समावेश असलेल्या विशेष कृतीदलाची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.







