Menu Close

कॉमेडी शो – हास्य की अश्लीलता ? मनोरंजनाच्या नावाखाली मर्यादांचे पतन !

आजच्या डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. सामाजिक माध्यमे, ओटीटी मंच, यूट्यूब आणि थेट कार्यक्रम (Live Shows) यांच्या माध्यमातून विनोदी कलाकारांना लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. हास्य हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. ते ताण कमी करते, मन प्रसन्न ठेवते आणि समाजाला सकारात्मक दृष्टीकोन देते. मात्र दुर्दैवाने आज विनोदाचा स्तर झपाट्याने घसरताना दिसत आहे. अनेक तथाकथित विनोदी कलाकार अश्लीलता, अभद्र भाषा, धार्मिक श्रद्धांची टिंगल, व्यक्तींचा अपमान आणि सामाजिक मूल्यांचा अवमान यांनाच विनोदाचे स्वरूप देत आहेत.

हास्याचा खरा उद्देश काय ?

हास्याचा उद्देश समाजाला आनंद देणे, जीवनातील विसंगतींकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी देणे आणि सकारात्मक विचारांना प्रेरणा देणे हा आहे. भारतीय साहित्य, नाट्यपरंपरा आणि लोककलेत विनोदाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी केला जात असे. विनोद म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा, धर्माचा, संस्कृतीचा किंवा सामाजिक मूल्यांचा अपमान नव्हे.

आज मात्र याच्या उलट चित्र दिसते. साध्या, सुसंस्कृत विनोदाऐवजी अश्लील टिप्पणी, द्विअर्थी संवाद, शिवीगाळ आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने यांनाच लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे समाजातील विनोदाची समज विकृत होत चालली आहे.

तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम

सामाजिक माध्यमांमुळे अशा कार्यक्रमांचा सर्वाधिक प्रभाव तरुणांवर पडतो. लोकप्रिय कलाकार अश्लील भाषा वापरताना पाहून अनेक तरुण त्यालाच आधुनिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक मानू लागतात.

त्याचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात –

  • सुसंस्कृत संवादाची परंपरा कमकुवत होते.
  • महिलांप्रती आदरभाव कमी होतो.
  • धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची टिंगल सामान्य वाटू लागते.
  • सामाजिक संवेदनशीलता कमी होते.
  • मनोरंजनाच्या नावाखाली विकृत मानसिकतेला प्रोत्साहन मिळते.

काही गाजलेले वाद

अलीकडच्या काळात काही स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि सांस्कृतिक परंपरांशी संबंधित विषयांवर विनोद केला जात आहे. मनोरंजनाच्या नावाखाली अनेकदा समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावणारे प्रसंग सादर केले जात असून त्यावर तीव्र आक्षेप नोंदवले गेले आहेत.

प्रणित मोरे प्रकरण

१. विनोदी कलाकार प्रणित मोरे यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. प्रेक्षकांशी संवाद साधताना (Crowd Work) गुरुग्राम येथील एका युवकाने एका युवतीवर ₹३७० ची बिर्याणी खर्च केल्याचे सांगत, त्याबदल्यात तिच्याकडून शारीरिक संबंधांची अपेक्षा असल्याचा सूचक उल्लेख केला. या विधानावर मंचावर हशा पिकवण्यात आला.

वादाचे मूळ कारण ₹३७० ची बिर्याणी नव्हते; तर एखाद्या महिलेवर काही पैसे खर्च केल्याने तिच्या शरीरावर किंवा इच्छेवर अधिकार मिळतो, अशी मानसिकता यातून सूचित होत होती. प्रणित मोरे यांनीही या आक्षेपार्ह विधानाला विरोध न करता त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. अनेकांनी याकडे महिलांच्या सन्मान, संमती (Consent) आणि प्रतिष्ठेविरोधी मानसिकतेचे उदाहरण म्हणून पाहिले.

२. त्याच कार्यक्रमात मुंबईतील केईएम रुग्णालयाशी संबंधित डॉ. सेजल पवार यांनी देहदानातून मिळालेल्या मृतदेहांच्या आंतरिक अवयवांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. कार्यक्रमात त्यावर विनोद करण्यात आला. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्राचा आणि देहदानासारख्या पवित्र सेवाकार्याचा हा अवमान असल्याची भावना व्यक्त झाली.

या प्रकरणामुळे स्त्रीद्वेषी विचारसरणी आणि लैंगिक दबाव सामान्य ठरवणारी मानसिकता विनोदाच्या माध्यमातून समाजात कशी पोसली जाऊ शकते, हे अधोरेखित झाले.

रणवीर अलाहाबादिया आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वाद

विनोदी कलाकार समय रैना यांच्या India’s Got Latent या यूट्यूब कार्यक्रमावर अश्लील भाषा, अभद्र टिप्पणी आणि सामाजिक मर्यादांचे उल्लंघन केल्याचे आरोप वेळोवेळी झाले आहेत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये एका भागात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांनी एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांशी आणि लैंगिक संबंधांशी संबंधित अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र, आसाम आदी राज्यांत तक्रारी आणि गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर समय रैना यांनी कार्यक्रमाचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवले.

या कार्यक्रमातील अनेक भागांमध्ये लैंगिक विषय, द्विअर्थी संवाद, शिवीगाळ आणि वैयक्तिक टिप्पणी यांनाच विनोदाचा आधार बनवण्यात आला होता. टीकाकारांच्या मते, मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारे मर्यादा ओलांडणे तरुण पिढीला चुकीच्या दिशेने नेत आहे.

मुनव्वर फारुकी यांच्याकडून हिंदू श्रद्धास्थानांचा अवमान

मुनव्वर फारुकी यांच्या काही कार्यक्रमांवर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप झाले आहेत. विविध संघटनांच्या मते, त्यांच्या काही विधानांतून हिंदू श्रद्धास्थानांची आणि सांस्कृतिक प्रतीकांची टिंगल करण्यात आली. एका कार्यक्रमात त्यांनी माता सीता आणि प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विनोद केला होता.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य आहे का ?

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा महत्त्वाचा अधिकार आहे; मात्र प्रत्येक अधिकारासोबत उत्तरदायित्वही असते. कोणाच्या श्रद्धा, संस्कृती, नैतिकता किंवा सामाजिक भावना दुखावून मिळवलेली लोकप्रियता निरोगी समाज घडवू शकत नाही.

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि इतर दृश्य माध्यमांसाठी नियमनाची व्यवस्था आहे; त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणाऱ्या सार्वजनिक विनोदी कार्यक्रमांसाठीही आचारसंहिता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

समाजाने काय करावे ?

निरोगी विनोदसंस्कृती विकसित करण्यासाठी –

  • साहित्य वाचनाला प्रोत्साहन द्यावे.
  • नाट्य, वक्तृत्व आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन वाढवावे.
  • तरुणांमध्ये संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित करावी.
  • सुसंस्कृत आणि विचारप्रवर्तक विनोद करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.
  • अश्लीलता आणि अपमान यांनाच मनोरंजनाचे मापदंड मानणाऱ्या प्रवृत्तीला विरोध करावा.

खरा विनोद तोच, जो माणसाला हसवण्याबरोबरच विचार करायलाही भाग पाडतो. समाजाला जोडणारा विनोदच श्रेष्ठ; समाजात फूट पाडणारा नव्हे.

अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमांवर नियंत्रण आवश्यक ! – डॉ. मनीषा कायंदे

याच संदर्भात शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्या आणि मुख्य प्रतोद डॉ. मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अश्लील आणि अनैतिक संवादांनी भरलेल्या स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमांवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच अशा कार्यक्रमांना सेन्सॉर मंडळाची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

त्यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे –

  • प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमातील अश्लील टिप्पणींचा समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • अवयवदान आणि देहदान यांसारख्या सामाजिक अभियानांची प्रतिमा मलिन होऊ शकते.
  • सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणारे असे कार्यक्रम अश्लीलतेला चालना देत आहेत.
  • केवळ व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून समस्या सुटणार नाही.
  • भविष्यातील अशा कार्यक्रमांसाठी नियमन आणि पूर्वतपासणीची व्यवस्था आवश्यक आहे.

या संदर्भात राज्य शासनाने आवश्यक धोरण आखून संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली असून पत्राची प्रत राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही पाठवली आहे.

निष्कर्ष

हास्य हे समाजाचे आरसे आहे; मात्र जेव्हा ते अश्लीलता, अपमान आणि विकृतीचे माध्यम बनते, तेव्हा त्याचे परिणाम दूरगामी आणि गंभीर ठरतात. मनोरंजन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. विनोदाची समृद्ध परंपरा जपण्यासाठी कलाकार, प्रेक्षक आणि शासन या तिन्ही घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडली, तरच सुसंस्कृत, संवेदनशील आणि मूल्यनिष्ठ समाजाची निर्मिती होईल.

Latest News